आज मै उपर , आसमां नीचे--१

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
16 Mar 2026 - 3:11 pm

आज मै उपर , आसमां नीचे
करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे. पाटील कुलकर्णी जोशी पवार कांबळे गायकवाड हे असतातच.आमच्या सातारकडे तर काही गावे च्या गावे ठरावीक आडनावांची असतात. लिंब-गोवे म्हणजे साळुंखे पाटखळ म्हणजे शिंदे , सातारा कशाला पुण्यातही हे सापडते. भोसरी गावात लांडगे आणि उंद्री गावात मांजरे आडनावाचे लोक रहातात हे समजले तेंव्हा गम्मतच वाटली होती. असो.पण आपले नावच वेगळे आख्ख्या शाळेत दोघींचेच नाव करुणा. करुणा टिपणीस आणि करुणा जाधव. करुणा जाधव युपी एस सी देऊन आय पी एस झाली. गेल्या महिन्यात भेटली होती चालणे बोलणे एकदम वेगळेच,काय रुबाबदार दिसत होती ना. तीच्या नावात फक्त करुणा. काम मात्र गुन्हेगारांना वठणीवर आणायचे. असते एखादीचे. बाकी नावाचा आणि दिसण्याचा तसा काहीच संबन्ध नसतो. बघा ना अर्थातच कसा असेल. मुलाचे किंवा मुलीचे नाव वयाच्या अवघ्या बाराव्या दिवशी ठेवले जाते. काहीवेळा तर जन्माच्या अगोदरच . त्या वेळेस मुलगा होणार की मुलगी तेही माहीत नसते. आणि ते पुढे मोठी झाल्यावर काय करतील कशी दिसतील हे तरी कसे ठरवणार. ताहीराचा भाउ शेरखान पण तो दिसायचा इतका सुकडा. त्याने नाव सांगितल्यावरच हसू यायचे. द ग्रेट असा नावाचा अर्थ होतो तो अकबर पंक्चर काढायची टपरी टाकतो.मधुरा नावाची बाई कैदाशीण बरी अशी वागते. मधुरा ऐवजी तीचे नाव मंथरा असते तर बरे झाले असते वाटते. कॉलेजमधे भद्रा शहा ला कोणीतरी एकदा विचारले होते की तुमच्यातले लोक सैन्यात का जात नाहीत. तीने न चिडता उत्तर दिले होते. म्हणाली आमच्यात रणछोड हे नाव खूप कॉमन आहे. कल्पना करा ब्रिगेडियर रणछोडदास हे ऐकायला कसे वाटेल. नावामुळे त्याला बढतीच काय पण सैन्यात नोकरीही मिळणार नाही. तीने त्या प्रश्न विचारणार्‍या अँकरला एकदम निरुत्तर करून टाकले होते. लोकानी टाळ्यांचा इतका जल्लोष केला की तो पुढे काही विचारायचेच विसरुन गेला.करुणा जाधव आणि आपण फक्त नावातच साम्य. बाकी सगळेच निराळे. बारावी पर्यंत दोघीही एकत्र शिकलो. ती पुढे बी एस सी ला गेली. युपी एस सी करायचे म्हणून. आपल्याला मेडिकलला जायचे होते. रुग्णांची सेवा करायला मिळावी म्हणून.
