Skip to main content

चल कही दूर निकल जाये ....(५)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/08/2026 18:47 या दिवशी प्रकाशित केले.

कोणीतरी मला हातावर थापटी मारतंय. मी भानावर येतो.

ए... काय झाले..... कुठे हरवलास? सुहास मला विचारतेय.

 

मागील दुवा चल कही दूर निकल जाये.....(४) | मिसळपाव

 मी इकडे तिकडे पहातो. मला जाणीव होते मी फ्लाईट   मधेच आहे. मी ओशाळवाणा हसतो.

किती वर्षे गेली ना? अजून सगळे स्पष्ट आठवतेय. मी सुहासला माझ्या मघाच्या तंद्री बद्दल स्पष्टीकरण देतो.

काही गरज नाहिय्ये. स्पष्टीकरण द्यायची. ते दिवस कोण विसरेल? 

खरे आहे.  पी जी  कॉलेजचे ते दिवस एकदम मंतरलेले असतात. प्रत्येकजण आपण कोणीतरी मोठा होणार आहे या खात्रीत असतो.  स्वप्नांनी भरलेले असतात पण ती स्वप्ने यु जी सारखी नसतात. यु जी मधे असताना काहीतरी खूप करायचे  असते. पण ते कसे करायचे  याबद्दल काहीच माहिती नसते. कोणीतरी चहा विकला आणि त्याला १०० कोटी मिळाले असे ऐकले की १०० कोटींची स्वप्ने दिसायला लागतात.  चहा करता येत नसला तरी  आपल्यालाही चहा विकून पैसे मिळतील  असे वाटायला लागते. दुसऱ्या दिवशी कोणाला तरी कॅंपसमधून कितीतरी लाखाचे पॅकेज मिळाले हे समजते.  त्याच्या कामापेक्षाही आपल्याला तेवढे पॅकेज मिळाले तर ते खर्च कसे करायचे . कपडे कोणत्या ब्रान्डचे घ्यायचे, गाडी कोणती घ्यायची , लॉग ट्रीपला कुठे जायचे.  डीओ कोणता वापरायचा याचेच विचार यायला लागतात.

पीजी ला गेल्यावर  थोडे वय वाढल्यामुळे असेल किंवा मग परिस्थितीची थोडीफार जाणीव झाल्यामुळे असेल पाय थोडे जमिनीवर यायला लागतात. 

.माझे एक काका म्हणायचे की वयाच्या विशीत माणसाला जग बदलून टाकेन अशी जिद्द असते. पंचविशीत आल्यावर तो समाज बदलायची भाषा करत असतो. तीशीमधे आल्यावर बायकोच्या विचारात बदल कसा आणता येईल याचा विचार करत असतो.चाळीशीत घराच्या भिंतींचा रंग बदलायचा विचार करतो आणि पन्नाशीला आल्यावर त्याला जग बदलणे राहू द्या पण आपण घरातली साधी भिंतही बदलू शकत नाही हे त्याला कळून चुकलेले असते. ते काका म्हणायचे तितके नाही पण  मॅनेजमेंट कॉलेजमधे  केस स्टडी वरअसाइनमेंट करताना  कंपन्यांच्या प्रॉडक्ट्स  स्ट्रॅटीजीस ,  त्यांची मार्केटिंग गिमीक्स याची चर्चा करताना आपण यात काय बदलू शकतो याचाच सतत विचार करायची सवय लागते. ते तुमच्या मेंदूचे एका प्रकारे प्रोग्रामिंग केले जाते म्हणाना. मनात सतत प्रॉडक्टिव्हिटी , नफा , स्पर्धा, मार्केट रीच , प्रतिस्पर्ध्यावर मात कशी करता येईल याचेच विचार असतात. जो  हे करणार नाही  तो हरला अशी मनाची समजूत करुन दिली जाते. तुमच्या मेंदूला रोबो बनवले जाते.

ॲमॅझॉन इंडिया फोरम . मार्केटिंग , सप्लाय चेन मैनेजमेंट च्या  स्टुडन्ट साठी अभ्यासाची सुवर्ण संधी . सगळे एकसे एक दिग्गज मंडळी स्टेजवर आहेत.  बहुतेक चेहरेे आंतरराष्ट्रीय मॅगेझीनमधे  झळकलेले. त्याना  नुसते बघायला मिळाले तरी  जन्म सार्थक म्हणावा असे.आम्ही सगळेच अक्षरश:  कानात जीव आणून सगळे इव्हेन्ट अटेन्ड करतो.

  सर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने हे होऊ शकणार नाही.  सगळीच कामे मशीन ने करवून घेतली तर लोकानी काय करायचे.   प्रत्येक क्षेत्रात नफा हे एकमेव उद्दीष्ठ ठेवून चालणार नाही. ईकॉनोमिक्स च्या डॉ.रंगनाथन सरांच्या ऑटोमेशन वर्सेस ह्युमन कॅपिटल सिद्धान्ताला सुहास थेट   आव्हान देते. ते ही ॲमॅझॉन इंडीयाच्या फोरम मधे. सुहास ने प्रश्न विचारायला म्हणून  हात वर केल्यावर आता ही काय विचारणार  म्हणून आम्ही सगळे अवाक झालेलो.तीचा युक्तिवाद  अर्थातच डॉ. रंगनाथन नी मान्य केला नाही.   तीच्या प्रश्नावर रागावून त्यानी हे  मुद्दे  सोव्हियट क्रांतीच्या काळातले आहेत  हे आवर्जून सांगितले.  थेट डॉ. रंगनाथन ना प्रश्न विचारणारी मुलगी म्हणून सुहास सगळ्यानाच माहीत झाली.

प्रत्येक गोष्टीत नफा पहायचा नसतो.  हा विचार  कधी डोक्यात आला नव्हता. पण मग नफा मिळणार नसेल तर मग ते कशाला करायचे? हा पुढचा प्रश्न सुहासलाच विचारायला हवा.

का कोण जाणे पण सुहासचा मुद्दा डोक्यात फिट्ट बसला. पुढचा आठवडाभर तो डोक्यात भुंगा होऊन फिरत राहिला.

तिसऱ्या सेमिस्टर मधे हे असले विचार फार काळ रेंगाळत ठेवणे परवडत नाही. सगळ्याना  कॅंपस इन्टरव्ह्यू  चे वेध लागलेले असतत. त्याची तयारी करणे ही इतिकर्तव्यता असते. 

सी पी एल. मधे काम करणे हे बिग फोर मधे काम करण्यापेक्षाही प्रेस्टीजीयस . इन्टरव्ह्यू च्या सेकंड राउंड ला येणे हे सुद्धा खूप मोठे समजले जाते.

थर्ड राउंड मधे आम्ही फक्त पाच कैन्डिडेट्स सिलेक्ट झालेलो आहोत. गुरुदीप, हॅन्सन , कमलाक्षी सुहास आणि मी. या पुढचा राउंड  पर्सनल. इन्टर्व्ह्यू. यात तुमचे  एखाद्या प्रश्नावरचे , सिच्यूएशनवरचे मत  विचारतात.  हे कशाही प्रकारचे असू शकते. हैन्सन चा इन्टर्व्ह्यू अर्धा तास चालतो. त्याला सद्दाम हुसेन ने कुवेत वर केलेल्या आक्रमणाचे समर्थन करायला सांगितले. हे ऐकल्यावर आम्ही सगळेच टेन्स .   गुरुदीप ला  एका मायक्रो फायनन्स बद्दल  विचारले. हैन्सन ला  आय एम एफ  लोन्स, आणि गरीब देश या बद्दल.  विसाव्या  मिनीटाला हैन्सन घामाघूम होऊन बाहेर आला. आता माझा नम्बर.मी आत जातो.  समोर चौघे जण होते. त्यातले एक सी पी एल चे  व्हीपी एच आर.  सुरवातीचे हाय हॅलो झाल्या नंतर  मला  हॅन्डलिंग क्रिटिकल पाथ  इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट वर बोलायला सांगितले.  मी बोलायला सुरुवात करतोो. समोर बसलेले शांतपणे ऐकताहेत.  पुढची सात मिनीटे मी बोलतो. सगळं बोलून संपतं. आता नवीन काही सांगण्यासारखे काही नाही. एक चमत्कारीक शांतता. समोरचे कोणीच काहीही बोलत नाहीत.  त्या चमत्कारीक शांततेचं ओझं होतंय.  समोरचे काही बोलतील या अपेक्षेने त्याम्च्याकडे पहात मी कसनुसा हसतो. त्यावर कोणीच प्रतिक्रीया देत नाही. मी चुळबुळत रहातो. काही वेळाने  त्या पॅनल मधला एक जण म्हणतो. "थॅंक्यू .  तुम्ही जाउ शकता पुढच्या कॅन्डीडेट ला पाठवा". बस इतकेच. तुमचे सिलेक्षन झालंय नाही याबद्दल काहीही बोलणे  नाही. काय समजायचं एखाद्याने? मी प्रश्नार्थक  चेहेऱ्याने बाहेर पडतो.  माझ्या नंतर सुहासचा नंबर. सुहास आत जाते.

त्या नंतरच्या मोजुन चौथ्या मिनीटाला सुहास बाहेर येते.  तीच्या चेहेऱ्यावरून काहीच कळत नाही.  पण ती बाहेर येते ती  अगदी कैज्यूअल चेहेऱ्याने. आपण कोणता इन्टरव्ह्यू दिला आहे , तो हुकला आहे , एक संधी गेली वगैरे कसलेच भाव नाहीत.

पण तीला विचारायचे कोणी धाडस केले नाही. निदान त्यावेळेला तरी. 

काही दिवसानी आम्हा पाचही जणाना जॉब ऑफर आली.  पहिले सहा महिने मॅनेजमेंट ट्रेनी  त्या नंतर परफॉर्मन्स वर रीजनल मॅनेजर म्हणून.

त्या आठवड्यात  आणखी सात कंपन्या  कॅंपस  साठी आल्या. बॅचमधल्या बहुतेक जणाना जॉब ऑफर मिळाला.  ही चर्चा सुरू असताना सुहास सीपीएल ची जॉब ऑफर नाकारल्याची बातमी  आली.  ती येडी आहे यावर सगळ्यांचे पूर्ण एकमत .  काही जणाना तीला दुसरी काही ऑफर आली आहे अशीही एक वदंता . पण त्याा दिवसा नंतर कोणतीही कंपनी कॅंपस साठी आली नाही. 

परीक्षा झाल्या तसे सगळे पांगले. हॉस्टेलीयर्स तर सर्वात अगोदर. लास्ट डे म्हणून एक जोरदार पार्टी. परवडेल तेवढ्या पैशात. या शहरात दोन वर्षे राहिलो .  चोवीस महिने. सतत अभ्यास, असाईनमेंट, प्रेझेंटेशन्स हे करण्यातच गेले.  या शहराला परकेच राहिलो. कसले रुणानुबंध नाहीत. की कोणाशी मैत्री नाही. अगदी हॉस्टेल मधल्या सोबत्याशी देखील नाही.  एक प्रकारची विरक्त भावना. 

मी बैग आवरतोय. त्याने काहीच होणार नाही हे माहीत असूनही  व्हॉट्सॅप वर ग्रुप स्थापून झालाय. पुढचे फारतर दोन आठवडे गुड मॉर्निंग गुड नाईट चे मेसेज. जगाला माहीत असलेले ज्ञानाचे  अपचन होईल इतके घडे ,  हाताचा अंगठे , बरोबरची टीक या पेक्षा फारसे काही होणार नाही.  व्हॉट्सॅप चे क्षणभंगूर जग. नाईलाज म्हणून ठेवावे लागते फोनवर.

माझ्या फोनची रिंग वाजते. सुहास चा फोन आहे.  सांड्या! संध्याकाळी काय करतो आहेस. तुला भेटायचेय. महत्त्वाचे काम आहे. फोनवर नाही सांगता येणार. आपण 

सुहासला काय म्हणायचे याचा अंदाज आहे. तीला आपण ती जॉब ऑफर का नाकारली याबद्दल बोलायचे असेल

मी कॅफेमधे आत जातो. सुहासने टेबल अगोदरच बुक करुन ठेवले आहे. टेबलवर  गुलाबाची दोनच फुले असलेला एक अगदी लहान बुके ठेवलेला आहे.  कोणासाठी असेल हे. तीने आणखी कोणाला बोलावलंय का? काहीच माहीत नाही. जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय.

मी स्थानपन्न होतो. माझ्या अगदी मागोमाग सुहास येते.  आज ती काही वेगळीच दिसतेय. अगदी एखाद्या चित्रात असावी तशी.   फिकट निळा टॉप त्यावर डार्क  ओढणी. त्याच रंगची सलवार. गळ्यात मोत्याची माळ. तीचे डोळे काहीतरी छान दिसताहेत. पुन्हा पुन्हा त्यांच्या कडे पहावेसे वाटते. रेखीव . सुहास एरवीही मोहक  दिसते पान आज  त्यापेक्षा कितीतरी पटीने तीचा चेहेरा अधीक छान वाटतो. काहीतरी वेगळे दिसतेय तीच्यात आज.  मला जाणवतेय ते कशामुळे  हे समजत नाही. काहितरी वेगळे आहे. हे नक्की. 

सुहास हसते. एकसारखे रेखीव दात. आणि त्या एखाद्या सुंदर चित्राला फ्रेम असावी असे  त्या दातांना कोंदण वाटावे अशी गडद लाल लिपस्टीक लावलेले तीचे ओठ.  तीचे ते पिंगट स्वप्नाळू डोळे , ते ही तसेच. काजळाच्या एका महिरपी  रेषेने त्याना कितीतरी अगदी एका शब्दात सांगायचे तर मॅग्नेटीक केलं. लहानपणी एकदा शेजारच्यांच्या पारीजातकाच्या फांदीत  माझा पतंग अडकला होता. दोरा तुटला तरी तो तिथेच वाऱ्यामुळे फडफडत होता. त्याची आठवण झाली.  

त्या पतंगासारखाच मी त्या डोळ्यात अडकून पडलो. नजरबंदी व्हावी तसा.   नजरबंदी  हाच शब्द  चपखल होईल त्यासाठी .

मी कदाचित तीच्या चेहेऱ्याकडे फारच टक लावून पहात असेन.

काय आहे? ती हसून विचारते.

 काही नाही काही नाही. मी भानावर येतो.  नजर चुकवत कसनुसा हसतो.   ते हे ते आपले. काय ते...   काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलतो.

काही नाही ना. तीच्या प्रश्नाला मी फक्त मुंडी हलवत उत्तर देतो. कोणी पाहिले असते तर, त्या मान हलवण्यातून हो आणि नाही असे दोन्ही अर्थ निघाले असते. त्याला कळालंच नसते.

ती पुन्हा हसते.  मी छान दिसतेय ना आज?  अशा गुगली  प्रश्नाला उत्तर देणे अवघड असते. खरे बोलावे की खोटे ते ठरवता येत नाही.  नाही म्हणणे अशक्य असते.  मला उगाचच पाडगावकरांची कविता आठवते. "हे प्रश्न जीवघेणे ....हरती इथे शहाणे"  मी त्यावर नुसताच हसतो. अशाावेळी  करण्याासारखे  दुसरे काहीच नसते म्हणा.

कसा आहेस? लोक हा प्रश्न का विचारतात कोण जाणे.   असा प्रश्न  एक तर विचारूच नये . कान्हेरे आजोबाना कोणी असा प्रश्न विचारला की ते इतके काही सांगत बसतात की आपण प्रश्न विचारून चूकच केली याची विचारणाराची खात्री होते.

परवाच तर भेटलो होतो की.

तरीही.

मजेत ॲज युज्वल.

मला काहीतरी बोलायचेय.

बोल. मी सावरून बसतो. 

 मी  ती सी पी एल ची ऑफर का नाकारली हे विचारले नाहीस मला? 

आम्ही सगळे वीस वीस मिनीटे आत होतो.  तुझा इन्टरव्ह्यू इतक्या पटकन कसा संपला याचे आश्चर्य वाटले होते.

विचारले नाहीस मग? 

माझे काहीच उत्तर नाही. मी अजूनही तीच्या डोळ्यांतच अडकलोय. 

त्यानी  मला विचारले की  भारताच्या परराष्ट्रीय धोरणात पेट्रोकेमीकल रीफायनरीचा काय रोल रहातो. 

मग

मला त्या प्रश्नाचा रागच आला. मी त्याना थेट सांगितले. मी याचे उत्तर देऊ शकते . पण  तुम्ही मला जो जॉब ऑफर करणार आहात त्याच्याशी या प्रश्नाचा काय संबन्ध आहे हे समजले तर उत्तर देऊ शकेन.

मग. मग काय त्या पॅनेल वरच्या लोकानी एकमेकांकडे पाहिले. काही वेळ ते निरुत्तर झाले. त्यानी काहीतरी मार्क केले आणि मग म्हणाले.ठीक आहे. यू मे गो. थ्यांक्यू.

पण मग तुला त्यानी जॉब ऑफर केली त्याचे काय.

त्याना त्या स्पेसिफिका रोल साठी   मैनेजमेंट ला प्रश्न विचारण्याची हिम्मत असणारा उमेदवार हवा होता म्हणे. हे मला सोलकर सरांनी सांगितले.

पण मग तू ती ऑफर नाकारलीस.

हो मला कॉर्पोरेट रॅट रेस मधे जायचे नाहिय्ये.  रॅट रेस मधे तुम्ही जिंकलात तरीही तुम्ही एक रॅटच असता. आय डोन्ट वॉन्ट टु बी अ रॅट. 

पण मग तुझ्याकडे दुसरी ऑफर आहे?

नाहिय्ये. मला काय करायचे नाहिय्ये ते माहित आहे. काय करायचे आहे ते अजून ठरवायचे आहे.

पण हे म्हणजे.

ते जाऊ देत. मी आज एका खास गोष्टीसाठी आज इथे आले आहे. माहीती आहे काय बोलणार आहे मी ते तुला?   माझे बोलणे सुहास मधेच तोडते.

समथिंग स्पेश्यल. व्हेरी व्हेरी स्पेष्यल.  पर्स मधून मोठ्ठी   कॅडबरी  काढून  त्याच्यासह तो दोन फुलांचा बुके माझ्या पुढे करते. हैव अ नाईस डे. टू युवर सक्सेस. बेस्ट लक  फोर युवर फ्युचर असाईनमेंट्स.

अरेच्चा हे.कशासाठी ? मला काहीच कळत नाही. हे काय चाललय.समथिंग स्पेश्यल ? 

 येस. टु समवन स्पेश्यल .

मला तुला हे सांगायचे होते. कितीतरी दिवस.

काय?

अगदी थेट सांगू?

हो.

हो अगदी थेट सांग.मला आवडेल. ताकाला जावून भांडे लपवायचे कशाला.

तू .. तू ... तू मला आवडतोस. गेले कित्येक दिवस मला तुला हे सांगायचे होते.

काय?  मी   आश्चर्याने खुर्चीवरून उडाऊन पडायचेच बाकी  आहे.

आर यू सिरीयस सुहास. आय मीन...

नो मीन्स... आय ॲम सिरीयस. डॅम सिरीयस.  तुझ्याकडे पांढरा घोडा नसला म्हणून काय झाले.  तू माझ्या स्वप्नातला राजकुमार आहेस.

अग पण ......

नो पण आणि नो  बीण. खूप आवडतो मला तुझा स्वभाव. एकदम आयडीयल. खूप फोकस्ड आहेस तू. काय करायचे आहे ते नक्की माहीत असणारा. मला माहीत आहे हे तु बोलणार नाहीस म्हणून मीच धाडस करतेय.

पुढचे काही क्षण मी गप्प. धक्का बसल्यामुळे असेल किम्वा कशामुळे असेल माहीत नाही. बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये सुहास माझी पार्टनर होती.ती मला तीचा मित्र मानते हेही माहीत होते मला.  पण हे असे काही असेल हा  कधी विचारच केला नव्हता.  

ए.. गप्प का झालास? माझे प्रपोजल आवडले नाही? मिल्स & बून च्या पुस्तकात कधी कधी सिच्यूएअशन असते .   नायक नायीकेला स्वत: होऊन  प्रपोज करत नाही तेंव्हा  नायीक   पुढाकार घेते. 

आणि

आणि काय!   राजकेन्याला तीचा  राजकुमार मिळतो.दे लिव्हड हॅप्पिली. त्यांचा संसार सुरू होतो.

सुहास. तू छानच आहेस. एक मित्र म्हणून सांगतो.   तुझा लाईफ पार्टनर नक्की भाग्यवान असेल. प्रेमळ छान बायको मिळाली म्हणून.

मग?

पण माझ्या लाईफ पार्टनर बाबत कल्पना जरा वेगळ्या आहेत. हे  सांगताना मी  नजर चोरतो.

स्पष्ट सांग नीट जरा.   सुहास माझ्या डोळ्यात पहात बोलते.

तू  मॅनेजमेंट मधे पी जी केलेस. पण मनाने तू अजूनही  शाळेतच वावरतेस. टीन एजर्स मुलींप्रमाणे  पांढऱ्या घोड्यावरून झोकात येणाऱ्या राजकुमाराची स्वप्ने पहातेस.    पुस्तकात कादंबऱ्यात  दाखवलेली स्वप्ने वास्तवात खरी होतातच असे नाही. मला तुझ्या बुद्धी चा आदर आहे.  एखाद्या खेड्यातल्या गुणी  मुलीप्रमाणे  तू कोणाच्यातरी  घरात चूल मूल आणि नातेवाईक यात रममाण होऊन आयुष्य घालवावे असे मला वाटत नाही. तू जर म्हणतेस की काय व्हायचे ते माहीत नाही. पण काय व्हायचे नाही ते माहीत आहे. आपले आयुष्य कोणीही यावे आणि हवे तसे वळवावे इतके किरकोळ नाहिये. ते जर  ओली माती असेल त्या मातीला आकार देणारा  कुंभार   आपणच व्हायचे असते.  आपले भविष्य आपणच लिहायचे असते. स्वप्ने बघताना  सुद्धा स्वप्ने घडवणारे आपण आहोत हे मनात ठेवून पहायची असतात.

हेच हेच मला आवडते रे . तू इतका फोकस्ड आहेस. सुहास च्या पिंगट डोळ्यात पाणी दाटून आलंय.  आत्ता केंव्हाही  धो धो कोसळायला लागेल इतके आभाळ भरून आलंय तीच्या डोळ्यात. तीला आता बोलणं अवघंड झालंय. कोणत्याही क्षणी ती कोसळून रडायला सुरवात करेल.

 मला तीला म्हणायचे आहे की " तु मला आवडतेस" पण मी शब्द आवरतो. त्या ऐवजी तीच्या हातावर हात ठेवतो.

माझ्या हाताचा स्पर्ष होताच ती माझ्या कडे बघते. ती माझ्या हातावर थोपटते.माझी समजूत  काढल्यासारखे. ती काहीच बोलत नाही. डबडबलेल्या डोळ्यानी माझ्याकडे पहाते.  शून्यात पाहिल्यासारखे.काहीतरी हरवल्यासारखे. हातातून निसटून गेल्यासारखे. हरल्यासारखे.

खुर्चीतुन उठते. आणि  कॅफेच्या बाहेर निघून जाते.  

या परिस्थितीत काय करावे हे मला कळत नाही.  सुहास गेली त्या देशेला पहात  मी तसाच बसून रहातो.  आपण केले ते योग्य की अयोग्य ते च समजत नाहिय्ये. 

घरी जातानाही तेच विचार. सुहास मला आवडते. लाघवी आहे. साधी सरळ आहे . थेट मनातले बोलते. आपण तीला दुखावले आहे. का माहीत नाही.

खूप गिल्टी वाटतंय. तीला जाऊन पुन्हा समाजाउया का.

काय होते ते माहीत नाही. मला तीला सांगायचेय  तू मला खूप आवडतेस म्हणून.  अगदी मनापासून. माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तस्साच बसून रहातो.  मी खुर्चीतून उठू शकत नाही.  पायातले त्राण गेल्यासारखा.

मला बाहेर दिसतेय सुहास रिक्षा करून निघून गेली. 

रूमवर गेल्यावर मला झोप येत नाही. रात्री दोन वाजता मी फोन पहातो. व्हैट्सॲप वर सुहासचा फोटो आता दिसत नाही.  तीला मेसेज करतो. मेसेज मधे दोन फुले पाठवतो.  मेसेज पोहोचल्याची  त्या दोन टीक असलेली खूणा येत नाहीत. त्या ऐवजी एकच टीक दिसते. 

मी झोपायचा प्रयत्न करतो.  फेविक्विक ने चिकटवावी तशी नजर आढ्याला चिकटली आहे. डोळे बंद केले की सुहास चा  ते पाण्याने डबडबलेले डोळे दिसतात. तीचा चेहेरा दिसतो.  खूप काही हरवल्याची जाणीव होते. काळ मागे फिरवता आला असता तर कालचा दिवस दुपारपर्यंत मागे फिरवला असता. सुहासची  अधीक चांगल्याप्रकारे  समजूत घातली असती. तुला मला दुखवायचे नव्हते गं. माझे डोळे भरून येतात.स्वत:वरच चरफडतो.

माझ्या हाताला  कोणीतरी हलवंतय. अरेच्चा पुन्हा हरवलास? काय झालं? सुहास माझ्या हातावर थापट्या मारतेय. मी भानावर येतो. आपण फ्लाईट मधे आहोत. आणि मागच्या तीन चार मिनीटात काळाच्या मागे जाऊन  कितीतरी फिरून आलो.

 ओह... मी ..... ,मी तुला खूप दुखावलं ना! मी सुहासला म्हणतो.

 तुझ्या लक्षात आहे ते अजून?

तर विसरेन कसा. आणि तुझ्या?

माझे ही उत्तर तेच. विसरेन कशी. सुहास डोळा मिचकावत म्हणते. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट.

म्हणजे?

सांगते. पण अगोदर तू सांग तू काय केलेस त्या नंतर  सांगते ."

क्रमश:

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया