पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
4 Jan 2008 - 1:39 pm
गाभा: 

राम राम मंडळी,

येत्या २६/२७ जानेवारी (शनि-रवि) या दिवशी आम्ही पुण्यात पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन घ्यायचं ठरवलं आहे!

अहो असे दचकू नका! अलिकडे आमच्याच जातीतल्या काही मंडळींनी पुढाकार घेऊन पुण्यात पहिलं चित्तपावन संमेलन भरवलं होतं तेव्हा म्हटलं आपणही पुण्यात पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन भरवावं! :)

जाऊ द्या, 'पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन' हे शब्द जर अगदीच जड वाटत असतील तर आपण आपलं त्याला 'पहिलावहिला मिसळपाव कट्टा' असं म्हणू! अहो आपल्या मिसळपाव परिवाराचा जीव तो केवढासा? अवघ्या तीनशे-साडेतीनशे लोकांचं हे आपलं एक छोटेखानी संस्थळ आहे तेव्हा उगाच कशाला संमेलनासारखे मोठे शब्द वापरा?! :)

तर सांगायची गोष्ट अशी की आमचे एक स्नेही आणि मिसळपाववर मनापासून प्रेम करणारे, सध्या अमेरिकेत असणारे मिसळपावचेच एक सभासद गेले बरेच दिवस आमच्या मागे लागले आहेत की "तात्या, पुण्यात किंवा मुंबईत एखादा मिसळकट्टा भरव. मी सगळा खर्च स्पॉन्सर करायला तयार आहे!"

त्या व्यक्तिशी व्य नि द्वारा आणि फोन द्वारा विस्तृत चर्चा केल्यावर असे ठरले आहे की सदर मिसळपाव कट्टा दोन सत्रात भरवायचा आहे.

दि २६ जानेवारी रोजी संध्याकाळची एखादी ओल्या पार्टीची मैफल नंतर यथास्थित कुणाला काय हवं असेल त्याप्रमाणे शाकाहारी/मांसाहारी जेवण, गाणी/गप्पा वगैरे वगैरे.

आणि दुसरे सत्र दि रवि. २७ जानेवारी रोजी सकाळी भरवायचे ठरवले आहे. त्य दिवशी सकाळी न्याहरीला अर्थातच मिसळपाव असेल आणि दुपारी अर्थातच गोडाधोडाचं शुद्ध शाकाहारी जेवण आणि गाणी, गप्पा, गोष्टी, कथा, कविता आणि सर्वजण बोअर झाले की एकमेकांचा निरोप! :)

ज्यांना आदल्या दिवशीच्या ओल्या पार्टीत सहभागी व्हायचं नसेल त्यांनी कृपया दुसर्‍या सत्राला यावे, ही नम्र विनंती!

तर मंडळी, हे सगळं ठीक आहे, परंतु आमची अडचण अशी आहे की पुण्यात कुणीतरी पुढाकार घेऊन हे सगळं ठरवायला, सिंहगड रस्त्यावर एखादा भाड्याचा बंगला बुक करायला, जेवणाखाण्याचं ठरवायला आम्हाला कुणीतरी पुण्यातल्याच सभासदाने मदत केली पाहिजे! आणि तसा मदतीचा हात मागण्याकरताच आम्ही हा चर्चाप्रस्ताव आपल्या सर्वांपुढे ठेवत आहोत.

करेल का कुणी आम्हाला पुण्यात पहिलावहिला मिसळपाव कट्टा भरवण्याकरता मदत?

पैशांची काळजी नको. आम्ही इथे दूर मुंबईत असल्यामुळे कुणा लोकल पुणेकराचेच साहाय्य आम्हाला लागेल! बघा मंडळी, पुणेकरांच्या इज्जतीचा सवाल आहे कारण पहिलं जागतिक मिसळपाव संमेलन भरवण्याचा मान पुण्यालाच मिळतो आहे! :))

सबब, या विषयावर येथे साधकबाधक चर्चा व्हावी तसेच इच्छुकांनी इथे किंवा आम्हाला पोष्टकार्ड पाठवून आमच्याशी संपर्क साधावा या दृष्टीने हे चर्चासदर लिहीत आहे! पहिला मिसळपाव कट्टा यशस्वी होणं आपल्याच हाती आहे!

