✪ संस्थांना भेटी, चर्चा, रात्री उशीरापर्यंत प्रश्नोत्तरं आणि गाणी!
✪ प्रत्यक्ष काम करणार्या संस्था व कार्यकर्त्यांसोबत संवाद
✪ एक सदस्यीय "वेळ पाळा समिती"
✪ उदयपूरमधली शिक्षांतर संस्था- "स्वपथगामी"
✪ दोन वर्षांमधल्या खडतर टप्प्याची सुरूवात
✪ फिल्ड वर्कमधले अनुभव, गावं आणि शिकणं
✪ प्लॅन ऑफ वर्कचा पाचवा ड्राफ्ट!
"अभ्यास दौरा" अर्थात् स्टडी टूअर हे माध्यम अनेक संस्थांमध्ये वापरलं जातं. कार्यकर्ते किंवा संस्था सदस्यांनी नवीन शिकण्यासाठी आणि त्यांच्या एकत्रित कामासाठी ते खूप उपयोगी पडतं. अनेक गोष्टी पुस्तकात वाचून किंवा नुसत्या ऐकून कळत नाहीत. त्या प्रत्यक्ष बघितल्यावरच कळतात. त्यासाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या दोन वर्षीय MSW अभ्यासक्रमात अभ्यास दौरा हा भागसुद्धा महत्त्वाचा होता. आमचा समुदाय विकास स्पेशलायजेशनचा दौरा राजस्थानला जायचं ठरलं. उदयपूर, चित्तौड़गढ़, छोटी सादड़ी अशी दक्षिण राजस्थानातली शहरं आणि गावं. तिथल्या ग्रास रूटवर काम करणार्या संस्थांना भेटी द्यायचं ठरलं. सर्वच दृष्टीने हा दौरा अविस्मरणीय ठरला. तिथे शिकायला मिळालेल्या गोष्टी, खूप वेगळं काम करणार्या संस्थांची ओळख, वेगवेगळ्या मुद्द्यांवर होणार्या जोषपूर्ण चर्चा आणि ग्रूपची सोबत! मार्गदर्शनासाठी आवडत्या मॅडम. त्यामुळे खूप मजा करता आली आणि खूप खोलवर अनुभवता आलं.
(ब्लॉगवर सगळे लेख एकत्र वाचता येतील: विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
पुणे ते अहमदाबाद ट्रेनने गेलो. जाण्याचा दिवस २१ ऑक्टोबर २००७ (एका मैत्रिणीच्या वाढदिवसामुळे तो दिवस लक्षात राहिला)! ट्रेनचं तिकीट स्टेशनवर जाऊन आमच्यातल्या प्रवीण आणि मैत्रेयीने काढलं होतं! अहमदाबादमध्ये आमची सिनियर ऍमी भेटली. तिथून उदयपूर हा ८ तासांचा बसचा प्रवास. उदयपूरमध्ये आदिवासींसोबत सखोल काम करणार्या आस्था संस्थेला भेट दिली. त्यानंतर मजदूर किसान शक्ती संगठन (MKSS), प्रयास संस्था व त्यांचं अधिकार आधारित आंदोलन समजून घेतलं. प्रयासमध्ये खेमराजजींसोबत छान भेट झाली. अशा इतरही काही संस्थांना भेटी दिल्या. त्यांच्या ठिकाणी जाऊन काम बघितलं. सविस्तर चर्चा केल्या. भूमीहिन लोकांसोबत काम करणार्या, दलितांसोबत काम करणार्या, बंधुवा श्रमिकांबरोबर काम करणार्या आणि अगदी मानवी तस्करीवर काम करणार्याही त्या संस्था व आंदोलनं होती. ह्या सगळ्याच भेटी खूप काही शिकवणार्या होत्या. कशी एक एक संस्था सुरू होते, कोणती व्हिजन घेऊन काम सुरू होतं, ते कसं वाढतं, काय अडचणी असतात हे शिकायला मिळालं. त्यातल्याच प्रयास संस्थेत मी कालांतराने कामसुद्धा केलं. पण ह्या अभ्यास दौर्यात सर्वांत जास्त भावलेली संस्था म्हणजे उदयपूरची "शिक्षांतर" होती.
शिक्षांतर ही गांधी विचारांवर आधारित शिक्षणातील परिवर्तनासाठी काम करणारी संस्था. खूपच वेगळी. उदयपूरला मनिष जैन ह्यांनी ती स्थापन केली होती. मनिषजी आणि रामप्रसादजींसोबत छान चर्चा झाली. शिक्षणातील परिवर्तन, विकेंद्रीकरण, स्वराज, पर्यावरण, शाश्वत विकास ह्या दिशेने काम करणार्या लोकांचा एक गट असं तिचं स्वरूप होतं. आणि विचार कौशल्यावर तिथे खूप भर होता. प्रत्येक जण विशिष्ट (युनिक) आहे, त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग- साधन वेगळं असू शकतं हा तिथला भाव होता. पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहचवण्याची साधनं तिथे वापरात होती. म्हणजे हात धुण्यासाठी साबणाच्या ऐवजी राख. नळाच्या ऐवजी बादलीत ठेवलेलं पाणी. सौर ऊर्जेचा व सार्वजनिक परिवहनाचा वापर इ. इ. त्याबरोबर होम स्कूलिंगचाही पर्याय ते करायचे. अनुभवातून शिकणं व स्वत:च्या मार्गाने पुढे जाणं, हे त्यांचं सूत्र होतं. त्यांच्या नियतकालिकाचं नावसुद्धा "स्वपथगामी" असं अर्थपूर्ण होतं. मला ही संस्था सर्वाधिक आवडली.
ह्या सगळ्या भेटींमध्ये आणि पूर्ण दौर्यात नागमणी मॅडमनी एक "वेळ पालन समिती" म्हणजे "टाईम कीपिंग कमिटी" बनवली होती. आणि ती एक सदस्यीय होती. माझ्यावर ते काम दिलं होतं. वेळेकडे लक्ष देणे आणि आठवण करून देणे! रिफ्रेशमेंट कमिटी, को-ऑर्डिनेशन कमिटी अशा इतरही समित्या होत्या. रोज साधारण तीन संस्था/ चळवळी/ सेंटर्सला भेटी व्हायच्या. त्या सगळ्या झाल्या की, मुक्कामाच्या ठिकाणी भोजनोत्तर चर्चा रंगायच्या! आमच्यातला संतोष राठोड मुद्दाम जास्तीत जास्त प्रश्न विचारायचा व चर्चा लांबत जायची! तीन मुली, नागमणी मॅडम व चौदा मुलं असा हा ग्रूप. चर्चांमध्ये कधी कधी कोणाला झोप आलीच तर चळवळीतली गाणी! "तोड मर्दा तोड ही चाकोरी तोड बाई तोड ही चाकोरी", "झुंजूमुंजू पहाट झाली" अशी ही गाणी! त्या चर्चा, त्यातले विषय, संस्थांचे कामं आणि मित्र- मैत्रिणींची सोबत, काही जणांची मस्ती आणि नौटंकी! असा हा पाच- सहा दिवसांचा अभ्यास दौरा खूपच मस्त झाला. त्यावर पुढे सादरीकरण, भेटींचे रिपोर्टस आणि संस्थांना धन्यवाद पत्रं पाठवणं अशा गोष्टी होत्या.
... नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झाला ह्या अभ्यासक्रमातला खडतर टप्पा! हळु हळु फिल्ड वर्क, रिसर्चचं डेटा ऍनालिसिस आणि प्रबंध लेखन (चॅपटरायजेशन), फिल्ड वर्कमधला छोटा रिसर्च, वेगवेगळ्या असाईनमेंटस असं वेळापत्रक खूप अवघड व्हायला लागलं. आणि कधी कधी गोष्टी मार्गदर्शक फॅकल्टीचा वेळ मिळत नसल्यामुळेही मागे राहायला लागल्या. फिल्ड वर्कमध्ये प्रवास सुरूच होते. दुसर्या सत्रात मुख्यत: देहूजवळचं कान्हेवाडी तर्फे चाकण, राजगुरूनगर तालुक्यातली गोसासी आणि रेटवडी अशा गावांत जास्त काम होतं. कधी कधी इतर काही गावं किंवा पाड्यांवरही जावं लागायचं. काही गावांमध्ये छोटे अभ्यास करायचे असायचे. सहभाग आधारित मूल्यमापन- Participatory Rural Appraisal (PRA) असा एक भाग होता. शिवाय त्या संस्थेने सुचवलेली आणि फॅकल्टीने सुचवलेली कामं होती. त्या दिवसांमधली एक आठवण म्हणजे एका होम व्हिजिटसाठी एका आतल्या गावामध्ये जावं लागलं आणि तिथेच नंतर मुक्कामही करावा लागला. कधी कधी संस्थेच्याही कार्यकर्त्यांच्या फार ओळखीचं घर नसायचं. संस्था त्यांना माहिती असली तरी मी त्यांच्यासाठी अनोळखीच. पण तरीही आपुलकीने घरातली माय भाकर खाऊ घालायची. चार घास खाऊन घे म्हणायची. अशी खरी गावं आणि गावातली खरी माणसं त्या फिल्डवर्कमध्ये खूप भेटली. त्यांच्याबद्दल अजूनही मनातून कृतज्ञता वाटते.
फिल्डवर्कमधल्या मायक्रो स्टडीची एक गंमत झाली. त्यासाठीचा "प्लॅन ऑफ वर्कला" फॅकल्टीची मान्यता लागायची. त्यात नक्की काय करायचं आहे, कोणते घटक आहेत इ. इ. हाही एक रिसर्चच असतो, पण छोटा असतो. त्याचा माझा प्लॅन फायनलच होत नव्हता. पहिल्या ड्राफ्टवर मॅडमनी ढिगाने गोष्टी सांगितल्या. मग दुसरा. मग तिसरा! तरीही फायनल होत नव्हता. शेवटी पाचवा प्लॅन कसाबसा फायनल झाला! त्याउलट माझा हॉस्टेलचा मित्र किशोर बिडवे- पहिलाच प्लॅन ऑफ वर्क फायनल! कळायचंच नाही की असं कसं होऊ शकतं! परीक्षा देताना माझी व किशोरची पहिली पुरवणी कोण घेतो अशी शर्यत असायची!
"वेळ पाळा" समितीचा सदस्य असूनही हळु हळु वेळेची शर्यत अवघड झाली. पण सगळ्यांचीच ही स्थिती होती. अनेकांचे रिसर्च मागे रखडले होते. डेटा कलेक्शनच अनेकांचं चालू होतं, ते सुरू न झालेलेही काही होते. ह्या धावपळीत हळु हळु इतर स्पेशलायजेशनच्या मित्र- मैत्रिणींसोबत भेटी थोड्या कमी झाल्या. पण जनरलचे लेक्चर्स तेवढेच हवेहवेसे झाले. त्याशिवाय इतर काही गेस्ट लेक्चर्स असायचे, ग्रूप असाईनमेंटस असायच्या. त्यात ते मित्र भेटायचे. शिवाय स्टुडंट फोरमचं कामही सुरू होतं. अशा गडबडीत मित्र- मैत्रिणींसोबत गप्पा मैफिली, दोन वर्षांत बघितलेला एकच चित्रपट आणि आजारी मैत्रिणीसाठी हॉस्टेलच्या खाली नेऊन दिलेली बिस्कीटं, वाढदिवसाची गमतीदार गिफ्टस, ए१ हॉटेलचा चहा- नाश्ता, मैत्रिणीने नवीन शर्ट भेट देणं आणि तो इथेच घालून दाखव म्हणून मागे लागणं अशाही आठवणी! अशा आठवणींसह २००७ वर्ष संपायला आलं!
पुढचा भाग: कर्वेतले दिवस ९: माहितीच्या अधिकारावर पथनाट्यात सहभाग
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 11 सप्टेंबर 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया