✪ अखंड सुरू राहणारी गावं!
✪ अगस्त्यमलाई पर्वतरांग!
✪ सुचिंद्रमचं अप्रतिम मंदिर
✪ दूरवरून दिसणारा अगाध आणि अथांग तो
✪ योग आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारं विवेकानंद केंद्र
✪ सायकलवर कन्याकुमारी- स्वप्नपूर्ती
✪ निवेदिता ताईंसोबत संवाद नमस्कार.
२१ जानेवारीची सकाळ. तिरूअनंतपूरम! आज मोठा दिवस आहे! कन्याकुमारी! अर्धा प्रवास पूर्ण होईल. खरंच विश्वास बसत नाहीय. कन्याकुमारीला सायकलवर जायचं हे अनेक सायकलिस्टचं स्वप्न असतं! आज ते पूर्ण होणार. टप्पा छोटा म्हणजे ९४ किलोमीटरचाच आहे. सलग चार शतकं झाल्यानंतर आता टप्पे थोडे लहान आहेत. आज केरलममधला शेवटचा दिवस! १६ वर्षांपूर्वी कन्याकुमारीला गेलो होतो, त्यावेळच्या आठवणी आहेत. तीन बाजूंनी समुद्र आणि जमिनीचं टोक! आणि त्याबरोबर निमुळता होत जाणारा पश्चिम घाट!
(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) .
.
.
.
.
तिरूअनंतपूरमधून बाहेर पडून महामार्गावर आलो. वाहनांची विशेष गर्दी नाहीय. सकाळची प्रसन्न हवा! हा महामार्ग छोट्या गावांमधून जातोय. किंवा छोट्या गावांचा एक प्रदेशच सुरू आहे असं वाटतंय. मागच्या वेळच्या तुलनेत मार्ग मोठा झालाय आणि काही गावांमध्ये पूल झाले आहेत. त्यामुळे महामार्गावर गर्दी अशी नाहीय. दूरवर डोंगर रांगा दिसत आहेत! अगस्त्यमलाई पर्वतरांग! ऋषी अगस्त्य आणि दक्षिण भारताचं खूप विशेष नातं आहे. त्यांना तमिळ भाषेचा जनक मानलं जातं. शिवाय आकाशातल्या अगस्त्य तार्याचाही इथे विशेष संबंध आहे. रात्रीच्या आकाशातला दुसरा सर्वांत तेजस्वी तारा अगस्त्य- पूर्वीच्या काळी पृथ्वीच्या परांचन गतीमुळे (precession) तो पूर्ण भारतातून नाही तर फक्त ह्या अगस्त्यमलाई रांगांच्या परिसरातून- भारताच्या अगदी दक्षिणेकडच्या टोकावरूनच दिसायचा! आज हा अगस्त्य तारा दिल्लीवरूनसुद्धा दिसू शकतो. कुठेही फिरताना हे वेगवेगळे पैलू आणि पार्श्वभूमी लक्षात असली पाहिजे. असो!
तिरूअनंतपूरम- कन्याकुमारी महामार्गाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सुंदर चढ आहेत. छोट्या छोट्या टेकड्या लागतात आणि दृश्य छान दिसतं. काही अंतर समुद्र किंचित बाजूला राहतो. एका हॉटेलात इडली- चटणी असा नाश्ता करून पुढे निघालो. नवीन महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाहीय. त्यामुळे एका ठिकाणी जाऊन परत मागे येऊन जुन्या सिंगल लेन महामार्गावर जावं लागलं. तमिळ नाडू सुरू झाला! परत काही अंतरासाठी दाटीवाटीची गावं लागली. अशाच एका गावात पाणी पिण्यासाठी थांबलो असताना स्वच्छता करणार्या दोन महिला भेटल्या. त्यांनी नजरेनेच माझी विचारपूस केली. त्या हसून आणि हावभावाने माझ्याशी बोलल्या, की सगळं ठीक आहे ना.
कन्याकुमारीचे बोर्डस दिसत असल्यामुळे "कन्याकुमारीचा" उल्लेख असलेलं गाणं आठवलं! मनातल्या मनात असे रँडम गाणे ऐकत पेडलिंग करत राहिलो. मध्ये मध्ये डोंगर आणि तळ्यांची सुंदर दृश्यं आहेतच. नागरकॉईल ओलांडलं. सुचिंद्रमचं मंदिर नक्की पाहा, असं मित्राने सांगितलं आहे. त्यामुळे सुचिंद्रममध्ये आल्यावर बायपास न घेता गावातून गेलो. मंदिर रस्त्यावरच लागलं. खरोखर थक्क करणारी वास्तुकला! आता वाटेत अशी बरीच मंदिरं लागणार आहेत!
सुचिंद्रमनंतर थोडा ग्रामीण परिसर सुरू झाला. गावांमध्ये मोकळं अंतर दिसतंय. कन्याकुमारी साधारण १० किलोमीटर होतं तेव्हा दूरवर अथांग आणि अगाध असा "तो" दिसला! अहा हा! हिमालय उतरताना दूरवर जमीन दिसावी तसा! विलक्षण! छोटे छोटे ओहळ वाटेत लागत आहेत. समुद्र जवळून दिसत नाहीय. आलं कन्याकुमारी! कन्याकुमारी आलं तसा मोठा वारा सुरू झाला! समुद्री वारे! कन्याकुमारीसुद्धा आता खूप मोठं शहर वाटतंय! आधी थेट किनार्याकडे गेलो. गाव ओलांडून बीचजवळ आलो. विवेकानंद रॉक मेमोरियलचा रस्ता थोडा चुकला. त्यामुळे बाजूच्या दुसर्या बीचवर पोहचलो! तिथून तीन बाजूंचा समुद्र बघितला! एका पोलिसांनी माझा फोटो घेऊन दिला. सायकल प्रवासाच्या ह्या टप्प्यावर थोडं मनोगतही रेकॉर्ड केलं! कन्याकुमारीच्या विवेकानंद जयंतीला १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद योगा अनुसंधान संस्थेतून सुरू करून दहाव्या दिवशी विवेकानंद केंद्रामध्ये पोहचलो! .
.
.
.
.
.
काही क्षण किनार्यावर थांबलो. डोळे भरून "त्याला" बघितलं! त्याचा वारा अंगावर घेतला. आणि हळु हळु परत रस्त्यावर आलो आणि विवेकानंदपुरममधल्या विवेकानंद केंद्रात आलो. आजचे ९४ किलोमीटर पूर्ण झाले. रिसेप्शनमध्ये इथले प्रमुख सुनीलजी भेटले. आधी बोलणं झाल्यामुळे रूम लगेच मिळाली. विवेकानंद केंद्राचाही परिसर खूप वाढल्यासारखा वाटतोय. अगदी गावाच्या आतलं छोटं गाव वाटतंय हे. आंघोळ केल्यावर समोरच्याच कँटीनसारख्या हॉटेलात जेवण केलं. दुपारी आराम केला.
संध्याकाळी विवेकानंद केंद्रात हे केंद्र उभं करणार्या एकनाथजी रानडेंच्या जीवन कार्याची माहिती देणारं संग्रहालय बघितलं. विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा निवेदिताताई भिडेंना भेटलो. त्या जीवनव्रती आहेत आणि गेली अनेक दशकं विवेकानंद केंद्रासाठीच काम करतात. इथला आतला परिसर विलक्षण सुंदर आहे. आतमध्ये मोरसुद्धा राहतात! नंतर स्वामी विवेकानंदांच्या जीवनाबद्दलचं दुसरं एक संग्रहालयसुद्धा बघितलं. विवेकानंद केंद्राचा एक वेगळा बीच आहे. उद्या सकाळी तो बघून पुढचा प्रवास करेन.
विवेकानंद केंद्र योगाच्या क्षेत्रातही मोठं काम करतं! मला आठवतं, अगदी लहानपणापासून परभणीत नेतीसाठी वापरली जाणारी नेतीपात्रं विवेकानंद केंद्रातच बनवली जायची. निरामय संस्थेचा विवेकानंद केंद्रासोबत तेव्हापासून संबंध आहे. विवेकानंद केंद्रामध्ये बहिरंग योगाबरोबर अंतरंग योगावरही तितकंच काम केलं जातं. वर्षातून दोनदा महिनाभराचे अभ्यासक्रम होतात आणि योग शिबिरंही होत असतात. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचं काम विवेकानंद केंद्र आणि देशभरातले त्यांचे कार्यकर्ते करतात. इथे आधी थोडं अजून व्यवस्थित बोलणं झालं असतं तर इथल्या लोकांसोबत संवाद करू शकलो असतो. संध्याकाळी सुनीलजींसोबतही परत भेट झाली. वेळ कमी असल्यामुळे रॉक मेमोरियल बघता आलं नाही. आणि उद्या निघताना परत बीचवर जाईन.
२० दिवसांच्या प्रवासातले १० दिवस पूर्ण झाले! मुख्यत: पश्चिमेकडे व दक्षिणेकडे असलेला प्रवास आता दिशा बदलेल! एका रात्रीत भारताच्या पश्चिम किनार्यावरून पूर्व किनार्याकडे पोहचेन! पुढच्या टप्प्यामध्ये अनेक गावं खूप छोटी आहेत. आणि बर्याच ठिकाणी कोणताच संपर्क झालेला नाही. त्यामुळे माझ्या काकाचे मित्र विजय राजमोहनजींच्या माध्यमातून सेवा भारती दक्षिण तमिळ नाडूसोबत संपर्क केला. पुढचा प्रवास, संस्थांच्या भेटी व राहण्याची व्यवस्था ह्यासाठी ते मदत करतील. अर्ध्या टप्पा पूर्ण झाल्यावर मनामध्ये एकच एक भावना सतत येते आहे. ती म्हणजे कृतज्ञता!
पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ११: कन्याकुमारी ते तिरूचेंदूर ९१ किमी वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 25 मे 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया