निळसर छटा अपरिहार्य...
कित्येकदा आपल्या आयुष्यातल्या अभावांची आपल्याला जाणच नसते. दुखऱ्या नसेला स्पर्श होईस्तोवर आपल्याला इथंही दुखतं आहे, हे समजतच नसतं. त्या दुखण्याला आपल्या असण्यात सामावून घेत निमूट विनातक्रार वाट चालत असतो आपण. एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही.
या जागांचं ऋणी असावं की शाप द्यावेत त्यांना? हा ज्याच्या त्याचा निर्णय. आपापल्या वकुबानं आणि जबाबदारीनं घेण्याचा.
मिसळपाव

गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु