बायको किंवा नवऱ्याच नाव त्यांचे पार्टनर्स मोबाईल मध्ये काय म्हणून सेव्ह करतात हा प्रचंड मनोरंजक प्रकार आहे. एका चित्रपटांत (नाव आठवत नाही) पोलिसाने त्याच्या बायकोचं नाव धर्मसंकट असं ठेवलेलं असतं. बरेच जण फक्त बायको इतकंच ठेवतात. आता तरी एकच नंबर असतो पण पूर्वी जेव्हा एकापेक्षा जास्त असायचे तेव्हा बायको १, बायको २ असा सोपा मामला होता.
बायका थोड्या Creative तरी असतात. माझ्या एका मैत्रिणीने तिच्या नवऱ्याच नाव अहो म्हणून ठेवलं होतं (पुरुषांच्या मानाने ही creativity म्हणता येईल). लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतर बायकोच नाव डार्लिंग असं upgrade करणारे काही हुशार नवरे माझ्या माहितीत आहेत. Hubby किंवा husband असाही एक प्रकार अस्तित्वात आहे. पण नुकताच एक अत्यंत मजेशीर अनुभव आला. झालं असं की, ऑफिसमधली माझी कलिग माझ्या गाडीत येणार होती. तिच्या मोबाईलची बॅटरी ची चार्जिंग संपत आल्यामुळे तिने तो चार्जिंगला लावला. थोड्या वेळात तिला एक कॉल आला आणि मोबाईल कनेक्ट असल्यामुळे स्क्रीनवर नाव आलं सुपरमॅन! आपलं processor slow असल्यामुळे आधी लक्षातच आलं नाही की सुपरमॅन कोण आहे माझ्या list मध्ये? नंतर लक्षात आलं की माझा फोन नसून हा माझ्या बाजूला बसलेल्या कलिगचा होता. लगेच ट्यूब पेटली की हा तिचा नवराच असणार. जन्मजात सवयीने सगळे वाह्यात विचार शक्य तितक्या वेगाने येऊन गेले. म्हणजे हे साहेब पँटच्या वर बरमुडा घालून जात असतील का? ऑफिसला कारने जात असतील की पाठीला पडदा बांधून उडत? सुपरमॅन ची बायको अत्यंत साधा, डिझाइन नसलेला पडदा पाठीला अडकवू देत नसेल नक्कीच. वगैरे! ह्या वेळात सुपरमॅन आणि बाजूला बसलेल्या सुपरवुमनचे बोलणे झाले होते. नवरा बायको फोनवर किती बोलणार? हे बाकी आपल्यासारखेच आहे ह्यांच्या जगात हे बघून आनंद झाला. फोन झाल्यावर तिने सांगितले की खरं म्हणजे तो तिला घ्यायला येणार होता पण मध्येच त्याला तापाची कणकण आणि शिंका येत असल्यामुळे तो घरी गेला आहे. हे ऐकून हा असा कसा सुपरमॅन ? हा विचार लगेच येऊन गेला. तिला तिच्या घराच्या रस्त्यावर सोडून मी माझ्या घरी गेलो. थोडक्यात काय तर लग्न झाल्यावर सुपरमॅन हा फक्त मोबाईलच्या नावापुरता उरतो..बाकी सुपर पॉवर तर त्याच्याकडे कधीच नव्हती ती कोणाकडे असते हे सांगायला पाहिजे का?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
119
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया