फ्लायदुबई या एअरलाईनच्या फ्लाईट FZ 1073 बद्दलची बातमी आता सगळ्यांच्या समोर न्यूज चॅनल्स, यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स आणि अन्य मार्गांनी येते आहे.
विमानाशी सबंधित काहीही घटना आणि दुर्घटना घडली की तिच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवत राहणं आणि इथे मिपावर त्याविषयी चर्चा आणि अपडेट धागा काढत राहणं ही एक सवयच बनली आहे.
ही लेटेस्ट घटना एकदम एखाद्या थरारक सिनेमाच्या कथेला मागे टाकणारी आहे.
३४,००० फुटांवर हवेत घडलेली अत्यंत भयंकर, भीषण, रक्त गोठवणारी सत्यघटना आहे. नेहमीप्रमाणे विमानांच्या जगात अशा घटना घडल्या की सुरुवातीला विखुरलेले आणि सनसनाटी बातम्यांचे तुकडे येतात, खूप अफवा पसरतात, अर्धवट माहितीचे झरे जिवंत होतात.. आणि मग हळूहळू खरा टेक्निकल डेटा समोर यायला लागतो.
हा धागा या संपूर्ण घटनेचे धागेदोरे गोळा करण्यासाठी आणि या विलक्षण घटनेचे अपडेट्स मिपावर नोंदवले जावेत म्हणून सुरू करत आहे.
नेहमीप्रमाणे आधी निव्वळ अ- ललित वस्तुनिष्ठ माहिती:
विमान कंपनी: फ्लायदुबई
फ्लाईट नंबर: FZ 1073 (दुबई ते तेल अवीव)
विमानाचं मॉडेल: बोईंग ७३७ मॅक्स (Boeing 737 MAX 8) जे आपल्या एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने खूप मोठ्या संख्येने ऑर्डर केलं आहे आणि वापरत पण आहेत.
पायलट इन कमांड (PIC): कॅप्टन स्मित मच्छार
फर्स्ट ऑफिसर (को-पायलट): ओमानी नागरिक (याचं नाव का लपवलं आहे हा एक वादग्रस्त मुद्दा निर्माण झाला आहे.)
प्रवासी आणि क्रू: सुमारे १७० प्रवासी (चुभूदेघे) क्रू नेमका किती होता ते बघावं लागेल. पण सुदैवाने दोन ड्यूटीवर नसलेले पायलट पण प्रवाशांमध्ये बसलेले होते. या लेखात मी या सर्व लोकांच्या जिवंत राहण्याला चमत्कार म्हणणार आहे त्यातला एक महत्वाचा भाग.
क्रूझिंग अल्टीट्यूड: फ्लाईट लेव्हल ३४० (३४,००० फूट). यासाठी माझा फ्लाईट लेव्हल संबंधित लेख शोधू शकता जर इंटरेस्ट असेल तर.
इमर्जन्सी लँडिंग: ताबुक विमानतळ, सौदी अरेबिया
आता घटनाक्रम आणि नेमकं काय झालंय ते बघूया. कारण मीही जशाजशा बातम्या वाचत गेलो तसं तसं आगोदर सरळ वाटणारी घटना अधिकाधिक क्लिष्ट आणि सिरियस होत गेली.
विमान जॉर्डन आणि सौदी यांच्या सीमेजवळ आपल्या ठरलेल्या क्रूझ लेव्हलवर (३४ हजार फूट वर लिहिल्याप्रमाणे) उडत असताना अचानक कॉकपिटमध्ये आजवर न झालेलं काहीतरी अघटित घडलं. को-पायलटने (ज्याचं नाव अजूनही लपवलं आहे) अचानक धारदार शस्त्राने पायलट इन कमांड कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर एकदम अनपेक्षित हल्ला चढवला. हे बहुधा काही वैयक्तिक भांडण नव्हतं, तर प्राथमिक माहितीनुसार विमानाचे कंट्रोल कॉलम्स खाली दाबून आणि इंजिन पॉवर म्हणजे थ्रॉटल फुल पॉवरमध्ये सेट करून विमान जमिनीवर आदळवण्याचा तो प्रयत्न होता असं सध्या तरी दिसतं आहे.
कॉकपिटमध्ये को पायलटने चाकू (जो अनेक माध्यमांत सांगितला जातोय पण प्रत्यक्षात विमानाच्या इमर्जन्सीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांतल्या कुऱ्हाडीसारखं एक उपकरण होतं.) वापरून मुख्य पायलटवर जो जीवघेणा हल्ला केला त्यात कॅप्टन स्मित यांच्या अनेक नाजूक जागी घाव बसले. डोक्यावर, पोटावर आणि इतर अनेक जागी. त्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही कॅप्टन स्मित यांनी प्रतिकार चालू ठेवला. ट्रू एअरमनशिप..
ही जीवघेणी झटापट सुरू असताना विमानाने अंदाजे ३० सेकंदांत ३४,००० फुटांवरून थेट १७००० फुटांपर्यंत थरकाप उडवणारा सूर मारला. रडारवर हा ड्रॉप पाहणाऱ्या कोणाचेही ठोके चुकावेत असा हा दर होता.
डेव्हिल इज इन द डीटेल्स. प्रथमदर्शनी हा केवळ एका माथेफिरू किंवा अतिरेकी हल्ल्याचा आणि सुटकेचा प्रसंग वाटेल; पण एक एव्हिएशन अभ्यासक म्हणून डेटा आणि फिजिक्सच्या चष्म्यातून पाहिलं तर खूप गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि माझी काही निरीक्षणं आणि अंदाज आहेत आपल्या त्या भारतीय पायलट इन कमांडबद्दल.. जी खरी ठरतात का हे काळच सांगेल.
पहिलं म्हणजे वीक स्पॉटवर वार झाला असता तर ? आणि कॉकपिट लॉक उघडायला काही सेकंद उशीर झाला असता तर..??!!
जर्मनविंग्जच्या अपघातानंतर ९/११ चे नियम आणि कॉकपिटचे आतून लॉक होणारे दरवाजे खूपच चर्चेत आले होते. जर को-पायलटने केलेला वार कॅप्टनच्या गळ्यातील कॅरोटिड आर्टरीवर किंवा छातीवर लागून कॅप्टन स्मित दुर्दैवाने तात्काळ गतप्राण अथवा बेशुद्ध झाले असते, तर आज आपण १७० किंवा अधिक मृतांची बातमी वाचत असतो. कारण तसं झालं असतं तर कॉकपिटमध्ये त्या आत्मघातकी को पायलटला रोखणारं कोणीच शिल्लक राहिलं नसतं. बाल बाल बचना या उक्तीचं हे उदाहरण का आहे यातला हा पहिला मुद्दा.
आता दुसरा पॉईंट बघूया. ज्यामुळे या सर्व लोकांचं जिवंत असणं हे किती अशक्य कोटीतलं आणि केवळ उच्च कोटीचं नशीब असल्याशिवाय कसं अशक्य होतं हे अधिकाधिक स्पष्ट होईल.
थोडा तांत्रिक भाग अपरिहार्य आहे. इथवर जे वाचक टिकून आहेत त्यांनी नेटाने पुढे वाचा.
मुद्दा एक.. स्ट्रक्चरल लोड आणि एअरफ्रेमचं विघटन ऊर्फ डिसइंटिग्रेशन (Aero Structural Stress):
बोईंग ७३७ मॅक्ससारखी प्रवासी विमानं साधारणपणे +२.५ जी (गुरुत्वाकर्षण) ते -१ जी लोड फॅक्टरसाठी डिझाइन केलेली असतात. ३०-४० सेकंदांत १६-१७ हजार फूट खाली येणं म्हणजे हा निव्वळ नॉर्मल डिसेंट (खाली उतरणं) नव्हता. तो हेतुपुरस्सर पूर्ण पॉवरवर (फुल थ्रॉटल म्हणतात तसा) केलेला स्टीप डाईव्ह होता. विमान ऑलरेडी प्राणघातक स्पिनमध्ये गेलं होतं. अशा स्थितीत विमानाच्या फ्रेमची ताण सहन करण्याची जी एक सर्वाधिक मर्यादा असते ती जवळपास ओलांडली गेली होती.
आतापर्यंत जे कळलं आहे त्यानुसार विमानाच्या टेल रडरला (Tail Rudder) आणि शेपटीच्या भागात असलेल्या स्टेबिलायझरचं प्रचंड नुकसान झालं आहे.
मुद्दा दोन.. अशा तीव्र वेगात जेव्हा विमान आवाजाच्या वेगाच्या मर्यादेकडे जातं, तेव्हा हवेचा डायनॅमिक दाब विमानाचे पंख किंवा शेपूट हवेतच उखडू शकतो.(डिसइंटिग्रेशन)
या घटनेत त्या फिरत फिरत खाली पडणाऱ्या पानासारख्या कोसळण्यातून बाहेर पडताना (पुल आऊट प्रोसिजरमध्ये) जर वैमानिकाने किंचितही जास्त जोरात कंट्रोल कॉलम मागे खेचला असता, तरी अतिरिक्त जी फोर्सेसमुळे विमानाचे हवेतच तुकडे झाले असते. विमान हवेत शाबूत राहणं हा त्या बोईंगच्या डिझाइनचा आणि रिकव्हरी करणाऱ्या हातांचा चमत्कार आहे. जरी अनेक मिडियांमध्ये त्या ऑफ ड्यूटी पायलट्सनी विमान सांभाळले असं लिहिलं असलं तरी माझं विश्लेषण ठामपणे सांगतं की सर्वात महत्वाची कृती म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत आणि कोणतीही हालचाल करणं अशक्य होईल अशा नोज डाईव्ह स्थितीत (शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत) देखील ते जीवघेणं कोसळणं थांबवून विमान पुन्हा क्षितिजसमांतर स्थिर अवस्थेत आणणं.. आणि तेही सबुरीने योग्य प्रमाणात विमानाचं नाक वर उचलत.. हे केवळ स्थितप्रज्ञ मनुष्यच करु शकतो. हॅट्स ऑफ टू कॅप्टन स्मित.
मुद्दा ३.. तीस सेकंदांचा खेळ..
३४ हजार फुटांवरून १७ हजार फूट खाली येण्यासाठी जर अर्धं मिनिट लागलं असेल तर उर्वरित १७,००० फूट अंतर कापून जमिनीवर स्फोट होण्यासाठी त्यांच्याकडे हार्डली आणखी ३० ते ४० सेकंद उरले होते. टाइम वॉज लाईफ. हा त्या चमत्काराचा आणखी एक भाग..
मुद्दा ४.. निगेटिव्ह जी फोर्स आणि मानवी हालचालींचं भौतिकशास्त्र..
काही बातम्यांमध्ये असं म्हटलं गेलं की प्रवाशांनी धावत जाऊन कॉकपिटमध्ये को पायलटला पकडलं आणि विमानाची रिकव्हरी केली. पण फिजिक्सच्या दृष्टीने विचार करा..
जेव्हा विमान पूर्ण थ्रॉटलवर नोज-डाउन फेकलं जातं (जे त्या को पायलटने केलं), तेव्हा केबिनमध्ये प्रचंड भयंकर निगेटिव्ह जी (ऋण गुरुत्वाकर्षण) निर्माण झालं. अशा वेळी उभे असणारे लोक आणि विमानातल्या सर्व वस्तू थेट छतावर आदळतात. अशा स्थितीत कोणालाही पायावर उभं राहून कॉकपिटच्या दिशेने धावणं फिजिकली अशक्य आहे.
त्यामुळे माझ्यामते या घटनेचा खरा क्रम असा असावा..
गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतः आधी हल्लेखोर को पायलटच्या हल्ल्याच्या वेदनेला सहन करत त्याच्या तावडीतून कंट्रोल्स आपल्या हातात घेतले. को पायलटने विमान कोसळून नष्ट व्हावं म्हणून फुल पॉवरवर सेट केलेला थ्रॉटल मागे ओढला.
विमानाचं नाक वर ओढून तो मरणाकडे नेणारा डाईव्ह शांत चित्त ठेवत योग्य नियंत्रित प्रकारे रोखला.. त्यांनी विमानाला साधारण १७,००० फुटांवर जवळपास एक जी फोर्सवर, म्हणजे नॉर्मल अवस्थेत स्थिर केलं. विमान स्थिर झाल्यावरच कॅप्टनने कॉकपिट डोअरचा अनलॉक स्विच दाबला असणार. कॉकपिट डोअर उघडून, पॅसेंजर्स आणि कॅबिन क्रू आतमध्ये घुसून कोपायलटला जेरबंद करुन मग जे ऑफ ड्यूटी पायलट विमानात होते त्यांनी पायलट सीट्सवर बसून विमान नियंत्रित करणं हे डाईव्ह होत असताना शंभर टक्के अशक्य होतं. त्यामुळे आता कॅप्टन स्मित यांनी केवळ कॉकपिटचं दार उघडलं इतकंच श्रेय दिलं जातं आहे ते माझ्यामते अन्यायकारक आहे. कॅप्टन स्मित यांनी आधी पहिल्या पंधरा सेकंदात जर ते कोसळणं नियंत्रणात आणलं नसतं, तेही गंभीर जखमी अवस्थेत आणि को पायलटशी झगडत झगडत.. तर पुढचं सगळं अशक्य होतं.
मुद्दा ५... द मल्टिपल मिरॅकल्स.. विचार करा.. दार उघडल्यावर प्रवाशांनी आत घुसून त्या हल्लेखोर कोपायलटला बांधून टाकलं.
पण सर्वात मोठा स्ट्रोक ऑफ लक म्हणजे याच विमानात फ्लाईदुबईचेच २ अतिरिक्त वैमानिक, ऑफ ड्यूटी क्रू , हे प्रवासी म्हणून प्रवास करत होते..
कॅप्टन मच्छार प्रचंड रक्तस्त्रावामुळे झपाट्याने अशक्त होत जात असताना या क्वालिफाईड वैमानिकांनी कॉकपिटची सूत्रं आपल्या हातात घेतली. वेळेत डॅमेज असेसमेंट केली, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाला सौदी अरेबियातल्या ताबुक नावाच्या विमानतळावर सुखरूप उतरवलं.
एव्हिएशनच्या इतिहासात अशा घटना "झीरो सर्व्हायव्हल प्रॉबेबेलिटी" मानल्या जातात. एकाच वेळी पायलटवर हल्ला, आत्मघातकी डाईव्ह, हवेत तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेली एअरफ्रेम आणि तरीही अगदीच जीवघेण्या जखमा न होता सर्वजण जिवानिशी जमिनीवर उतरणं.. हे निव्वळ नशीब नाही, तर कॅप्टन स्मित मच्छार यांनी मरणाच्या दारात दाखवलेली "एअरमॅनशिप" आहे
FDR (फ्लाईट डेटा रेकॉर्डर) आणि CVR (कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) या दोन्हींचं विश्लेषण आल्यावर नक्की किती जी फोर्स नोंदवले गेले, एअरस्पीड किती होता, डाईव्हमधून ती केवळ काही सेकंद हातात असताना केलेली कौशल्यपूर्ण रिकव्हरी कोणी केली हे सगळं स्पष्ट होईलच.
तूर्तास अपडेट्स सुरू ठेवण्यासाठी हा धागा खुला करतो आहे. तुम्हीही अपडेट्स आणि तुमची मतं नोंदवत रहा..
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया