मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मोठ्यांचं लहान मन

संगीतनहुष · · काथ्याकूट
२६ जानेवारीचा "लिटिल चाम्प्स"कार्यक्रम ऐकला. सावरकरांची गीते आणि हृदयनाथ स्वतः आठवणी व अधिक माहिती सांगणार त्यामुळे अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. जयो ऽ स्तुते हे आपणा सर्वांचे आवडते गाणे आले. काही म्हणा, मंगेशकरांनी गायल्यापासून हे गाणे जणू मंगेशकरांचेच झाले आहे. पण तरीही वाट पहात होतो, हृदयनाथ या गाण्याची चाल व संगीत कोणी कधी केले हे सांगतील, तिच्याविषयी अधिक टिप्पणी करतील याची. खरे तर हे सांगायला लागता कामा नये पण एक पिढी बदललेली आहे, लोकांच्या स्मरणातून ही गोष्ट गेली आहे. फार वर्षांपूर्वी एक सारंगिया होता, त्याचे नाव मधुकर गोळवलकर. त्याने या तेजस्वी कवितेला तशीच ओजपूर्ण चाल लावली, संगीताचे सुंदर सुंदर तुकडे त्यात जुळवले. प्रत्येक कडव्याची चाल वेगळी, शेवटचे कडवे तर जणू मुकुटमणी, अंगावर काटा आणणारे. गाणे रेडियोवर गाजले, प्रचंड लोकप्रिय झाले, सर्वांच्या तोंडात बसले. १९६२-६५ चा सुमार असावा हा. किती गोडगोड गाणी आली होती हो त्या काळात (जुन्या लोकांना "भास्वर , तुजसम भास्वर, तूच भारता"हे गाणे आठवते?) खूप नंतर कधीतरी मंगेशकरांना "सागरा प्राण तळमळला" करायचे होते व त्या तबकडीच्या मागे कोणते गाणे घ्यावे ते शोधताना त्यांच्या हाती जयोस्तुते लागले असावे. गाणे व संगीत अत्यंत सुंदर होतेच, त्यात अगदी काडीमात्र फरक करून त्यांनी ते उचलून घेतले. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. हृदयनाथांनी ही गोष्ट सोडून सगळे सांगितले. ओळीओळीचा अर्थ स्पष्ट करून निरूपण केले. पण तेवढे मुद्द्याचे बोलले नाहीत. व्यक्तिशः माझी फार फार निराशा झाली. गोळवलकरांची कलाकृती त्यांनी पुन्हा प्रकाशात आणली. आम्ही खूप ऋणी आहोत त्यांचे. तितके श्रेय ज्याचे त्याला दिले असते तर मंगेशकरांचे फारसे नुकसान झाले असते असे मला वाटत नाही. दोन शब्दांचा प्रश्न होता फक्त. पण तसे झाले नाही. कोण जाणे, कदाचित गोळवलकरांनीच ती चाल दीनानाथांच्या एखाद्या जुन्या पदावरून चोरलेली असेलही. तसे असले तर तो इतिहास आम्हाला तरी ज्ञात नाही. मग तो इतिहास सांगून आमच्या ज्ञानात तरी भर टाकायची होती. बूंद से तो गयी. असो. सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नसतात. त्यापेक्षा आपण हृदयनाथांच्या अद्भुत संगीताचाच रस घेऊया.

वाचन 3011 प्रतिक्रिया 0