✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

म
मार्गी यांनी
Sat, 06/14/2025 - 21:32  ·  लेख
लेख
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो. आणि जेव्हा हा सुपर कंप्युटर मानवाला मदत करेनासा होतो, तेव्हा बिकट स्थिती होते. आपण ह्याचीच अनेक उदाहरणं खूप बघत आहोत. अशा घटना घडत आहेत. सगळ्या गोष्टी आपण यंत्रांकडून करून घेत आहोत. गूगल मॅपवर ठिकाण बघतो. पत्ता तर मिळतो, पण वाटेतल्या रस्त्याचं व परिसराचं आकलन होत नाही. मोबाईलवर माहिती शोधल्यामुळे माणसांसोबतचा संवाद खुंटतो. आणि "कुठेच न चुकता"‌ गेल्यामुळे हरवण्यातली मजाही जाते. आणि जी गोष्ट आपण यंत्रांकडून करायला लागतो, तिची आपली क्षमता गमवत जातो. आणि त्यातून हळु हळु आपल्या क्षमतेचाच र्‍हास होतो. दुचाकी सहज उपलब्ध झाली की, चालणं कमी होत जातं. इंटरनेटवर सतत लगेच उत्तर मिळालं की, शोधण्यातली मजा, जिद्द आणि शिकणं कमी होत जातं. आज सगळीकडे अति तंत्रज्ञान झालंय. आणि अति कशाचाच बरा नसतो. अगदी तंत्रज्ञानाचाही व कम्फर्टचाही. थोडे धक्के हवेत. थोडे पाय जमिनीवर हवेत. आणि सतत "आणखी पुढे, अधिक उत्तम" ही हावसुद्धा बरी नाही. परवाचा भयावह विमान अपघात! त्याचं विश्लेषण त्यातले जाणकार मंडळी करत आहेत. उच्च तंत्रज्ञानाची भिती वाटावी अशी स्थिती आहे. तंत्रज्ञान कितीही उच्च होवो, त्यासोबतचा माणूस तितका घट्ट पाळंमुळं रोवून उभा आहे का हा प्रश्न पडतो. शिवाय तंत्रज्ञानातली प्रतिस्पर्धा, त्यामधील सतत नवीन येणार्‍या प्रणाल्या. त्यातूनही अनपेक्षित गुंते होऊ शकतात. (हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल: आणि इथे वेगवेगळे विज्ञान प्रयोग व गमतीही वाचता येतील.) नुसतं उच्च तंत्रज्ञान मिळून चालत नाही. समज विकसित व्हावी लागते. आणि नवीन बदल किंवा सुधारणा ह्यांचं प्रतिबिंब माणसाच्या कामातही उमटावं लागतं. एम- एटीच्या ऐवजी अपाचे येते, पण चालवणारा पुढे समजदार होतो का, हा प्रश्न उरतो. तंत्रज्ञान आलं, पण बाकी सामाजिक व व्यक्तिगत समज पुढे गेली का हा प्रश्न राहतो. तितकी समजबुद्धी व परिपक्वता येते का, हा प्रश्न राहतो. सतत पुढे पुढे जाण्याच्या हव्यासामुळे आज खूप वेगवेगळे तणाव होत आहेत. शहरांची‌ अवस्था अतिशय नाजुक झाली आहे. कुठे कुठे अत्याधुनिक सुविधा, पॉश वसाहती, सुखसोयी. पण अर्धा तासाचा पाऊस सगळं विस्कळीत करतो. आणि आज तंत्रज्ञानाने आपल्याला कमालीचं ग्रासलेलं आहे. सगळं काही तंत्रज्ञानाने व इंटरनेटने होतंय. उद्या समजा ५ दिवस इंटरनेट ठप्प झालं तर काय होईल? पेट्रोल तर जाणारच आहे. त्यावर आपल्याला विचार करून ठेवावा लागेल. वेगवेगळ्या आपत्ती‌ येतच राहणार आहेत. सगळीकडेच येणार आहेत. सगळीकडच्या बातम्या बघता आपण अस्थिरतेकडेच जातोय असं म्हणावं लागेल. अनपेक्षित तेच होईल अशी अपेक्षा इथून पुढे करावी लागेल. आपल्याला सज्ज राहावं लागेल, पुढच्या पिढीलाही सज्ज करावं लागेल. अनेक प्रकारे- अनेक संदर्भात हे करावं लागेल. मुलींच्या संदर्भात तर काही धोका झाला तर तू काय करशील हे बोलावं लागेल. अशा स्थितीचे ड्रिल्स द्यावे लागतील. तू एकटीने जात आहेस आणि अचानक कोणी मध्ये आला, तर काय करशील? किंवा स्कूलबसला आग लागली, तर तुला काय काय करता येऊ शकतं? असे सिम्युलेशन्स करावे लागतील. आपल्याला पैसे देणारे स्रोत जर उपलब्ध राहिले नाहीत तर आपल्याकडे दुसरी कुठली कौशल्य आहेत ज्यांचा आपण उपयोग करू शकतो, हेसुद्धा बघून ठेवावं लागेल. आणि जर पूर्वकल्पना असेल- पूर्व तयारी असेल तर त्या स्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निश्चितच प्रत्येकात असते. पण त्यासाठी तयारी हवी. सज्जता हवी. आणि म्हणतात ना- the more you sweat in peace, the less you bleed in war! तशी आपली तयारी जितकी जास्त, तितकी आपल्याला कमी झळ बसेल. (वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 14 जून 2025) ब्लॉगवरचे गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती: त्रिकोणी आकाराचा जादुई परिणाम इंद्रधनुष्य बनवा! प्रकाशाचे अपवर्तन (refraction) पवनचक्की तयार करा! पॉवरफुल फुगा! भाताच्या शीताचा डिंक आवाजाचे परावर्तन (रिफ्लेक्शन)!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
1935 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

नाही . काहीही संकटे येतात.

कंजूस
Sun, 06/15/2025 - 10:22 नवीन
नाही . काहीही संकटे येतात. काय करावे सुचत नाही.
  • Log in or register to post comments

सदैव सैनिका तयार रहायचे.....

कर्नलतपस्वी
Sun, 06/15/2025 - 10:42 नवीन
रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

खूप

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 06/16/2025 - 11:53 नवीन
विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.
  • Log in or register to post comments

तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता

विवेकपटाईत
Mon, 06/16/2025 - 17:01 नवीन
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.
  • Log in or register to post comments

काही पटले काही नाही

चंद्रसूर्यकुमार
Mon, 06/16/2025 - 23:12 नवीन
काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.
  • Log in or register to post comments

पूर्वी डायलचे फोन असायचे

विजुभाऊ
Tue, 06/17/2025 - 10:00 नवीन
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते
  • Log in or register to post comments

आज सगळीकडे अति तंत्रज्ञान झालंय

कपिलमुनी
Wed, 06/18/2025 - 16:10 नवीन
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
गुरुवार, 06/19/2025 - 18:05 नवीन
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा