Skip to main content

घाव

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 23/04/2026 22:53 या दिवशी प्रकाशित केले.

 

संध्याकाळ झाली. रवी झोपेतून उठला. त्याला चांगलीच झोप लागली होती ; पण जेव्हा तो बेडवर उठून बसला तेव्हा त्याचं डोकं गरगरत होतं . त्याच्या  मनामध्ये असंख्य भोवरे फिरू लागले होते . लहान पोरं भोवरा खेळतात आणि मध्येच तो हवेत फेकून तळहातावर झेलतात . तसंच त्याचं होत होतं ; पण इथे भोवरे  अनेक होते . आणि - एखादा  भोवरा उचलून घेतलाच तर तो  थेट हृदयाला सलत होता .

 

त्याला कारणही तसंच होतं . आज सकाळीच त्याचा डिव्होर्स झाला होता.  कोर्टातल्या त्या सगळ्या किचकट प्रोसिजर्स,  कागदपत्र आणि सह्या आणि सगळंच ; पण उरकलं होतं एकदाचं .  त्यांच्या विभक्तपणावर अखेरीस शिक्कामोर्तब झालं होतं.

 

किती आठवणी...

 

ते कॉलेजमधलं प्रेम ...मग ते लव्हबर्ड्ससारखं  फिरणं ,पुढे लग्न , लग्नासाठी पॉश कार्यालय, लग्नातल्या गंमतीजमती  आणि हनिमूनच्याही गंमतीजमती …

 

आणि मग पुढचं आयुष्य. रूटीन . त्यानंतर  वादविवादाला सुरुवात.  कोणाचं चूक कोणाचं बरोबर ते ठरवणं अवघड ...शेवटी पूर्ण फारकत !

 

त्याने पम्याला फोन केला. तो सकाळपासून त्याच्याबरोबर होताच .  त्याचा खास दोस्त- त्यांना समजावून सांगून थकलेला. त्यांचा खरा हितचिंतक. पण शेवटी रवी आधीचा  निशा नंतरची . कोर्टातलं  काम संपल्यावर तोही दुपारी घरी गेला होता. त्याच्याही डोक्याला शॉट होताच की !

 

कोर्टातून निघतानाच ठरलं होतं- संध्याकाळी दुःख दारूत बुडवायचं . 

 

पम्या गाडी घेऊन आला . आज त्याने वेगळ्या बारमध्ये जायचं  ठरवलं होतं . तेवढाच चेंज ! तो  काही दिवसांपूर्वी  तिथे  जाऊन आला होता . शांत निवांत बार .  सुंदर अँबियन्स !  हो ना - दुःखाची कलकल कलकलाटात  कशी बुडवायची ? 

 

पम्याने गाडी तिकडे वळवली . पण तो बार काही कारणाने बंद होता.

 

शीट !  असं म्हणत त्याने गाडी दुसरीकडे वळवली . विचार न करताच . आपसूकच त्या एरियातल्या जवळच्या बारकडे . रवी शांतच होता. एखादा पेग पोटात गेल्याशिवाय आता तो काही बोलणारही नव्हता . त्याचं मन स्वाभाविकच अस्वस्थ होतं . त्याच्यामुळे पम्याही शांतच होता.

 

पम्या त्याला दुसऱ्या बारमध्ये घेऊन गेला.

 

ते बसले. त्यांनी ऑर्डर दिली आणि त्यांनी ग्लास उंचावले... रवीच्या पाठीमागेच खिडकी होती आणि दोघांनाही काहीतरी आठवलं .दोघांनी एकदमच खिडकीतून बाहेर पाहिलं .  समोर लांबवर एक इमारत होती . ती तोडण्याचं काम चालू होतं . तिच्यावर अनेक घाव पडलेले दिसत होते . नुसता सांगाडाच काय तो राहिला होता . पडलेल्या घावांनी ती छिन्नविछिन्न झालेली होती . ती इमारत म्हणजे एक मंगल कार्यालय होतं.

 

 रवी आणि निशाचं  लग्न त्याच कार्यालयात तर झालं होतं...

 

 आता मात्र दिवसभर रोखून ठेवलेले त्याचे अश्रू  सावरलेच नाहीत . ते मोकळे झाले. ते ओघळू लागले - टपटप टपटप ! ... आणि ते त्याच्या हातातल्या ग्लासमध्ये मिसळू लागले. 

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 82
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया