सुरेश कुलकर्णी... एक आठवण.
‘‘ सही!’’ ’’व्वा!’’ या शब्दांनी दुसऱ्याचे फक्त कौतुकच करायचे हा या माणसाचा सगळ्यात मोठा गुण होता. त्याचा आणि माझा फार काळ संबंध आला नाही. पण त्याच्यावर काहीतरी लिहावेसे मला वाटले, एवढे नाते आमच्यात तयार झाले होते.
नात्याने तो माझा मामा. म्हणजे माझ्या आईचा मावस भाऊ. किरकोळ शरीरयष्टी, कुठेतरी स्वप्नात हरवलेले डोळे, या जगातील व्यवहाराशी टिकून राहताना होणाऱ्या वेदना मला त्याच्या डोळ्यात दिसायच्या. कविमनाचा हा माणूस अत्यंत साधा. वाचनाची आवड म्हणाल तर त्याची आणि माझी गट्टी झाली ती काफ्कामुळे. त्यावेळी मी अकरावीत होतो आणि मला वाटते तो कॉलेज मधे.
त्याच्याही अगोदर आमची ओळख होती पण मी तेव्हा फारच लहान होतो. माझे वडील भारतीय वायुदलात होते आणि त्यांच्या बदल्या जालंधर, अदमपूर, जामनगर इ.इ. ठिकाणी व्हायच्या. आता उत्तरेत जाण्यासाठी बॉम्बेला जावेच लागे. मे महिन्यात मग आम्हाला वडील सुट्टीसाठी त्यांच्याकडे घेऊन जायचे. त्यावेळी दिल्लीला जायलाच दोन दिवस लागायचे... पुण्याहून मुंबईला जायचे व मावशीकडे एक दिवस मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी दिल्ली किंवा अमृतसरची गाडी पकडयची. यामुळे त्या काळात आमची गाठ दर वर्षी पडायचीच पण मी इतका लहान होतो की तो कविता वगैरे करतो हे मला माहीत असायचे कारण नव्हते. पण त्या घरातील दोन गोष्टी मला नेहमी आठवत राहातील. एक म्हणजे मावशीच्या हातचा स्वयंपाक आणि कै. सुरेश कुलकर्णी यांनी केले्ेले लाड. लाड म्हणजे काय तर या माणसाने लहान म्हणून मला कधी टाळले नाही.. त्याच्या टेबलावर एक वही कायम उघडी असायची हे मात्र मला अंधुकसे आठवते.
अकरावीनंतर मी एन.डी.ए.ची परीक्षा देण्यासाठी मुंबईला गेलो होतो. तेव्हा मात्र त्याने माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. मी काफ्का वाचले आहे हे ऐकून त्याला फारच नवल वाटले. त्याच्या तोंडून त्याचे आवडते शब्द हळूच निसटले, ‘‘सही!’’ मग आम्ही द ट्रायलवर गप्पा मारल्या. त्या मारतानाही त्याने मला काफ्का किती समजले आहे याची चौकशी केली नाही. मला त्याने फक्त बोलू दिले. मला वाटते दुसऱ्याचे ऐकून घेणे हा त्याचा स्वभावच असावा. त्याच ट्रिपमध्ये मग त्याने मला सिनेमा पाहायला नेले. त्यांचे घर होते, १ चुनाम लेन, लॅमिंग्टन रोड. आता ती इमारत आहे की नाही हे मला माहीत नाही. पण त्या रस्त्यावर दोन तीन चित्रपटगृहे होती हे मला चांगले आठवत आहे. त्यातीलच कुठल्यातरी एका चित्रपटगृहात त्याने मला ‘‘प्यासा’’ दाखवला. मला वाटते त्याने तो अनेकवेळा पाहिला असणार कारण गाणे सुरु झाले की तो जागेवर यायचा आणि गाणे संपले की बाहेर जायचा... एकदा त्याने मला श्री. विलास सारंग यांच्याबद्दल सांगितलेले अजून मला आठवत आहे... त्यांची मित्रमंडळीही त्याच प्रकारची होती. त्यात एक उत्कृष्ट छायाचित्रकार होता हे मला चांगले स्मरतंय.. त्याचे नाव मात्र मला आठवत नाही.. त्याचे वाचनही प्रचंड होते हे त्याच्या बोलण्यावरून सहज समजून येत असे. (अर्थात बोलला तर)
१ चुनाम लेन्. लॅमिंग्टन रोड, बोळातून बाहेर पडले की कोपऱ्यावर लटकणारी व वाऱ्यात हलणारी १ चुनाम लेन ची निळी पाटी हे मला अजून आठवतंय... मला भेटलेला माझ्या आयुष्यातील पहिला साहित्यिक, पण दुर्दैवाने, तो कवी होता हे मला त्यावेळी माहीत नव्हते. असते, तर त्याच्या तोंडून त्याच्या कविता ऐकणे मला सहज शक्य होते.. असो.. नंतर नंतर संपर्क कमीच होत गेला... पण त्याच्या संगतीत जे काही क्षण मी काढले त्या क्षणांशी संपर्क कमी होईल असे वाटत नाही.. हातातून काय काय निसटून गेलंय हे आपल्याला फार उशीरा कळते ही माणसाची एक प्रकारची शोकांतिकाच आहे..
आज मला एक मेसेज मिळाला त्यात एक दुःखाची किनार असलेली आनंदाची बातमी वाचण्यास मिळाली. ती तशीच्या तशी खाली देत आहे...
सुरेश आपण फार भेटलो नाही पण आता मात्र तुझ्या कविता वाचून तुझ्या मनातील खळबळ मला समजेल... मला वाटते तू एक Existentialist होतास....
***
सुरेश कुलकर्णी यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आणि तोही त्यांच्या पश्चात प्रकाशित होत आहे त्याची खंत जरी असली तरी त्यांच्या समर्थ कवितांना पुनरुज्जीवित करण्याचं, उजाळा देण्याचं समाधान मात्र निश्चितच आहे.
सुरेश कुलकर्णी यांनी शाळेत आठवी नववी इयत्तेत असतानाच लिखाणाला सुरवात केली. सुरुवात गद्य लेखनाने झाली. तेव्हाचे त्यांचे आदर्श होते गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, नंतरच्या काळात पु.शी.रेगे, आरती प्रभू, सदानंद रेगे, टी एस इलियट यांच्या प्रभावाने ते कविता लेखनाकडे जे वळले ते तिथेच शेवटपर्यंत रमले.
त्यांचा वाचनाप्रमाणेच लिखाणातही चोखंदळपणा होता. त्याचप्रमाणे प्रसिद्धीच्या मासिकाबद्दलहि त्यांचा चोखंदळपणा लक्षात येतोच. सुरुवात 'सत्यकथा' मासिकातून करून पुढे अभिरुची, अबकडइ, ऋचा, अंतर्नाद वगैरे दर्जेदार नियतकालिकांमध्येच त्यांनी कविता प्रसिद्ध केल्या. तसे तर ते प्रसिद्धीविन्मुखच म्हणावेत.
उण्यापुऱ्या पन्नास एक वर्षाच्या आयुष्यात सुरेश कुलकर्णी यांनी हजारावर मराठीत आणि इंग्रजीत कविता लिहिल्या
.
आपल्या नशिबाने त्यांनी कवितांच्या वह्या मात्र व्यवस्थित ठेवल्या होत्या. या वह्यांमुळेच ह्या त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करणं शक्य झाले आहे.
त्यांनी त्यांच्या कवितांमधून हाताळलेले सर्वच कवितांचे प्रकार या संग्रहात सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कविता या मूलतः जीवनाच्या निरर्थकतेतून उद्भवलेल्या असल्या तरी त्यांच्या कवितेचं ढोबळ वर्गीकरण करायचं झालं तर त्यांची कविता ही मनोवस्थादर्शक, प्रासंगिक, वैश्विक, वैचारिक, शाब्दिक, गुढ,भावोत्कट, प्रतीकात्मक या प्रकारांत विभागता येईल.
