बाई माझी कंबर लचकली..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
18 Feb 2026 - 11:47 am

हेलनसारखा नाच मी करु शकत नाही. अगदी जयश्री गडकर सारखाही नाही. पण तिच्यासारखं न नाचूनही मध्यंतरी माझी कंबर लचकली. दुखायला लागली. मी व्हाटस् ॲप वर लग्गेच ते सर्व मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना कळवलं. मग लगेच सूचना सुरू झाल्या
"चोळ,शेक,अमुक पेन किलर घे. तमकं क्रीम लाव. पडून राहा. विश्रांती घे."
काहीजणांनी विचारपूस केली. "काही जड वस्तू उचललीस का? फार वेळ खाली वाकून काही केर पोछाचं काम केलंस का?" (ही असली कामं सुनेला करायला सांगत जा."असा सल्लाही काहीजणांनी दिला.)

"गार फरशीवर खूप वेळ बसलीस का?"
"कमरेचे व्यायाम जास्त वेळ केलेस का?" (नशीब,कुणी झुम्बा डान्स केलास का? असं विचारलं नाही.

हे सगळे सल्ले ऐकून, त्याप्रमाणे वागून पाहिले,पण काहीही उपयोग झाला नाही.

मग मी आर्थोपेडिक ऊर्फ हाडांच्या डॉ.कडे जायचे ठरवले. बाय द वे आर्थोपेडिक चं स्पेलिंग काय हो?" Orthopaedic"वाटतंय! पण मध्येच "a "नंतर"e"कशाला?

मला डॉ कडे जायला अजिबात आवडत नाही. कारण मला कोणताही आजार झालेला असो. तो डॉ."वयपरत्वे असं होणारच आजी", असं म्हणून मला माझ्या "ज्येष्ठ नागरिकत्वाची"जाणीव करून देतो.

डाॅ.कडे जायचं म्हटलं की या वयातही माझ्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या वाढते. बीपी वाढतं, घशाला कोरड पडते, मन सैरभैर होते.

वाटतं, "हा प्राणी आता आणखी काय झालंय म्हणून सांगतोय कुणास ठाऊक!"
आता मी ज्या डॉ.कडे गेले होते, त्यांनी मला X ray काढायला म्हणजे आईच्या भाषेत "क्ष किरण" तपासणी करायला सांगितले. ती एकदा, समोरुन,मग डाव्या बाजूने, मग उजव्या बाजूने,मग उभ्याने,मग झोपून. असे एक्स रे सेशन झाले. आणि नंतर काय सांगितले असेल? ओळखा पाहू? कर्रेक्ट! बरोबर ओळखलंत!

ते म्हणाले,"तुमच्या दोन मणक्यांत गॅप पडलीय. दोन मणक्यातली मधली गादी सरकलीय. त्यामुळे तिथल्या नर्व्हजवर दाब पडतोय. "

वंडरफुल! मला अगदी हेच निदान अपेक्षित होते. कंबरदुखी जडलेल्या प्रत्येकाला हेच निदान सांगितले जाते. त्यांनी सांगितले की कमरेचे व्यायाम करा. मी एका फिजिओथेरपीस्टचं नाव सांगतो, त्या तुम्हांला फिजिओथेरपी देतील. फिजिओथेरपी चं स्पेलिंग काय हो? मला वाटतं "figiotherapy" नो. नो. चुकलं. चुकलं. शून्य मार्क. मग Phgiotherapy? ओह् मिस्टेक अगेन. आता मायनस मार्कस्. Physiotherapy हे बरोब्बर!
हे "वाघिणीचे दूध" वगैरे भाषा असलं कसलं स्पेलिंग करतात. त्यांना तरी पाठ होतं का!

अर्थात् स्पेलिंग काही का असेना,मी कशाला ते लक्षात ठेवू? डॉक्टरांनी तो शब्द माझ्या आधी,माझी परवानगी न घेता वापरलाय . त्यांनी लक्षात ठेवावं स्पेलिंग!

डॉ.पुढे म्हणाले,"हे सुरू करण्यापूर्वी टु बी ऑन द सेफर साईड तुम्ही MRI करून घ्या, मी सांगतो त्या हाॅस्पिटलमधे."
आयला! किंवा बापरे!

MRI म्हटलं की माझी "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे"अशी अवस्था होते.

मी दारं, खिडक्या गच्च बंद केलेल्या खोलीतही बसू शकत नाही. बंद लिफ्टमध्ये मी भेदरते. तर MRIच्या त्या अजस्त्र,गोल नळकांडीत मला हातपाय बांधून,कोंडून, कोंबून, दाबून, मुसक्या आवळून बळेबळे सरकवले तर माझी काय अवस्था होईल? आणि शिवाय आमच्या लहानपणी बर्गर, पिझ्झा नव्हता. सकस आहार आणि घरचे दूध,तूप, दही, आईच्या हातचे गरमागरम अन्न चारी चौकाळ खाल्ल्यामुळे माझी शरीरयष्टी जरा हंssss आहे. ती त्या नळकांड्यात शिरत नाही,मावत नाही. त्यामुळे MRI म्हणजे मला "मार"किंवा "मर"टेस्ट वाटते. कधी कधी मला ती पुढच्या जन्मी करावी असंही वाटतं. रामदास स्वामी पेटीत लपून बसले आणि न गुदमरता त्यांनी "विश्वाची चिंता"ही कशी केली ते तेच जाणोत.

थोडक्यात मला "क्लोस्ट्रोफोबिया"आहे. त्या शब्दाचं स्पेलिंग लिहिण्याचं धैर्य माझ्यात नाही.

बहुतेक ते "Claustrophobia"असे असावे. खरं तर प्रत्येक शब्दाचं स्पेलिंग डिक्शनरी मध्ये "शोधलं की सापडतं". पण त्या प्रचंड पृष्ठ संख्या असलेल्या जुन्या काळातल्या छापील अवाढव्य डिक्शनरीत आपल्याला हवा तो शब्द शोधायचा म्हटलंच की माझ्या कपाळात दोन भुवयांच्या मध्ये सडकून दुखायला लागतं. फोनवर टाईप करताना स्पेलिंग बरोबर आहे का याबद्दल सूचना येण्यासाठी सुरुवातीची किमान काही अक्षरे तरी योग्य टाईप करावी लागतात.

तर.. एकूण मी MRI इत्यादी कुठल्याही प्रकारच्या टेस्टस् न करता फक्त फिजिओथेरपी घ्यायचं ठरवलं. ती बाई रोज माझ्या घरी यायला लागली. ती हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सूचना द्यायची. "हॅंड उपर. लेग प्रेस करो.कमर प्रेस करो,उपर उठाओ.लेग,हॅंड. राईट साईड, लेफ्ट साईड."इ.इ.

मी खरं तर मराठी भाषेची अभिमानी.

मराठी अस्मिता.इ.इ.वगैरे.वगैरे जपू इच्छिणारी. पण या महानगरीत जगताना माझ्या मराठीत इतर भाषांमधले अगणित, असंख्य शब्द स्थिरावले.तोंडवळणी पडले. त्यामुळे माझ्या थेरपिस्टच्या द्वैभाषिक सूचना मी पाळू लागले. तिची पर डे बरीचशी जास्त असणारी फीही मी दिली. बरेच पैसे खर्चून, अनुभव गाठीशी बांधल्यामुळे की काय आता माझी कंबर दुखत नाही.

वाङ्मयविनोदसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Feb 2026 - 12:56 pm | राजेंद्र मेहेंदळे

छानच विषय, आणि फिजिओ घेउन तुमची कंबरदुखी थांबली हे वाचुन फारच आनंद झाला. नशीब , तुमची फिजिओ ही कायरो प्रॅक्टीशनर नाही. तो एक भयानक अनुभव आहे.

कंबरदुखीसाठी आम्ही एका फिजिओ कम कायरो कम कम कम...अशा बाईकडे गेलो. तिकडे तिने वेगवेगळ्या प्रकारची व्यायाम तर करुन घेतलेच आणि बक्कळ फी सुद्धा घेतली पण "मी भारतातील २० का ३० का ४० कायरो पैकी एक आहे" असे म्हणुन "मान सैल सोडा/ हात सैल सोडा/पाय सैल सोडा ,जबडा सैल सोडा" असे म्हणत म्हणत ईतके अवयव पिळले आणि असे काही पिळले की मूळची कंबरदुखी बाजुला राहुन नवीन नवीन अवयव दुखायला लागले. ते सेशन घेउन आल्यावर जिम मध्ये १ तास व्यायाम केल्यावर जसा थकवा येतो तसेच वाटते आणि झोपण्याशिवाय दुसरे काही करण्याची ईच्छा होत नाही. या पेक्षा सक्तमजुरी परवडली.

आर्‍अ‍ॅच्।च्।आआ..
अरेच्चा. लॅपटॉपीवर ( उशीवर, गादीवर, चादरीवर प्रमाणे) टाईपताना 'क्याप्स्लॉक' का काय म्हणतात ते उघडे होते, त्यामुळे 'अरेच्चा' हे आर्‍अ‍ॅच्।च्।आआ' असे लिहिले गेले. आणि प्रतिसादाचे शीर्षक काय लिहीले होते ते मी 'वयोमाना'मुळे विसरलो, त्यामुळे ते तसेच राहु दिले. -- ते कसे ओळखायचे हे कुणी सांगू शकेल का ? (सध्या मिपावर हुशार हुशार आयायटीयनांचा वावर आहे, त्यापैकी कुणीतरी नक्कीच सांगू शकेल असे वाटते.)
असो. नमनालाच पाच उनित वीज घालवून आता पुढचे लिहीतो.
आजी, तुम्ही लई म्हणजे लईच खुसखुषीत लिहीता ब्वॉ. (खुसखुशीत' ऐवजी 'खुसखुषीत' जास्त मजेशीर वाटते)
तुमच्या त्या इंग्रजी स्पेलिंगांच्या गमती, एमाराय, "धडकने लगता हैं मेरा दिल तेरे नाम से,ऐसा लगता हैं कि अब हम गये कामसे" वगैरेंमुळे तर "कयामत से मेरी जां कम नही हो" असेच म्हणावे लागेल. मस्त. असेच लिहीत रहा.

प्रचेतस's picture

19 Feb 2026 - 9:23 am | प्रचेतस

एकदम मस्त, धमाल...!

काही वर्षांपूर्वी माझ्या आईची एक मैत्रीण ( तेंव्हा वय वर्षे ७५) माझ्या दवाखान्यात सुनेबरोबर आली होती. जाता जाता मला म्हणाली अरे डॉक्टर ( आईची मैत्रीण असल्याने मला अगदी लहानपणापासून ओळखते म्हणून अरे) आजकाल मधून मधून माझे गुढघे आणि कंबर दुखतात.

मी त्यांना म्हटलं मावशी तुम्ही घरात फिरून एक गोष्ट तपासून पहा - ७५ वर्षे जुनी कोणती वस्तू आजही चालू आहे का?

दोन मिनिटे विचार करून त्या म्हणाल्या अरे हो इतकं जुनं अगदी घड्याळ सुद्धा चालू नाही.

मग मी त्यांना म्हणालो मावशी, ७५ वर्षे काम करून तुमचं शरीर झिजलं आहे. तेंव्हा असं थोडं फार चालायचंच. ७५ व्य वर्षी तुम्ही उत्तम चालत्या फिरत्या आहात याचा आनंद मानायचा कि दुःख हे तुम्हीच ठरवा.

मंगेश पाडगावकर लिहून गेले आहेत.

जगायचं कसं ?

कण्हत कण्हत का गाणं म्हणत?

त्यावर त्या हसून म्हणाल्या-- बरोबर आहे तुझं!

गणेशा's picture

19 Feb 2026 - 6:49 pm | गणेशा

हलका फुलका लेख..

सौंदाळा's picture

19 Feb 2026 - 7:13 pm | सौंदाळा

माझी आई काही वर्षांपूर्वी अगदी याच टप्प्यांमधून गेली होती. पण नंतर फिजिओथेरपीने दुखण्याला उतार पडला. आता बसून खूप वेळ प्रवास केला तर अजून त्रास होतो.
त्यामुळे आईनेच लेख लिहिला असे वाटले.