भटकंती - ४

... असं म्हटलं जातं की उजाड जमीन लागवडीखाली आणणे हे अमेरिकन जनतेचे एक इतिकर्तव्य आहे आणि परिणामी येथे प्रचंड प्रमाणावर जमीन लागवडीखाली आणण्यात आली. त्याचे प्रमाण खरोखरच अमानवी आहे. असे उदाहरण जगात शोधूनही सापडणार नाही. मला वाटते या शेतकऱ्यांनी इंडियन जमातींना विस्थापित केले त्याचे कारण ही कुरणेच आहेत. मी एकदा एका शेतकऱ्यासाठी सर्वेक्षण करताना एक सरळ रेष आखत होतो.. ही रेखा एका पाणथळीतून जात होती. डांटेच्या इन्फर्नोमधे त्या नरकाच्या तोंडाशी एक पाटी लिहिलेली असते. ‘‘आत शिरण्यारांनी आपल्या सगळ्या आशांचा त्याग करून आत शिरावे कारण येथून परत जाणे असंभव आहे.’’ अशी पाटी त्या पाणथळीच्या तोंडाशी लावली असती तरी चालले असते इतकी ती भयंकर होती. हे काम करताना मी त्या मालकाला कित्येक वेळा ती पाणथळ पोहत पार करताना पाहिले आहे. त्याच्या मालकीची अजून एक पाणथळ होती जिचे मी सर्वेक्षण करू शकलो नाही कारण ती पूर्णपणे पाण्याने भरली होती. त्याच्या मालकीच्या तिसऱ्या पाणथळीचे सर्वेक्षण मात्र मी करू शकलो त्यावेळी तो काय म्हणाला हे माझ्या चांगलेच लक्षात आहे. तो म्हणाला, ‘‘ प्राण गेला तरी मी या पाणथळी विकणार नाही आणि त्याचे मुख्य कारण आहे त्यात जमलेला सुपीक गाळ.’’ एवढेच नाही तर तो त्या पाणथळीभोवती दोन तीन वर्षात खंदक खोदण्याची योजना बनवत होता आणि त्यातून जमलेला गाळ बाहेर काढणार होता. ही मातीची महती आहे..
ज्या शस्त्रास्त्रांनी आम्ही जी युद्धे जिंकली आहेत आणि शस्त्रे आम्ही आमच्या पुढील पिढ्यांच्या हातात सोपविणार आहोत ती तलवारी आणि बंदुका नाहीत हे लक्षात घ्या. मग आम्ही जी खरी युद्धे जिंकली ती फावड्यांच्या साहाय्याने, कुदळींच्या साहाय्याने आणि खुरप्यांनी. खडकाळ जमिनींची ही युद्धे जिंकताना या शस्त्रास्त्रांना भूमीचे रक्त लागून ती गंजलीही असतील. फार पूर्वी याच कुरणांमधे इंडियन जमातींनी मक्याशी शेते लावली असणार आणि त्यांना योग्य मार्ग दाखवला असणार पण तो मार्ग अनुसरण्यासाठी त्यांच्याकडे कसब नव्हते. त्या जमिनीभोवती खंदक करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य अवजारे नव्हती. पण आता गोष्ट वेगळी आहे. आता शेतकऱ्यांकडे कुदळी आहेत आणि नांगरही आहेत.
साहित्यातही तुम्ही पाहाल, आपल्याला जंगलांचेच जास्त आकर्षण वाटते. रुळलेल्या वाटेचे दुसरे नाव कंटाळा ! समाज काय म्हणेल याचा विचार न करता, असंस्कृत, स्वतंत्र जी मते हॅमलेट आणि इलियडमधे मांडली गेली आहेत त्यामुळेच ती पुस्तके आपल्याला आवडतात. तीच गोष्ट दंतकथा व पुराणकथांबाबतीत खरी आहे. ज्याप्रमाणे जंगलातील बदके बागेतील पाळलेल्या बदकांपेक्षा जास्त तरतरीत असतात, उत्साहाने सळसळत असतात, सुंदर असतात त्याचप्रमाणे स्वतंत्र विचारही पाणथळींच्या वरून धुक्यातून झेप घेणाऱ्या मॅलार्ड पक्षांसारखे असतात. खरोखरच सांगतो, चांगली पुस्तके ही अफाट पसरलेल्या कुरणांवर अचानक उमललेल्या रानटी फुलांप्रमाणे असतात. चमकदार आणि सर्वार्थाने परिपूर्ण ! जी अंधाराचे अस्तित्व दाखवून देते ती खरी प्रज्ञा, उदा. चमकणारी आकाशातील वीज. कदाचित ती ज्ञानाचे मंदीरही ध्वस्त करत असेल पण ती खरी प्रज्ञा. शेकोटीच्या खाली उजळणारा दगड म्हणजे प्रज्ञा नव्हे जो शेकोटी विझली की लगेच काळवंडून जातो.