कवीच्या अनेकविध पातळ्यावरचे सामाजिक, वैयक्तिक, वैचारीक, भावनिक, भाषिक, प्रांतिक, सांस्कृतिक धागे लिलया विणलेली हि कविता सहजी घेता येण्याजोगी नक्कीच नाहीये. आपल्याला या कवितांची गंभीरपणे दखल घ्यावीच लागेल. काव्य परंपरेत मैलाचा दगड ठरू शकण्याची ताकद असलेल्या या कवितेला जास्तीत जास्त वाचकांपुढे आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
आपण या प्रयत्नात सहभागी झाला त्याबद्दल आभार.
सुरेश कुलकर्णी यांनी शाळेत आठवी नववी इयत्तेत असतानाच लिखाणाला सुरवात केली. सुरुवात गद्य लेखनाने झाली. तेव्हाचे त्यांचे आदर्श होते गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, नंतरच्या काळात पु.शी.रेगे, आरती प्रभू, सदानंद रेगे, टी एस इलियट यांच्या प्रभावाने ते कविता लेखनाकडे जे वळले ते तिथेच शेवटपर्यंत रमले.
त्यांचा वाचनाप्रमाणेच लिखाणातही चोखंदळपणा होता. त्याचप्रमाणे प्रसिद्धीच्या मासिकाबद्दलहि त्यांचा चोखंदळपणा लक्षात येतोच. सुरुवात 'सत्यकथा' मासिकातून करून पुढे अभिरुची, अबकडइ, ऋचा, अंतर्नाद वगैरे दर्जेदार नियतकालिकांमध्येच त्यांनी कविता प्रसिद्ध केल्या. तसे तर ते प्रसिद्धीविन्मुखच म्हणावेत.
त्यांची एक कविता -

सुरेश कुलकर्णी यांच्या एका कवितेवर... ‘‘ये निद्रे ये!’’
....निद्रा! दोन अक्षरे! पण निद्रेवाचून तुम्ही जगूच शकत नाही. आठवून पहा, दोन तीन दिवस जर झोप लागली नाही तर आपली काय अवस्था होते.. पार वेड लागायची पाळी येते आपल्यावर. कधी एकदा डोळे मिटतात आणि पापण्यांच्या आड स्वप्नांची चलत् चित्रे दिसू लागतील असे होऊन जाते अगदी. पण ती देवता काही प्रसन्न होत नाही... मी काही वेळा याचा अनुभव घेतलाय. सैनिकांच्या आयुष्यात हा प्रसंग अनेक वेळा येतो पण तो शारीरीक. म्हणजे ऐन युद्धात कुठली झोप लागायला? पण मनाच्या काही अवस्थेत होणारा निद्रानाश हा एक भयंकर अनुभव असावा... असं वाटते, ‘‘हो चुका इन्तजार अब सोने दे.. असे वारंवार वाटायला लावणारा हा भयंकर अनुभव...
मग एखादा कवी निद्रेला आर्त साद घालतो... खाली सुरेश कुलकर्णी यांची एक कविता देण्याचा मोह आवरत नाही..
हे निद्रे!
हे निद्रे!
स्वप्नांच्या ढगावरून हळुवार येणाऱ्या दुरस्थ नभ देवते!
तुझ्या कृपेचे थेंब मागतो थोडेसे. वेडसरसे.
येओत ते,
या साडेतीन हाताच्या वैराण वाळवंटात
एकेका थेंबाने.
भरून येऊ देत अवघे संसार संवेदना सज्ञांचे
थेंबाथेंबाच्या काचातून दिसू देत दूरस्वी दिवास्वप्नं....
कवीने पहिल्या दोन ओळीतच साद घातली आणि निद्रादेवतेच वर्णन केलंय. कशी आहे ही देवता? ती फार दूरवर नांदते पण आली तर स्वप्नांच्या ढगावरून येते..पण त्यासाठी निद्रेच्या स्वाधीन व्हावे लागते. तेच नशिबात नाही... माझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंच्या काचेतून मला दिवास्वप्न दाखवलीस तरी चालेल पण ये!
पुढे एका ओळीत कवी म्हणतो,
ये निद्रे ये!
दे तुझी स्वप्नांची स्वप्नभूमी औटघटकेची शिराळशेटी
निदान शिरेन काही काळ त्या परीजगताच्या या सवत्यासुभ्यात
तेवढेच रंगले जाईल हिर्व्या रंगाने वाळवंट हे...
क्षण दोन क्षण झोप मिळाली तरी मला खूप आहे... पण स्वप्नांचा ही स्वतःचा सवतासुभा आहे... त्यात शिरायला मिळेल का? हा खरा प्रश्न आहे...
पुढे तो म्हणतो,
ये निद्रे ये!
घेऊन सुखी माणसांची सदरे स्वप्नातून
खुळ्या आशांची मयसभा निर्मित कौशल्याने...
......
....
निद्रा! दोनच शब्द पण मिळाली नाही की काय होते आणि तिची आराधना करता करता कशी वेड लागायची वेळ येते हे कवीने अत्यंत मनस्वीरित्या लिहिले आहे.. देव करो आणि निद्रेविण जगायची वेळ कोणावरही न येवो ...
निद्रेविण आयुष्य फार प्रखर आहे आहे... व्यर्थ आहे.. अर्थात डोळे मिटणे आणि निद्रा येणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे हे मी सांगायची गरज नाही...
***
आणि ही अजून एक कविता आणि त्यावर मी लिहिलेले -
सुरेश कुलकर्णी यांच्या एका कवितेवर...
‘‘डिव्हाईन कॉमेडी’’ या युरोपमधील सगळ्यात जास्त वाचले गेलेल्या पुस्तकाचे नाव प्रथम नुसते कॉमेडी असे होते. या पुस्तकाचा लेखक होता डांटे अलिघेरी. चर्चने त्यात ख्रिश्चन धर्माचा संबंध जोडण्यासाठी त्यात डिव्हाईन हा शब्द घुसडला. याचे नाव कॉमेडी का असावे यावर बऱ्याच तत्त्वज्ञांनी, विचारवंतांनी विचार केला. त्यात काही इतिहासाचा अभ्यास करणारेही होते. शेवटी मी असा निष्कर्ष काढला की त्या काळात म्हणजे पहा इ.स्. १३०० मध्ये शोकांतिका (ट्रॅजेडी) हे अत्यंत उच्च प्रकारचे साहित्य मानले जात असे. कारण फार सोपे आहे. दुःखातून ज्या वेदना निर्माण होतात त्या सहन करणे कर्मकठीण असते. जो मनुष्यप्राणी या वेदना सहन करण्याची सहनशक्ती बाळगतो त्याला थोर मानण्याची पद्धत त्या काळी असावी. त्याच्या नंतर येतात इतर भाव भावना. कदाचित डिव्हाईन कॉमेडी म्हणजे कॉमेडी हे दीर्घ काव्य शोकांतिकेच्या तुलनेत कमी प्रतीचे (भाषेचा विचार केला तर - म्हणजे कसे लिहिले तरी चालते या अर्थाने) असावे म्हणून त्याला काव्याला कॉमेडी हे नाव दिले असावे. (अर्थात ते तसे नाही) (वॉल्डनमुळे माझी जी काही पुस्तके मागे पडली त्यात डिव्हाईन कॉमेडीचा अनुवाद मागे पडला आहे. त्याची १०० पाने झाली आहेत. आता पूर्ण करेन कधी तरी. जरा अवघड आहे! असो.) तर काय सांगत होतो, दुःख आणि त्याच्या वेदना सहन करण्याची ताकद परमेश्र्वराने दिली आहे म्हणून ठीक आहे नाहीतर या जगात रस्त्यावर फक्त वेडेच दिसले असते...
काही कमनशिबी लोकांच्या वाट्याला जन्मापासूनच भोग आलेले असतात. ते भोगण्यात त्यांचे आयुष्य सरते पण वेदना काही कमी होत नाहीत. असे वाटते की त्यांच्या हृदयातच त्या वेदनांचे बीज कोणी तरी पेरले आहे की काय! काही जणांच्या वेदना शब्दांचे रूप घेऊन बाहेर पडतात, काहींच्या वेदना अश्रूंचे रूप घेऊन बाहेर पडतात, काहींच्या बोलण्यातून तर काहींच्या लेखनातून. वेदना कवितेतून जास्त उत्कटतेने प्रकट होते असे मला वाटते. वेदनांचा दाहकपणा कवितेतून जास्त जाणवतो...
खाली सुरेश कुलकर्णी यांची एक कविता देतो आहे... त्याच्या अजून काही कवितांवर लिहायचे आहे पण ते परत कधीतरी...
*****
जन्म दिलास...
तेव्हाच वेदनेचे बी बेंबीत पेरलेस
वाढत्या वर्षागणीक वेदनेची वेलही वाढली
तिची फुलं माझ्या डोळ्यातून गालावर ओघळत
कधी मधी,
तेवढीच तुला जाणवली.
वेलीचं मूळ बेंबीत रुजलेलं राहिलं अदृष्टित,
रानात उगवलेल्या वेलीची प्रसिद्धी तिला लाभली.
माझ्या शब्दांनी मात्र तिचे कांटे प्रसिद्ध केले,
प्रत्येक जाहीर मतभेदाच्या प्रकरणातून.
तेवढंच तुला दिसलं.
तुझ्या योजनांच्या रस्त्यांमधून तू जेव्हा माझी
मिरवणूक काढतेस
त्या वेळी तुझा अस्थानी उत्साह मला गुदमरवतो
तुझ्या अश्राप मनोवृत्तीची
मला अजागळ प्रियकराची यावी तशी घृणा येते.
जरी
एकाच भूमीवर आपण जन्मलो
एकाच रक्ताच्या ओहोळातून वाहात,
स्वतः उभारलेल्या भिंतींचे अंतर घेऊन,
आपल्या आपल्या किनाऱ्यांवर आपण उभे आहोत
प्रत्येक रक्ताचे स्वतंत्र नाते असते स्वतःशीच.
आपापल्या रक्ताच्या स्वतंत्र नात्यातून
जरी उद्भवलेला काटशह देणाऱ्या आदेशांचे पालन करीत
तुझ्या सनातन मातृत्वाचा मी अपराधी,
वा तुझ्या मायेच्या झाडावर माझ्या कुऱ्हाडी
वा तुझ्या आकांक्षांचा मी गुलाम पारंपरिक
वा माझे सारे तुझ्या दृष्टितलातून चमत्कारिक.
माझ्याही
पोटात जळणारा एकेक घास पुकारा करतो
तुझ्या अलांछित सत्तेचा.
प्रत्येक व्रण उभा आहे तहानलेला
तुझ्या नैसर्गिक क्षमेचा
आणि तरीही
फक्त तुझेच मी ऋण मानतो
चार ओळी खरडण्याचे दिलेले सामर्थ्य पाहून
तुझ्या भाबड्या मायेचा वारसा क्वचित घेऊन
स्पष्ट सांगतो,
नैवेद्य मिळणार नाही
ऋणाची परतफेड करण्याचा सनातन बाणा दाखवू नकोस
ही विनंती.
फक्त दिलेल्या मूल्यांचा जगाच्या पतपेढीवर पहिला
चेक वटला गेला
की तुझ्या आठवणीने मन स्तब्ध होईल....
******
... अनपेक्षित कठोर शब्द ऐकून सुचलेली ही कविता असावी... नंतर अर्थातच चूक उमगल्यावर तिच्या आठवणीने व्याकूळ होणे आलेच...
या कविता वाचल्यावर मला काफ्काचे एक वचन आठवते -
Poems must shatter that thick layer of ice so that our real, buried emotions can finally flow. (This is modified)
- जयंत कुलकर्णी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया