मिपा संपादकीय - राजुचे असत्याचे प्रयोग..

संपादक's picture
संपादक in विशेष
12 Jan 2009 - 9:26 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचावयास मिळेल! धन्यवाद...

राजुचे असत्याचे प्रयोग

भारतातील उद्योगजगताला गेल्या आठवड्यात फार मोठा हादरा बसला. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात तर हलक्ललोळ पसरला आहे. गुंतवणुकदार सुन्न होवुन भकास नजरेने विचारहीन झाले आहेत. सत्यम कॉम्प्युटर्स या भारतातील आयटी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकावर असलेल्या कंपनीचे चेअरमन रामलिंगा राजु यांनी आपण गेली दहा वर्षे सेबी, शेअरबाजार, शासन तसेच भागधारकांची गैरव्यवहार तसेच हेराफेरी करुन फसवणुक करत आहोत हे मान्य करत आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचे बंधु आणि कार्यकारी संचालक बी. रामा राजू यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

रामलिंगा राजू यांनी सत्यमच्या संचालक मंडळास लिहिलेल्या राजीनामा पत्रात आपण गेली दहा वर्षे खोटे हिशेब लिहुन नफा वाढवुन दाखवत होतो असे कबुल केले आहे. ही बनवेगिरी अंगाशी येणार असे दिसताच, खोट्या मालमत्तेच्या ठिकाणी खरी मालमत्ता दाखवता यावी यासाठी आपल्याच मुलांनी काढलेल्या दोन कंपन्या खरेदी करण्याचा डाव रचला. त्याचा गौप्यस्फोट होताच तो व्यवहार आतबट्याचा असल्याने रद्द केला अशी मखलाशी करुन चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. वाघावर चढुन तर बसलो, परंतु आता उतरायचे कसे, वाघ खाणार तर नाही हे पहायचे कसे हे न उमगल्याने आपण राजीनामा देत असल्याचे राजू म्हणतात.

सत्यमच्या संचालक मंडळाच्या बैठकीपुर्वीच राजू बंधूंनी पळ काढला असुन आपण स्वतःला कायद्याच्या हवाली करुन कायदेशीर परिणाम भोगण्यास तयार आहोत असे म्हटले आहे. सत्यमबाबत असे काही तरी ऐकायला मिळणार याची अंधुकशी कल्पना आधीच्या काही दिवसांत आलीच होती. नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा ही म्हण सत्यमबाबत खरी ठरली. नाव सत्यम पण असत्यामधे आकंठ बुडालेली कंपनी असेच वर्णन करता येईल. रामलिंगा राजूंच्या राजीनाम्याचे वृत्त येताच सत्यमच्या शेअरचे भाव दाणकन कोसळले. भागधारक साफ आडवे झाले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक ब-याच काळाने दहाहजाराच्या वर असल्याने गुंतवणुकदार वर्गात जरा आशेचे वातावरण पसरले होते, पण या बातमीनंतर शेअर बाजार पण कोसळला.

सत्यमच्या राजू बंधूंनी आपले भोंगळेपण जाहीर करतांनाचा कंपनी व्यवहार खाते, सेबी, शेअरबाजार, ऑडीटर्स या सगळ्यांचे वस्त्रहरण केले आहे. सरकार आता माहीती घेत असुन नंतर दोषींवर कारवाई करणार आहे असे समजते. खोटे हिशेब लिहुन नफा फुगवुन सांगायचा आणि त्या जोरावर गुंतवणुकदारांना झुलवायचे, आतल्या गोटातील माहिती असल्याने स्वतःचे उखळ पांढरे करुन घ्यायचे हा निगरगट्टपणा अमेरिकेतील काही बलाढ‍्य कंपन्यांनी दाखविला आहे. एन्रॉन ही उर्जा क्षेत्रातील अशीच कंपनी खोट्या हिशेबाच्या आधारावर फुगली आणि एका रात्रीत रस्त्यावर आली. भारतात गुंतवणुकदार वर्गास, भागधारकांना फसवणा-या एका रात्रीत गायब होणा-या, केवळ कागदोपत्रीच अस्तित्व असणा-या कंपन्यांची काहीही कमतरता नाही.

