अरे ऊठ ऊठ, जरा डोळे बंद कर
हो हो, जरा डोळे बंद कर
डोळे उघडलेस की तू तुझ्या त्या नेहमीच्या जगात जातोस
तिकडे सगळ्या प्रकारची दुखणी आहेत, त्रास आहेत
भरीत भर म्हणून झुरळं-ढेकूण-पिसवा-डास आहेत
त्यापेक्षा तुझे डोळे असे मिटलेलेच राहू देत
बाहेरच्या जगाशी सगळे बंध तुटलेलेच राहू देत
चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू
चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू
इथलं जग आहे कुठल्या तरी वेगळ्याच रंगांनी रंगवलेलं
तुझ्या मनाच्या आतल्या कोपर्यात तूच कधीतरी गोंदवलेलं
त्या रंगांची उधळण तू तुला हवी तशी कर
इकडची वस्तू तिकडे तुला हवी तशी कर
चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू
चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू
अरे तू फक्त सांग, तुला पाहिजे तसं घडेल
तुझ्या खिडकीचं दार कदाचित दूरवरच्या गुहेत उघडेल
त्या गुहेमध्ये अश्याच स्वप्नाळू लोकांची वस्ती आहे
बाहेर काहीही घडो, त्यांना कुणाची धास्ती आहे?
चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू
चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू
ते बघ, तो पहिलास का? तिकडे एक निळा डोंगर आहे
त्याच्याकडे जाणारी ती पायवाटसुद्धा किती सुंदर आहे
त्या डोंगरावर चांदिची झाडं आणि त्यांना सोन्याची फळं लागलीयेत
तुला दूरवरून पाहताच ती तुला बोलवायला लागलीयेत
चल आमच्या बरोबर, सगळं विसरशील मग तू
चल ना रे स्वप्नांच्या गावाला, सगळं विसरशील बघ तू
चल तर आमच्या बरोबर, मग तुला परत जावंसंच वाटणार नाही
इथली रसाळ फळं सोडून बाकी काही खावंसंच वाटणार नाही
त्या रंगीत प्रकाश सोडणार्या फुलपाखरांच्या मागे पळत राहशील
हत्तीच्या सोंडेची घसरगुंडी करून त्यावरच खेळत राहशील
आकाशातला चंद्रच इथे होडी बनून येईल
समुद्राच्या लाटांवरून तुला अलगद घेऊन येईल
त्या समुद्राच्या लाटाच पुढे वहात वहात जातात
आणि मध्येच मधीतरी एका उंच धबधब्यातून खाली पडतात
रात्रीच्या वेळी काजवे तिथे इतका प्रकाश सोडत असतात,
कि त्या धबधब्याच्या मधून एकशे आठ इंद्रधनुष्य दिसतात
त्या इंद्रधनुष्याची शिडी करून तो धबधबा चढून जायचा
चल चल, लवकर चल, नाही तर उशीर व्हायचा!
तो -
अरे हाड!!! जा तिकडे, तुमचं स्वप्नांचं जगच रंगवत बसा
काय मिळतं रे तुम्हाला, दुसर्यांच्या स्वप्नात जाऊन?
काय मिळतं तुम्हाला, खोटी सुखं दाखवून?
रियॅलिटीत या रे रियॅलिटीत या
हिंमत असेल तर इथले भोग भोगून दाखवा
पण तुम्हाला तरी इथल्या भोगांची काय कल्पना असणार!
तुम्ही फक्त तुमचं रंगीबेरंगी जगच रंगवत बसणार!
तुम्हाला कोणती जीवघेणी दुखणी नाहीत,
तुम्हाला कुणाचे शिव्याशाप नाहीत
रियॅलिटीत या रे रियॅलिटीत या
हिंमत असेल तर इथले भोग भोगून दाखवा
पण एक लक्षात ठेवा,
जोवर डोळे बंद आहेत ना, तोवरच तुमचं अस्तित्व
एकदा डोळे उघडले की खरे त्रास सुरू होतात
डोंगराचं काय घेऊन बसलात, चार जिने चढून धापा लागतात
शरीराचे लाड पुरवण्याकरिता शरीरच झिजवावं लागतं
पोट भरण्या अगोदर ते कष्टाच्या घामाने भिजवावं लागतं
स्वप्नातलं लाईफ कुठे हार्ड असतं?
स्वप्नात कधी कुणाकडे रेशनकार्ड असतं?
स्वप्नात असतात सगळेच समोरासमोर, तिथे टेलिफोन किंवा फॅक्स नसतो
रंगीबेरंगी धबधब्याचं पाणी पिण्यावर म्युन्सिपाल्टीचा टॅक्स नसतो
तुमच्या त्या चांदीच्या झाडावर चढल्यावर कधी फांदी तुटत नाही
सोन्याचं फळ कितीही उंचावरून पडलं तरी ठिकर्या होऊन फुटन नाही
तुम्ही स्वप्नातच जगा आणि स्वप्नातच मरा
नाहीतर जा, कुठल्यातरी शुष्क माणसाच्या स्वप्नात जाऊन ओलाव्याचे रंग भरा.
- पुष्कर
वाचन संख्या
1340
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
लिहायचं राहिलं
लिहायचं राहिलं