चला कॅरावके शिकुया...!

गंगाधर मुटे जे न देखे रवी...
चला कॅरावके शिकुया...!

                           आज ज्या विषयाला मी हात घालतोय, त्याला काय म्हणावे, माझे मलाच कळत नाही. संगीत विषयाचा फ़ारसा अभ्यास नाही, गायनायोग्य आवाज नाही आणि तरीही संगीताच्या एका पैलूचे मुखदर्शन इतरांना करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रारंभीच एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांना माझ्याएवढी किंवा माझ्यापेक्षा संगीताची अधिक जाण आहे त्यांनी या लेखाच्या अजिबात वाटेला जाऊ नये. मात्र ज्यांनी कॅरावके हा शब्ददेखील अजून ऐकलेला नाही त्यांनी मात्र अवश्य हा लेख वाचावा आणि उदाहरणादाखल जे गीत दिले आहे तेही जरूर ऐकावे.

                      गेली दोन वर्ष आंतरजालावर वावरतांना ठळकपणे माझ्या एक बाब लक्षात आली की, अनेकांकडे सुंदर आणि सुमधूर आवाज आहे. त्यांनी जर कॅरावके तंत्र अवगत केले तर त्यांना संगीताचा अमर्याद आनंद लुटता येऊ शकेल. स्वत:च्या आवाजात अत्युत्तम संगीतसाजासह गाणी रेकॉर्डींग करता येऊ शकेल. स्वत:च स्वत:ची गाणी ऐकून किंवा इतरांना ऐकवून स्वर्णिम आनंदाचे क्षण मिळवता येऊ शकेल.

                        पूर्वीच्या काळी प्रथम गीत लिहिले जायचे. गीतकाराने लिहिलेल्या गीताला त्यानुरूप संगीतकार चाल लावायचेत. लावलेल्या चालीशी सुसंगत वाद्याची निवड करून संगीत दिले जायचे. पण काळानुरूप त्यात बरेच बदल होत गेले आणि बरीच उलटापालट झाली. सर्वप्रथम संगीतकाराच्या डोक्यात घोळत असलेली चाल संगीतबद्ध करून त्या संगीतात आणि चालीत फ़िट बसेल असे गीत गीतकाराने लिहायचे, अशी एक नवी पद्धत विकसीत झाली. कॅरावके प्रकारही काहीसा याच प्रकारात मोडणारा आहे. 

                           लोकप्रिय गाण्यांच्या चालींना संगीतबद्ध करून ते प्रथम रेकॉर्डींग केले जाते. त्यानंतर गायकाने संगीतातील रिकाम्या जागा हेरून, त्याला साजेशा स्वरूपात आपला आवाज मिसळून त्यानुरूप गायचे, यालाच कॅरावके तंत्रज्ञान म्हणतात. 

                                आजकाल बाजारात बर्‍याचशा गाण्यांच्या कॅरावके सिडी उपलब्ध आहेत. तुमच्या आवडत्या चालीतील कॅरावके संगीत शोधा, थोडेसे परिश्रम घेऊन संगीतामध्ये आपला आवाज मिसळून गाणी म्हणून बघा. आपणही हा प्रयोग अवश्य करून बघाच. आणि संगीताचा आनंद लुटा....!

उदाहरणादाखल मी १९८० च्या सुमारास लिहिलेले 

"मना रे" आणि "हे जाणकुमाते"  ही दोन भक्तीगीते सिनेसंगीताच्या चालीत साग्र संगीतात गाण्याचा प्रयत्न केलाय.
*   *   *
हे जाणकुमाते

हे जाणकुमाते, हे जाणकुमाते
तुझ्या दर्शनास मी आलो मा, पुजा घेऊनी
या पामरास दान द्यावे,  दर्शन देऊनी  ॥धृ०॥

मनमोगर्‍याचे फ़ूल मी हारास आणिले
गुंफ़ूनी भाव भोळा मी चरणी वाहिले  ॥१॥

मुर्ती तू साजरीशी, डोळ्यात साठली
स्वप्नात मुर्त आज मी तुझीच पाहिली ॥२॥

येते सदासदा मुखी, तुझेच गूण ते
अरविंदही मनोमनी, तुलाच गाईते    ॥३॥

                          - गंगाधर मुटे  "अरविंद"
------------------------------------------

------------------------------------------

मना रे मना रे....!

मना रे मना रे, नको आडराना 
जाऊ सोडोनी सतमार्गा ॥धृ०॥

घर तुझे नाशिवंत असे हे रे
आशा मनिषा काम क्रोध सोयरे हे
देह हा जाईल, आत्मा हा राहिल
असे तुझा कोठे वास रे ॥१॥

तुझे हाती जीवनाची नाव ह्या रे
तोलुनिया संयमाने हाकार रे
भरतीही येईल, ओहोटीही जाईल
आला भोग संयमाने भोग रे ॥२॥

वासनेच्या आहारी तू जाऊ नको
पाप भरले जहर तू पिऊ नको
संग असा घेई जो, मोक्षपदा नेई जो
"अरविंदा" चढवी तू साज रे ॥३॥

                   - गंगाधर मुटे  "अरविंद"
------------------------------------------

------------------------------------------

------------------------------------- 
      पूर्वप्रकाशित लेख

दीपज्योती ई-दीपावली अंक २०११
 -------------------------------------
वर्गीकरण
लेखनविषय:

8 टिप्पण्या 1,731 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

कॅरावकेची माहिती आवडली. त्याचबरोबर तुम्ही ते 'जानकुमाते' वो महेबुबाच्या चालीवर बसवलं ना माझी हहपुवा झाली राव. :) दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

प्रास नवीन

हे भन्नाट आहे हो.... तुमच्या गाण्याच्या उत्साहास सलाम! :-)

गणपा नवीन

अवो जरा त्या साईट चे पत्ते पण द्या की जिथुन या कॅरावके डाउन लोडवता येतील. शेजारी पाजारी काही बेणी सध्या लैच त्रास देत आहेत ऐकवतोच त्यांना माझ्या आवाजातली काही सुमधुर गाणी. ;) खरच कुणाकडे अश्या साईटचे पत्ते असतील तर मला हवे आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by गणपा

>>>>>अवो जरा त्या साईट चे पत्ते पण द्या की जिथुन या कॅरावके डाउन लोडवता येतील. असेच म्हणतो. माझाही गोड आवाज चेक करीन म्हणतो. :) -दिलीप बिरुटे

स्मिता. नवीन

सिनेमातील गाण्यांच्या चालीवर भक्तिगीते गाणे हा प्रकार मी आधीही पाहिलेला आहे. मी लहान असताना माझ्या आजीसोबत घराजवळच्या देवळात एकादशीची भजनं, काकड आरती, इ. करता जात असे. तेव्हा तिथं येणार्‍या एक आजी सगळी भजनं छान-छान चालीवर म्हणायच्या. तेव्हा मी बरीच लहान असल्याने जुनी सिनेमाची गाणी फारशी ऐकलेलीच नव्हती. पण मोठी झाल्यावर जेव्हा जेव्हा ती गाणी ऐकायचे तेव्हा तेव्हा देवळात ऐकलेली भजनंच तोंडात यायची ;) बाकी त्या आजी आणि त्यांच्या तोंडाचा पट्टा 'धडाडीचा' असल्याने बाकीच्या आज्यांना हे पटत नसलं तरी कोणी त्यांना तसं सांगू शकत नव्हतं ;)