मलाही एकदा मृद्क्कण बनून
गरारा वार्यावर भरारायचय
खूप खूप उंच जाऊन
एकदा त्या आभाळाला शिवायचं
नात, मुलगी, बहिण, प्रेयसी
मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय
हात पसरून खुल्या मनान
फक्त मी म्हणून जगायचंय
बांधीव उंबरा ओलांडून
मला स्वत:ला ओळखायचंय
मोकळा मोकळा श्वास घेऊन
मनावरल मळभ पुसायचंय
तो उंबरा ओलांडताना
मन स्थिर ठेवायचंय
खोल काही तुटेल आत
तरी स्वत:ला सावरायचंय
स्वैर करताना संचार
जगापासून अलिप्त राहायचंय
सारे सारे तुटतील आधार
तरी स्वप्नांना जगवायचंय
त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन
वेड्यासारख त्यांमागे धावायचंय
सारी सारी बंधने झुगारून
फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय