१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.
उजवीकडे सिद्धगड, त्याच्या मागे भीमाशंकर, समोरचा दमदम्या, बाजुला आहुपे गावाकडे वर जाणारी घाटवाट, त्याही बाजुला दुर्ग, अजून पलिकडे, जीवधन, नानाचा अंगठा अशी सगळी ओळखपरेड सुरू असतांनाच, या सर्व उत्तुंग भिंतींवरूनही डोके वर काढून आकाशात घुसलेले एक रूंद शिखर दिसते.