संस्थेत आमची प्राथमिक मुलाखत झाली. आमचं मूल दत्तक घेण्याचं कारण, त्यामागची मानसिकता, आमची मानसिक-आर्थिक तयारी, दत्तक मुलाची प्रक्रिया, त्यासाठीची कागदपत्रे, सगळी माहिती देण्यात आली. जवळपास दोन तासांचं ते मार्गदर्शन होतं. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं - दत्तक मूल मिळण्यास किमान दीड वर्षाचा कालावधी लागतो. दत्तक घेऊ इच्छिणारे पालक "वेटिंग लिस्ट'वर आहेत!
दीड वर्षं हा कालावधी आमच्यासाठी अगदीच अनपेक्षित, प्रदीर्घ होता. आमचं दोन मुलांमधल्या अंतराचं नियोजन बोंबललं होतं. म्हणजे मनस्वी साडेचार वर्षांची होईपर्यंत तरी तिला भाऊ मिळणार नव्हता. तोपर्यंत गावभर बोंब करून कुणाला सांगणंही योग्य नव्हतं.