स्वरराधा
भैरव वा भटियार
पहाट फुलवत येती,
स्पर्श जणू कान्ह्याचे
राधेला उठवुन जाती.
ठाऊक तिला सारंग
माध्यान्ही झुलवत येतो,
"गंध" न त्यास स्वत:चा
तरि वृंदावनी घमघमतो.
यमन असा कान्ह्याचा
यमुनेचे श्यामल पाणी.
निनाद गोघंटांचा
सांज करी कल्याणी.
मालकंस वा जोग,
अमृत बरसे गात्री.
कान्ह्याच्या ओठी वेणू
तिच्याचसाठी रात्री.
कणकणात भिनली आहे
मल्हाराची आस,
मेघ पेटवून जातो
मयूरपंखी प्यास.
पण सूर भैरवीचा का
राधेला माहीत नाही?
युगे उलटली, अजुनी
राधा तर वाटच पाही..
काव्यरस
मिसळपाव