रामलिंगा राजूंची औद्योगिक उपक्रमशीलता, दृष्टेपणा, प्रामाणिकता, कुशलता यांचा भारतच नव्हे तर विदेशातही डांगोरा पिटला जात असे. त्या राजूंच्या या जंटलमन कृतीमुळे कंपनी जगताला फार मोठा धक्का बसला आहे. सत्यमच्या व्यवसाय वृद्धीच्या मार्गांवरती अनेक वेळेस प्रश्नचिन्हे उमटली होतीच, शेअरबाजारात कुजबुज होतच होती. सत्यममधे राजू आणि कुटुंबीय यांची जेमतेम आठ टक्के गुंतवणुक असतांना राजूंची कंपनी असाच बोलबाला सतत होत असे. सत्यमकडे पाच हजार करोड रोकड असल्याच्या गप्पा राजू मारत होते. तरीही आयटी क्षेत्रातील, पन्नास हजाराहुन अधिक कर्मचारी असलेल्या सत्यमला आपल्या व्यवसायाशी संबंध नसलेल्या क्षेत्रात उतरायची गरज काय असा प्रश्न उपस्थित झालाच होता. त्यामुळे संचालक मंडळाने एकमताने घेतलेला निर्णय भागधारकांच्या रोषामुळे राजू यांनी मागे घेतला, सौदा फिसकटला. पाठोपाठच युनोने सत्यमवर बदमाषीचा आरोप करत आठ वर्षे काळ्या यादीत टाकले.

राजु यांची स्वार्थप्रेरणा जोर धरत असतांना त्यांच्यातील उद्योजक कधीच हरवला होता. सत्यमचे नाव तसे केतन पारेख यांच्या घोटाळ्यातही निगडीत असल्याची बातमी होतीच. म्हणजेच २००१ सालीच कंपनीच्या नावाचा कोणताही विचार न करता कडक कारवाई करण्याची गरज होती. त्याऐवजी आयटी मधील नावाजलेली, चौथ्या क्रमांकाची कंपनी असे म्हणत तिचे कौतुक केले गेले. राजूसाहेबांच्या तथाकथित व्यवहार कौशल्याचे अवास्तव कौतुक केले गेले. हे कौतुक आतापर्यंत चालु होते. आता फुगा फुटल्यावर, अवॉर्ड परत घेण्याचा अनावस्था प्रसंग पहावा लागत आहे.

यामधे भागधारक तसेच आर्थिक संस्थांचे नुकसान झाले आहेच तरीही आज सत्यम तर उद्या कोणाचा नंबर या धास्तीमुळे गुंतवणुकदार चिंतेत आहेत. आधीच रडतखडत दोनपाचशे अंकामधे खालीवर होणारा निर्देशांक अजुनच खाली येण्याची शक्यता आहे. पण त्याहीपेक्षा चिंतेचा मुद्दा हा आहे की, या घोटाळ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेला आहे. लाल चटया अंथरुन परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या शासकीय प्रयत्नांवर या घोटाळ्यामुळे पाणी पडु शकते. या राजुंच्या असत्य प्रयोगामुळे एकंदरीत आयटी उद्योगाकडे अविश्वासाने पाहीले जाउ लागले आहे. तसेच भारतीय कंपन्यांवर आणि भारतीयांवर असलेल्या विश्वासाला तडा गेला आहे.

जगभरात आधीच मंदीचे फटके बसत आहेत. आपल्यावर ते कमी बसावेत असे प्रयत्न सर्व स्तरावर होत आहेत. पण आता या घोटाळ्याच्या निमित्ताची संधी इतर देशातील कंपन्या घेण्याची शक्यता आहे. वास्तविक लीमन, एआयजी, सिटी इत्यादी अमेरिकन कंपन्यांनी असेच व्यवहार करत नफे फुगवण्याचे धंदे बराच काळ केले. त्यांचे फुगे फुटल्यावर अमेरिकेसह अनेक देशांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यांच्या कर्तृत्वाला तेथे बेलआउटचा आधार मिळाला आहे. अशी हात साफ नसलेलीच मंडळी आपल्या निर्यात उद्योगांना व गुंतवणूकीला अडथळे निर्माण करण्याची शक्यता आहे.

भारतीय शेअरबाजारातील आर्थिक घोटाळ्यांची मालिका खंडीत झाल्यासारखी वाटत होती. पण आर्थिक घोटाळे चालुच आहेत. सत्यमचा घोटाळा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. आणि दुर्देवाने अशा घोटाळ्यांमुळे आपली प्रतिमा मलिन तर होतेच होते, आपला वाढीचा वेग मंदावतो. आपल्या एकंदरीत अर्थ व्यवस्थेत काही त्रुटी आहेत. समाजातील धुर्त वा लबाड प्रवृत्ती असणारच असे न म्हणता या वृत्तींना वेळीच नियंत्रित करुन संपविण्यात आणि त्यांनी जर असे काही केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास आपण कमी पडत आहोत असेच चित्र उभे राहीले आहे.

सत्यममधील राजूयुग संपले असले तरी पुढे काय होणार हा महत्वाचा प्रश्न आहे. आर्थिक संस्थांकडे ६० टक्क्याच्या आसपास शेअर्स आहेत. कदाचित विलीनीकरण करुन मार्ग काढला जाईल. मात्र या सगळ्या भानगडीत सत्यमची एवढी बदनामी झाली आहे की, कर्मचारी टिकणे, भागधारकांचा विश्वास मिळवणे अतिशय अवघड जाणार आहे. यामधे कंपनीचे हिशोब तपासणारे ऑडीटर्स पण दोषी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अतिशय गरजेचे आहे. सत्ताधा-यांना संभाळणे, नामवंतांना संचालक मंडळात घेणे, तथाकथित सामाजिक उपक्रम राबविणे अशा विविध मार्गांनी राजू यांनी आपल्या भोवती कवच तयार केले होते. आमचे कंपनी क्षेत्र अगदी सोवळे आहे, असे त्यांचे सहकारी म्हणत असत. तर अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आमच्या क्षेत्रात स्थानच नाही असे त्यांचे स्पर्धक असले तरी या मुद्यावर पाठिंबा देणारे म्हणत असत. त्यांनीही जाब दिला पाहिजे. त्याचबरोबर नियंत्रक कुठेतरी कमी पडत आहेत ते शोधून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

पाहुणा संपादक : अवलिया.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Jan 2009 - 9:45 am | विसोबा खेचर

उत्तम, औचित्यपूर्ण अग्रलेख..

अभिनंदन..

तात्या.

सखाराम_गटणे™'s picture

12 Jan 2009 - 9:52 am | सखाराम_गटणे™

ही हेराफेरी ही मी म्हणेल तो कायदा, मी काहीही करु शकतो ह्या प्रवृत्तीतुन झाली आहे. कर्मचारी टिकणे, फारसे अवघड आहे असे तरी सद्यपरीस्थीतीत वाटत नाही, कारण मार्कॅट मध्ये आधीच नोकर्‍या कमी आहेत. त्यातुन तरी कोणीही खास कंपनी आवडत नाही म्हणुन लगेच सोडुन जाईल असे तरी नक्कीच वाटत नाही, जोपर्यत पगार व्यवस्थेत मिळतो आहे, तो पर्यत तरी नाही.

पण परवाचीच बातमी सांगते की, सत्यम काही पुढील महीन्याचा पगार देउ शकत नाही.

भागधारकांचा विश्वास मिळवणे अतिशय अवघड जाणार आहे. यामधे कंपनीचे हिशोब तपासणारे ऑडीटर्स पण दोषी आहेत.
सहमत, कारण भागधारक ऑडीटर्स कडे खुप विष्वासाने पहात असतात, याचा परीनाम हा होईल की सर्व कंपन्या ज्यांचे प्राईझवॉटर ऑडीट करते ते सगळे संशयाच्या जाळ्यात येतील

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सहज's picture

12 Jan 2009 - 9:52 am | सहज

अग्रलेख आवडला.

राजु यांच्या सत्यमप्रमाणे अजुन किती कंपन्यांचे असत्य बाहेर येईल हा येणारा काळच सांगु शकेल. पुढील एक दोन वर्षे सगळ्याच मोठ्या कंपन्यांचे ताळेबंद अजुन काटेकोरपणे तपासले जातील. निकाल जाहीर झाले की बाजार अजुन खाली जाईल अशी अटकळ आहे . त्यामुळे यापुढे शेयरबाजारात गुंतवणुक जरा दमानंच. एक असेही म्हणता येईल की दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकदारांसाठी ही एक संधी असेल. यावर आधीक प्रकाश अवलिया, एकलव्य आदी प्रभुतींनी टाकावा.

राजु यांनी अमेरिकेतील संभाव्य अटक टाळण्याकरता इथे शरणागती पत्करली असे या बातमीत म्हणले आहे.

सुनील's picture

12 Jan 2009 - 9:58 am | सुनील

समयोचित लेख.

भरमसाठ वेगाने वर वर जाणार्‍या कंपन्यांबाबत संशयाचे वातावरण निर्माण व्हावे, ही तशी चांगली गोष्ट नाही. पण सत्यम घोटाळ्याने, अशाच काही नामवंत कंपन्यांकडेही संशयीत नजरेने पहावे, अशी परिस्थिती आली आहे, हे खरे!

हर्षद मेहता प्रकरणानंतर सेबीची स्थापना झाली (चुभूद्याघ्या), तरीही घोटाळे काही थांबले नाहीत. हे असे का व्हावे?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

एकलव्य's picture

12 Jan 2009 - 10:05 am | एकलव्य

भारतातील आय टी क्षेत्राकडे अविश्वासाने पाहिले जात आहे हे जरी खरे असले तरी त्याने बिझिनेसवर परिणाम होईल असे वाटत नाही. याक्षणी बोटे दाखविली जात असली तरी त्यामागे वेगवेगळ्या आकसांचाही भाग आहे हे नाकारता येत नाही. (आमची तशी अखिल भारतीय प्रवक्ते म्हणून सुप्त ख्याती आहे... त्यामुळे राजूबाबाच्या कृपेने बर्‍याच जणांकडून "अरे काय रे हे?" अशी "विचारपूस" झाली. आम्हीही शिव्या घ्यातल्याच पण फुशारकीचा भाग म्हणून नव्हे पण अमेरिकन भस्मासुरापुढे सत्यम किस झाड की पत्ती हेही बडवून झाले.)

बेल-आउटची बोंब भारतातही उठणार/ उठते आहे यांत संशय नाही. निवडणुकांचे दिवस आहेत त्यामुळे (किंवा त्याशिवायही) कदाचित प्रांतीयवादाचे रंगही सत्यमच्या बुडित खात्याला लागतील. सत्यमला वाचविण्याचा फार धडपडाट करू नये असे आम्हाला वाटते. विस्तार टाळतो.

संपादकीयाची मांडणी चांगली आहे. आभार!

- एकलव्य

आपला अभिजित's picture

12 Jan 2009 - 10:08 am | आपला अभिजित

सत्यम च्या गैरप्रकाराचा उत्तम वेध घेतला आहे. विषयाची मांडणी आणि भवितव्याची दखलही योग्य प्रकारे घेतलेली आहे.

खरे तर याला `गैरव्यवहार'ही म्हणता येत नाही. कारण यात स्वतः भ्रष्टाचार न करता, कंपनीचा फुगा फुगवून गुंतवणूकदारांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न झाला आहे.

मी सुद्धा ४४६ रुपयांनी सत्यम चे शेअर्स घेतले होते. आता ते भंगाराच्या भावात विकावे लागणार, बहुतेक!

मदनबाण's picture

12 Jan 2009 - 10:13 am | मदनबाण

आयटीच्या दुष्काळातील हा १३ महिना ठरला !!!

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

मराठी_माणूस's picture

12 Jan 2009 - 10:26 am | मराठी_माणूस

आजच्या ईकॉनॉमिक टाईम्स च्या खालील लेखा मधे असे म्हटले आहे की हे २००३ पासुन चालु होते आणि अगदी उघड पणे चालु होते.
http://epaper.timesofindia.com/Daily/skins/ET/navigator.asp?Daily=ETM&lo...

मग कोणत्याही तज्ञाच्या हे कधीच लक्षात का आले नाही ? कींवा आले असेल तर तसे निदर्शनास का आणुन दीले नाही

ऋषिकेश's picture

12 Jan 2009 - 12:20 pm | ऋषिकेश

अग्रलेख आणि अग्रलेखाचा मथळा आवडला :)

-ऋषिकेश

यशोधरा's picture

12 Jan 2009 - 1:59 pm | यशोधरा

अग्रलेख आवडला.

संजय अभ्यंकर's picture

12 Jan 2009 - 3:14 pm | संजय अभ्यंकर

अवलीयाने अजून विस्तारीत लिहावे अशी अपेक्षा होती.

भविष्यात अजूनही काही कंपन्यांचे गैरव्यवहार बाहेर येऊ शकतात.
आम्हास आधीच ठाऊक होते म्हणणारे, आधीच का नाही अशी प्रकरणे बाहेर आणत?
नंतर "गौप्यस्फोट" करण्यात काय हशिल आहे?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

12 Jan 2009 - 3:52 pm | विनायक प्रभू

'असत्याचे प्रयोग' चा दुसरा अंक तुरुंगात बसुन.
अस्ते ते नस्ते.

अनिल हटेला's picture

12 Jan 2009 - 5:05 pm | अनिल हटेला

अग्रलेख आवडला....
शीर्षक आणी विषय अतीशय समर्पक...
अभिनंदन...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चतुरंग's picture

12 Jan 2009 - 7:11 pm | चतुरंग

अग्रलेख आवडला. अजून थोडे विस्ताराने लिहाल असे वाटले होते - विशेषतः असा घोटाळा कसा होऊ शकतो? कंपनीतली बडी मंडळी हे कसे करु शकतात (गुन्ह्याची कार्यपद्धती)?
सामान्य माणसांना/गुंतवणूकदारांना हे थेट समजणे तसे अवघडच पण नियंत्रण करणारेही कसे गंडवले जाऊ शकतात? ऑडीटर्स कसे सामील असतात? ह्याबद्दल थोडा उहापोह वाचायला आवडला असता.
(अजून एक लेख लिहावा अशी विनंती).

चतुरंग

लिखाळ's picture

12 Jan 2009 - 7:17 pm | लिखाळ

अग्रलेख आवडला.
चतुरंगांच्या मताशी सहमत आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

संदीप चित्रे's picture

12 Jan 2009 - 7:27 pm | संदीप चित्रे

चतुरंग आणि लिखाळच्या मतांशी सहमत.

ही सगळी भानगड कशी जमवली असेल त्यावर प्रकाश टाकला तर आनंद होईल.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jan 2009 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अग्रलेख आवडला !!!

प्राजु's picture

12 Jan 2009 - 8:16 pm | प्राजु

मांडणी, मथळा सगळेच उत्तम.
पण चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे आणखी एक लेख लिहा.
आपले लेख नेहमीच माहितीपूर्ण असतात. आवडतात वाचायला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नाटक्या's picture

12 Jan 2009 - 10:16 pm | नाटक्या

> पाठोपाठच युनोने सत्यमवर बदमाषीचा आरोप करत आठ वर्षे काळ्या यादीत टाकले.

"पाठोपाठच वर्ल्डबँकेने सत्यमवर बदमाषीचा आरोप करत आठ वर्षे काळ्या यादीत टाकले." असे हवे होते...

- नाटक्या

पिवळा डांबिस's picture

12 Jan 2009 - 11:46 pm | पिवळा डांबिस

समयोचित, संयमी आणि समतोल अग्रलेख!!
ह्यावर आणखी टिप्पणी करावे असे आमच्याकडे काहीही नाही....
गुड जॉब, वेल डन!!!

प्रभाकर पेठकर's picture

12 Jan 2009 - 11:49 pm | प्रभाकर पेठकर

शेअरबाजार आणि त्यातले उतार-चढाव ह्या बाबत माझे बरेच अज्ञानच आहे.
पण संपादकिय लेखातून जरा जास्त स्पष्टीकरण, विश्लेषण अपेक्षित होते. लेख जरा, 'पेपरमधील बातम्यांचे संकलन' अशा अंगाने झाला आहे असे वाटते. सर्वसामान्य माणूस कंपन्यांचा ताळेबंद, ऑडिटर्सची विश्वासार्हता ह्यावर अवलंबून शेअर्स खरेदी करतो. पण इतकी काळजी घेऊनही भागधारकांना तोंडघशी पडावे लागत असेल तर ह्या पुढे कुठली काळजी गुंतवणूकदारांनी घ्यावी? सत्यमच्या ऑडीटर्सच्या अखत्यारीत येणार्‍या इतर कंपन्यांचे शेअर्स ठेवावेत की विकावेत? ऑडीटर्सचा ऑडिटींग परवाना रद्द का केला जाऊ नये? करतात का? शेअर्सचा व्यवहार हा एक जुगार असला तरी सुरक्षित जुगार खेळता येऊ शकतो का? असेल तर कसे? इत्यादी प्रश्नांवर उहापोह अपेक्षित होता.
असो. अजूनही एखाद्या स्वतंत्र लेखात वरील चर्चा, उहापोह, विश्लेषण, समुपदेशन शक्य आणि गरजेचे आहे.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

मैत्र's picture

13 Jan 2009 - 10:40 am | मैत्र

पेठकर काकांशी सहमत आहे. समयोचित लेख पण संपादकाचं मत जाणवलं नाही.
बहुतेक भाग यामध्ये रस घेणार्‍या आणि थोडं फार टाइम्स व इकॉनॉमिक टाइम्स वाचणार्‍याला माहित असला पाहिजे.
विशेषतः नियंत्रक आणि लेखापाल यावर जे शेवटच्या परिच्छेदात म्हटलं आहे ते थोडं विस्ताराने संपादकांच्या मतासह मांडावं अशी नानांना विनंती.

अवलिया's picture

13 Jan 2009 - 5:33 pm | अवलिया

सर्व वाचकांचे आभार. अनेकांनी अधिक काही मुद्यांवर प्रकाश टाकावा असे प्रतिसादात, खरडीत, व्यनीत म्हटले आहे. जशी विस्तृत माहिती समोर येईल त्यानुसार, तसा लेख मिपावर टाकण्याचा प्रयत्न मी करेन.

पुनश्च एकवार सर्वांचे आभार.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

अभिज्ञ's picture

13 Feb 2009 - 12:38 pm | अभिज्ञ

नाना,
अग्रलेख आवडला.
पुढील लेख केंव्हा देताय?
तसेच सध्याचा बाजार पाहता गुंतवणुकिबद्दल काहि मार्गदर्शन करावेत हि विनंती.

अभिज्ञ.

श्रीयुत संतोष जोशी's picture

13 Feb 2009 - 1:05 pm | श्रीयुत संतोष जोशी

फार सुंदर अग्रलेख

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.