Skip to main content

भटकंती... भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 05/08/2026 13:49 या दिवशी प्रकाशित केले.

भटकंती...

 

 

...आज मला निसर्गासाठी काहीतरी बोलायचे आहे. पूर्ण स्वातंत्र्य आणि या अफाट मूक घनदाट निसर्गासाठी बोलायचे आहे. पण मला निसर्गावर बोलायचे नाही. या समाजाचा एक घटक समजून मी हे बोलणार नाही तर मी या निसर्गाचा एक घटक आहे असं समजून मी बोलणार आहे. मी आता जे बोलणार आहे ते तुम्हांला कडवट वाटेल कारण समाजाची वकिली करण्यासाठी या पृथ्वीवर अनेक माणसे आणि संस्था झटत असतात. त्यामुळे मला त्याची काळजी वाटत नाही. पण निसर्गाची बाजू कोणी मांडत नाही.

माझ्या आयुष्यात मला एकदोनच माणसे अशी भेटली असतील की ज्यांना भटकण्याची कला समजली आहे. भटकणे म्हणजे ज्याला इंग्रजीत सॉन्टरींग असं म्हणतात ते. त्याचा शब्दकोशात अर्थ दिला आहे तो असा - 

या शब्दाच्या जन्माची उगम कथा फारच मजेशीर आहे. मध्ययुगीन काळात निरुद्योगी माणसे वाट मिळेल तेथे भटकत. अर्थात भटकण्याचा खर्च भागविण्यासाठी ते दानधर्मावर अवलंबून असत. त्यांना हे पैसे कशासाठी गोळा करताय? असा कोणी प्रश्न केल्यास ते बिनधास्त सांगत, ‌‘‌‘सेंट टेरे‌’‌’ च्या यात्रेसाठी. ही माणसे जेव्हा गावागावांतून भटकत, तेव्हा गावातील मुले त्यांना हेटाळणीने म्हणत, ‌‘‌‘तो पहा सेंटटेरे चाललाय!‌’‌’ त्यातून पुढे सॉन्टरींग हे क्रियापद निर्माण झाले व जो स्वच्छंदपणे भटकतो त्याला सॉन्टरर असे नाव पडले. पण त्यातही थोडा फरक आहे. जे सेंट टेरेला जात नाहीत किंवा त्या नावाखाली भटकण्यास बाहेर पडतात त्यांना उनाड भटक्या असं म्हणतात आणि जे भटकण्यासाठी बाहेर पडतात आणि खरोखरच सेंट टेरेला भेट देतात त्यांना सॉन्टरर असं म्हणतात. पण भटकण्याची भूक दोघांतही आहे हे लक्षात घ्या. काही जण मात्र या शब्दाचे उगमस्थान सॅन्स टेरे या शब्दप्रयोगात शोधतात. ‌‘सॅन्स टेरे‌’ म्हणजे ‌‘बेघर‌’. सॅन्स हा शब्द नकारार्थी आहे आणि टेरे म्हणजे घर. ज्याच्याकडे राहण्यासाठी घर नाही असा. जो बेघर आहे तो किंवा ‌‘हे विश्वची माझे घर‌’ या तत्त्वावर ज्याचा विश्वास आहे असा माणूस, पण भटकण्यातील रहस्य "हे विश्वची माझे घर" या वाक्यात दडलेले आहे. विश्व एकदा स्वतःचे घर मानले, की मग कोणी अटकाव करण्याची भीती नाही. जो माणूस हातावर हात टाकून कायम घरात बसतो तो खरा सगळ्यात मूर्ख (आळशी) असतो. पण जो भटकतो तो नदीपेक्षा जास्त उनाड सतो. ती कशी खळाखळा वाहत समुद्राला जाऊन मिळण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग शोधत असते. खरा भटक्या कधीच जवळचा मार्ग शोधत नाही.. पण मलाया शब्दाची पहिली जन्मकथा आवडते. मला स्वतःला असं वाटते, की या शब्दाची खरी उगम कथा हीच असावी. कारण प्रत्येक भटकंती ही एखाद्या क्रुसेडसारखी असते. ती आपल्यातील हर्मिटला जागा करते आणि ती सतत पवित्र भूमी पादाक्रांत करण्यासाठी उद्युक्त करते.

आपण भटकंतीच्या क्रुसेडचे योद्धे आहोत, पण भेदरट. जे भटकंतीला बाहेर पडतात आणि चिकाटीने ती पूर्ण करत नाही ती मंडळी सुद्धा भेदरटच आहेत. आपली आजकालची भटकंती ही सहल असते. सकाळी सुरू होते आणि संध्याकाळी संपते. संध्याकाळी आपण परत घराच्या उबेत विसावतो. म्हणजे आपली अर्धी भटकंती ही त्याच मार्गावर उलट पावली होते. जर आपण भटकण्यासाठी बाहेर पडलो, तर आपल्या अंगात असणाऱ्या साहसाला स्मरून तसेच पुढे जायला पाहिजे. परत न येण्यासाठी! आपली (इजिप्त) ममी आपल्या ओसाड राज्यात परत पाठविण्याची आपली तयारी असली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना मागे सोडायला तयार असाल, भाऊ बहिणींना मागे सोडायला तयार असाल, तुमची बायको, मुले आणि मित्रांना मागे ठेवण्याची तुमची तयारी असेल, तुम्ही तुमची सगळी देणी फेडली असतील आणि आता तुमच्यावर कसलीही जबाबदारी नसेल तर तुम्ही आता भटकण्यासाठी तयार आहात असं मी मानतो.

माझ्या अनुभवाबाबत बोलायचे झाल्यास मी आणि माझा सहप्रवासी (कधी कधी माझ्या बरोबर सहप्रवासीही असतो) क्रुसेडमधे वापरल्या गेलेल्या साधनांपेक्षा जास्त प्राचीन साधनांचा वापर करतो. खरं तर हालचालींचे हे साधन सर्वांत प्राचीन आणि शौर्याचे प्रतीक आहे. क्रुसेडमधे नाईटस्‌‍ घोड्यांवरून दौडायचे. पण आम्ही नाईटस्‌‍ नाही. आम्ही आहोत वॉकर, भटकणारे. फ्रेंच राज्यक्रांतीमधे तीन इस्टेटी होत्या हे आपल्याला माहिती आहे पण चर्च, राज्य आणि जनता या तीन जमातींपेक्षा ही चौथी इस्टेट वेगळी आहे. या जमातीचे नाव आहे उनाड भटके. पण याठिकाणी उनाड या शब्दाचा अर्थ चांगला घ्यावा. म्हणजे कुठे जायचे हे न ठरवता भटकणारा.

आम्हांला वाटत होते, की चालण्याच्या या उमद्या कलेचा फक्त आम्हीच आस्वाद घेतो पण खरं सांगायचे तर आमच्या मित्रांना मला आवडते तसे चालायला किंवा भटकण्यास आवडत असावे पण ते बिचारे भटकू शकत नाहीत. या भटकंतीच्या व्यवसायात लागणारे भांडवल कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. काय आहे हे भांडवल? स्वातंत्र्य, मोकळा वेळ आणि आनंद! हे भांडवल ही देवाची देणगी आहे. ही सगळ्यांनाच मिळते असे नाही. भटका होणे हा एक दैवी संकेत आहे असं मी मानतो. तुमचा जन्म भटक्यांच्या घराण्यात व्हायला पाहिजे. चांगला कवी जन्मालाच यावा लागतो तो तयार करता येत नाही अशा अर्थाची लॅटीनमधे एक म्हण आहे. भटक्याचेही तसेच आहे. तो जन्मालाच यावा लागतो. एखाद्याला मारून मुटकून आपण भटक्या बनवू शकत नाही. माझ्या गावकऱ्यांपैकी काही जणांनी त्यांनी दहा एक वर्षांपूर्वी केलेल्या भटकंतीची वर्णने माझ्याजवळ केली आहेत पण ती भटकंती त्यांनी केली त्याला वेगळे कारण होते. ते जंगलात रस्ता चुकले होते. परत आल्यावर त्यांनी हमरस्ता कधी सोडला असेल असं मला तरी वाटत नाही. त्यासाठी त्यांनी अनेक कारणेही पुढे केली असतील याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. भटक्यांचा एक एक वेगळाच उच्चवर्ग आहे बरं का! जेव्हा भटक्यांच्या गप्पा चालतात, तेव्हा तेही एके काळी जंगलात राहात होते आणि त्यांचे पूवर्जही भटकत भटकत येथे आले होते, (कदाचित ते कायद्यापासून पळही काढत असतील कोण जाणे !), ही जाणीव त्यांना क्षणभर का होईनात सुखावून जात असेल याबद्दलही माझ्या मनात शंका नाही.

