वाट फुटेल तिथे २

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
16 Feb 2008 - 6:00 am

रत्नागिरी आणि मुर्डेश्वर

२ ऒक्टोबर २०००.
सकाळी पाचला उठून पावणेसहा सहाला फ़िरायला बाहेर पडलो. ना-या हॉटेलातच थांबला. ना-याला उशिरा उठायला आवडते. त्यामुळे मी व जाड्या दाढी व्यायाम व आंघोळ आटोपेप-यंत त्याला झोपायला मिळते. जाड्याला जास्त वेळ व्यायाम करावा लागतो. मला कमी. त्यामुळे त्याचा व्यायाम होईपर्यंत माझी दाढी व आंघोळ होते. आश्हा तर्हेने एक बाथरूम आम्हा तिघांना पुरते. अद्याप हॉटेलचे सर्व कर्मचारी झोपले होते. मराठी माणसाच्या या होटेलात साडेसहाला न्याहारी वा चहा सोडाच बिल मिळाले तरी खूप. मुंबईसारखीच घामट पण शुद्ध हवा. कुंद वातावरण. पण माझ्या उत्साहावर या गोष्टी पाणी ओतू शकत नाहीत. माझा रथ सदैव चार अंगुळे वरच. बोलण्यात आचरटपणा भरपूर. आचरटचार्य आश्ही पदवीच आहे माझ्याकडे. जाड्या अविद्यापीठाची. जाड्याच्या जिभेवर सदैव सरस्वतीचे नृत्य. साहजिकच सगळ्यांनाच चेव येतो. न्याहरीसाठी चांगले आरोग्य भुवन कोठे आहेत हे पाहून ठेवले. आज न्याहारी व दुपारचे जेवण याऐवजी ब्रंच घेऊन कालचा बॅकलॊग भरून काढू आसे ठरवीत होतो. अपेक्षेएप्रमाणे न्याहारी मिळाली नाहीच. बिलच साडेसातला मिळाले. ना-या आला. न्याहारीला बाहेरच्या आरोग्य भुवनांत बोलावून घेतले. ॐ मोबाईल नम: (तेव्हा नवीनच आणि कॉल महाग होते) रत्नागिरी म्हणजे बटाटेवडे उत्तम असायला आपली हरकत नसते. परंतु आरोग्य भुवनवाल्याची हरकत होती. सगळेच पदार्थ सपक व बेचव होते. असो. उदरभरण झाले हेहि नसे थोडके. खाण्याच्या कोणत्याहि पदार्थाला नाव ठेवले की जाड्याला राग येतो. साले तुम्ही आयते खायला सोकावले आहात म्हणतो व फ़ैलावर घेतो. तो या संधीची वाटच पाहत होता. पण. पण आम्ही देखील अखेर त्याचेच मित्र. आमच्या चेह-यावर त्याला तसे वाचता येत होते. त्यामुळेच आम्ही खोटेखोटे छानछान म्हणून खात होतो. स्वाभाविकच त्याची फ़ार कुचंबणा झाली व आम्हा चौघांना फ़ारच मज्जा आली. खातांना चौघे एकमेकांकडे पाहून बराच वेळ गालातल्या गालात हसत होतो. फ़ार म्हणजे फ़ारच करमणूक झाली. साराच आचरटपणा दुसरे काय! तोच करावा म्हणून तर बाहेर पडलो.

निघालो नऊसाडेनऊला. पेट्रोल भरले. हवा तपासून घेतली व मार्गस्थ झालो. आर्ध्या तासात रा म मा १७ आला. दोन अडीच तासांनी ड्रायव्हरची पदावनती व किलींडरची पदोन्नती होत होती. रत्नागिरीच्या पुढे रा म मा १७ च्या दुतर्फ़ा छान झाडे आहेत. घाट आला की वातानुकूलन बंद करावे लागे. करण त्या इंजिनाच्या नाजूक जीवाला ते पेलत नसे. पण आपल्या मुंबईच्या मानाने हवा तशी बरी होती व घाटात हवा जरा थंडच असते. (पेस्तनजींचा) घामही फ़ारसा आला नाही. घाट आला की सगळे गप्प होऊन निसर्ग सौंदर्य पाहाण्यात मग्न होत. याचा आणखी एक फ़ायदा म्हणजे घाटात जेव्हा जास्त एकग्रतेची गरज असते तेव्हा ड्रायव्हरचे ल़ विचलित होत नाही. गोवा आले व गेले. कारवार जवळ येऊ लागले तसे जाड्याला ऊत आअला. आमच्या सौ चे माहेर नन्दनगद्दा. कारवारपासून पाचएक किलोमीटर. ते कोठे आहे ते कारवारच्या पुलाअलिकडून त्याला दाखवले. लगेच त्याने आमच्या सौ ला "हर हायनेस प्रिन्सेस ऑफ़ नन्दनगद्दा" हा किताब जाहीर केला. साधारण तीन ते चारच्या दरम्यान तेथून जात होतो. दीडदोन तासांनी मुर्डेश्वरला पोहोचलो. रा म मा १७ ने द़क्षिणेकडे जातांना मुर्डेश्वर स्टेशनकडून मुर्डेश्वरला जाण्यासाज़ी फ़ाटा आहे. क्षितिजावर एक शंकराची प्रचन्ड मूर्ती दिसू लागते. नंतर ती जवळ जवळ दिसूं लागते. तेथे आर एन शेट्टी हे फ़ार बडे प्रस्थ आहे हे जाणवत होते. रस्त्याने पाहावे तिथे आर एन शेट्टी. दोघेहि चालक फ़ार थकले होते. कावळे सगळ्यांच्याच पोटात कोकलत होते. हॉटेले फ़ार महाग. (उर्दूवाचन फार) पावसाची बुरबुरहि चालू झाली होती. हॉटेल शोधतांना किमान पाचसहा हॉटेले नापसंत करून आम्ही तिघांच्याहि वाट पाहाण्याच्या शक्तीचा अंत पाहिला. दर व सोयी यांचे गणित काही जुळता जुळेन. शेवटी आर एन शेट्टी ट्रस्टचे हॉस्टेल मिळले. त्याचे ठिकाण (लोकेशन) फ़ारच रमणीय आहे. येथील मंदिर मागील बाजूने समुद्रात घुसले आहे. त्यामुळे तीन बाजूंना समुद्र दिसतो. अलौकिक देखावा. ऑफसीझन असल्यामुळे जवळजवळ निम्मे दर होते. तेव्हा २००० साली नेहमीचा डबल ऑक्युपन्सीचा दर रू. ८५०.०० व ऒफ़ सीझन म्हणून रू. ४७५.०० होते. थोडक्यात म्हणजे उर्दूवाचन चांगले होते. हे आर एन शेट्टी बहुधा पुण्याचे असायला हरकत नाही. हॉटेलच्या कार्यालयाबाहेरच दरवाजाच्या डाव्या बाजूला सूचनांची भली मोठी उभी पाटी होती. मद्यपान तसेच अंमली पदार्थ आणू नयेत. आढळल्यास बाहेर घालविले जाईल व भरलेले पैसे मिळणार नाहीत. एक रुमवर जास्तीत जास्त तिघांना राहता येईल. पाण्याचे ग्लास एका रूमवर दोनच मिळतील इ. इ. पण गंमत काय पाहा. या सगळ्या अटी होत्याच. तारीख दोन ऒक्टोबर. गांधीजयंती. म्हणजे दारूबंदीचा दिवस. तरीहि आजूबाजूच्या एकदोन खोल्यातून मद्यपींचा आरडओरडा ऐकू येत होता. गांधीजींनी त्यांना क्षमा केली असेलच. शुक्राचार्यांचा विजय असो. आंघोळी आटोपून उदरभरणास सज्ज झालो. हॉटेलच्या रेस्टॉरंटध्ये फ़क्त शाकाहारी. ना-या व जाड्या मासे खायला सोकावलेले म्हणून बाहेर गेलो. एका कळकट हॉटेलाबाहेर मसाल्याचा छान वास येत होता म्हणून तेथेच जेवलो. जेवण सुरेखच होतो. गावठी अंडी होती म्हणून मी डाळभात भाजीबरोबर आम्लेट देखील खाल्ले. ते पण छान होते. कालचे उट्टे भरुन निघाले. सगळे पुरूष असल्याने हा मोठा फायदा मिळतो. आपण कोठेहि राहू शकतो. कोठेहि खाऊ शकतो.

३ ऒक्टोबर २०००.
नेहमीप्रमाणे पावणेसहा सहाला चौघे फ़िरायला बाहेर पडलो. बीचवरच गेलो. एवढा सुरेख लांबलचक बीच. पण आपल्या भारतीय लोकांना त्याचे सोयरसुतक नाही. सार्वजनिक ठिकाणीं जास्तीत जास्त घाण न केल्यास दंड असावा आणि सार्वजनिक ठिकाणी घाण कचरा टाकल्यास वा थुंकल्यास पारितोषिके असावीत व प्रातर्विधी करणारांस सर्वांत मोठे पारितोषिक असावे अशी परिस्थिती होती. म्हणून अर्ध्या तासात न्याहरी करण्यासाठी परत फ़िरलो. ना-याला बोलावून घेतले. कर्नाटकात सेट डोसा म्हणून एक पदार्थ मिळतो. हल्ली सगळे लोक भरपूर पर्यटन करतात. त्यामुळे बहुतेकांना ठाऊक असेल. तरी पण न खाल्लेल्या लोकांसाठी सांगतो. घावनापेक्षाआ जाड व उत्तप्पापेक्षां किंवा आंबोळीपेक्षा पातळ असे तीन डोसे, चटणी व सांबार. हा सेट डोसा फ़क्त कर्नाटकातच मिळतो. इडल्या, मेदूवडा, सर्वच पदार्थ चविष्ट होते. सांबार मात्र तूरडाळीचे नसून छोट्या चवळीचे आणि धनेयुक्त मसाल्याचे वेगळ्या पण छान चवीचे होते. उपमा देखील छान होता. पाचजण असल्यामूळे प्रत्येकजण वेगळा पदार्थ मागवून चव पाहून आपला पुढील पदार्थ ठरवीत असे. फ़िल्टर कॉफ़ी द़क्षिणेत अपेक्षेपेक्षा चांगली मिळते. न्याहारी करुन परतलो सूर्यदर्शन झाले. स्वच्छ निळे आकाश, कोवळी सोनेरी उन्हे पसरलेली. तपमान २५ सें च्या आसपास असावे. आतिशय आल्हाह्दायक व उत्साहवर्धक वातवरण होते. आणि अहो आश्चर्यम आमच्या वसतिस्थानासमोरच ती दुरुन दिसणारी प्रचंड मूर्ति तर होतीच. शिवाय गीतोपदेशाच्या रथाचा सिमेंटधे केलेला पण रंगवलेला सुरेख देखावा आणि आणखी कांहीं सुंदर देखावे होते. ही कर्नाटकाची खासियत. बहुतेक गांवात हायवेवर काटकोनी कमानी असतात. सिमेंटने केलेल्या. तीतच मुर्ती कोरलेल्या पण तैलरंगात छान चित्रांसह रंगविलेल्या. रस्त्यावर या परिसरात बरीच मंदिरे आहेत. काळ्या दगडातील प्राचीन आणि अंधारी. आंत येणारा जो कांही थोडाफ़ार वा तुटपुंजा प्रकाश असेल तो काळ्या दगडामुळे जरादेखील परावर्तित होत नाही. मी 'काळ्या' दगडाला नावे टेवली म्हणून सगळ्यांनी खंत व्यक्त केली. स्वत:च्या वर्णाचे थोडे तरी कौतुक असावे की राव. एवढे सुरेख स्थापत्य निर्माण करणे खायचे काम नाही. पण येथेच असे नाही पण सगळीकडील पुरातन बांधकमांत प्रकाशयोजनेचा पूर्ण अभाव आढळतो. गुहांतील बांधकामात आपण समजू शकतो की प्रकाश आंत आणण्यास फ़ारसा वाव नसतो. पण बांधलेल्या मंदिंरांचे काय? नैसर्गिक प्रकाश आत आलेला गाभारा मी आजून पाहिला नाही. या अंधारावर वास्तुशास्त्रज्ञच प्रकाश टाकूं शकतील. कदाचित टाकलेला देखील असेल आणि माझा तो विषय नसल्यामुळे हे माझे अज्ञान दूर झाले नसेल. असो. मला तरी हे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

पन्नास पैशापेक्षां कमी किंमतीची नाणीं मुंबई-पुण्यांत चालत नाहींत. भिकारी देखील घेत नाहींत. ना-या जातीने वैश्यवाणी असल्यामुळे त्याला आम्हीं शेटजी म्हणतो. अशी कांही नाणीं त्याच्याकडे येथेसुद्धा बरीच होती. बहुतेक पन्नासएक रुपये भरतील एवढी असावीत. भिकारी देखील बरेच होते. त्यामुळे त्याच्या औदार्याला उधाण आले होते. त्याच्या संधिसाधू औदार्यावरुन त्याची भरपूर टिंगल केली. नंतर देखील फ़िरक्या घेण्यास अजून एक विषय मिळाला. धार्मिक असा तो आमच्यात एकटाच असल्यामुळे तो अल्पमतात होत. फ़ारच मज्जा आली. इतर सर्व ठिकाणी नेहमी आम्हीच अल्पमतात असतो. फ़ोटोबिटो काढून निघण्यास साडेदहा अकरा वाजले. मडिकेरी येथून फ़ारसे दूर नाही. आमच्या नकाशात मंगलोरच्या पुढे बंगलोर रस्त्यावर बंटवालच्या पुढे लगेच उजवीकडे मडिकेरीचा फ़ाटा दिसत होता. परंतु बंटवाल रस्त्यापासून थोडे दूर दिसत होते. त्यामुळे रस्त्यावर नीटच लक्ष द्यावे लागणार होते. मंगलोरचे रस्ते स्वच्छ व चांगले वाटले. बंगलोरची दिशा दाखवणारे बाण बहुतेक मोठ्या नाक्यावर होते. जेथे नव्हते तेथे विचारीत पुढे गेलो. अखेर मडिकेरीचा फ़ाटा सापडला. हळू हळू झाडोरा वाढू लागला. पावसाळ्याची अखेर असल्यामुळे रस्ता मात्र खराब होता. वेग पंचवीसवर आला. हवेत गारवा यायला लागला. तपमान २० च्या आसपास असावे. समोर डोंगर दिसू लागले. चढ वाढू लागला. वळणे येऊ लागली. रबराची झाडे मी यापूर्वी पाहिली नव्हती. ती दिसू लागली. आमच्या चित्तवृत्तींचा बहर वाढू लागला. चढावामुळे .. पायातील नव्हे .. सरासरी वेग आणखी कमी झाला. आजूबाजूला जमिनीच्या कुंपणांकित आयतांमध्ये विविध नावांच्या पाट्या दिसू लागल्या. चहाचे मळे कोणाला पाहायचेत . . देवा किलींडरने विचारले. लवकरच पाहायला तयार व्हा म्हणून मास्तरांनी घोषणा केली. आमच्या उत्साहाला आणखी धुमारे फ़ुटले. एक घाट संपून दुसरा येऊ लागला. रस्ता वाईटच. एक डोंगर संपून दुसरा दिसू लागे. आता सर्वजण मैलाचे दगड वाचू लागलो. चार कन्नड दगडानंतर पाचवा एक इंग्रजी दगड असे प्रमाण होते. वाईट व घाटाचा वळणावळणांचा रस्ता म्हणून दोघेहि चक्रधर फ़ार थकले होते. दीडदोन वाजले असावेत.

मी मनगटी घड्याळ वापरीत नाही याबद्दल क्षमस्व. याची शिक्षा म्हणून ना-याने माझ्यावर भरपूर दुगाण्या झाडल्या. त्याच्या देखील हाताला घड्याळ नव्हते याची त्याला जाणीव करून दिली. परंतु त्याचे नुकतेच पडून फ़ुटले म्हणून त्याला ते माफ़ असा त्याचा दावा होता. मी तर कधीच बांधत नाही. पण तुझा वेंधळेपणा कसा काय माफ़? या प्रश्नावर तो फ़ार उखडला. त्यामुळे इतर तिघे माझ्याशी सहमत झाले.

सुरेख हवेमुळे पोटातील कावळे जागे झाले. त्यामुळे जेवण पूर्ण स्किप न करता पोटात हलके पदार्थ स्किप करुन सोडावेत असे ठरवले. वाटेत एक छोटेसे गांव लागले. खाण्याची टपरी कुठे दिसते काय हे पाहू लागलो. चौकशी करु लागलो. हिंदी इंग्रजी कुणाला कळेना. जेवण्याची खूण करुन इडली डोसा हे शब्द उच्चारु लागलो. एक चौकात पार्किंगला चांगली जागा दिसली. जवळील दुकानदाराला गाडीवर लक्ष ठेवायला विनंति केली. अर्थात खुणेने. उतरुन आरोग्य भवनाचा शोध घेतला. अखेर एक किशोरवयीन मुलाने एका छोट्याशा गल्लीत नेले. एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत एक छोटेसे शंकर विलास छाप हॉटेल दाखवले. बसलो. साठीच्या आसपास दिसणारी एक महिला आतून बाहेर आली. कन्नडमध्ये काहीतरी विचारले. डोक्यात कहीच शिरले नाही. हिंदीत बोललो. अंधारच. मी कोकणीतून विचारले 'खावच्याक कित मॅळतले' म्हणून. (गोव्यातील कोकणीत खावपाक म्हणतात) पुन्हा अंधारच. माझ्या कोकणी भाषेच्या अज्ञानाची व कोकणी बोलण्याच्या क्षमतेच्या यथेच्छ चिंध्या. हा (मी) गाढव आहे की नाही? जाड्याने विचारले. तिला बोध झाला नाही परंतु तिची करमणूक झाली. जाद्या म्हणतो ते बरोबर की नाही असे त्या देवाने तिला विचारले. अर्थातच अर्थ न कळता त्या धोरणी महिलेने ताबडतोब मान हलवून होय म्हटले. भरपूर हशा पिकला. पण असे घडले हे माझ्यासारखा सूज्ञ अजूनहि कबूल करीत नाही. मग इडली डोसा शब्द उच्चारले. तिने होय म्हटले. युरेका युरेका. जवळ जवळ अर्धा तास वाट पहावी लागली. चांगला ब्रेक मिळाल्यामुळे कृष्णराज व शल्यराज खूष होते. आतून मसाल्याचे वास येऊ लागले. आत कावळ्यांना नाकाची कुमक मिळाली. रगड्यावर चटणी वाटल्याचा आवाज आला. शेवटी चुर्रचुर्र आवाज येऊ लागला व क्लायमॅक्स़ जवळ आल्याची जाणीव झाली. अखेर ते सेट डोसा नावाचे गरमागरम पूर्णब्रह्म समोर आले. असा सुरेख सेट डोसा आजतागायत आम्ही खाल्ला नाही. चटणी सांबार हवे तेवढे. ती चव ते जंगलातील गावातले सुरेख हवेतील भारलेले वातावरण (माहोल) आमच्या सर्वांच्या मनांवर कायमचे कोरले आहे. उर्दू वाचन त्याहून सुरेख. सव्वाएक तासाने तृप्त होऊन त्या अन्नपूर्णेला दुवा देऊन निघालो.

सुब्रमण्यम चा फ़ाट गेला. चहाचे मळे दिसायला लागले. तोपर्यंत ते मी फ़क्त भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांत व फ़ोटोतच आणि अर्थातच हिंदी सिनेमात पाहिले होते. माझी उडी माथेरान, महाबळेश्वर, मालवण, गोवा, अहमदाबाद, कारवार, शिरसी व अजिंठा याच्यापुढे गेली नव्हती. पाचच्या सुमारास डोंगराच्या कुशीतील स्वप्नातील दृश्यासारखे मनोरम दिसणारे गाव दिसू लागले व सर्वजण हरखून गेलो. आधीच हिल स्टेशन. त्यातून डिस्ट्रिक्ट फ्लेस. त्यामुळे उर्दू वाचन फ़ार होते. डबल ऑक्युपन्सीला १२०० पासून २५०० पर्यंत . त्या मानाने सुविधा नाहीत. आम्ही कोठून आलो याची चौकशी करीत. आम्ही मुंबईचे पाहून चढे दर सांगत. एकदोन ठीक होती पण पार्किंग चांगले नव्हते. कर्नाटक टुरिझम अर्थात के टी डी सी मध्ये गेलो. छापील दर. रुम्स यथातथाच होत्या. पण पार्किंगची जागा प्रशस्त आणि सुरेख. मागील बाजूने दरीला लागून असलेले अत्यंत रमणीय ठिकाण. भरपूर रिकाम्या रूम्स. साहाजिकच निवडीला जास्त पर्याय उपलब्ध. एक आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला. के टी डी सी चे मॅनेजरसाहेब छान मराठी बोलत होते. कालपर्यंत पाऊस अक्षरशः वेड्यासारख कोसळत होता. सतत चार महिने मुसळधार पावसाने वेड लागायची पाळी आली होती. तुमच्यासारखी खुल्या दिलाने बोलणारी माणसे पाहून फ़ार आनंद झाला असे म्हणाले. त्यांनी दोन दिवस खरेच खाजगी कंपन्यांनी लाजावे आशी उत्तम सौजन्यपूर्ण सेवा पुरवली. अर्थातच याचे थोडेसे श्रेय जाड्याकडे व माझ्याकडे जाते. जाड्या हा एक चांगला मार्केटिंग मॅनेजर व मी चांगला पी आर ओ (जरी प्रशासकीय खात्याचा असलो तरी) आहे. साहजिकच आमच्या जिभेवर मधाची कोठारे आहेत. कृपया मधमाशांना आमचा पत्ता देऊ नका. पंचाईत होईल. आमच्या तीन वर्षानंतरच्या पुढील दोन सहलीत याचा चांगला अनुभव आला. जेवण आमच्याच कॆंटीनमध्ये करा. येथील जेवण उत्तम असते. असे जेवण येथे दुसरीकडे मिळणार नाही. येथील स्थानिक लोक बाहेर जेवायला म्हणून निघाले की येथेच येतात. मॅसा नी सांगितले. आम्ही त्यांच्या कर्तव्यतत्परतेची ताबडतोब वाखाणणी केली व तसेच करण्याचे ठरवले. मराठी बोलणा-य व्यक्तीने एवढे सौजन्य व अगत्य दाखवावे हे आश्चर्यच.

क्रमशः

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

16 Feb 2008 - 6:25 am | ऋषिकेश

सुधीरराव! तुमचे पाय कुठे आहेत.. अप्रतिम!!!
तुम्ही आम्हालाहि सोबतच सफर घडवताय. अतिशय आभार!! असं बर्‍याच दिवसांनी झालंय की वर्णन केलेली एकेक व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहतेय.. वा वा अतिशय सुरेख!!
त्यात कोस्टल कर्नाटक फिरलेलो असल्याने स्थळे ही ओळखीची आहेत. (तसंही तुमचं वर्णन इतकं चित्रदर्शी आहे की तिथे न गेलेल्यांच्याहि डोळ्यासमोर चित्र जसंच्यातसं उभं राहावं)
पुढच्या भागाची आतूरतेने वाट पाहतोय :)

-ऋषिकेश

धमाल मुलगा's picture

18 Feb 2008 - 12:33 pm | धमाल मुलगा

झकास.....

आणखी काय लिहू? एकदम मस्त प्रवासवर्णन ! येऊद्या..

अवा॑तर : ते उर्दूवाचनाच॑ झे॑गाट काय कळ॑ल नाय बॉ..सा॑गता जरा इस्काटून ?

-ध मा ल

झकासराव's picture

18 Feb 2008 - 9:49 pm | झकासराव

वर्णन आहे.
फोटो असते तर अजुन मजा आली असती.
धमाल अरे तुला उर्दु वाचन माहिती नाही?????? (ये पी एस पी ओ नही जानता च्या चालीवर)

अरे हाटेलात गेल की आधी किमंत बघायची मग पदार्थ मागायचा ही मुळ कल्पना रे.
त्यानी राहण्याच्या व्यवस्थेत देखिल तीच पाहिली :)

धमाल मुलगा's picture

19 Feb 2008 - 11:41 am | धमाल मुलगा

हे अस॑ आहे होय? आम्ही तर नेहमी उर्दूच वाचतो म्हणायच॑ मग!

लय भारी शब्द...
झकासराव, आभारी आहे!

-ध मा ल (उर्दूवाचक)

सुधीर कांदळकर's picture

20 Feb 2008 - 8:17 pm | सुधीर कांदळकर

फार महाग होते. मी साध्या हॉटशॉट ने काढलेले कांही आहेत. स्कॅन करून कांही पुढील भागात टाकीन. खास करून मुर्डेश्वरचे. परंतु त्यांची प्रत मात्र सुमार दर्जाची आहे. तेव्हा फोटोबद्दल फार मोठ्या अपेक्षा बाळगू नका. तरीहि आपल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मनीष पाठक's picture

18 Feb 2008 - 12:57 pm | मनीष पाठक

झक्कासच ....

तुमच्याबरोबर आमचाही प्रवास घडतो आहे. पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.

मनीष पाठक

प्रमोद देव's picture

19 Feb 2008 - 12:18 pm | प्रमोद देव

सुधीरराव मस्त चाललाय तुमचा प्रवास आणि तुमच्यासोबत आमचाही!
आता पुढे कुठे जायचंय म्हणता?

चतुरंग's picture

19 Feb 2008 - 12:33 pm | चतुरंग

आणि प्रवाही शैली आहे तुमची, मला खरं तर तुमचा हेवा वाटतो!
एकेक व्यक्ती आणि प्रसंग सहजपणे डोळ्यांसमोर उभा करता.
मुर्डेश्वरचे ते मंदिर आणि समुद्रातले ते रेस्टॉरंट पुन्हा एकदा मनातल्यामनात भटकून आलो.
अतिशय चित्रगर्भ लेखणी लाभली आहे तुम्हाला! थोडं ते प्रकाशचित्राचंही जमवता आलं तर बघा की राव!
बाकी पुढच्या प्रवासाची तिकिटे काढून गाडीची वाट बघत बसलोय!

चतुरंग