Skip to main content

दास डोंगरीचा..

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 12/06/2026 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
दास डोंगरीचा जनां 
सांगून कधीचा गेला,
"दिसामाजी काही तरी 
जन हो लिहीत चला," 
 
जन हो वाचत चला
प्रसंगी, नि अखंडित"
उपदेश मनोमनी 
पटे, गेलो मी वाचत 
 
काही बाही वाचलेले 
अवचित सुचलेले 
लिहिण्याच्या आळसाने 
सालो-साल साचलेले 
 
असा सगळा मामला 
म्हटले लिहीन चला 
सुदैवाने सोमि(#) तेव्हा 
आयुष्यात उगवला 
 
कायप्पा(£)च्या विद्यापीठी 
एकनिष्ठ मी स्नातक 
छद्मविज्ञानाचा भोक्ता 
ध्येय माझे: फेकाफेक 
 
फॉरवर्ड चा वक्र बाण 
माझ्या भात्यामध्ये आला 
मग स्वतः लिहिण्याच्या 
बेत ढगांमध्ये गेला 
 
दिसामाजी शेकड्याने 
आता फॉरवर्ड करतो 
इतरांचे फॉरवर्ड 
अखंडित मी वाचतो😊
               
~~~~~~~~~~~~~
 
सोमि(#) : सोशल मिडिया 
कायप्पा (£): WhatsApp
लेखनविषय:

वाचने 53
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया