Skip to main content

चल कही दूर निकल जाये ...( ३)

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 06/08/2026 09:47 या दिवशी प्रकाशित केले.

तीच ती  टिपीकल हो म्हणताना किंचीत झटका देत मान हलवण्याची स्टाईल. नक्की ही सुहासच आहे. पण ती आयुष्यात इलियाहु गोल्डराट वाचणे शक्यच   नाही. बेट लावून सांगतो. जगात कुठल्याच बाईच्या हातात इलियाहु गोल्डराट ची पुस्तके दिसणार नाहीत. क्रॉसवर्ड मधे  पुस्तक चाळत उभी असेल तरी सुद्धा  दिसणार नाहीत.  वाचताना दिसणे तर गुलबकावलीच्या फुलाहून दुर्लभ. 

ही कोण असेल याबद्दल माझे कुतूहल आता अधीकच चाळवते.

मागील दुवा चल कही दूर निकल जाये....( २) | मिसळपाव

विचारावे का की तू सुहासच आहेस का म्हणून? पण नसेल तर ? उगाच या बाईचा गैर समज व्हायचा.  म्हणेल एकटी बाई दिसली की  पुरूष  फ्लर्ट  करायला येतात. टिप्पीकल मेल चाउनिस्टीक पिग म्हणेल. समजा झाला गैर समज तर... तीने फ्लाइट क्रू कडे तक्रार केली तर? मला पुढचे धोके दिसायला लागतात. जाउ देत ना.....  नकोच.

मी वर्गात शिक्षकानी टेबलावर डस्टरने खड खड खड केल्यावर जसा वर्ग अनामीक चाहूलीने शांत होतो तसा शांत बसतो.

पण इलियाहू गोल्डराट वाचणारा कोणीही  इतके एकदम टोकाला जाणार नाही.  ही सुहास आहे का? आणि हीच्या हातात इलियाहू गोल्डराट कसा काय ? हे दोन्ही कुतुहले मला शांत बसू देत नाहीत.

विचारुन तर पाहूया. काय होईल. ती नाही म्हणेल. काय विचारूया? तू सुहास आहेस का की मग तुम्ही गोल्डराट वाचताय?

ही बाई नक्की कशी दिसते ते समजयला मार्ग नाहिय्ये. त्यासाठी तिच्याकडे थेट पहायला हवे. ते चांगले दिसणार नाही.

अशियायी असावी  ती अर्थात चिनी जपानी नाही हे नक्की तीचे केस चिनी बायकांसारखे दिसत नाहिय्येत.  भारतीय असावी.पण मग मेक्सीकन देखील असेच दिसतात.  तीचा ॲक्सेंट मॅक्सीकन वाटला नाही.  ब्राझीलीयन देखील असेच दिसतात. असो.  मॅक्सीकन किंवा ब्राझीलीयन एक वेळ बरे. भारतीयच असेल  बहुतेक. पण त्याने काय फरक पडतो असा.

 तीच्या उत्तरावरून तीला आपल्याशी बोलायचे आहे की नाही हे लगेच समजेल.  तू सुहास आहेस का किंवा मग तुम्ही गोल्डराट नेहमी वाचता का या पैकी कोणताही प्रश्न विचारला तरी ती फारतर हो किंवा नाही म्हणेल. आहे काय त्यात.

विचारूयाच एकदा.

लोक तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देतील हे तसे सांगता येत नाही. मागे एकदा आपण पुण्यात टिळक रोडवर  समोरून येणाऱ्या एका मुलीला कुठलातरी पत्ता विचारला होता.   इकडे जायला हा रस्ता  बरोबर आहे का? आपली काय अपेक्षा असते की ती हो किंवा नाही म्हणेल. पण त्या मुलीने   आपल्या त्या प्रश्नाला  उत्तर म्हणून आपल्याला  तोंड वाकडे करून दाखवले आणि ती पुढे निघून गेली .  मी पुढची दोन तीन मिनीटे ती गेली त्या दिशेला अवाक होऊन पहात होतो. माझी विश्वासच बसत नव्हता. तोंड वेडावून दाखवणे हे काय उत्तर होऊ शकते? इतका इन्सल्ट... तो ही काहीही न करता?  अर्थात पुण्यात काहीही होऊ शकते.  जिथे नागझरी इतके सुंदर नाव धारण करणारे गटार असू शकते त्या शहरात काहीही असू शकते.

 त्या मुलीने मला एका क्षणात जमिनीवर आणले होते. अर्थात इथे ते तसे काही होईल असे नाही. विचारू या तर. या बाईच्या जागी एखादा बाप्या असता तर वाईन चे घुटके घेत आपण थेट इलायाहु गोल्डराट वर बोलायला लागलो असतो. दोन पुरुषाना बोलण्यासाठी कोणता विषय हवाच असे काहिही नसते. ते थेट एकमेकांशी बोलू शकतात. अर्थात पुरुष असता तर तो इथे पुस्तक वाचत बसण्यापेक्षा  पहिल्या पाच मिनीटात समोरच्या स्क्रीनवर  बरेच स्क्रोल करून  कुठलीतरी फुटबॉल मॅच बघत बसला असता.  बोलुया का? तीच्या हातातले गोल्डराटचे पुस्तक आणितीचा सुहाससारखा वाटणारा आवाज हे दोन्ही मला  शांत बसू देत नाहीत. नक्की कोणता प्रश्न विचारूया?  तुमचे नाव सुहास आहे का की मग तुम्ही गोल्डराट नेहमी वाचता का? मी धाडस करतो. आर यू सुहास गोल्डराट? 

मी काय बोललो ते माझे मलाच कळले नाही? पण विचारून  झाले होते. शब्द एकदा तोंडातून  सुटले की ते परत घेता आले असते तर फार बरे झाले असते.

व्हॉ? ..... ती माझ्याकडे बघते. 

तीच्या त्या प्रश्नावरून मला जाणवते ते "व्हॉट" या शब्दामधले शेवट आलेले  ट अक्षर ती उच्चारत नाही. टिपीकल ब्रिटीश ढब. म्हणजे ही बया ब्रिटीश आहे तर . 

ती माझ्याकडे पहाते. आता मला तीचा चेहेरा स्पष्ट दिसतो. माझे डोळे आश्चर्याने  बहुतेक सताड उघडे झाले असावेत. तीच्या चेहेऱ्यावरच्या चष्म्यात ते दिसतय मला. माझा जबडासुद्धा डोळ्यांइतकाच  सताड उघडलेला असावा?

व्हॉ ? ती पुन्हा विचारते.

सुहास..... आर यू सुहास गोल्डराट? माझ्या शब्दांवरचाच  काय पण बोलण्यावरही ताबा संपलाय बहुतेक.

यू मीन नु से ॲम आय सुहास?  येस आय ॲम. ब हाव डिड यू नो दॅ? यू नो मी? तीच्या चेहेऱ्यावर संभमात पडल्याच्या सगळ्या  खुणा दिसताहेत.

मला माझी चूक कळते. मी डोक्यावरची पूर्ण झाकणारी हुडीची टोपी काढतो. कपाळावर सरकवलेले आय ब्लाइंडर काढून टाकतो. तोंडावरचा मास्कही काढून टाकतो. तीच्या चेहेऱ्यावरचे हाव भाव कॅनव्हासवर रंगाने ब्रशचे फरकाटे मारावेत तसे बदलत जातात. तीचे डोळे विस्फारतात. यू...... यू  चिन्मय..... चिन्मय जामसांडेकर...सांड्या...तू.....

तीचा अक्षरश:  किंचाळते.  तीच्या ते तशा आवाजात किंचाळणे  ऐकून एक एअर होस्टेस धावत येताना दिसतेय. बाजूच्या रो मधला एक जण झोपेतून जागा झाला आहे. त्याला नक्की काय झाले आहे ते समजत नाहिय्ये.  आजूबाजूचे सगळे आता जागे झालेत. ते आमच्याकडे पहात आहेत. 

मला परिस्थितीची जाणीव होते. विमानात आहोत म्हणुन ठीक आहे. हे असं दादर किंवा वडाळा स्टेशन वर झालं असतं ना , नक्की सांगतो पब्लीक ने मला धू धू धुतला असता. वर म्हणाले असते.  क्या जमाना  है. जंटलमन  लोग भी आजकल ऐसी हरकते करने लगे है....  

मी सुहासला हातानेच हळू  बोल हलू बोल म्हणतो. शक्य असते तर  हाताने तीचे तोंड बंद केले असते. पण तसे केले तर  आसपासच्या पब्लीकचा आणखीनच गैरसमज व्हायचा.

एअर होस्टेस आमच्या जवळ येते.  प्रोब्लेमन मेफराउ. घाट आलेस घूत मेत उ? एनी ट्रबल मादाम?  आर यु ऑलराईट. ती डच आणि इंग्रजी दोन्ही भाषांत विचारते. ते विचारत असतानाच ती फ्लाइट पर्सर देखील येतो. त्यांच्या मते मी काहीतरी  दंगा करणारा प्रवासी होतो.

सुहासच्या  हे  लक्षात येते. ती त्या दोघांना समजावते. या आलेस इस घूत. नेयेट्स  ओम ये सोर्गॅन ते माकन. हेई इस माइन फ्रिएन्द .   एवरी थिंग इस ऑलराई. नथिंग टु  वरी. हा माझा जुना मित्र आहे.   हे तीनेच सांगितले हे बरे झाले. माझ्यावर कोणी विश्वास ठेवला नसता. इतर कोणी कशाला.  हे मी मला  स्वत:ला सांगितले असते  ना तरी ही  विश्वास बसला नसता. सुहास आपल्याला,इतक्या वर्षांनंतर भेटते तेही हिंदी फिल्मवाले ही कल्पना  करू शकणार नाहीत अशा सिच्यूएशन मधे. थेट आकाशात. 

 हे एरव्ही जमिनीवर झाले असते ना तर  मी आनंदाने कोलांट्या उड्या मारल्या  असत्या. तीच्या जागी एखादा मित्र असता ना तर  उचलून घेतले असते.  मस्त घट्ट गळामिठी मारली असती.    फ्लाईटमधे दोन सीट्स च्या  रो मधे  त्या इवल्याशा जागेत सरळ उभे रहाणेही शक्य नसते तिथे  यातले काहीच शक्य नसते. फक्त शेकहॅंड करणे इतकेच काय ते घडु शकते. हिंदी फिल्मवाले अशावेळेस त्या दोघाना फ्लाईट मधून एकदम जमीनीवर आणतील. आकाशातून फुले वगैरे पाडतील आगेमागे  सोबत  घागरी कळशा घेऊन शंभर एक तरुण  तरुणी गाणे म्हणत नाच करतील.  

मी आजुबाजूला पहातो. आसपासचे सगळे एकतर झोपी गेलेले आहेत. किंवा मग त्यांच्या च्या समोरच्या स्क्रीनला डोळे चिकटवून बसले आहेत. कोणीही नाचण्या गाण्याच्या  अवस्थेत नाहिय्ये. आमचे प्रकरण हे नॉर्मल आहे हे समजल्यानंतर, सुहासच्या किंचाळण्याने जागे झालेले  ते   एक दोघेजण, कुछ भी नही. मारामारी हुवाच नही.   कुछ मजा नही आया. असे त्यांच्या त्यांच्या डच , चिनी , फ्रेंच, स्वाहीली, माओरी किंवा तत्सम भाषेत  बोलत  निराशेने पुन्हा झोपले.

माझी मात्र झोप पुर्ण उडाली आहे. आजच काय पण पुढच्या आठवडाभर तरी झोपू शकेन असे वाटत नाही. इतका जोरदार धक्का आहे हा.

क्रमश:

 

 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 147
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया