हॅट साला. फ्लाईट रूट्स पण कसल्या अडनिडी असतात ना. तरी बरंय या वेळेला एकच हॉल्ट आहे. डेट्रॉईट ते पॅरिस आणि तेथून थेट मुंबई. गेल्या वेळेला गेलो भारतात सगळा उलटा द्रविडी प्राणायाम करत... हेलिफॅक्स ते बोस्टन. तेथे एअरपोर्ट बदलायचे तेथून दुबई तेथे नऊ तास वेळ काढत मग मुंबई. प्रवासाचा सगळा चारमच निघून जातो या असल्या रगाड्यात. फ्लाईट म्हणजे कसे असावे. इकडे बसलो. तिकडे उतरलो. मधे मस्त वाईन घेतली सोबत स्नॅक्स आणि नेत्रसूख म्हणजे सगळ्या सुहास्यवदना रशियन एअरहोस्टेसेस. त्यांच्या त्या लालचुटूक लिपस्टीक लावलेल्या ओठाच्या मधून डोकावणार्या शुभ्र एका रेषेतल्या दंतपंक्ती दाखवणार्या हसण्यानेच माणूस विरघळून जातो. एकदम हवेत तरंगल्यासारखा फील येतो. अगदी थेट ढगात गेल्यासारखा.
राजा गुरवाच्या भाषेत सांगायचे तर हे असे हसणे म्हणजे लागु बंधू मोतीवाल्यांच्या दुकानात लालचुटूक डाळिंबी किनपाखी मखमली पेटीतला मोत्याच्या हार पाहील्यासारखे वाटते.राजा हा कलाकार माणूस, चित्रकार. असल्या उपमा त्यालाच सुचायच्या. आम्ही पडलो आयटी वाले. आम्हाला उपमा सुचणार त्या प्रॉडक्ट मधे बग असल्याच्या नाहीतर युजर अॅक्सेप्टन्स न मिळाल्याच्या. त्याचा विचार आल्यावर मला उगाचंच आपण लागु बंधूंच्या दुकानात बसलो असल्याचा फील यायला लागला.काय हरकत आहे ना एखादे दिवस दिवसभर त्यांच्या दुकानात जाऊन बसायला. ठरले तर या ट्रीप मधे ते तसे करून बघायचे.
फ्लाईट मधे एक बरे असते. शेजारचा माणूस अबोल असला तर बरे असते निदान त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून समोरच्या स्क्रीनवर सिनेमा पहाता येतो. बोलका असेल तर जरा वेळ बरा जातो पण अती बोलका निघाला तर वैताग येतो.मागच्या वेळेस एक पाकिस्तानी भेटला होता. सुरवतीला गम्मत वाटली पण नंतर नंतर वैताग आणला. काय म्हणे तर जबतक वो कर फॅमिली है तबतक इंडीया का क्रिकेट सुधरेगा नही. अगोदर समजलेच नाही त्याला काय म्हणायचे होते ते. गावसकर ,वेंगसरकर आगरकर , तेंडुलकर या सगळ्यांच्या आडनावात कर असल्यामुळे ते त्याला एकाच कुटुंबातले वाटत होते. त्याचे ते अगाध ज्ञान पाहून आपणच बोलणे आखडते घेतले. झोप आल्याचे सोंग घेतले तरी तो वेळोवेळी मधेच आपले डोळे उघडले आहेत हे पाहून काहितरी विचारत होता शेजारच्या सीटवर गुजराथी असला की तो पहिल्यांदा काय करतो ते म्हणजे एअरहोस्टेसला वाईन कोणती आहे ते विचारतो आणि स्वतःचा स्नॅक्स चा डबा उघडतो. सगळ्या विमानात बिन दिक्कत खाकरा , थेपला खायला लागतो. आणि स्क्रीनवर तारक मेहर्ता का उलटा चष्मा लावून बघत बसतो. बाकी काही त्रास नसतो. त्याला तू कुठला हे विचारायचे नसते. कारण तो त्याचे उत्तर हातातला थेपला खाऊन पूर्ण झाल्यावरच देतो. त्याचे " चाणस्मा , चोरवाड , ध्रांगध्रा ,हालोल , कालोल , गोध्रा, गोंडल भरुच मेंदरडा " असे उत्तर येईपर्यंत आपण काही प्रश्न विचारलाय हेच आपण विसरलेलो असतो. आणि तो नक्की काय म्हणालाय त्या शब्दाचा अर्थ लावत बसतो. बगडु , बोटाद, मेंदरडा ही गावाची नावे असू शकतात हे आपल्या गावीही नसते. अर्थात गावाचे नाव काय असावे हे आपण ठरवू शकत नाही. अकोला, उद्गीर , फुरसुंगी ,उंद्री, ही नावे ही इतरप्रांतीयाना अशीच वाटू शकतात.
अटलबिहारी वाजपेयीना एकदा म्हंटले होते की रशिया आमचा मित्र देश आहे तर चीन हा भाउ आहे. एका पत्रकाराने विचारले होते चीन ला तुम्ही मित्र का म्हणत नाही. वाजपेयी नी उत्तर दिले की मित्र जोडताना तुम्हाला चॉइस असतो भावाबद्दल तसा चॉईस नसतो तो शेजार्याबद्दलही नसतो. हे सगळीकडेच खरे आहे.
फ्लाईटमधे शेजारच्या सीटवर कोण असेल हे सांगता येत नाही. त्यातून आपण इकॉनॉमी क्लासवाले आपण फक्त प्रार्थना करु शकतो. त्यातही आईल सीट किंवा विंडो सीट असेल तर ठीक. तिथे एकाच बाजूला शेजार असतो. मधली सीट असेल तर दोन्ही बाजूला शेजार असतो. मग प्रार्थना दोन वेळा करावी लागते. डाव्या बाजूसाठी एकदा आणि उजव्या बाजूसाठी एकदा. कधीतरी अगदी सुपर स्ट्ऱोंग प्रार्थना केली तर मधली सीट रिकामी ही मिळते. प्रार्थना नेहमी फळाला येतेच असे नाही कधीतरी प्रार्थनेच्या उलट ही होते. सुधृड बालक स्पर्धेत अजूनही पहिला येऊ शकेल असा कोणी अदनान सामी चा अवतार शेजारी येतो. हा एवढा मोठा पदार्थ सीट मधे कसा मावेल हा विचार करत असतानाच तो स्वत:ला सीट नामक जागेत स्वत:ला खुपसतो आणि बसतो. दोन सीट मधल्या हात ठेवायच्या दांडीवरसुद्धा त्याच्या हाताचे कोपर ओघळत असते. आपल्याला हात काय बोट ठेवायलाही जागा शिल्लक रहात नाही. एक बरे आहे के एल एम च्या या फ्लाईट मधे मधल्या रांगेत तीन आणि बाजूच्या रांगेत फक्त दोन अशी सीट ची ऐरेन्ज्मेन्ट आहे.त्यामुळे इतकी सुपर स्ट्रॉग प्रार्थना करायची वेळ येणार नाहीय्ये.पण तरीही बघुया आज प्रार्थना न करता काय मिळतंय. देव म्हणे न मागणारालाच जास्त देतो खुश होऊन असे ऐकलंय. मी दोन्ही हाताच्या तर्जनी आणि मधल्या बोटाची घडी घालतो. मधले बोट तरजनीवर उचलून त्यांचा तिढा बसवतो. फिंगर्स क्रॉस्स्ड. अजूनतरी शेजारची खिडकीवाली सीट रीकामी आहे.
फ्लाईट सुटायची वेळ झाली. तरीही का बरे थांबली आहे. मी खिडकीतून बाहेर पहातो. नेहमीचेच दृष्य. प्रत्येक एअरपोर्टवर दिसणारे. लहान मोठी विमाने. मला लहानपणी वाचलेली गोष्ट आठवते ,हेमलीनचा पाईड पाईपर. बासरीवाला आणि उंदीर .त्या हेमलीनच्या पाईड पाईपर च्या गोष्टीत आहे ना तसे लटःठ उंदीर , सडपातळ उंदीर , आखुड उंदीर, लांब उंदीर,काळे उंदीर गोरे उंदीर, लहान उंदीर , मोठे उंदीर, शांत उंदीर , चळवळे उंदीर,साधे उंदीर, लबाड उंदीर असे अनेक उंदीर दिसतात तसे एअरपोर्टवर मोठी विमाने, लहान विमाने, पांढरी विमाने- रंगीत विमाने , नाक पुढे आलेली विमाने , बसक्या नाकाची विमाने, खिडकीवाली विमाने- बीन खिडकीवाली विमाने, रन वे साठी वाट पहात थांबलेली विमाने . उड्डाणासाठी रनवे वरून वर पहात धावणारी विमाने. उतरण्यासाठी नाक खाली करून येणारी विमाने. मधूनच बालवाडीतल्या मुलाना ओळ करून शिक्षीकेने घेऊन जावे तशी सामान घेऊन जाणारी ती लांबलचक ट्रॉली ची झुकझुकगाडी सारखी ओळ. हे नेहमीचेच दृष्य. स्पीकरवरुन काहितरी अनाउन्स होतेय. फ्रेंच , डच मधे थोडे थोडे समजतंय. वेलकोमेन हेर्रन बी कालेम फ्लुक्थ. वीर फ्लीगन नार परियेस. ही अनाउन्स मेन्ट तिसऱ्या वेळा होते. या अशा अनाउन्समेंट कडे किती जण लक्ष देतात कोण जाणे. सर्वात निरुपयोगी माहिती देणाऱ्या अशा वाक्याना इंग्रजीत प्लाटीट्यूड असा एक शब्द आहे. प्लाटीट्यूड म्हणजे अशी सूचना की जी कोणालाच उद्देशून नसते. उदाहरणार्थ. सर्व गणेशभक्तांचे स्वागत असो.
ही अशी प्लाटीट्यूड वाक्ये कोण लिहीतो हा संशोधनाचा विषय आहे. हे संशोधन सुद्धा एक प्रकारचे प्लाटीट्यूड च ठरेल.
एअर होस्टेस मधल्या आईल मधून फिरते. सगळे ओव्हर हेड कंपार्टमेंट नीट घट्ट बसले आहेत. याची पुन्हा एकदा खात्री करून घेते.
अजूनतरी शेजारची खिडकीवाली सीट रिकामी आहे. माझ्यासाठी केवढा मोठ्ठा बोनस.पुढचे आठ तास मै और मेरी तनहाई . मस्त मजा. इकोनमी मे बिझनेस क्लास का मजा. मी खुशीत गाजरे खातो. मी न केलेली प्रार्थना इतकी एक्स्ट्रा सुपरस्ट्रॉग असेल असे वाटले नव्हते. ते जे कोणीतरी म्हंटले होते ना. मी देव काही न मागणारालाच भरभरून देतो. खरे आहे ते. आता पुढचे आठ तास मस्त झोप काढायची. या आनंदापुढे मला टेक ऑफ करताना खिडकीतून लहान होत अदृष्य होत जाणारे शहर पहायचा आनंदही कमीच वाटतो. तसेही उन्हात धुरक्यामुळे हे शहर फार वेळ दिसू शकणार नाही. हा आनंद मी साजरा करणार आहे . सीट बेल्ट नीट लावलेला आहे परत एकदा पहातो. मस्त मांडी घालतो. उजेडाचाही डिस्टर्ब होई नये म्हणून डोळ्यावर आय ब्लाइन्ड्स बांधतो. मस्त मांडी घालतो मी डोळे मिटतो. आता किमान दोन तासानीच जागे व्हायचे. हवेत उडत असताना हवेत स्वप्ने पहायची.
माझ्या खांद्यावर कोणीतरी टॅप करतय. मी डोळे उघडतो. काहीच दिसत नाही. माझ्या पापण्याही उघडत नाहीत. असे का होतय? अरेच्चा.... डोळ्यावर आय ब्लाइंड्स आहेत हेच विसरलो. ती पट्टी वर करून मी डोळे उघडतो. एक कोणीतरी जीन्स अणि जैकेट मधली मुलगी आहे. मी वर पहातो. ओव्हरहेड कंपार्टमेन्ट्स मधे ती तीची बॅग ठेवतेय . त्यामुळे चेहरा दिसत नाही. पण तीचे वाक्य ऐकू येते. विल यू प्लीज गिव मी अ वे.... आय हॅव द विंडो सीट . तीला विन्डो सीट पर्यंत जाता यावे म्हणून मी पाय आखडून घेतो.शरीर शक्य तितके आकसून घेतो. आपली न केलेली प्रार्थना तितकी सुपरस्ट्रॉग नव्हती म्हणायची.लांबच्या प्रवासात शेजारी अनोळखी स्त्री प्रवासी असेल तर थोडे अनकम्फर्टेबल होते. नाही म्हंटले तरी आपल्या हालचालींवर ,खाण्यापीण्यावर थोडी बन्धने येतात. विषेशत: पिण्यावर. असो. पुरुष असेल तर जरा गप्पा तरी मारता येतात. फुटबॉल नाहीतर युरोपीयन युनियन आणि मायग्रेशन हे विषय निघाले की कोणीही बोलायला लागते . स्त्रीयांशी काय बोलायचे हाही एक प्रश्नच असतो.
आपल्याला काय तसेही पुढचे आठ तास डोळे बंदच ठेवायचे आहेत. मी पुन्हा आयब्लाइंड्स डोळ्यावर ओढून घेतो. दोन सीटच्या ओळीतील त्या लहान जागेतून तीच्या सीटकडे जाते.तीचा स्पर्ष मला जाणवतो.
का कोण जाणे तो तीचा “विल यू प्लीज गिव मी अ वे....” म्हणतानाचा आवाज आपण पूर्वी कधीतरी ऐकलाय असे वाटतेय
चल कही दूर निकल जाये..... चकोर शाह
क्रमश:
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख ! मस्त खुसखुषीत …
सुरेख !
मस्त खुसखुषीत पन्चेस !
कोण असेल ती याची उत्सुकता.
पुभाप्र.
वा!
सुरूवात अगदी खुसखुशीत झालीय...पु.भा.प्र