इंग्रजी साहित्यात भाटांनी लिहिलेल्या पोवाड्यांपासून ते इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्टच्या बंडखोर कवींपर्यंत फार काही स्वतंत्र विचारांची लिखाण झालेले नाही. हो! त्यात शेक्सपियरही आला. त्या सगळ्यांच्या साहित्यात ग्रीस आणि रोमच्या साहित्याचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसते. त्या साहित्याचे खरे स्वतंत्र रूप आहे हिरवी घनदाट जंगले आणि त्यात स्वैरसंचार करणारा रॉबीनहुड. त्यांच्या साहित्यात अनेक ठिकाणी निसर्गावरील प्रेमाची वर्णने आहेत पण दुर्दैवाने त्यात निसर्ग नाही. इंग्लंडच्या सनावळीत वन्यप्राणी केव्हा अस्तंगत झाले याच्या तारखा आढळतील पण स्वतंत्र विचारांची, बंडखोर माणसे केव्हा अस्तंगत पावली याच्या तारखा मात्र आढळणार नाहीत.
हंबोल्टचे शास्त्र आणि काव्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शास्त्रांमधे लागलेल्या अनेक शोधांमुळे आणि त्यांच्यामुळे झालेल्या ज्ञानवृद्धीमुळे आजच्या कवींमधे आणि होमरमधे खूप काही फरक पडला आहे असं मला वाटत नाही.
मग निसर्गाला त्याची बाजू मांडायची संधी देणारे साहित्य कुठे आहे? जो कवी वाऱ्याला आणि झऱ्यांना त्याच्यासाठी बोलण्याचे आमंत्रण देऊ शकेल तो हे साहित्य लिहू शकेल. ज्याप्रमाणे शेतकरी वसंत ऋतूत नुकत्याच मोकळ्या झालेल्या जमिनीत खुंट्या ठोकतो त्याप्रमाणे हा कवी शब्दांना त्यांचे प्राचीन अर्थ देऊ करेल. मग लागेल तेव्हा थोडीशी माती लागलेले शब्द. हे शब्द तो खणून काढेल आणि त्याच्या वहीतील पानावर पेरेल. असा कवी ज्याचे शब्द इतके सत्य असतील, इतके टवटवीत असतील की जरी ते कुठल्यातरी ग्रंथालयात पुस्तकाच्या दोन पानांमधे खितपत पडले असले, तरी वसंत ऋतूची चाहूल लागल्यावर जशा कळ्या उमलतात तेवढ्याच नैसर्गिकपणे हे शब्द उमटतील आणि कदाचित फुलांनंतर त्याला फळेही लागतील. कारण कुठलातरी निसर्गप्रेमी या पुस्तकाची पाने चाळेल, वाचेल याची मला खात्री आहे.
ज्याने निर्जन निसर्गाबद्दल वाटणाऱ्या तीव्र ओढीबद्दल पोटतिडकेने लिहिले आहे असा कवी मला तरी माहीत नाही. यादृष्टीने विचार केला तर मला लौकिकदृष्ट्या उत्कृष्ट समजले जाणारे काव्यही नि:सत्वच वाटते. कंटाळवाणे वाटते. जो निसर्ग मला माहीत आहे अशा निसर्गाविषयीसुद्धा मला वर्तमान किंवा प्राचीन काळातील साहित्यात माझे पोट भरेल असं काही लिहिलेले आढळत नाही. तुमच्या आता लक्षात आले असेल की माझी मागणी अशा शब्दांची आहे जी ऑगस्टकालीन किंवा एलिझाबेथकालीन साहित्य पुरी करू शकत नाही. माझ्या आपेक्षांच्या जवळपास येते ते पुराणांतील साहित्य. ग्रीक साहित्याची मूळे इंग्रजी साहित्यापेक्षा निसर्गामधे जास्त खोलवर रुजलेली आहेत. प्राचीन जगातील भूमीमधे आलेली ही फळे तिचा कसदारपणा कमी होण्याच्या आधीची आहेत. कल्पनाशक्ती आणि नावीन्य यांच्यावर तेव्हा सावट आलेले नव्हते. माझ्या मते ते सावट अजूनही दूर झालेले नाही. असो. पण हे साहित्य ज्या काळात निर्माण झाले त्या काळात हा साहित्याचा झरा अखंड वाहात असावा. हल्लीचे साहित्य हे घराभोवती अंधार करणाऱ्या एल्म वृक्षांसारखे असते पण हे साहित्य मानवाइतक्याच जुन्या असलेल्या ड्रॅगन-ट्री सारखे आहे आणि मला वाटते बाकीच्या साहित्याच्या कुजलेल्या खतावर ते जोपर्यंत मानव आहे तोपर्यंत सहज तग धरेल.
पश्चिमेची संस्कृती आता पूर्वेच्या बोधकथांमधे भर घालण्याचा प्रयत्न करीत आहे ही एक चांगली गोष्ट आहे. गंगेचे खोरे, नाईल आणि शाईन या नद्यांनी त्यांची भूमिका बजावली आहे. आता पहायचे आहे, की ॲमॅझॉन, प्लेट, ऑरिनोको, सेंट लॉरेन्स आणि मिसिसिपीची खोरी कसले पीक काढतात ते. हजारो वर्षांनंतर यदाकदाचित अमेरिकेचे स्वातंत्र्य जेव्हा एका दंतकथेचे रूप घेईल (तसे त्याला आत्ताच दंतकथेचे स्वरूप प्राप्त झाले आहेच म्हणा..) तेव्हा काय सांगावे जगातील कवी त्यापासून प्रेरणा घेतील.
स्वतंत्र विचाराच्या माणसांना पडणारी स्वप्ने ही इंग्लिश आणि अमेरिकेतील सामान्य जनतेच्या पचनी आज पडतीलच असं सांगता येत नाही. प्रत्येक सत्य सामान्य व्यवहारज्ञान असणाऱ्यांच्या पचनी पडेल असेही नाही. निसर्गामधे जशी कोबीला जागा असते तशी जंगली फुलांनाही असते. काही सत्यवचने ही लक्षात राहतात तर काही वास्तवात उतरतात. काही भविष्यवाणीसारखी असतात. उदा. काही आजारपणं ही येणाऱ्या रोगांच्या पूर्वसूचना असतात. काही भूशास्त्रज्ञांच्या लक्षात आले आहे की दंतकथेतील नाग, उडणारे प्राणी, ड्रॅगन आणि इतर अद्भूत प्राणी याचा जन्म जिवाष्मांच्या पोटी झाला आहे. म्हणजे काही प्रचंड आकाराचे डायनॉसॉरचा उल्लेख हे त्यांचे जिवाष्म सापडल्यानंतर सुरू झाले आहेत. हिंदूंच्या पुराणात पृथ्वी हत्तीवर उभी आहे आणि तो हत्ती एका अतिप्रचंड कासवाच्या पाठीवर उभा आहे. हे कासव एका नागाच्या फण्यावर उभे आहे. आणि खरेच एशियामधे एक हत्ती उभा राहू शकेल एवढ्या महाकाय कासवाचे जीवाश्म नुकतेच सापडले आहेत. मी कबूल करतो, की काळ आणि प्रगतीच्या पुढे कल्पनेच्या भराऱ्या घेणाऱ्या या दंतकथांमधे मला जरा जास्तच रस आहे. या कथा मला दैवी बुद्धिमत्तेचा पुनर्जन्म वाटतात. कोंबड्यांना मक्याचे दाणे आवडतात पण तिच्याबरोबर शिजणारा मका आवडत असेल असं मला वाटत नाही.
थोडक्यात काय सर्व चांगल्या गोष्टी या स्वतंत्र आणि जंगली (नैसर्गिक) असतात. संगीताच्या एखाद्या लकेरीत, मग ती मानवाच्या कंठातून उमटो किंवा एखाद्या वाद्यामधून मला नेहमीच निसर्गाची हाक ऐकू येते. उदा. थंडीमधे निर्जन जंगले पार करून, दूरवरून ऐकू येणाऱ्या बिगुलाच्या स्वरांनी मला जंगलातील श्वापदांच्या कुईची आठवण येते. देवा रे! मला स्वतंत्र विचार करणारे शेजारी आणि मित्र दे ! रुळलेल्या वाटेवरून विचार करणारे नकोत. या माणसांच्या विचारात बंडखोरपणा असावा. जेव्हा सज्जन माणसे किंवा प्रेमी एकमेकांस भेटतात तेव्हा हाच बंडखोरपणा प्रत्ययास येत असतो.