पीक पीक पीक. अलार्म बेल चा बझर वाजतो. भोवतालच्या मंद उजेडाला आणखीन गडद करत डॅशबोर्डवरचा लाल दिवा चमकतो. सांगतोय करुणा..... तीनशे पंधरा नंबर तीनशे पंधरा नंबरचा पेशंट... त्याला काहीतरी हवंय. त्या दिव्याच्या एका चमकण्याने माझे विचारचक्र तुटते. ड्यूटी फर्स्ट... अर्थात हे नेहमीचेच आहे. हा तीनशे पंधरा वरचा पेशंट , आज्जिबाई आहेत त्यांच्या वयात पेशंट चा नंबर मिळवला की चारशे पूर्ण होतात. त्याना बेलचे बटन दाखवले नसते तर बरे झाले असते. दोन तासात हे चौथ्यांदा होतंय. एकदा काय तर तहान लागली आहे पाणी प्यायचंय. दुसर्‍यांदा थंडी वाजते पांघरूण घाल. तिसर्‍यांदा लघवी करायची आहे बेडपॅन हवाय. आत्ता कशासाठी केलाय पहायला हवे. त्यांच्या सोबत झोपायला म्हणून एक लहान मुलगी आहे ती एकतर सतत झोपते किंवा मग फक्त रील बघत बसते. रात्रभर रील मधले ते खॅ खॅ खॅ चे आवाज ऐकत बसते. कितीदा सांगितले की हेडफोन घालून बस तर म्हणते की हेडफोन मुळे आज्जींनी बोलावले तर ऐकायला येत नाही. इतर पेशंट ना त्रास होतो ते दिसत नाही तीला. प्रत्येक जण स्वतःपुरते बघतो. ती त्या आज्जींची नात तर दिसत नाही. कामवाली असेल बहुतेक.,आपल्याला काय करायचेय. नसत्या चौकशा. आपण बरे आपले काम बरे. आज्जीना धाप लागली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाली आहे. हे काय ऑक्सिजन टँक मधली लेव्हल इतकी कमी कशी? संध्याकाळी हेब्बळ ने ऑक्सिजन सिलिंडर बदलला नाही की काय. अरे बापरे . नीड टू अ‍ॅक्ट इमिजिएटली. . हॉस्पिटल मधे या क्षणी किमान वीस पेशंट ऑक्सिजन वर असतील. पण ऑक्सिजन सिलिंडर कोण बदलणार आत्ता या वेळेस? दुर्योधन पांडे?..... तो बसला असेल बाटली पिऊन. नेहमीचे आहे त्याचे नाईट शिफ्ट म्हणजे त्याला वाटते की पिऊन यायची संधी असते. वॉर्डात तसाही औषधे डेटॉल आणि इतर केमीकल्स चा वास असतोच. अल्कोहलचा वास दबून जातो त्यात.
गणेश दुर्घाटे...तो बिचारा अभ्यास करतोय यु पी एस सी चा. बघावे तेंव्हा पुस्तकांच्या गराड्यात असतो.
त्याच्या अभ्यासामुळे आमच्यावर कामाचा लोड येतो .पण थोडे सांभाळून घेऊया. त्याच्या करीयरला मदत होत असेल तर तेवढीच.
वर्षा लिपारे .. ती बदलू शकेल सिलेंडर... पण ती तीची ड्यूटी नाहिय्ये.काही झाले तर जबाबदारी कोणाची?
प्रश्नच आहे.
रामनाथ सरांना फोन करुया. पण या वेळी? ते चिडतील . ओरडतील ,उद्या अगदी सकाळी सकाळी त्याना ओ टी आहे. पण त्या वेळेस ऑक्सिजन नसेल
हॅलो रामनाथ सर.... करुणा नायर बोलते आहे. सॉरी सर. सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू अ‍ॅट धिस अवर. ऑक्सिजन सिलेंडर मधले प्रेशर कमी झालेले आहे. काहीतरी टेक्निकल फॉल्ट असावा. हो. पांडे आहे ड्यूटीवर. पण तो काम करायच्या अवस्थेत नाहिये. ओके सर मी गोन्साल्वीस ला फोन करते. येस सर रीपोर्ट करते. ओके. तीनशे पंधरा पेशंटला धाप लागली म्हणून प्रेशर चेक केले. काय नाही नाही बी पी नॉर्मल आहे. फीवर नाहिय्ये. पल्स ९७ आहे. सिस्टोलिक जरा १३३ डायस्टोलीक ९० आहे. चेक केले मी. आदर सिम्प्टोम्स नॉर्मल. माझे पूर्ण लक्ष्य आहे. ओके सर.
हॅलो हॅलो गोन्सालवीस इमर्जन्सी. हो रामनाथ सरांनी सांगितलय.
रामनाथ सरांचे नाव ऐकताच तो दहा मिनीटात येतो आणि सिलेंडर चे प्रेशर चेक करतो. सिलेंडर व्हाल्व मधे काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आत्ता ठीक केलंय.
हा पेशाच असा आहे की इथे नाही म्हणायला जागाच नसते. कोणताही प्रश्न असो तुम्ही हो च म्हणायला हवे. वैद्यकीय पेशात नकार द्यायचा नसतो. नर्स ने तर कधीच नाही. लोक डॉक्टराना देव मानतात. नर्स ना देवाईतकेच पूजनीय मानतात. देवाने कोणाच्या विनंतीला नकार दिल्याचे ऐकलेय का कधी?
निदान सकाळपर्यंत तरी पहावे लागणार नाही. जनरल वॉर्ड मधे कितीही नर्सेस ठेवा इमर्जन्सी कायमची असतेच. या पेक्षा ओटी ची ड्यूटी बरी. दोन एक तास टेन्शन चे असतात. त्या नंतर सुटका तरी होते. अर्थात ते कुठले आपल्या नशीबात. आपल्या नशीबात एकतर जनरल वॉर्ड नाहीतर मॅटरनिटी. मॅटरनिटी मधे लहान बाळे असतात. लोकाना वाटते की तिथे मज्जा असेल म्हणून. असते देखील थोडीशी. तिथे जरा आनंदी चेहरे तरी पहायला मिळतात. प्रसुतीच्या वेदनानी शिणलेली आई बाळाला जेंव्हा बघते तेंव्हा खूप बरे वाटते तीच्या श्रमलेल्या चेहेर्‍यावर आनंद थुईथुई नाचत असतो.
आपल्याही आईला असाच आनंद झाला असेल ना मला पहिल्यांदा पाहिल्यावर. काय वाटले असेल ना तीला. काय माहीत. आई असती तर विचारता आले असते. त्या न आठवणार्‍या आईच्या उल्लेखानेही मनात एका जुन्या जखमेची खपली उखडली जाते.इतक्या वर्षांनंतरही. जन्मानंतर थोड्याच दिवसात आई गेली. पुढचे सगळे बाबांनीच केले. बाबा दवाखान्यात वॉर्डबॉय होते. त्याना खूप वाटायचे की मी डॉक्टर व्हावे म्हणून. पण नाहीच जमले ते.
आपण नर्स झालो तेंव्हा बाबाला खूप आनंद झाला होता. आख्ख्या दवाखान्यात त्याने पेढे वाटले होते. सगळ्या डॉक्टराना नर्सेस ना सगळ्या मावशीनाही. त्याचे स्वप्न अर्धे का होईना पूर्ण झाले होते.
नर्स झालो ते आपण स्वतःची इच्छा म्हणून की बाबाची इच्छा म्हणून? माहीत नाही. पण त्याचे आणि माझे असे काही वेगळे नाहीच मुळी. जे त्याला वाटते तेच मलाही वाटते. बाबाच म्हणतो तसा. मी अगदी लहान असल्यापासून.
नर्स बनले ते रुग्णांची सेवा करायची म्हणून. एक नोबल पेशा म्हणून. समाजात मान मिळतो नर्सला म्हणून. तीच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहू शकत नाही. बाबाने मला माझ्या नावाचा अर्थ सांगितला तेंव्हापासून . असे काहितरी करावेसे वाटायचे.
ख्बॉक ख्बॉक ख्बॉक...... कोणाच्या तरी खोकल्यानी पुन्हा विचारांची माळ तुटते. मी आवाजाच्या दिशेने पहाते. तीनशे नऊ नंबरचा पेशंट
अरे बापरे. याला न्यूमोनिया चा पेशंट.... सिव्हीयर लेजीऑनेर्स... लंग्ज पाण्याने भरली आहेत. ऑपरेट करायला हवे पण वय आणि तब्येत साथ देत नाहीये.
समोरचा पेशंट दगावणार आहे हे समजतय. तरीही मला त्याला ट्रीटमेंट द्यायलाच हवी. त्याच्या बेडशेजारचे औषधाचा बॉक्स पहाते. अरे बापरे पेन रीलीव्हर म्हणून चक्क नायट्रो ग्लिसरीन२०० लिहीलय. हे औषध तर अंजायना साठी असते ना? दोनच गोळ्या शिल्लक आहेत.म्हणजे या अगोदर दोन डोस झालेत? पण हे औषध म्हणजे? विचारयला हवे सकाळी.आत्ता तरी औषध देणे इतकेच काय ते करू शकते. त्या आजोबानी औषध घेतले. औषधाने किंवा त्या सोबत प्यालेल्या गरम पाण्यामुळे असेल पेशंट ची ढास कमी झालीये. झोप बाबा आता शांतपणे निदान सकाळ होई पर्यंत तरी.
अगोदरच आज स्टाफ कमी आहे.तुला काही झाले तर आमचा वर्कलोड कमी होण्यापेक्षा त्यात वाढच होईल.
रात्र म्हंटली की शांतता असते असे म्हणणाराना एक दिवस जनरल वॉर्ड मधे आणून बसवायला हवे. सगळ्या व्याधी अंधार पडायची वाटच पहात असतात जणू.कुणाची खोकल्याची उबळ वाढते. कोणाच्या अंगाला खाज सुटते , कोणाचा दिवसभर बेपत्ता असलेला ताप बटन चालू करावे तसा सुरू होतो. कोण डोळे फिरवायला सुरवात करते.
ती पलीकडची ३२२ वरची बाई वेदनेने किंचाळत असते. तीच्या पोटात ट्यूमर आहे. चांगला नारळा एवढा. दोन वेळा ऑपरेशन टेबलवरून परत आणले आहे. ऑपरेशनच्या वेळेस नेमकी तीची पल्स लागत नाही. त्या ३१८ वरचा पेशंट एकसारखा असंबद्ध बोलतोय. सोडीयम कमी झाले आहे.सोडीयम इंजेक्ट करायची वेळ झाली. गेल्या वेळेस उशीर झाला होता . केस हायपो नेटर्मिया मधे जाताजाता राहिली. त्या तीनशे सात चे टाके उद्या काढणार आहेत. बॅन्डेज बदलायचे राहिले आहे. रात्रभर नुसती चाकावर असल्या सारखी अवस्था आहे. थोडे कुठे बसायला जावे तर डेस्क वरची बेल पुन्हा वाजते कोणाचे तरी आय व्ही संपायला आलेय म्हणून. जर्रा म्हणून सवड नाहिय्ये आज.
ओ ओ ओ ओ ओ, आह आह ,अरे देवा, सोडव रे मला आता नाही नाही सहन होत नाहिये...... या शिवाय दुसरे काही ऐकू येत नाही. तरी बरे तीनशे चार चे सकाळी ऑपरेशन झाले. साधे ब्लड सँपल घ्यायला सुई टोचली तीने ए भाड्या अगायायाया , ए सटवे ...म्हणत अक्षरशः बोंब ठोकली होती म्हणे. कोणीतरी सांगत होते.
इथेही येतात असले प्रसंग. तरी बरंय. इथे इमर्जन्सी नसते रात्री मॅटरनिटी वॉर्ड सारखी . तिथे बाळे जन्माला येतात तीच वेळ न पहाता. नातेवाईक विचारत असतात बाळाची जन्मवेळ सांगा म्हणून. डिलीव्हरी करताना बाहेर येणार्‍या बाळाकडे बघायचे की घड्याळाकडे? हे लोक ना काहिही विचारतात. बसा तुम्हीच घड्याळ घेऊन डिलीव्हरीच्या वेळेस. आणि वेळ तरी नक्की कोणती धरायची. बाळाचे डोके बाहेर आली ते की मग नाळ कापली ती? ती बिचारी बाळाची आई अक्षरशः मरणाच्या दारातून परत येत असते त्या वेळेस. आणि नातेवाईक सांगतात घड्याळ बघा.
करीयरच्या सुरवातीला पहिले सहा महिने मॅटरनिटी वॉर्डच दिला होता आपल्याला.नुकतीच जन्माला आलेली लालचुटूक चेहेर्‍याची ती इवलीशी बाळे पाहून सुरवातीला जरा भितीच वाटायची. शिणलेल्या अवस्थेत असलेल्या त्याच्या आईला त्याही अवस्थेत बाळाला पाहिले की भरून पावल्याचे भाव चेहेर्‍यावर पसरायचे. माअ वाटायची. लहान बाळे हाताळायला जमलेच नाही नीट आपल्याला सुरवातीला. मोमीन मावशी नी साम्भाळून घेतले आपल्याला म्हणून बरे. नर्सिंग च्या अभ्यासक्रमात बाळाला मायेचा स्पर्ष देवून कसे शांत करायचे हे कधी शिकवलेच नाही.
आपण नर्सिंग ला अ‍ॅडमिशन घेतली याचा बाबाला खूप अभिमान. आपल्यालाही किती छान वाटले होते.
आज दहा वर्षांनन्तर ही आपले विचार तितकेच उदात्त विचार आहेत का?
शंका घ्यायला वाव आहे. रुग्णांची सेवा करता येते. या पेक्षाही आज माझा पेशा मला स्वावलंबी बनवतो. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात गेले तरीही मी स्वावलंबी असेन हा व्यवहारी विचार मनात येतो. पण आजही हा पेशा तितकाच आवडतो? अगदी खरे ,प्रामाणीक पण सांगायचे तर कधीकधी कंटाळा येतो. रोज रडके आजारी चेहरे , रोज दुखणी खुपणी , आजार यांचा सामना करायचा. रक्त लघवी , थुंकी , जखमेतली घाण , शरीरातले दोष हे पहायचे. रडणे कुंथणे कह्णणे , मॉनिटरची बीप बीप हे आपल्या आयुष्यातलं संगीत झालंय. कोणी रस्त्यातजरी भेटले ओळखेचे तरी बोलायचे विषय तेच. आजारपणाचे, हॉस्पिटलचे नाही तर कोणीतरी कशाने तरी सिरीयस आहे याचेच.
बायका भेटल्या तर विचारायला नको. दुखणी खुपणी यात महिन्याच्या पाळीबद्दलही बोलायला सुरवात करतात अगदी भर रस्त्यातही. गेल्या महिन्यात सिनेमा पहायला गेले होते. चांगली प्रेम कहाणी होती शाहीद कपुरची. पण मध्यंतरात वीणा ताई भेटल्या. त्यानी पुढचा सिनेमा बघूच दिला नाही. आपल्यापेक्षा हलवाइ बरा. सातारला गेलो होतो तेंव्हा वर्गातला विजा लाटकर म्हणत होता. माझ्या दुकानात दु:खी माणूस येतच नाही. सगळे येतात ते खुशखबर घेऊन. पास झाल्याची , नोकरी लागल्याची , लग्न ठरल्याची बाप झाल्याची , घर खरेदी केल्याची. पेढेवाला ना तो. हेवा वाटला त्याचा.
स्वतः होऊन दुखणी पहात बसायची. कंटाळा आलाय आता. किती दिवस हेच करायएच. डॉक्टर झाले असते तर निदान नवीन काही शिकले असते. तेवढाच फरक पडतो. आर्थीक आणि मानसीक स्थितीत. आपल्याला कितीही सिनीयर व्हा. तीच आणि तीच कामे करायची. बदल तो कसला म्हणूण नाहीच.
हे हल्ली असं खूप व्हायला लागलंय ना? पण कशामुळे?
हा प्रश्न आला. इतका वेळ मनात स्वतःशीच संवाद करत असलेली नर्स करुणा स्वतःशीच चमकते.
का बरे असे वाटावे?जाऊ दे. नकोच हा विचार करायला.
एखादी माशी हाताने हाकलून लावावी तसा तो प्रश्न करुणा उडवून लावते. पण तो प्रश्न तीचा पिच्छा सोडत नाही.
(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

16 Mar 2026 - 4:02 pm | पाषाणभेद

हॉस्पीटलचे जग दाखवत आहात. चांगली सुरूवात.