पर्समधले रहस्य - भाग १
दोन
‘हो,’ ती म्हणाली. ‘निवडणुकीला फक्त महिना राहिलाय. आमची दोघांची नावं एकत्र छापून आली तर...’
‘तर लोक हवा तो अर्थ काढतील,’ मुकुल म्हणाला. ‘पण मिसेस मेहरा, मगाशी मी गोळी कुणी झाडली असं विचारलं, तेव्हा तुम्ही ‘नाही’ म्हणालात. त्या वेळी तुमची नजर खिडकीकडे गेली होती. मला खोटं सांगितलंत तर मी तुमचा खटला घेऊ शकत नाही. आणि आज जे सांगितलं जात नाही, ते कोर्टात नेमक्या वेळी बाहेर येतं.’
ती खूप वेळ बोलली नाही. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती.
‘ईशिता मेहरा हे माझं खरं नाव नाही,’ ती शेवटी म्हणाली.
दारापलीकडे आर्याने पेन टेबलावर ठेवल्याचा आवाज आला. तिला हे आधीच माहीत होते.
‘मग खरं नाव?’
‘ते मी आत्ता सांगू शकत नाही. पण बाकी जे सांगेन, त्यातला शब्द न् शब्द खरा असेल.’
‘बोला.’
तिने सांगायला सुरुवात केली. काल रात्री पावणेनऊच्या सुमाराला ती आणि योगेश चव्हाण दरबार-ए-हिंदच्या पुढच्या हॉलमध्ये जेवायला बसले होते. आतल्या बाजूच्या दोन खाजगी हॉलमध्ये लग्नाचे स्वागत-समारंभ चालू होते. नऊ वाजून दहा मिनिटांनी तोंडाला रुमाल बांधलेला एक बंदुकधारी आत शिरला. त्याने ओरडून सगळ्यांना पाकिटे, घड्याळे आणि दागिने काढून टेबलावर ठेवायला सांगितले. एक तरुण उभा राहिला, विरोध करायला. बंदुकीचा नळा त्याच्याकडे वळला आणि त्याच क्षणी मागच्या बाजूने गोळीचा आवाज आला. बंदुकधारी खाली कोसळला.
‘एकच गोंधळ उडाला,’ ती म्हणाली. ‘बायका ओरडत होत्या, कुणी टेबलाखाली घुसलं. मी योगेशचा हात धरला आणि बाहेर पडायचा प्रयत्न केला. पण मुख्य दारापाशी हॉटेलचे लोक आणि सिक्युरिटीवाले आधीच उभे होते. कुणाला सोडत नव्हते. आणि थोड्याच वेळात पोलीसही आले.’
‘पोलीस इतक्या लवकर?’
‘हो. मलाही तेच वाटलं.’
‘मग तुम्ही बाहेर कशा पडलात?’
‘गर्दीतून. किचनच्या मागच्या दारानं. योगेश दुसऱ्या वाटेनं गेले.’ ती थांबली. ‘गर्दीत कुणीतरी माझ्या अगदी जवळून गेलं. धक्का लागला. मला वाटलं कुणीतरी घाबरून धडकलं असेल.’
‘मग?’
‘रात्री घरी पोचले तेव्हा इतकी थकले होते की पर्स उघडलीसुद्धा नाही. आज सकाळी...’
तिने खांद्यावरची पर्स दोन्ही हातांनी टेबलावर ठेवली आणि हळूच मुकुलच्या दिशेने सरकवली.
‘आतल्या कप्प्यात मला हे सापडलं.’
मुकुलने चेन उघडली नाही. तो आधी पर्सकडे आणि मग तिच्याकडे पाहत राहिला. चेहऱ्यावरचा एकही स्नायू हलला नाही, पण त्याने खुर्चीचे हात घट्ट धरले होते.
‘हे उघडताना तुमची बोटं त्यावर उमटली असतील.’
‘हो.’
‘आणि आत जे आहे ते मला वाटतंय तेच?’
‘हो. पिस्तूल.’
मुकुल उभा राहिला. त्याने पर्सला हात न लावता, पेनाच्या टोकाने ती टेबलाच्या कोपऱ्याकडे ढकलली.
‘मिसेस मेहरा, काल रात्रीपासून पोलीस ज्या पिस्तुलाचा शोध घेताहेत ते तुम्ही स्वतःच्या हातानं माझ्या ऑफिसात आणलंत. तुम्ही हे कुणाला सांगितलंत का?’
‘कुणालाच नाही. म्हणून तर तुमच्याकडे आले.’
त्याने आर्याला आत बोलावले. तिच्या समक्ष पर्स एका जाड लिफाफ्यात ठेवली, लिफाफ्यावर तारीख आणि वेळ लिहिली आणि दोघांनी सह्या केल्या.
‘पुरावा लपवायचा नाही,’ तो आर्याला खालच्या आवाजात म्हणाला. ‘पण योग्य वेळेआधी कुणाच्या हातून उघडूही द्यायचा नाही.’
लिफाफा चिकटवला जात असताना ईशिता एकदम लाल झाली. ‘त्या आतल्या कप्प्यात माझ्या काही... खाजगी वस्तू आहेत. त्या कृपा करून कुणी उघडून पाहू नयेत.’
‘खाजगी वस्तू? पिस्तुलाच्या शेजारी?’ मुकुलने भुवया उंचावल्या.
‘पिस्तूल मी ठेवलेलं नाही. पर्स माझी आहे, एवढंच.’
आर्याने तोंडावर रुमाल दाबला आणि दुसरीकडे बघत मुद्दाम खोकली.
तेवढ्यात बाहेरच्या दारावर जोराची थाप पडली. आर्या बाहेर गेली आणि लगेच परत आली. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता.
‘सर, पोलीस आलेत. इन्स्पेक्टर देशमुख. आणि बरोबर योगेश चव्हाणचे वकीलही आहेत. म्हणतात, योगेश चव्हाणना आत्ताच ताब्यात घेतलंय.’
मिसळपाव
प्रतिक्रिया