✪ कॉलेज गॅदरिंग आणि मित्रांसोबतची धमाल
✪ अखेर रिसर्चची डेडलाईन चुकली!
✪ नर्मदा किनार्यालगतची गावं!
✪ बडवानी आणि एक रूपयाचे पोहे
✪ हॉस्टेलचं दिल- संतोष राठोड
२००८ चा जानेवारी महिना! कॉलेजमधलं दुसरं गॅदरिंग! गॅदरिंगमुळे सगळ्या सबमिशन्सचा आणि कामांचा ताण दूर झाला! गेल्या दीड वर्षामध्ये हॉस्टेलच्या मित्रांनी पुरेसं सोशलाईझ केल्यामुळे सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकलो. अनेकांनी पारंपारिक वेषभुषा केल्या, पारंपारिक गाणी व नृत्य सादर केली. पोवाडा, भारूड, लोकगीत असे परफॉर्मन्सेस झाले. अविनाश रावतेने छान वेशभुषा केली होती. पण त्याने त्याचे धोनीसारखे देखणे केस मात्र गमावले होते! ह्या वर्षी पहिल्या वर्षाचे नवीन चेहरे होते- तेही आता चांगले ओळखीचे झाले होते. सगळ्यांनी खूप उत्साहाने सादरीकरण केलं होतं. संदीप बर्वेची गाणी सगळ्यांना आवडली. शेवटच्या जॅमिंग सत्रात मजा आली! हॉस्टेल मित्रांसोबतचा उड्यांचा डान्स झाला! डान्स करता करता घाम आला तरी थांबवावासा वाटला नाही. काही जण असे मोजून मापून नाचत होते की कमीत कमी दमतील! काय ते दिवस होते!
(ब्लॉगवर सगळे लेख एकत्र वाचता येतील: https://niranjan-vichar.blogspot.com/2026/09/karve-days-9-participation… विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल: https://www.instagram.com/reel/DdolESYzYiK/
१५ फेब्रुवारी संशोधनाचा प्रबंध सादर करण्याची डेडलाईन होती. जानेवारीपर्यंत वाटत होतं की जमेल. पण फेब्रुवारी सुरू झाला आणि हळु हळु ती वेळ चुकणार हे लक्षात आलं. अनेक गोष्टी बाकी होत्या. अनेक प्रकरणं फायनल व्हायची होती. सगळ्या गोष्टी फायनल करून त्याला मसदेकर मॅडमची मान्यता घ्यायची होती. ह्या संशोधनाच्या शेवटच्या टप्प्यावर पहिल्या वर्षाच्या अमित उपमन्यूने खूप साथ दिली. हॉस्टेलवर लॅपटॉप असलेला तो बहुतेक एकच असावा. त्याच्या लॅपटॉपमध्ये प्रबंधाचं लिखाण काम सुरू केलं. रात्र रात्र जागण्याचे दिवस सुरू झाले! आयपॉडवरची, कोणाच्या मोबाईलमध्ये असलेली गाणी आणि एफएम रेडिओ ऐकत काम सुरू झालं. शेवटच्या टप्प्यावर काम होतं पण डेडलाईनची बस चुकली ती चुकलीच!
ह्याच सुमारास समुदाय विकास विभागाच्या मुलांसाठी एक फिल्ड वर्कची संधी आली. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या परिसरातल्या एका संस्थेचं सर्वेक्षणाचं काम होतं. तिथे कर्वेचेच माजी विद्यार्थी अमुल्य निधी काम करत होते. ज्यांचे रिसर्च पुढे गेले आहेत, असे चार लोक निवडले गेले आणि मला त्यामध्ये जायची संधी मिळाली. मी, मनोज मरगडे, बुधाजी गवारी आणि संतोष राठोड हे ते चार जण! त्या परिसरातल्या गावांमध्ये- पाड्यांमध्ये सर्वेक्षण करायचं होतं. अगदी आठ दिवसांचं फिल्ड वर्क होतं. नर्मदा किनारी असलेल्या कसरावट बसावट परिसरात ही गावं होती. जवळचं मुख्य गाव होतं बडवानी! आम्ही चौघं ट्रॅव्हल्सने निघालो. पहाटे झुलवानियाला उतरलो आणि पुढे जीपचा प्रवास करत पोहचलो. हा आठ दिवसांचा अनुभव खूप वेगळा ठरला. ही सगळी गावं अशी होती जिथे पावसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे क्षेत्र बुडीत होत होतं. तिथेच लोकांची घरं- शेतं होती. त्यामुळेच सरदार सरोवर प्रकल्पाविरुद्ध आंदोलन केलं जात होतं. सर्वेक्षणाची प्रश्नावली त्याबद्दलच होती- क्षेत्र किती, लोक किती, विस्थापन किती, पुनर्वसन मिळालं का किंवा कुठे मिळालं इ. इ. अमूल्य निधीच्या मार्गदर्शनानुसार वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन हे फॉर्म्स भरायचे होते. त्याशिवाय तिथलं राहणीमान, लोकांची परिस्थिती, संस्थेचं काम, हे सगळं बघायचं होतं. संस्था अगदी ग्रास रूटवर काम करणारी होती. ग्राम विकास, युवा रोजगार, आदिवासी हक्क अशा विषयांवर काम करणारी आणि नरेगासारख्या योजनांची माहिती लोकांना देणारी.
