✪ कडक थंडीतलं आकाश दर्शन
✪ डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं!
✪ नितांत सुंदर परिसरात केलेलं ट्रेकिंग
✪ संध्याकाळची केशरी हिमशिखरं
✪ "शेर! देखो वहाँ खड़ा है!"
सत्गड़! ५ डिसेंबरला पहाटे साडेचारला उठलो. कडक थंडी आहे! अक्षरश: गच्चीमध्ये आकाश दर्शनासाठी बसता येत नाहीय. जणू पर्थच्या मैदानात जम बसवण्याइतकं अवघड आहे. पण आकाशच इतकं संमोहक आहे की हळु हळु थंडीचा मारा थंड पडला! चंद्राचं राज्य असलं तरी आता तो मावळतीला कललाय. चंद्राच्या थोडा अलीकडे गुरू चमकतोय. व्याध दक्षिणेला क्षितिजालगत दिसतोय. पूर्वेला खूप जास्त तारे दिसत आहेत. सप्तर्षी चांगलेच वर येत आहेत. सिंह रास- मघा नक्षत्र, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी दिसत आहेत. फोटोग्राफीसाठी मोबाईल सेट करून ठेवला. हात थड थड कापत आहेत. पण अहा! काय रम्य पहाट! हळु हळु पक्ष्यांचं कूजन सुरू झालं!
(हिमालयातले फोटो इथे बघता येतील. माझा लेख इथे ऑडिओ स्वरूपात ऐकता येईल.)
सत्गड़! १९०० मीटर उंचीवरचं गाव. इथे जानेवारीनंतर बर्फ पडतो. आत्ताही भयाण थंडी आहे. इतकी थंडी की, तोंड धुणं- चूळ भरणंही नकोसं वाटावं! उजाडल्यानंतर चहा घेतला. इथे चहा हा पिण्याहून खूप मोठा अनुभव आहे! आधी हात गरम करायचे. नंतर चेह-यावर वाफ घ्यायची! आणि मग हळु हळु चहा घ्यायचा. असा पहिला राउंड! दिवसभरात किमान दोन आकडी राउंडस नक्की होतात! नंतर सहज तपमान बघितलं तर दिसलं की, सकाळी आठ वाजताचं सत्गड़मधलं तपमान १ अंश सेल्सियस आहे! म्हणजे पहाटे अजून कमी असणार! व्वा! तासभर तरी आकाश दर्शन करता आल्याचा आनंद झाला.
थोडा दिवस वर आल्यावर आणि दुसरा चहा व नाश्ता झाल्यावर फिरायला बाहेर पडलो. इकडे कुठेही गेलो तरी रम्य परिसर! नव्याने झालेला जीपचा कच्चा रस्ता बघत बघत त्या दिशेने बाहेर पडलो. डोंगर उतारावरची शेती, छोटे घरं, दूरवर वर आलेला सूर्य आणि धुक्यात गुरफटलेली दरीतली गावं! अहा हा! आणि फुलं- झाडं तर खूप सुंदर. पुढे मोकळ्या जागेमधून दूरवरची दृश्य समोर आली आणि सकाळच्या केशरी ऊन्हात चमकणारे हिम शिखरही दिसले! व्वा! कच्च्या रस्त्याने खाली उतरून धारचुला हायवेला आलो. मनसोक्त पायपीट केली. मन भरणार नाही हे माहिती असूनही फोटो घेतले.
.
.
.
.
.
मुलीसोबत अजिंठा- वेरुळ- देवगिरी फिरलो होतो तेव्हा ती म्हणाली होती, अरे हा तर खारूताईंचा जिल्हा आहे! जिथे तिथे खारूताई! तिच्या हातावरसुद्धा खारूताई आली होती तेव्हा. तसा हा पिथौरागढ़ जिल्हा मला तिच्या लाडक्या ब्याऊंचा जिल्हा वाटतोय! तिच्या ऍलेक्ससारखेच ऍलेक्स सगळीकडे दिसत आहेत! तासभरात पाच किलोमीटर फिरलो आणि परत नातेवाईकांच्या घरी आलो. दिवसा समोरचा ध्वज मंदिराचा डोंगर, शेती, जंगल काय दिसतंय! कोवळं ऊन आणि चहा!
