आतापर्यंत उपक्रम,मायबोली,मिसळपाव,ऐसी अक्षरे, इत्यादी लेखनमंचावर 2007 पासून मी लिहितो आहे. मध्यंतरी "जानव्याची पॉवर" हा मिपावरील धागा अप्रकाशित झाला. जानव्याची पॉवर एवढी असेल असे मला खरोखर पुसटसे सुद्धा वाटले नव्हते. धागा अप्रकाशित करावा एवढे सामर्थ्य त्या लेखात नव्हते हे माझे मत आहे.
मिपासारख्या एखाद्या संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.
प्रतिक्रियांमधे आलेल्या अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात. या मधे धागा निश्चित भरकटतो. पण त्या भरकटण्यातून काही वाचकांना आनंदही मिळतो व काही त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहितीही मिळते. आता लेखकाला आपल्या लेखावर वाचकांच्या कुठल्या प्रतिक्रिया याव्यात किंवा येवू नयेत यावर नियंत्रण नसते.पण कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे व कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य निश्चित असते. छापील नियतकालिकांमधे संपादकाला लेख व प्रतिक्रिया छापायच्या कि नाही याचे स्वातंत्र्य असते. संकेतस्थळावरही प्रशासकाला/संपादकाला संकेतस्थळाच्या धोरणात कुठले साहित्य वा प्रतिक्रिया बसत नसतील तर ते अप्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवला असतो. फेसबुक सारख्या माध्यमात देखील काही अंशी फेसबुकचे नियंत्रण असते. पण माझी भिंत माझ्या गवर्या हा प्रकार तिथे दिसतो. मनोगत सारख्या काही संकेतस्थळावर धागाकर्त्याचे लेखन हे प्रशासका ने मंजूर केल्याशिवाय ते प्रकाशितच होत नाही. काही साहित्यिक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचे आकलन चर्चा प्रतिक्रिया समीक्षा सौंदर्य हे वाचकांवर सोपवून मुकत होतात. आता धागा भरकटला आहे का? त्यातील उपचर्चा, उपउपचर्चा या समांतर आहेत की अवांतर हे धागा लेखकाने ठरवायचे, वाचकांनी ठरवायचे कि संपादक/प्रशासकानी ठरवायचे हा ही चर्चेचा विषय होउ शकतो. एखा्दा अकॅडमिक लेख बिंदुगामी ठेवण्याच्या प्रयत्नात रिसर्च पेपर चा रुक्ष फील येतो. त्याची सामाजिक बाजू वा परिणाम हा समांतर पैलू त्या ठिकाणी समांतर न ठरता अवांतर ठरतो. संसदेतील वा टीव्हीवरील चर्चेतही वेळेच्या मर्यादांमुळे तसेच विस्तारभयामुळे सभापती वा ॲंकरला नियंत्रित कराव्या लागतात.
एक आठवण आली. मिपा चे संस्थापक तात्या अभ्यंकर जेव्हा प्रतिसादाच्या वरुन होणार्या वादावादी बाबत जेव्हा संकेतस्थळाचे चालक या नात्याने भूमिका घेत त्यावेळी त्यांनी "चपला" हा शब्द प्रचारात आणला. म्हणजे ज्यांना इथले खुले धोरण मान्य नाही, इथल्या प्रतिक्रिया वा लेखन पटत नाहीत त्यांनी चपला घालून बाहेर पडावे. त्यांना कसे ही करुन तुम्ही इथे लिहा असे आमंत्रण दिले नाही अशी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेक जण दुखावलेही होते.
लोकशाहीचा उद्गाता व्हॉल्टेअर चे सुप्रसिध्द वचन आहे, ज्यात व्हॉल्टेअर म्हणतो, "I May Not agree with a word what you say but I will defend untill my death your right to say so.'' 'याचाच अर्थ मी तुझ्या मताशी एका अक्षरानेही सहमत नाही, पण तुला तसे सांगण्याचा अधिकार आहे, हे मी माझ्या कंठात प्राण असेपर्यंत सांगत राहीन'. मात्र आज ही वैचारिक मतभिन्नता हरवत चालली आहे.एखादी विचारसरणी ही सर्वांसाठी व चिकित्सेसाठी खुली असावी. वैज्ञानिक दृष्टीकोन हा सर्वांसाठी खुला असतो. विचारसरणी ला बंदिस्त करणे हे त्या त्या विचारसरणी ला घातक असते. आपापली विचारसरणी व्यक्त करणे विचारांचे आदानप्रदान करणे हे विचारमंथन असते. आपले विचार इतरांना पटलेच पाहिजे असे नाही.
धागा भरकटण्याचा धोका
गाभा:
प्रतिक्रिया
8 Feb 2026 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१०००००००....... सहमत.
पण मराठी संकेतस्थळ ही खासगी असल्या कारणाने अशी संस्थळे कोणत्या विचारांची आणि त्यांचे वागणे कसे असावे, याबाबत वाचक आग्रह धरु शकत नाही असे वाटते.
-दिलीप बिरुटे
8 Feb 2026 - 1:18 pm | प्रचेतस
तुमच्या मते मिपा हे संस्थळ उजवे आहे काय?
8 Feb 2026 - 1:26 pm | युयुत्सु
याबाबत वाचक आग्रह धरु शकत नाही असे वाटते.
एकदम मान्य!
8 Feb 2026 - 10:46 am | प्रचेतस
लेख आवडला व पटला. खरं तर तो धागा अप्रकाशित करण्याचे काहीच कारण नव्हते मात्र संपादकांनी जानव्याची पॉवर ओळखुन दडपणाखाली तो धागा अप्रकाशित केला असावा असे वाटते.
8 Feb 2026 - 12:07 pm | कंजूस
काही जणांना तर चपला घालून बाहेर पडा हे सांगायचीही गरज लागत नाही. ते बाहेर पडलेलेच असतात. करमणूक संपली की कटणे उत्तम.
8 Feb 2026 - 5:12 pm | विवेकपटाईत
धागा भरकटलेला नसतो. मत देणारे आपले मत विभिन्न प्रकाराने व्यक्त करतात. जोपर्यंत अत्यंत ही दर्जाची भाषा वापरली जात नाही तोपर्यंत ठीक आहे. मिसळपाव ही व्यक्ती स्वातंत्र्याच्या हिशोबाने सर्वोत्तम आहे.
10 Feb 2026 - 12:00 pm | सुबोध खरे
यामुळे काही लोकानी दर एक दिवसाआड आपल्या गवऱ्या लोकांच्या तोंडावर मारायला सुरुवात केली आहे. कारण इतर लोकांना अक्कल नाहीच हे मूलभूत गृहीतक आहे.
म्हणून प्रशासकाने /संपादकाने प्रत्येक धागा अप्रकाशित करणे अशक्य आहे .
पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही कि आपण ओठाला लिपस्टिक आणि तोंडाला रंग फासून खिडकीत बसलो तर खालून जाणारे शुकशुक करणारच.
मग येथे स्कोअर सेटल करणे कंपूबाजी हे सर्व होते
असे झाल्यावर धागा भरकटणारच
11 Feb 2026 - 11:23 am | विजुभाऊ
ते ही ए आय सुगंधाचा वापर करून.