सुप्तनाते

गंगाधर मुटे जे न देखे रवी...
सुप्तनाते

तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे? धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते 'मेड इन चायना' किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, "अभय" व्यर्थ गेली तुझी साधना
                                                                - गंगाधर मुटे
-------------------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय:

8 टिप्पण्या 1,513 दृश्ये

Comments

निश नवीन

गंगाधर मुटे साहेब, अतिशय मस्त व छान कविता / गझल आहे. चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते मेड इन चायना किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना ह्या तुमच्या ओळी अतिशय जबरदस्त विचार करायला लावणार्‍या झाल्या आहेत. निवळ्ळ लाजवाब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

सर्वच ओळी पुन्हा पुन्हा वाचाव्या अशा. -दिलीप बिरुटे

योगप्रभू नवीन

मुटेसाहेब.. सुरेख कविता आहे. पण या कवितेच्या निर्मितीप्रेरणेविषयी काही लिहा ना. कविता कशी स्फुरली, त्यावेळी मनाची आंदोलने कशी होती, हे प्रत्यक्ष कवीकडून ऐकणे हा त्या काव्याचा परिपूर्ण आस्वाद ठरतो, असे मला वाटते.

परिकथेतील राजकुमार नवीन

कविता एकदम फक्कड हो. आवडेश. तुम्ही नियमीत लिहित नाही येवढीच खंत आहे.