दिवसभरात गप्पा, चहा, आराम आणि निसर्गाला न्याहाळण्याचा क्रम सुरू राहिला. इथे दिवस तसा छोटा आहे. समोरच डोंगर आहेत, त्यामुळे सूर्य एक तास उशीरा प्रकट होतो आणि दुपारी तीननंतर परत डोंगराआड जातो! दुपारच्या वेळीच ती थंडी थोडी कमी वाटते. लोक दुपारी बाहेरची कामं करतात. गुरांचा संभाळ, जंगलाजवळून गवत डोक्यावरून आणणं, काही घराची कामं असं करतात. चार वर्षांपूर्वी इथे नेटवर्क खूप विरळ होतं. आता अगदी जोरात आहे. गावात घरांची कामंही सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी पिथौरागढ़मध्येही गूगल पे चालत नव्हतं. आता सत्गड़मध्येही चालतंय!
दुपारी ध्वज मंदिराला जायचं होतं. पण माझ्या भाच्याला जमलं नाही. म्हणून नंतर माझ्या साडू- भाऊंबरोबर सत्गड़च्याच वरच्या भागात थोडा ट्रेक केला. डोंगर चढून वर गेलं की एक मैदान आहे. हनुमानाचं मंदिर आहे. तिथे मोकळ्या जागेतून विलक्षण नजारा दिसला! पंचाचुली शिखरं, ॐ पर्वत आणि इतर शिखरं खूप छान दिसत आहेत. बायनॅक्युलरमधून अजून छान दिसली आणि फोटोही घेता आले. अंधार पडायच्या आत तिथून परत यायला निघालो. येताना एक थरारक प्रसंग झाला!
आम्ही वेगाने शेतांमधून खाली उतरत घराकडे येत होतो. साडू भाऊंचं घर सत्गडमधलं जवळ जवळ सगळ्यांत वरचंच घर. पुढे लगेच जंगल व डोंगर सुरू होतो. घरापासून जेमतेम ३०० मीटर अलीकडे असताना साडू भाऊ एकदम थांबले आणि मला हाताला धरून धावायला लागले. त्यांनी हळु आवाजात मला सांगितलं, "शेर! देखो वहाँ खड़ा है!" खाली शेतात आणि घराच्या अगदी वर १०० मीटर अंतरावर खराच एक काळपट पिवळा मोठा प्राणी दिसत होता. आणि तो स्थिर होता. आम्हांला बघूनही पळाला नाही. ते पुढे म्हणाले की, कोल्हा असता तर पळून गेला असता. पण हा स्थिर उभा आहे, म्हणजेच तो वाघ आहे! आणि इथे तसे वाघ व इतर प्राणी काही नवीन नाहीत! अंधार पडल्यामुळे फोटो घेता आला नाही किंवा बायनॅक्युलरनेही बघता आलं नाही. दोन मिनिटांत तो हललेला दिसला व नंतर झाडीत दिसेनासा झाला! आम्ही नंतर लांबच्या वाटेने खाली उतरलो. साडू भाऊंच्या नजरेतून जाणवत होतं की, तो कोल्हा नव्हता!
घरी पोहचलो, चहा घेतला आणि रात्रच झाली! अगदी साडेपाच वाजता पूर्ण अंधार आहे आणि तारे दिसत आहेत! थंडी सहन होईल तितका वेळ म्हणजे अर्धा- पाऊण तास दुर्बीण सेट करून आकाश दर्शन केलं. नंतर मग मोबाईल फोटोग्राफी सुरू केली. इथे रात्री साडे- सहा- सातपर्यंत नीजानीज होते! संध्याकाळी उद्याचा कार्यक्रम ठरवला. उद्या सकाळी लवकर मुन्स्यारीला जायला निघेन. खाली रोडवरूनच थेट जाणारी जीप मिळेल. सत्गड़- कनालीछीना- जौलजिबी- मदकोट अशा रस्त्याने जायला मिळेल. बारा वर्षांपूर्वी उत्तराखंड मदत कार्यामध्ये सहभाग घेतला होता तेव्हा ह्याच गावांमध्ये फिरलो होतो. उद्या परत तिथे जायला मिळणार! कडक थंडीमुळे घेतलेल्या रजाई- पांघरुणासोबतच्या उत्सुकतेसह निद्राधीन झालो.
पुढील भाग: कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 7 जानेवारी 2026.
प्रतिक्रिया
13 Jan 2026 - 6:10 am | निनाद
अगदी रमणीय आहे हे सतगढ!!
14 Jan 2026 - 5:32 pm | सौंदाळा
सुंदर वर्णन आणि फोटो
कुमाउ सासुरवाडी लाभली, भारीच