कमीत कमी दररोज चार तास डोंगरदऱ्यांतून जगापासून दूर, भटकल्याशिवाय माझ्या माझ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत नाहीत आणि प्रकृती ठणठणीत राहणार नाही असे मला नेहमीच वाटत आले आहे. यावर तुम्हीही विचार करू शकता. कधी कधी मला गावातील यंत्र कारागीर किंवा दुकानदार आठवतात. ते दिवसभर पायावर पाय टाकून कसे काय बसतात कोणास ठाऊक, बहुधा त्यांची अशी समजूत असावी की पायाचा उपयोग उभे राहण्यासाठी किंवा चालण्यासाठी नसून फक्त बसण्यासाठी आहे. पण त्यांनी अजून कंटाळून किंवा आजारांमुळे आत्महत्या केली नाही म्हणून मला त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

मी एक दिवस जरी घरी बसलो तर माझ्या शरीराला गंज चढतो. कधी कधी मला भटकण्यासाठी बाहेर पडण्यास उशीर होतो. अंधाराने प्रकाशावर आक्रमण केल्यावर भटकण्यासाठी मग फारसा वेळ उरत नाही त्या वेळेस तर मला माझ्या हातून फार मोठे पाप घडले आहे असे वाटत राहते. या पापाची कबुली मग मी स्वतःपाशी देतो. पण मला अजून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते याची कबुली दिली पाहिजे. माझे शेजारी, आणि दुकानदारांची अचाट सहनशक्ती पाहून मी अचंबित होतो. ते कसे काय स्वतःला एका खोलीत कोंडून घेतात आणि इतक्या वेळ जागेवर बसू शकतात देवच जाणे. आता दुपारी तीन वाजले आहेत आणि अजूनही ते पहाटेचे तीन वाजल्यासारखे तेथेच आहेत. जणू काही आत्ताच दुकान उघडले आहे. परमेश्वराने यांना कसे घडवले आहे तोच जाणे. बोनापार्ट पहाटेच्या तीन वाजता दिसणाऱ्या शौर्याबद्दल काहीही म्हणो पण दुपारी तीन वाजता घरात आनंदाने बसण्याच्या शौर्यापुढे ते शौर्य काहीच नाही. स्वतःच्या इच्छेविरुद्ध स्वतःची कीव करत, मनाची उपासमार करण्यात खरे शौर्य आहे असे बहुधा यांना वाटत असावे. आता या वेळेला किंवा चार आणि पाचच्या आसपास जेव्हा सकाळची वर्तमान पत्रे वाचून झालेली असतात आणि संध्याकाळची अजून आलेली नसतात तेव्हा घरात कोंडलेल्या या माणसांच्या भावनांचा रस्त्यावर स्फोट कसा होत नाही याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेले आहे.

