पावसाळी रात्र. हॉटेलमध्ये अचानक पडलेला दरोडा, अंधारातून झाडलेली एक गोळी, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एका अनोळखी स्त्रीच्या पर्समध्ये सापडलेलं पिस्तूल. निर्दोष माणसांसाठीच लढणाऱ्या वकिलाला अखेर उलगडावं लागतं एका मोठ्या कटाचं गूढ.
एक
सकाळचे साडेनऊ वाजले होते. प्रभात रोडवरच्या त्या जुन्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ॲड. मुकुल आपल्या टेबलामागे येऊन बसला होता. जिन्याच्या भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्यांची नक्षी होती आणि दारावरची ‘मुकुल, फौजदारी वकील’ ही पाटी पावसाच्या पाण्याने खराब झाली होती. रात्रभर पाऊस पडत होता. पहाटे तो थांबला, पण आभाळ अजून काळवंडलेलेच होते. खिडकीतून समोरच्या रस्त्यावरच्या डबक्यांतून गाड्या पाणी उडवीत जाताना दिसत होत्या.
समोर एक फाईल उघडी होती, पण अर्धा तास झाला तरी मुकुलने तिचे एकही पान उलटले नव्हते. आदल्या दिवशी एक माणूस आला होता. बांधकामातला छोटा ठेकेदार. त्याच्या हाताखालच्या एका मजुराचा अपघातात मृत्यू झाला होता आणि त्याला साक्षीदारांना ‘समजावून सांगायचे’ होते. फीचा आकडा त्याने पन्नास हजारांपासून सुरू केला आणि दोन लाखांवर नेला. मुकुलने काहीच न बोलता त्याला दाराकडे बोट दाखवले होते. आता महिन्याच्या भाड्यासाठी तगादा लावणाऱ्या घरमालकाचा चेहरा त्याला डोळ्यांसमोर दिसत होता.
मुकुल छत्तीस वर्षांचा होता. शहरातल्या फौजदारी वकिलांत त्याचे नाव होते, पण ते त्याने जिंकलेल्या खटल्यांमुळे जितके, तितकेच त्याने नाकारलेल्या खटल्यांमुळेही. गुन्हा केलेला माणूस आहे अशी खात्री पटली की तो त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवी, मग तो कितीही पैसे देणारा असो. आणि एखादा निर्दोष माणूस, ज्याच्या पाठीशी कुणी नाही, तो आला की मुकुल फीचा विचारही करीत नसे. यामागे एक कारण होते, जे आर्यालाही माहीत नव्हते.
मुकुल एकोणीस वर्षांचा असताना त्याचे वडील, महापालिकेत कारकून, अपहाराच्या खोट्या आरोपाखाली अटक झाले होते. खटला अडीच वर्षे चालला. वकिलाने जामिनासाठी पाच हजार रुपये मागितले होते, पण ते घरात नव्हते. वडील तुरुंगातच राहिले, आणि निकाल लागायच्या चार महिने आधी छातीत कळ येऊन तिथेच गेले. नंतर कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले. तो कागद मुकुलने आजही ऑफिसच्या तिजोरीत, सगळ्या फाईलींच्या खाली, जपून ठेवला होता. कुणाला दाखवला नव्हता, कुणाला सांगितलेही नव्हते.
दार वाजले. त्याची कनिष्ठ सहकारी आर्या आत आली.
‘सर, एक बाई आलेय. अपॉइंटमेंट नाही.’
‘काय काम आहे?’
‘सांगत नाही. म्हणते तुम्हालाच सांगेन. नाव ईशिता मेहरा सांगितलं.’ आर्या क्षणभर थांबली. ‘पण मला खरं वाटत नाही, सर.’
‘का?’
‘तिनं फोन नंबर दिला, तो मी आपल्या डिरेक्टरीत पाहिला. तो एका पुरुषाच्या नावावर आहे. आणि पत्ता विचारला तर म्हणते प्रभात रोडवर राहते. कुठली बिल्डिंग, कितवा मजला, काहीच सांगत नाही.’
मुकुलने फाईल मिटली. ‘घाबरलेली माणसं बऱ्याचदा खोटं नाव सांगतात, आर्या. पाठव तिला आत.’
आर्या गेली तीन वर्षे त्याच्याकडे काम करीत होती. ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक नवीन माणसाला आधी तीच तपासून घेई, त्याची गोष्ट ऐकून घेई आणि मग ठरवी की मुकुलचा वेळ त्याला द्यायचा की नाही. ती चुकली असे आजवर फार क्वचित झाले होते.
थोड्याच वेळात एक तरुण बाई आत आली. वय सव्वीस-सत्तावीस. साधी, हलक्या रंगाची साडी, खांद्याला मोठी तपकिरी पर्स. आत येताच तिने मागे वळून दार नीट बंद झाले आहे का ते पाहिले. मग तिने एका नजरेत सारी खोली पाहून घेतली, कायद्याची पुस्तके, कोपऱ्यातली जुनी तिजोरी, भिंतीवरचे घड्याळ. पर्स तिने डाव्या हाताने घट्ट धरली होती आणि उजव्या हाताने साडीचा पदर. बोटे पांढरी पडली होती.
‘बसा.’
ती बसली. पर्स मांडीवर घेतली. ‘तुम्ही वकील मुकुल?’
‘हो.’
‘मी अडचणीत सापडले आहे.’
मुकुलने नुसती मान हलवली. अडचणीत सापडल्यावरच माणसं वकिलाकडे येतात. त्यात नवीन काही नव्हते.
‘मी आधी दोन-तीन वकिलांकडे जाऊन आले,’ ती म्हणाली. ‘पण त्यांची ऑफिसं पाहून आत जायची हिंमतच झाली नाही. एवढी मोठी, एवढी चकचकीत. आपली अडचण तिथं फार लहान वाटली असती.’
‘किंवा फार घाणेरडी,’ मुकुल म्हणाला. ‘इथं तसं काही वाटून घ्यायचं कारण नाही. मी फक्त निर्दोष माणसाचा खटला घेतो. तुम्ही निर्दोष असाल तर बोलू. नसाल तर मी तुम्हाला तसं स्पष्ट सांगेन. नाव काय तुमचं?’
‘ईशिता मेहरा. मी विवाहित आहे. प्रभात रोडवर राहते.’
नाव सांगताना तिने क्षणभर नजर खाली घेतली. मुकुलला ते जाणवले, पण त्याने काही म्हटले नाही.
‘सांगा, काय झालं?’
‘काल रात्री दरबार-ए-हिंद हॉटेलमध्ये जो दरोडा पडला, त्याबद्दल तुम्ही पेपरात वाचलं असेल.’
‘वाचलं. एका बंदुकधाऱ्यानं लूट सुरू केली होती आणि कुणीतरी त्याच्यावर गोळी झाडली. तो गंभीर जखमी आहे.’
‘मी तिथं होते.’
‘कुठे बसला होतात?’
‘पुढच्या हॉलमध्ये. जिथं जेवण होतं तिथं.’
‘गोळी कुणी झाडली, माहीत आहे?’
तिची नजर क्षणभर खिडकीकडे वळली. मग मुकुलकडे बघून ती म्हणाली, ‘नाही.’
उत्तर फारच पटकन आले होते. मुकुलने ते मनात ठेवून घेतले. समोर टेबलावर काचेचा पेपरवेट पडला होता, त्यात एक छोटे निळे फूल गोठवलेले. तिने तो उचलला आणि बोटांत फिरवू लागली.
‘तुम्ही एकट्या होता तिथं?’
‘नाही.’
‘कुणाबरोबर?’
ती बराच वेळ गप्प राहिली. मग खूप हळू आवाजात म्हणाली, ‘मी तुम्हाला जे सांगणार आहे, ते बाहेर गेलं तर माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. माझ्या नवऱ्याला माहीत नाही की मी काल रात्री कुणाबरोबर होते.’
‘कुणाबरोबर?’
‘योगेश चव्हाण.’
मुकुलच्या भुवया वर गेल्या. ‘योगेश चव्हाण? पोटनिवडणुकीला उभा असलेला तो तरुण उमेदवार?’
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया