म्हणून.....
माझे एक सीनिअर आणि एक उत्तम कवी असलेले पण माझ्यासारख्या नवख्या कवीला मित्र मानणारे श्री.महेश घाणेकर यांनी मला तू "मुक्तछंदात पण लिही , उगीचच यमकात स्वतःला जखडून घेऊ नकोस !" असे स्पष्टपणे सांगितले.ते सांगणे आज जे लिहिण्याचा प्रयत्न करतोय त्यात उतरले असावे अशी दाट शंका मनात आहे.....बघा , जमलय का ते !
म्हणून.....
ए , तुझ्या जाड वेणीवर मस्त गजरा माळू ?
नाही, मला काही हौस नाहिये ,
ती वेणी एकटीच उदास वाटत्येय ना, म्हणून !
रात्रभर मोगर्यातली ती वेणी सोडू?
मोकळे करू का लांबसडक काळेभोर केस तुझे?
नाही , न पिता नशा चढावी ना , म्हणून !
श्रावणसरीत अबोली साडीत भिजलेली तू ,
थरथरत्या तनूला कवेत घेऊ का?
नाही , 'पाऊस केंव्हा "जीवाचा मैतर" वाटतो ?'
हे कळावं ना, म्हणून !
घरच्या सुती साडीत , श्रांत अशी तू
डोळा लागलेल्या तुला निरखत बसू?
नाही , "निरागसता" कशी दिसते?
हे दिसावं ना , म्हणून !
तुझा माझा लग्नातला फोटो ,
त्यातील तुझ्या ओठांवर ओठ टेकू ?
नाही , 'खरं प्रेम कसं असतं?'
हे नातवांनी हळूच बघावं ना , म्हणून !
त्या शाल्मलीच्या डोळ्यांवरून
माझी नजर हटत नाहिये !
त्या तू दान दिलेल्या डोळ्यांत काजळ घालू ?
नाही , तुझ्या (फक्त या) डोळ्यांना माझीच नजर लागेल ना !
......स् स् .....म्हणून गं सखे , .....म्हणून !
लेखनविषय:
याद्या
1560
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
खूप छान
छान सल्ला आहे !
In reply to खूप छान by शुचि
माझ्या डोळ्यात
In reply to छान सल्ला आहे ! by उदय सप्रे
छान