प्रश्नावली थोडी गुंतागुंतीची होती आणि माहिती घ्यायला कठिण गेलं. पण लोक कसे राहतात, काय परिस्थितीत आहेत हे जवळून बघता आलं. बडवानीला राहण्याची सोय आणि रोज कार्यकर्त्यांसोबत वेगवेगळ्या गावी प्रवास असं काम होतं. माझ्यासोबत संतोष राठोड होता. दुसरे दोघे इतर गावांमध्ये जायचे. त्यानंतर केलेल्या कामाचं रिपोर्टिंग- डायरी लिहीणं हे काम. शिवाय वेळ मिळेल तेव्हा रिसर्चचं काम. भरभर दिवस गेले. हिवाळा असल्यामुळे नदी लांब दिसत होती. पण पावसाळ्यात इथे काय होत असेल हा प्रश्न अस्वस्थ करत होता. आम्ही राहायचो तिथे बडवानी गावात चक्क एक रूपयाचे पोहे मिळत होते! आणि तेही भरपूर. फिल्ड वर्कमध्ये खूप वेगळ्या परिसरात फिरायला मिळत होतं. खरं खुरं जंगलसुद्धा पाहायला मिळालं. अशा खूप वेगळ्या आठवणी घेऊन परत आलो.
आमच्यासोबत असलेला संतोष राठोड खूप वेगळा होता. त्याचं कुटुंब भटकंती करणार्या समुदायातलं होतं. त्याच्या आधी कोणी जास्त शिकलेलं नव्हतं. पण त्याची जिद्द वेगळीच होती. आम्ही कर्वेच्या प्रवेश परीक्षेहून परत गेलो तेव्हा एकाच बसमध्ये होतो. नंतर हळु हळु छान मैत्री झाली होती. प्रसन्नचित्त आणि सगळ्यांना हसवणारा त्याचा स्वभाव. पण तरी तो वेळेच्या बाबतीत पक्का आणि कामाला चोख आहे, हे ह्या प्रवासात कळालं. एकदा सगळ्या सबमिशनच्या ताणामुळे "आत्ता काहीच करणं होत नाही," अशी स्थिती झाली तेव्हा त्याच्या रूममध्ये गेलो. तेव्हा त्याने त्याची एक फाईल दाखवली होती. खूप वेगवेगळी कात्रणं- वेगवेगळ्या विषयांवरची माहिती त्याने जपून ठेवली होती. शिवाय त्याने काढलेल्या नोटस, चित्रं, कविता असंही खूप होतं. त्याची काम करण्याची पद्धत आणि इतका नीटनेटकेपणा बघून मलाही प्रेरणा मिळाली. सबमिशनचं ओझं हलकं झालं आणि झोकून देऊन काम करायची प्रेरणा मिळाली. गंमत म्हणजे तोसुद्धा सेहवागचा चाहता! त्यामुळे छान मैत्री झाली.
असा हा संतोष राठोड. दुर्दैवाने कर्वेतून बाहेर पडल्यावर काही वर्षांनी एका अपघातात तो सगळ्यांना सोडून गेला. "जख्मी दिल" नावाने कविता करणारा सगळ्यांना जख्मी करून गेला. हॉस्टेलवर एक मित्र खूप प्रसिद्ध होता. त्याला सगळे हॉस्टेल की जान म्हणायचे. तो जान असेल तर संतोष राठोड हॉस्टेलचं दिल होता!
पुढचा भाग: कर्वेतले दिवस ११: “पीआरए" साठी दुर्गम गावांचा अभ्यास दौरा
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 3 ऑक्टोबर 2026.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया