'एका नवीन देवस्थानाचा जन्म' ही व्यंकटेश माडगूळकरांची एक जमलेली कथा आहे. माणदेशातील एका लहानशा गावात ही कथा घडते. जून महिन्यातल्या एका सकाळी त्या गवात एक भला मोठा वानर येतो. वैराण, रखरखीत माणदेशात झाडेझुडे कमीच, त्यामुळे असले प्राणी बघायची काही त्या गावकर्यांना सवय नसते. त्यातून हा वानर चक्क मारुतीच्या देवळातच घुसतो. आणि मग येऊन एका झाडावर निवांत ऊन खात बसतो. हे बघणार्या गावकर्यांना मग तर काय साक्षात हनुमान आपल्या गावात आला असे वाटायला लागते. पण शाळेला येणार्या मुलांपैकी एक गुलाम मुलगा त्या माकडाला एक भिर्रकन धोंडा फेकून मारतो. मग तो माकड चिडतो आणि उंच पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतो.