पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्याच्या आसपासच्या निसर्गरम्य परिसरात झालेला रस्त्यांचा बदल आणि सायकलिंगसाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती प्रकर्षाने जाणवली. डोंगररांगा, हिरवीगार दऱ्या, तलाव आणि वळणावळणाचे रस्ते यांच्या सान्निध्यात सायकल चालवण्याचा अनुभव खऱ्या अर्थाने वेगळाच असतो.
कधीकाळी पुण्याच्या आसपास सायकलिंग करताना मनात नेहमी एक विचार यायचा या सुंदर परिसरात जर दर्जेदार रस्ते आणि सायकलिंगसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या, तर पुणेकरांना किती अप्रतिम अनुभव घेता येईल! आज त्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर मला माझा सायकलिंगचा प्रवास आठवला. गेल्या काही वर्षांत पुण्याच्या आसपास आणि त्याही पुढे सायकलवर केलेले प्रवास, त्या प्रवासातून मिळालेले अनुभव, आव्हाने आणि आनंद हे सगळं शब्दांत मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे.
२०१६ पासून मी सायकलवर पुण्याच्या आसपासच्या रमणीय ठिकाणांचा अनुभव घेत आलो आहे. सुरुवातीला वडगाव–कामशेत अशी राईड MTB सायकलवर सुरू केली. त्याच काळात लोणावळ्याची शतकी राईड जणू प्रत्येक रविवारी ठरलेलीच असायची. या टप्प्यावर सायकलिंगसाठी आवश्यक स्नायूंची ताकद, हृदयाची मजबुती आणि फुफ्फुसांची ऑक्सिजन वाहण्याची क्षमता विकसित झाली. म्हणजेच माझा कार्डिओ-व्हॅस्क्युलर फिटनेस वाढत गेला, VO₂ क्षमतेत सुधारणा झाली.
वेगवान रोड बाईक
यानंतर मी रोड बाईक घेतली आणि स्पीड रायडिंगचा खरा अनुभव सुरू झाला. या प्रवासात अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या एरोबिक आणि अॅनअॅरोबिक झोन्समध्ये सायकलिंग, वेगात सायकल चालवण्याची क्षमता वाढवणे, क्लिप शूजचा वापर, योग्य कॅडन्स राखणे आणि ठरावीक वेळेत राईड पूर्ण करण्याची शिस्त. ३.५ तासांत १०० किलोमीटरची शतकी राईड पूर्ण करणे, स्ट्रावावर स्वतःचाच वेळ कमी करत “Beat Yesterday” ही स्वतःबरोबरची स्पर्धा, आणि काही सेगमेंट्सवर KOM मिळवण्याचा आनंद, हे सगळं या प्रवासाचा अविभाज्य भाग बनलं.
कामशेत–पवना, लवासा, महाबळेश्वर, तापोळा असे निसर्गाने नटलेले मार्ग आणि पुण्याच्या आसपासच्या विविध राईड्स दर आठवड्याच्या नियोजनात असायच्या. प्रत्येक आठवडा, प्रत्येक नवीन रस्ता, प्रत्येक नवीन अनुभव.
हळूहळू प्रवासाची कक्षा वाढत गेली. पुणे–पंढरपूर हा प्रवास मी ५–६ वेळा सायकलवर केला. अलिबाग आणि मुंबई गेटवे ऑफ इंडिया ही राईड दोन वेळा पूर्ण केली. वाटेत भेटणारी माणसं, मंदिरे, गावांचं शांत जीवन मनाला खूप समाधान देऊन जायचं. राईडच्या वेळी आम्ही जणू एका वेगळ्याच विश्वात असायचो.
सायकल मित्रांपासून प्रेरणा आणि नवीन छंद
या सायकलिंग प्रवासात अनेक चांगले मित्र जोडले गेले. इंडो अॅथलेटिक सोसायटी या आमच्या सायकल एनजीओ क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. अनेक लोकांची ओळख झाली, मैत्री जुळली, आणि सायकलिंग हा केवळ खेळ न राहता एक समुदाय बनला.
यानंतर सायकल मित्रांच्या संगतीने धावणे आणि पोहण्याची आवड निर्माण झाली. स्विमिंग पूलमध्ये फ्रीस्टाईल स्विमिंग शिकली, नंतर पवना नदी आणि कासारसाई धरणात लांब अंतर पोहण्याचा सराव केला. याच तयारीचा परिणाम म्हणून २०१९ साली कोल्हापूर येथे लोहपुरुष म्हणून ओळखली जाणारी आयर्नमॅन ७०.३ ही अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करता आली.
आंतरराज्यीय सायकल प्रवास
कोविड काळात सायकलिंगचे प्रमाण कमी झाले. चालण्याचा व्यायाम सुरू होता, पण नियमित सायकलिंग थांबलं. त्यामुळे या दोन–तीन वर्षांत वजन वाढलं. दर आठवड्याला सायकल चालवणं जमलं नाही, तरी आमच्या क्लबच्या लांब पल्ल्याच्या राईड्समध्ये सहभाग घेत राहिलो. त्यासाठी सरावाच्या राईड्स केल्या आणि पुणे–स्टॅच्यू ऑफ युनिटी, सोमनाथ, पुणे–उज्जैन–अयोध्या असे आव्हानात्मक प्रवास सायकलवर पूर्ण केले.
हे प्रवास केवळ अंतर पार करण्यासाठी नव्हते, तर स्वतःला ओळखण्यासाठी होते. आजवर ५०० हून अधिक राईड्स करत सुमारे २८,२०० किलोमीटर अंतर कापले आहे. आणि प्रत्येक राईडने काहीतरी नवीन शिकवलं आहे.
सायकलवर असताना आपण जणू एका वेगळ्याच विश्वात असतो. रस्त्याच्या कडेला दिसणारा निसर्ग, सकाळची थंड हवा, सूर्यास्ताचे रंग आणि शांततेत चालणारा प्रवास मनाला विलक्षण आनंद देतो. त्या क्षणी वेळ थांबलेला वाटतो आणि जीवन अगदी साधं, पण सुंदर भासतं.
या प्रवासात शरीराचाही कस लागतो. थकवा येतो, वेदना होतात, पण त्याचबरोबर फिटनेस वाढतो, सहनशक्ती मजबूत होते आणि मन अधिक कणखर बनतं. सायकलिंगने मला केवळ ठिकाणं दाखवली नाहीत, तर आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासही दिला.
सायकल ही माझ्यासाठी फक्त एक वाहन नाही, तर जगाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे.
माझ्या पहिल्या वर्षातील सायकलिंगचे काही क्षण या व्हिडिओमध्ये टिपले आहेत. जरूर पहा : https://youtu.be/VNpwEPH-a-s?si=CJkpewtsSybpWIIO
त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना मनापासून विनंती आहे की सायकलिंग किंवा रनिंग जो प्रकार तुम्हाला अधिक आवडतो त्याची सुरुवात नक्की करा. सातत्याने केलेला हा व्यायाम तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास देईल, शरीराची क्षमता वाढवेल आणि आरोग्य अधिक मजबूत करेल. विशेषतः उतारवयात सक्रिय, निरोगी आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी हा छंद नक्कीच उपयोगी ठरेल.
— अविनाश म. अनुसे