वाळवणं म्हणजेच काय तर अडीअडचणीला उपयोगी पडणारे पदार्थ. आदिमकाळात जेव्हा मानव शिकार करू लागला, शेती करू लागला तेव्हापासून तो धान्य, वस्तू साठवायला शिकला. पदार्थ जास्त दिवस टिकण्यासाठी ते मीठात खारवून ठेवणे, वाळवून ठेवणे यासारख्या पद्धतींचा अवलंब करू लागला, आणि हीच पद्धत आपण आजपर्यन्त चालू ठेवलीय.
उन्हाळा आणि वर्षभराचे वाळवणं यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. वर्षंभराचे हे पदार्थ करण्यासाठी प्रत्येक घरातील बायका पदर खोचून कामाला लागतात. मला आठवतं, आम्हालाही त्यात छोटी-छोटी काम सांगितली जायची. सगळ घरच या वाळवणाच्या तयारीला लागायचे.
मी मुळची खान्देशी, फेब्रुवारीपासूनच ऊन तापायचे.