मी म्हणतो हे तर ठीक आहे, पण स्त्रिया? त्या तर माणसांपेक्षा जास्त काळ घरात कोंडलेल्या असतात. हा कोंडमारा त्या कसा काय सहन करत असतील त्याच जाणोत. मला शंका आहे त्यांना ते अगदी असह्य होत असणार. उन्हाळ्यात जेव्हा उबदार वारे वाहत असतात तेव्हा मी आणि माझा जोडीदार गावातून चक्कर मारतो. कपड्यावरील धूळ झटकत आम्ही रस्त्याच्या दुतर्फा असलेली गॉथिक घरे पाहिली तेव्हा माझ्या मनात, ही घरे आता विश्रांती घेत असतील असा विचार आला. माझा जोडीदार माझ्या कानात कुजबुजला, ‌‘‌‘आतील माणसे बहुतेक गाढ झोपली असतील.‌’‌’ रस्त्यावर चिटपाखरुही नव्हते आणि तेव्हाच आम्ही त्या घराच्या वास्तुशास्त्राचा आणि सौंदर्याचा खरा आस्वाद घेतला. वास्तुशास्त्र कधीच झोपा काढत नाही हे आमच्यावर उपकारच आहेत म्हणायचे.

अर्थात या इमारती जुन्या आहेत म्हणूनच मनाला भावत असाव्यात. माणसाचे वय जसे जसे वाढत जाते तसे त्याचे घरात स्वस्थ बसण्याचे किंवा घरातच काम करण्याचे बळ वाढत जाते. त्याच्या आयुष्याची संध्याकाळ आलेली असते आणि त्याच्या चांगल्या सवयींचीही संध्याकाळ होते. तो फक्त सूर्यास्ताच्या आधी थोडा वेळ बाहेर पडतो आणि अर्ध्या तासाचा फेरफटका मारतो. पण मी ज्या चालण्याविषयी बोलतोय त्याचा संबंध व्यायामासाठी चालण्याशी बिलकूल नाही. ते चालणे म्हणजे एखादा रोगी जसा वेळेवर औषधं घेतो तसे ठरलेल्यावेळी ठरलेले अंतर चालणे. मी म्हणतोय ते भटकणे हे नाही. मी ज्या चालण्याबद्दल किंवा भटकण्याबद्दल बोलतोय तो एक असा उद्योग आहे ज्यात धाडस आणि नाविण्याला भरपूर वाव आहे. पण जर तुम्हांला व्यायामच करायचा असेल तर डंबेल्स वापरा आणि भटकायचेे असेल तर दुर्गम डोंगरातील खळखळत वाहणारा एखादा झरा शोधा.

माणसाने कसे उंटासारखे चालले पाहिजे. हा एकमेव प्राणी असा आहे की तो चालताना रवंथ करतो. निवांत ! एकदा एका पर्यटकाने वर्डस्‌‍वर्थच्या मोलकरणीला त्याची अभ्यासिका कुठे आहे? असा प्रश्न केला. तिने उत्तर दिले, ‌‘‌‘त्याचे ग्रंथालय येथे आहे पण त्याची अभ्यासिका मात्र या घराबाहेर आहे.‌’‌’

घराबाहेर उन्हातान्हात आणि वाऱ्यात दिवस काढले, की कळत नकळत तुमच्यात एक प्रकारचा राकटपणा येतो हे मला वाटते सगळ्यांना मान्य असावे. आपल्या मृदू स्वभावावर आणि हातापायांवर राकटपणाचा एक पातळ थर चढतो. तसा कष्टकऱ्यांच्या हातावरही तो राकटपणा जाणवतो म्हणा! घरात राहिले तर याच्या उलट होते. आपली कातडी लुसलुशीत होते आणि स्वभाव फारच संवेदनशील होतो. छोट्याशा कारणाने आपल्या मनावर ओरखडे पडतात. पण तेही महत्त्वाचे आहे, कारण याच कणखरतेने आणि बुद्धिमत्तेने आपल्यावर नैतिकतेचे संस्कार होतात. थोडक्यात काय निसर्गात भटकणे आणि घरात राहणे याचा ताळमेळ जमला पाहिजे. तो एकदा जमला की आपले व्यक्तिमत्त्व गेंड्याच्या कातडीचे आणि त्याच वेळी मृदू स्वभावाचे होईल. आता याचे प्रमाण कसे असावे हा संशोधनाचा विषय आहे. पण मला वाटते त्याचे प्रमाण हे दिवसाचे रात्रीशी, हिवाळ्याचे उन्हाळ्याशी आणि विचारांचे अनुभवाशी जे प्रमाण असते तेवढे तरी असावे. त्याने होईल काय, की आपल्या विचारात जास्त सूर्यप्रकाश आणि वारा येत राहील. पण राकटपणा थोडासा जास्त असला तरी हरकत नाही. कामगाराचे पंजे कणखर असतात पण आत्मसन्मानाच्या नाजूक तंतूशी त्यांची चांगलीच ओळख असते हे विसरू नका. त्याच्या त्या राकट हाताचा स्पर्श हा आळशी, मऊ हातापेक्षा केव्हाही स्फूर्तिदायक असतो. अर्थात हा सगळा भावनांचा खेळ आहे. या भावना दिवसभर बिछान्यात लोळत पडतात आणि स्वतःला गोऱ्या समजतात. अनुभवाच्या राकटपणापासून शेकडो कोस दूर...

आम्ही जेव्हा गप्पा मारतो तेव्हा आमची पावले अगदी नैसर्गिकपणे शेतांकडे आणि जंगलांकडे वळतात. जर आम्ही मॉलमधे किंवा बागेत फिरलो तर आमचे काय होईल? कित्येक तत्त्वज्ञानी लोक ते जंगलात जाऊ शकत नाही म्हणून जंगलालाच साद घालतात. खुद्द प्लॅटोनेही आपल्या ॲकॅडमीमधे रान पेरले होते, जोपासले होते. या रानात, झाडांच्या समवेत, मोकळ्या हवेत तो व त्याचे मित्र गाढ्या चर्चा करीत फिरत असत. पण आपण मनाविरुद्ध रानाकडे पावले टाकण्यात तसा अर्थ नाही. त्या पावलांना रानावनाची ओढ लागलेली पाहिजे. मनाविरुद्ध जंगलात गेल्यास काय होते याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. एके दिवशी मी जंगलात एक मैलभर आत गेलो होतो शरीराने मी जंगलात होतो पण मनाने मी दुसरीकडेच होतो. त्या वेळेस मनाची जी घालमेल झाली ती मला अजून आठवते आणि मला आजही अपराधी वाटते. माझ्या संध्याकाळच्या भटकंतीत मी आनंदाने दिवसभराची कामे आणि समाजाप्रति माझी कर्तव्ये विसरतो, पण कधी कधी मी गावाला झटकून टाकू शकत नाही हे ही खरं आहे. कुठल्यातरी कामाचा विचार माझ्या मनात चालू असतो आणि माझे शरीर जेथे असते तेथे मनाने मी नसतोच मग अशा वेळी मात्र मी माझा राहात नाही. 

मी जेव्हा भटकतो तेव्हा ही स्थिती मला मुळीच आवडत नाही. त्या वेळेस मला माझे मन पूर्णपणे थाऱ्यावर असलेले आवडते. रानात आणि दुसऱ्या कशाचा विचार ? या विचारानेच मी अस्वस्थ होतो. जरी ज्यावर मी विचार करतो ती बाब चांगली असली तरी.. असं होतं कधी कधी...

क्रमश:

- थोरो
अनुवाद - जयंत कुलर्णी

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 112
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

 

थोरोच्या मराठी अनुवादाची लेखमाला सुरु करण्याबद्दल शतश: आभार.  १९६७-६८ च्या सुमारास दुर्गा भागवतांनी अनुवादित केलेले 'वॉल्डनकाठी विचार-विहार' वाचून अगदी भारून गेलो होतो, ते आज पुन्हा आठवले. 

त्या काळी थोरो सांगतो, अगदी तशीच भटकंती करत असे. आता पुन्हा लवकरच  आसपासच्या जंगलात भटकणे सुरु करणार आहे. 

पुढील भाग लवकर यावेत. (मूळ ग्रंथ कोणता आहे ?)

 


भटकंती करता येणे, आणि त्या भटकंतीला आणि निसर्गाला असं शब्दबद्ध करता येणे महान आहे. आवडलंय थोरोंचं लिखाण आणि हा ओघवता अनुवाद.