Skip to main content

घेऊ कसा उखाणा ..?

लेखक मनीषा
Published on बुधवार, 14/12/2011
बरं का मंडळी ...... एकदा एका गावात .. मोठी लगीन घाई झाली पायताणं नाही कुणाच्या .. पायामध्ये राहिली । फेटे आणि मुंडाशी .. डोईवर चढली बिलवर , पाटल्या संगे .. नथ ही झुलली । जिलब्यांची रास .. श्रीखंडाचा घास रंगीत रांगोळीची .. पंगतही सजली । नाव घ्या, नाव घ्या .. मंडळी बोलली नवी नवी पाटलीण .. गालातच हसली । घेऊ कसा उखाणा .. (तिला) कोडं पडलं नवं कोणाचं नाव ? .. आणि कसं बाई घ्यावं? । सगळे म्हणती बाई .. लाजू नको काही नाव घे झोकात .. आणि सांग काही-बाही । पाटलीण बोलली लाजून .. घेते मी नाव मान तुमचा राखून ताई, माई, अक्का जरा ... घ्याल ना सांभाळून ? । पदराला सावरित मग .. पाटलीण हळू बोले रावांचे घेऊ? पंतांचे घेऊ ? .. का घेऊ दादांचेच नाव पहिले ? । (१) लहानशा या गावात .. किर्ती दादांची मोठी दहा, पंध्रा वर्सं झाली .. पार केली साठी । आपल्या हातान मोडली .. आधाराची काठी आंब्याचा गर फेकून .. राखून ठेवती बाठी । गवगवा मोठा .. जरी काम थोडं फार दादांच्या नावाचा .. दरारा फार फार । (२) घंटा वाजवून देवासमोर .. दंडवत कुणी घाली तासभर प्रवचन देऊन .. पंत बसलेत खाली । डोळे मिटून अर्धे .. पाहती दक्षिणेची थाळी नजरेनेच जोखती पंत .. किती जमले तांदूळ-डाळी ? । कुणाचे काय ? .. आणि कशाचे काय ? बघता बघता पंतांचे .. नेहमीच फाटक्यात पाय । (३) पंत पडले म्हणून म्हणे .. चढले आहेत राव हात ठेवून तोंडावर .. हसतोय सारा गाव । माडी बांधून झोकात .. होते, मिरवीत येथे राव त्या साठी टाकून काडी .. जाळलाय त्यांनी गाव । फसलाय पाय आता .. गुंते झालेत फार राव जरा कमी खा .. वाढलाय भुईचा भार । गुणाचे आहेत राव मोठे .. नाव मोठं अन लक्षण खोटे सार्‍यांना माहित गुपित त्यांचे .. नफ्याशी त्यांचे साटेलोटे । काय राव ? कस्सं राव ? .. कुणालाच काही नाही ठाव ? माइक घेऊन सांगा जरा .. आहे काय तुमचा भाव ? उखाणे ऐकता ऐकता पंगत सारी रंगली । कुणाला नाही कळले वेळ वरातीची टळली ।। सजलेली घोडी अन उभे बँण्ड वाले । हात धुण्यासाठी सारे वर्‍हाडी पांगले ।।
लेखनविषय:

याद्या 6391
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

सजलेली घोडी अन उभे बँण्ड वाले । हात धुण्यासाठी सारे वर्‍हाडी पांगले ।। क्या बात!! :) :)