पाळलेले प्राणी जेव्हा त्यांच्या अंतःप्रेरणेला जागून जंगली श्वापदाप्रमाणे वागतात तेव्हा मला मनापासून आनंद होतो. एकदा पूर आलेला असताना माझ्या शेजाऱ्याची म्हैस दावे तोडून पळाली. तिने मोठ्या धाडसाने एक खवळलेली नदी पोहोत पार केली तेव्हा मला आफ्रिकेतील श्वापदे एका ऋतूत नद्या पार करत दुसऱ्या कुरणांच्या प्रदेशात जातात त्याची आठवण झाली. ते दृश्य पाहून माझ्या मनातील प्राण्यांबद्दल वाटणारा आदर अजून वाढला. जशी जमिनीत रोपट्यांची बिजे अनेक युगे दडलेली असतात तशी प्राण्यांच्या जाड कातड्यात अंतःप्रेरणेची बिजे अमर्याद काळासाठी दडलेली असतात.
खेळणारी गुरे ही एक कल्पना वाटेल. पण मी एकदा एक गुरांचा कळप चक्क खेळताना पाहिला होता. त्या कळपात १२ एक जनावरे असतील. ती शेपट्या वर करून डोंगर उतारावर बागडत होती. ते पाहून त्यांची आणि हरणांची जातकुळी एकच आहे की काय अशी शंका माझ्या मनात आली. मी ते दृश्य अनिमिष नजरेने पाहात असतानाच कोणी तरी त्यांना हाकलण्यासाठी होऽऽहोऽऽ अशी आरोळी ठोकली आणि ते चित्र क्षणात बदलले. त्या खेळणाऱ्या हरणांचे त्याच क्षणी गोमासांत रूपांतर झाले. मानवजातीमधे दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांखेरीज असं जनावरांना कोण हाकलतो? जनावरांचे आयुष्य माणसांच्या आयुष्यासारखेच सतत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित होत असते.
ज्याप्रमाणे नाठाळ घोड्यांना वठणीवर आणून मग माणसाचे गुलाम केले जाते जाते त्याचप्रमाणे माणसालाही त्याची स्वतःची जहाल मते बाजूला ठेवून समाजात सामील व्हावे लागेल. अर्थात सगळीच माणसे समाजात राहण्यास योग्य नसतात याची मला मुळीच शंका नाही. कुत्री, घोडे किंवा मांजरेही त्यांच्या स्वभावामुळे माणसाळवली जातात. पण काही माणसांचा स्वभाव असा नसतो मग या नाठाळ माणसांना वठणीवर आणणे, त्यांना त्या पातळीवर आणण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. माणसं तशी सारखी असतात पण परमेश्वराने ती एवढ्या संख्येने जन्माला घातली आहेत त्याचे कारण बहुधा ती वेगवेगळी असावीत असे त्याला वाटले असावे. एखादे क्षुल्लक काम कुठलाही माणूस करू शकतो पण अवघड व महत्त्वाच्या कामासाठी योग्य बुद्धिमत्ता व कौशल्य असणारा माणूस निवडावा लागतो. कुठलाही माणूस आत येणारे वारे ते भोक बंद करून थांबवू शकतो पण कन्फ्युशियसने जे उदाहरण दिले आहे ते सगळी माणसे देऊ शकत नाही. तो म्हणतो, ‘‘ वाघाची आणि चित्त्याची कातडी एकदा कमवली की म्हशीच्या कातड्यासारखीच दिसतात. ’’ हे खरे असले तरी समाज वाघांना माणसाळवण्याचा प्रयत्न करीत नाही आणि म्हशींना श्वापद करण्याचा प्रयत्न करत नाही. शिवाय ती कातडी कमवून त्याचे जोडे शिवण्यापेक्षा या प्राण्यांचे कितीतरी चांगले उपयोग असावेत.
मी जेव्हा परदेशी माणसांच्या आडनावांच्या यादीवर नजर टाकतो, उदा. फौजेतील अधिकारी किंवा लेखकांची यादी तेव्हा ‘नावात काय आहे?’’ या उक्तीची मलापरत एकदा आठवण येते. उदा. मेंशिकॉफ या नावाने माझ्या डोक्यात कसलाच प्रकाश पडत नाही. झालीच तर मला मिशांची आठवण येते आणि त्या उंदराच्याही असू शकतात. जशी ही नावे आपल्याला विचित्र वाटतात तसेच त्यांनाही आपली नावे चित्रविचित्र वाटत असणार याची मला खात्री आहे. काही नावे तर मला लहान मुलांच्या गाण्यातील बडबड वाटते. मला कधी कधी जंगलात हिंडणारे श्वापदांचे कळप आठवतात आणि तेथील शिकाऱ्यांनी त्यांच्या आवाजावरून त्यांचे केलेले नामकरणही आठवते. या उलट माणसांची नावे कुत्र्यांच्या नावाप्रमाणे फारच अर्थहीन आणि असंबद्ध असतात. उदा एखाद्या कुत्र्याचे नाव मोती ठेवण्यात काय अर्थ आहे हे मला अजून कळलेले नाही.
मला वाटते माणसांना विशेषनामे नसली तर बरेच आहे. मग ओळखायची कशी माणसे? त्यांच्या वंशावरून किंवा व्यवसायांवरून? नाहीतरी रोमन सैन्यामधील प्रत्येक सैनिकांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व होते आणि त्याला नाव होते हे बहुतेकांना माहीत नसतेच.
सध्यातरी जी आपली नावे आहेत ती टोपणनावेच आहेत आणि तीच खरी नावे झाली आहेत. मला एक मुलगा माहीत आहे ज्याच्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वावरून त्याला त्याचे मित्र बस्टर म्हणायचे. त्याच्या या नावाने त्याच्या ख्रिश्चन नावाची जागा घेतली होती हे ठीकच झाले म्हणायचे. काही प्रवासी सांगतात, की एका इंन्डियन (रेड) माणसाला पाळण्यातील नावच नव्हते. पण त्याच्या कर्तृत्वाने त्याला नाव मिळाले. एवढेच नाही तर प्रत्येक प्रांतात त्याला त्याच्या कामगिरीबद्दल वेगवेगळी नावे मिळत गेली आणि तो खूपच प्रसिद्ध झाला. जी माणसे फक्त सोयीसाठी नावे धारण करतात, जी मिळवलेली नसतात त्यांची मला खरेच कीव येते. त्यांना नाव असते पण ते नाव मिळवत नाहीत.
मी केवळ नावांवरून माणसा माणसात फरक करीत नाही. अजूनतरी मी त्यांना एका मानवी समूहाच्या स्वरूपात पाहतो. ओळखीचे नाव असले म्हणून तो माणूस माझ्या ओळखीचा आहे असे म्हणण्याचे धाडस मी करीत नाही. कदाचित ते नाव एखाद्या रानटी, क्रूर माणसाचेही असू शकेल. असा माणूस ज्याने त्याचे जंगलात मिळालेले नाव लपवले आहे. आपल्या प्रत्येकात एक रानटी माणूस दडलेला असतो आणि काय सांगावे कदाचित कुठेतरी एखादे रानटी नाव आपल्यासाठी राखून ठेवलेले असेल... मी पाहून ठेवलेले आहे माझा एक शेजारी कोटाबरोबर त्याचे विशेषनामही काढून ठेवतो. ते नाव त्याला कधीच चिकटत नाही मग तो झोपलेला असो किंवा अत्यंत रागावलेला असो. कधी कधी मी त्याला त्याचे नातेवाईक त्याच्या मूळ नावाने हाका मारताना ऐकतो.
आपले दुर्दैव दुसरे काय! आईच्या मायेने आपल्यावर प्रेमाचे पांघरुण घालणाऱ्या निसर्गाशी फारकत घेऊन आपण समाजाशी नाळ जोडतो. हे म्हणजे स्तनपान करणाऱ्या तान्हुल्यांना पोट भरण्याआधीच स्तनांपासून अलग करण्यासारखे आहे. अलग करायचे आणि शिवाय त्याला दुग्धपान सोडून दुसरे काहीतरी खाणयास किंवा पिण्यास द्यायचे. या इतका क्रूरपणा विश्वात कुठे नसेल...
क्रमशः
- थोरो
अनुवाद - जयंत कुलकर्णी.
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच!रुळलेल्या वाटेचे दुसरे…
मस्तच!
रुळलेल्या वाटेचे दुसरे नाव कंटाळा ! सो ट्रू
जी माणसे फक्त सोयीसाठी नावे धारण करतात, जी मिळवलेली नसतात त्यांची मला खरेच कीव येते. त्यांना नाव असते पण ते नाव मिळवत नाहीत.
हे आवडले.
आईच्या मायेने आपल्यावर प्रेमाचे पांघरुण घालणाऱ्या निसर्गाशी फारकत घेऊन आपण समाजाशी नाळ जोडतो.
त्या काळी जर असं म्हणणं असेल तर आता माणूस निसर्गाच्या १८० डिग्री कोनातच वळलाय म्हणायला हवं.