आमचे स्नेही प्रभाकर पेठकर, चित्तोबा सध्या कामात व्यग्र असल्यामुळे तूर्तास तरी ते आम्हाला मदत करू शकत नाहीत. (दोन्ही वेळच्या कट्ट्याला मात्र येणार आहेत लेकाचे! :)

सर्वसाक्षींशी आमचे बोलणे झाले आहे परंतु तेही मुंबईकर असल्यामुळे जास्त धावपळ करू शकत नाहीत!

अजून एक महत्वाचे -

दोन्ही सत्रांचा सर्व खर्च जरी प्रायोजित असला तरी खारीचा वाटा म्हणून एक नाममात्र नगण्य रक्कम मात्र प्रतिमाणशी घ्यावी, असं आम्हाला वाटतं आणि उरलेला सिंहाचा वाटा प्रायोजकाकडून घ्यावा असंही आम्हाला वाटतं! च्यामारी, आदल्या दिवशीचा आणि दुसर्‍या दिवशीचा असे दोन्ही खर्च त्या भल्या माणसाच्या एकट्याच्या अंगावर पडता कामा नाहीत असंही आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं!

ते सद्गृहस्थ आणि त्यांची पत्नी मिसळपाववर प्रेम करतात याचा अर्थ त्यांना फारच खर्चात पाडायचं असं आम्हाला वाटत नाही! आपलं मत काय?

बाय द वे, या अमेरिकास्थित मिसळप्रेमीने काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे नांव जाहीर करण्यास सक्त मनाई केली आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे नांव कोणत्याही परिस्थितीत जाहीर करू शकत नाही. त्या सभासदाच्या कुणा प्रिय व्यक्तिच्या स्मृतींखातर त्यांनी उदारहस्ते कट्टा स्पॉन्सर करायचे ठरवले आहे याचा आम्ही मनापासून आदर करतो...

असो,

२६/२७ जानेवारी (शनिवार/रविवार) सर्वांनी मोकळी ठेवावी आणि पुण्यातील पहिला मिसळकट्टा यशस्वी करावा हीच विनंती!

आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.

ता क -

१) पहिल्या मिसळपाव कट्ट्याचा संपूर्ण खर्च स्पॉन्सर होतो आहे हा आम्ही मिसळपावचा सन्मान समजतो!

२) कट्ट्यासंदर्भात वरील सर्व गोष्टी ठरवण्यासाठी (व्हॉलेंटियरगिरी) आम्हाला मदत करू इच्छिणार्‍या व्यक्तिने इथे जाहीरपणे इच्छा व्यक्त करावी किंवा आम्हाला आवर्जून पोष्टकार्ड पाठवावे, ही विनंती! आम्हा वाट पाहात आहोत.

३) सर्वांच्या सूचनांचे/कल्पनांचे स्वागत! त्यातील इष्ट आणि व्यवहार्य सूचना निश्चितच स्विकारल्या जातील...

प्रतिक्रिया

नंदन's picture

4 Jan 2008 - 1:46 pm | नंदन

मिसळपावाच्या पहिल्या कट्ट्याला/संमेलनाला हार्दिक शुभेच्छा. येणे शक्य नसल्याने रुखरुख वाटते आहे, पण जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच सहभागी व्हायला आवडेल.

अवांतर - २६ जानेवारी हा शुष्क/कोरडा दिवस (ड्राय डे) असेल ना? आधीपासूनच बंदोबस्त करावा लागेल :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर's picture

4 Jan 2008 - 1:54 pm | विसोबा खेचर

नंदन महाराज, आपली शंका रास्त आहे परंतु काळजी नसावी! :)

आमचे एक अमेरिकास्थित स्नेही दि २० जानेवारी दरम्यान मुंबईत येत आहेत. कुणाला कोणता ब्रँड हवा त्याची आगाऊ चौकशी करून आम्ही त्या व्यक्तिस ड्युटीफ्री मधून सदर माल आणावयास सांगू! ड्युटीफ्री असल्यामुळे माल अंमळ स्वस्तही मिळेल आणि प्रायोजकांचे काही पैसेही वाचण्यास मदत होईल!

आणि म्हणूनच त्याकरता एखाद्या भाड्याच्या बंगल्याच्या शोधात आम्ही आहोत. कारण कोरडा दिवस असल्यास हॉटेलात पंचाईत होईल, शिवाय हॉटेलातला माल अंमळ महाग असल्यामुळे प्रायोजकांवर उगीचंच जास्त खर्च पडेल!

असो..

आपला,
(ड्राय डे चा आगाऊ बंदोबस्त करणारा!) महात्मा तात्या.

छोटा डॉन's picture

4 Jan 2008 - 1:57 pm | छोटा डॉन

एकदम रापचिक कल्पना आहे .......
आमच्यासुध्धा मिसळपावाच्या पहिल्या कट्ट्याला/संमेलनाला हार्दिक शुभेच्छा.
दिवाळीला १२ गावचे पाणी [ आणि बाकी बरेच काही ] पित हिंडल्यामुळे आता सवड मिळणे अशक्य झाल्याने संमेलनाला येणे अशक्य आहे. पण काही जुगाड जमवून यायचा प्रयत्न करूच....

ताक.:-"२६ जानेवारी हा शुष्क/कोरडा दिवस (ड्राय डे) असेल ना? आधीपासूनच बंदोबस्त करावा लागेल :)"

काळजी नसावी. "पुणे तेथे काय उणे?"
काही पत्ते आत्ताच देतो, जेथे पाहिजे तेव्हा व्यवस्था होते, जसे सुदामा - शिवाजीनगर, प्यासा- पत्ता सांगण्याची गरज नाही ...

धोंडोपंत's picture

4 Jan 2008 - 1:57 pm | धोंडोपंत

मिसळपावकट्टयाला आमच्या हार्दिक शुबेच्छा. आम्ही येऊ शकत नाही याचा खेद वाटतो. कारणे सरपंचाना ज्ञात आहेतच.

कट्ट्याचा वृत्तांत आणि छायाचित्रे मिसळ्पाववर उपलब्ध होतील एवढे पहावे.

आपला,
(प्रेक्षक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

इनोबा म्हणे's picture

4 Jan 2008 - 2:28 pm | इनोबा म्हणे

तात्या,
कल्पना(लाजमी नव्हे,चावला ही नव्हे)चांगली आहे आणी आम्ही स्वतः पुणेकर असल्यामुळे आम्हाला हा आमचा सम्मान वाततो.या कट्ट्याचे यजमानपद आम्हाला दिल्याबद्दल आम्ही तात्यांचे शतशः आभारी आहोत,पण सिंहगड पायथा वगैरे जी काही ठिकाणे 'ओल्या' पार्टीकरीता सुचवली गेली आहेत्,ते 'खतरोसे खाली नही',खास करून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी.या ठिकाणी आजकाल बर्‍याच 'धाडी' पडायला लागल्या आहेत्.तरी ठिकाण आपण सुचवावे किंवा आम्ही मुळशीच्या कोणत्याही शेतात 'मोफत सोय' करण्यास तयार आहोत.बंगला मिळाल्यास पाहतो.बाकी आणखी काहि काम असल्यास व्य.नि. ने माझा भ्रमण ध्वनी क्र. पाठवतो.

शरुबाबा's picture

4 Jan 2008 - 2:47 pm | शरुबाबा

मिसळपावाच्या पहिल्या कट्ट्याला/संमेलनाला हार्दिक शुभेच्छा. येणे शक्य नसल्याने रुखरुख वाटते आहे, पण जेव्हा जमेल तेव्हा नक्कीच सहभागी व्हायला आवडेल.

आपला,

बेसनलाडू's picture

5 Jan 2008 - 12:43 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

7 Jan 2008 - 1:13 pm | स्वाती दिनेश

हेच..
कट्ट्याला खूप खूप शुभेच्छा!
स्वाती

केशवसुमार's picture

4 Jan 2008 - 3:19 pm | केशवसुमार

आमच्या अनुपस्थीतीत पुण्यात कट्टा.. ये बहोत ना इन्साफी है!!
च्या मारी ह्या कंपनीच्या.. साला २६ जनेवारीला परत जायच होते पण परतीची वेळ ३ आठवड्यांनी पुढे गेली.. नाही तर डायरेक्ट कट्ट्यावर उतरलो असतो..
असो.. अमच्या नवाने दोन थेंब हवेत उडवा म्हणजे झाले..
मिसळपावाच्या पहिल्या कट्ट्याला/संमेलनाला हार्दिक शुभेच्छा..
मार्च मधे पुन्हा भरवू कट्टा त्यात काय..मिसळपाव,घासपूसच जेवण आणि प्राण्यांची प्रेतं आम्ही प्रायोजित करू..कसे...(घसे आपापले ओले करा)
केशवसुमार.

विसोबा खेचर's picture

5 Jan 2008 - 10:44 am | विसोबा खेचर

मार्च मधे पुन्हा भरवू कट्टा त्यात काय..मिसळपाव,घासपूसच जेवण आणि प्राण्यांची प्रेतं आम्ही प्रायोजित करू..कसे...(घसे आपापले ओले करा)

चला बरं झालं! अजून एक स्पॉन्सरर मिळाला!

सुमारा, तू जेवणाचं तेवढं बघ. लिंबू सरबताचा खर्च लोकं आपापला करतील! :)

आपला,
(केशवाचा आडनावबंधु) तात्या.

अवलिया's picture

4 Jan 2008 - 5:58 pm | अवलिया

तात्यानु

परजासट्टाक दिन लय झोकात हुन जावु द्या अन काय ....
ते पुण्याला यायच काय घाटत नाय पघा...पुढल्या टायमाला जरा निवांत असलो तर यीन म्हंतो...

जोरात होवु द्या

नाना

सखाराम बाइंडर's picture

4 Jan 2008 - 6:05 pm | सखाराम बाइंडर

प्रायोजक कोण ? भांडारकर दांपत्य का?
आजच खंडणी साठी चिल्लरला पिटाळतो....

खरा डॉन (बाकीचे क्लॉन)

अरविन्दनरहरजोशी's picture

4 Jan 2008 - 6:49 pm | अरविन्दनरहरजोशी

अरविन्द
चान्गली क्ल्पना आहे. वेळ आणि जागा कळविणे. इश्ट मित्रासह यावे काय?

इनोबा म्हणे's picture

4 Jan 2008 - 7:05 pm | इनोबा म्हणे

च्यामारी,ओली पार्टी म्हणलं की समदे उड्या टाकीत येतात,पण जबाबदारी घ्याला कोण तयार नाय.आधी जागेचं काय करायचं ते तरी बघा.

तात्या,काय ते डिसीजन घ्या लवकर.आणी शिमग्याला मिसळीचा अंक काढावा म्हणतो.त्यासंबंधी तुमचं मत इथं द्या.

विसोबा खेचर's picture

5 Jan 2008 - 10:47 am | विसोबा खेचर

अरविन्दा,

इश्ट मित्रासह यावे काय?

एखादा() इष्ट मित्र चालेल! :)

आपला,
(मोजूनमापून कोकणस्थ!) तात्या.

मुक्तसुनीत's picture

4 Jan 2008 - 8:07 pm | मुक्तसुनीत

पार्टीला येऊ न शकण्याबद्दल खंत वाटते. यथासांग वृत्तांत कळण्याची व्यवस्था होईलच, याची खात्री वाटते !

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Jan 2008 - 8:12 pm | बिपिन कार्यकर्ते

कल्पना छान आहे... आमच्या शुभेच्छा.

बिपिन.

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Jan 2008 - 9:28 pm | ब्रिटिश टिंग्या

पहिल्यावहिल्या जागतिक मिसळपाव संमेलनाचा मान पुण्यनगरीला दिल्याबद्दल आभार आणि संमेलनासाठी शुभेच्छा!!!!!
आम्ही स्वत: जातीने हजर राहू शकणार नसल्याने माफी असावी. परंतु कोणतीही मदत लागल्यास कृपया नि:संकोच संपर्क साधावा.

संमेलनासाठी थोड्या फार सुचना :
१. आपण 'ओल्या' संमेलनासाठी सुचवलेली जागा नांगरे पाटलांच्या अधिपत्याखाली येत असल्यामुळे जरा जपून र्‍हावा. शक्यतो 'शिंवगड' पायथा या साठी टाळावा.
इनायकभौंनी सुचिवल्यापरमान मुळशीच्या कोंच्याबी रानात 'फुक्काट सोय' व्हत असली तर लयी ब्येस........
२. बाकी सहभागी होणार्‍या सदस्यांना विनंती की कृपया संमेलन हे आपले "घरचेच कार्य" असल्यामुळे आपल्याकडून मदतीची अपेक्षा आहे.
२. तसेच समस्त डॉन मंडळींना (छोटा, मोठा, खरा, खोटा जे कोण असतील ते) आम्ही आवाहन करीत आहो की आपण आपापले हप्ते/खंडणी संमेलनाच्या खर्चासाठी अर्पण करून थोडे (तरी) पुण्य कमवावे. ;)

असो, आपल्या सर्वांचा हातभार असल्यामुळे संमेलन यशस्वी होईल यात शंकाच नाही.

आपला,

(संमेलनास येवू न शकणारा) छोटा टिंगी :(

इनोबा म्हणे's picture

4 Jan 2008 - 9:41 pm | इनोबा म्हणे

टिंग्या,
बराब्बर बोललास लेका,आपण समद्यानी ह्या कामासाठी पैका उबाराय पाह्यजे.
नांगरे पाटलाच्या इलाख्यात जायाचं म्हनजी आगीत पाय घालण्यासारखं हाय. ह्या जागी संमेलन भरावलं तर निरोप समारंभ चौकीत कराय लागंल आणी रातभर ढूंगणावर बांबू बसतील ते येगळे.नको भौ,जागा चेंज करा.

(चिंतातूर) -इनोबा

ध्रुव's picture

7 Jan 2008 - 11:56 am | ध्रुव

मिपा संमेलन झकास व्हावे ही शुभेच्छा.
सिंहगड ही जागा २६ जानेवारीला ओल्या पार्टीला योग्य नाही असे मलाही वाटते. नांगरे पाटील यांना इथल्या स्थानीक लोकांची भरपुर मदत होते.
काळजी घ्या. जमल्यास जागा बदला.

--
ध्रुव

दूर असल्यामुळे येता येणार नाही याचे दु:ख होतय!

असो, संमेलन रंगतदार होवो ही शुभेच्छा!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2008 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

२६ जानेवारीला जमणे शक्यच नाही. त्यामुळे मिसळकट्ट्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा !!!
ओली पार्टी आणि मिसळप्रेमी जमणार म्हणजे नुसती धूम असणार, आणि च्यायला आम्ही नाही.
फीर भी देखेंगे. वादा नाही पण, कोशीश जरुर करेंगे.
क्योकी वादे अक्सर तुट जाते है !!! कोशिशे कामीयाब होती है !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

5 Jan 2008 - 3:30 am | प्राजु

सर्व चर्चांवरून आम्हा मिसळपाव वरील भगिनिंना आपण विचारात घेतलेच नाही असे दिसते....(ओल्या पार्टीच्याच चर्च्या जास्ती होताना दिसताहेत म्हणून विचारलं)
असो...
संमेलनाला शुभेच्छा!
- प्राजु.

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Jan 2008 - 5:44 am | ब्रिटिश टिंग्या

आपले विचार/ मते स्वागतार्ह आहेतच. परंतु त्याकरिता भगिनी मंडळाचा चर्चेत हिरीरीने सहभाग हवा. कसे?
-छोटी टिंगी.

इनोबा म्हणे's picture

5 Jan 2008 - 10:32 am | इनोबा म्हणे

प्राजूताई,
आपणांस विचारात घेतले नाही याबद्दल खेद आहे,आपण हवं तर संमेलनाला हजर राहून ओल्या पार्टिचा सुका मेवा(चकणा) चावू शकता,किंवा आपणास अल्कोहोलच्या द्रव्याचा त्रास होत नसल्यास आपण आमच्या बैठकीत बसून घसा ओला करु शकता.
हे ही जमत नसेल तर दूसर्‍या दिवशी उपस्थीत राहून प्रितीभोजनाचा आनंद लुटू शकता.आपणांस हवा तो पर्याय निवडून तत्काळ कळवणे.मागाहून तक्रार चालणार नाही.

हूकूमावरून
व्यवस्थापक(काळजीवाहू)
जा.मिसळपाव संमेलन

विसोबा खेचर's picture

5 Jan 2008 - 10:44 am | विसोबा खेचर

सर्व चर्चांवरून आम्हा मिसळपाव वरील भगिनिंना आपण विचारात घेतलेच नाही असे दिसते....(ओल्या पार्टीच्याच चर्च्या जास्ती होताना दिसताहेत म्हणून विचारलं)

अगं प्राजू, मुळात आपल्या मिपावर भगिनींची संख्या फरच कमी आहे. तू एक येऊन जाऊन असतेस, तुझं कौतुक वाटतं! बाकी आमची दुसरी एक भगिनी होती ती हल्ली इतर संस्थळांवर लिहिताना, प्रतिसाद देतान दिसते परंतु इथे मात्र मुद्दामून येत नाही, काहीही लिहीत नाही. असो.. प्रत्येकाची मर्जी!

असो! येणार्‍या-जाणर्‍या सर्वांचंच मिपावर स्वागत आहे....!

बाय द वे, ओल्या पार्टीला हजर राहायचे नसल्यास दुसर्‍या दिवशीच्या संमेलनाला ये! मी वाट पाहीन.. :)

तात्या.

पहिल्या जागतिक मिसळपाव संमेलनास शुभेच्छा!
संमेलनास उपस्थित रहाता येणार नाही, याची खंत वाटते.

संजय अभ्यंकर

प्राजु's picture

5 Jan 2008 - 11:14 am | प्राजु

पुणे आणि मँचेस्टर हे अंतर जरा वाईच्च लांब वाटते त्यामुळे उपस्थित नाही राहू शकणार. पण तात्या ठाण्यात येईन तेव्हा तुम्हाला मात्र चांगलाच भुर्दंड बसेल... तयारी ठेवा.

प्राजु.

विसोबा खेचर's picture

5 Jan 2008 - 6:16 pm | विसोबा खेचर

पण तात्या ठाण्यात येईन तेव्हा तुम्हाला मात्र चांगलाच भुर्दंड बसेल... तयारी ठेवा.

अगदी अवश्य ये, तयारी ठेवली आहे. आपण समर्थ भोजनालयात जेवायला जाऊ तिथे शंभर रुपयांपर्यंत खर्च येईल तो मी करीन आणि निरोप घेतेवेळी तुला वीस रुपयापर्यंत एखादा पुष्पगुच्छ भेट देईन! :)

काय? ठेवल्ये की नाही भरपूर तयारी?! :)

आपला,
(प्राजूचा एक गरीब भारतीय मित्र) तात्या.

मनीष पाठक's picture

5 Jan 2008 - 11:40 am | मनीष पाठक

संमेलनाची कल्पना छानच आहे. माझ्याही मिसळपाव कट्ट्याला / संमेलनास हार्दीक शुभेच्छा.

पुण्यनगरी या माझ्या आवडत्या ठिकाणी असुनही कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहता येणार नाही म्हणुन खंत वाटते :-)

मनीष पाठक

झकासराव's picture

5 Jan 2008 - 6:47 pm | झकासराव

हे बेस केलत सम्मेलनाचा मान पुण्याला दिलात ते. :)
पण हे दोन दिवस कस जमणार???
मला तर फक्त शनिवारीच सुट्टी आहे (२६) ला. :(
असो.
बघु. तसच त्यावेळी कोल्हापुरात जावुन जिलबी खायचा प्लॅन आधीच झालाय. जर तो प्लॅन कॅन्सल झाला तर मग मी येइन सगळ्यांची भेट घ्यायला. :)
बर ते विश्वास नांगरे पाटलाना घाबरण्यार्‍या लोकाना एक सांगतो.
त्यानी टाकलेली रेव पार्टीची धाड होती त्याला कारण एकच होत ते म्हणजे परवानगी नसलेल्या मादक द्रव्यांचा वापर.
इथे लोक्स असल काही करणार नाहीत. ओली पार्टी म्हणजे फक्त जे पितात त्यांच्या घशाखाली दारु आणि जे पिणार नाही त्याना कोल्ड्रिंक. अस असणार. उगा संशय मनी घेवु नये आणि फुका दुसर्‍याच्या मनी निर्माण करु नये. :)
बर ते सम्मेनल हा शब्द जरा अळणी वाटतो हो तात्यानु जरा फर्मास शब्द बघा की.
कट्टा पण तेवढा छान नाहिये. एखादा रसरशीत शब्द बघा राव.
मदतीच म्हणाल तर मीच सिन्हगडापासोन फार लाम्ब राहतो निगडीत.
तरिही काहि मदत लागली तर जीमेल करा. मी तयार आहे. :)

इनोबा म्हणे's picture

5 Jan 2008 - 8:39 pm | इनोबा म्हणे

त्यानी टाकलेली रेव पार्टीची धाड होती त्याला कारण एकच होत ते म्हणजे परवानगी नसलेल्या मादक द्रव्यांचा वापर.
झकासराव ,२६ जानेवारीला 'ड्राय डे' असतो,आणि त्या दिवशी दारु पिणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. नांगरे पाटलांना कमी समजू नका.आख्ख्या पुणे जिल्ह्यात हा एकमेव प्रामाणिक पोलिस अधिकारी असावा.सापडलो तर सुटका नाही.घाबरणे आणि सावधानी बाळगणे यात फरक असतो.

इथे लोक्स असल काही करणार नाहीत. ओली पार्टी म्हणजे फक्त जे पितात त्यांच्या घशाखाली दारु आणि जे पिणार नाही त्याना कोल्ड्रिंक. अस असणार. उगा संशय मनी घेवु नये आणि फुका दुसर्‍याच्या मनी निर्माण करु नये. :)
मला वाटते तुम्ही स्वतःच दुसर्‍यांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहात.

सुनील's picture

8 Jan 2008 - 1:44 am | सुनील

२६ जानेवारीला 'ड्राय डे' असतो,आणि त्या दिवशी दारु पिणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो.

मला वाटतं, खाजगी, बंदिस्त जागी (उदा. घरी) पिणे (ड्राय डेच्या दिवशीदेखील) हा गुन्हा नसावा. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा नेहेमीच गुन्हा आहे, केवळ ड्राय डेच्या दिवशीच नव्हे.

चु भु द्या घ्या.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे's picture

8 Jan 2008 - 2:16 am | इनोबा म्हणे

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे हा नेहेमीच गुन्हा आहे, केवळ ड्राय डेच्या दिवशीच नव्हे.
सुन्या अरे तुझं म्हणणं बरोबर आहे...पण सिंहगड पायथा किंवा सिंहगड रोड हा अशा पार्ट्या करण्यासाठी सुरक्षीत नाही रे!!! इतर ठिकाणी काही 'प्रॉब' नाही.

मला वाटतं, खाजगी, बंदिस्त जागी (उदा. घरी) पिणे (ड्राय डेच्या दिवशीदेखील) हा गुन्हा नसावा.
सिंहगड जवळच्या सगळ्या बंगल्यांवर पोलिसांची नजर असते...

(सावध बेवडा) -इनोबा

देवदत्त's picture

5 Jan 2008 - 8:48 pm | देवदत्त

मला तर फक्त शनिवारीच सुट्टी आहे (२६) ला. :(
का हो? रविवारी का नाही सुट्टी?
(माफ करा. तुमचे कामाचे क्षेत्र माहित नाही म्हणून विचारतो.)

अन्या दातार's picture

23 Jan 2008 - 4:44 pm | अन्या दातार

झकासराव, कोल्हापुरला येऊन्च्यान कुटं बरं जिलेबी खायाला येता? मलाबी एकाद्-दुसरं ठिकाण माहित होऊंदे म्हन्तो म्या.
आपला,
(कोल्हापुरी) अनिरुद्ध दातार

झकासराव's picture

24 Jan 2008 - 8:05 am | झकासराव

आपल्याकडे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट्ला जिलेबीचे स्टॉल सगळीकडे असतात रे.
ते वातावरण इकडे पुण्यात नाही. म्हणुन तस लिहिल होत.
मी फक्त जिलेबी खाण्यासाठी येत नाही रे तिकडे माझ घर आहे. आणि आता माझा पोट्ट्या तिकडेच आहे. त्याला भेटायला म्हणुन जाव लागत रे
राहवत नाही. (३ महिन्याचा असला म्हनून काय झाल. लळा लागतोच हो :))
बर तरिही तुला जिलेबीची माहिती सांगतो (ऐकीव आहे)
अस म्हणतात की शिवाजी पुतळ्यापासुन महानगरपालिकेकडे जाताना पहीलाच चौक आहे त्या चौकात छान जिलेबी मिळते.
बघ जावुन.

देवदत्त's picture

5 Jan 2008 - 8:49 pm | देवदत्त

२६ तर जमणार नाही. २७ ला प्रयत्न करीन.

असो. आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा.

प्राजु's picture

8 Jan 2008 - 2:02 am | प्राजु

सगळ्या सम्मेलनाला उपस्थित राहणा-या मिपा करांना एक विनंती.
संम्मेलानात तात्याना, गायला सांगा नक्की. आणि त्याची चित्रफित इथे अप्लोड करा. आणि हो, माझ्यातर्फेहि विनंती करा.
प्रतिक्षेत आहे त्या चितफितिच्या.
- प्राजु.

शरुबाबा's picture

21 Jan 2008 - 5:56 pm | शरुबाबा

सगळ्या सम्मेलनाला उपस्थित राहणा-या मिपा करांना एक विनंती.
संम्मेलनाचि चित्रफित इथे अप्लोड करा. प्रतिक्षेत आहे त्या चितफितिच्या.
शरुबाबा

धनंजय's picture

21 Jan 2008 - 7:53 pm | धनंजय

मस्त मिसळ चापा!

चतुरंग's picture

21 Jan 2008 - 8:04 pm | चतुरंग

ह्या वर्षी भारत यात्रा नसल्यामुळे येऊ शकत नाही त्याची रुखरुख लागून राहिली आहे.
तुम्हा सर्वांना शुभेच्छा. भरपूर प्रकाशचित्रे आणि संमेलनाची ध्वनिचित्रफीत येथे बघता येईल असे करा.

अवांतर -:) नांगरे पाटलांशी गाठ पडलीच तर त्यांनाही मि.पा.खिलवा आणि मि.पा.चेसदस्यही बनवा, तेही खूप छान लिहितात!:))

चतुरंग

शरुबाबा's picture

22 Jan 2008 - 6:03 pm | शरुबाबा

ओली पार्टी आणि मिसळप्रेमी जमणार म्हणजे नुसती धूम असणार

अजुन केवल पाच दिवस बाकि आहेत , पन karyakarmachi काहिच चच्रा नाहि
शरुबाबा

वरदा's picture

23 Jan 2008 - 10:38 pm | वरदा

प्राजुची आयडीया आवड्ली...तात्या मीही ध्वनीफितीच्या प्रतिक्षेत्......सग़ळे मज्जा करा...

विसोबा खेचर's picture

24 Jan 2008 - 12:16 am | विसोबा खेचर

२५ ला संकष्टी आणि २६ तारखेला ड्रायडे असल्यामुळे कार्यक्रम थोडासा पुढे ढकलला आहे. पुढची सूचना लवकरच!

तात्या.

झकासराव's picture

24 Jan 2008 - 8:06 am | झकासराव

पाहतोय पुढच्या सुचनेची :)

केशवसुमार's picture

24 Jan 2008 - 5:13 pm | केशवसुमार

कोणी न्हाट लावली रे.. त्याच्या *** पहिले संमेलन आणि तेच पुढे ढकलले...
(आम्हाला सोडून संमेलन करता काय ;) ) आता पुढे ढकलले आहेच तर मग २९ फे. ला ठेवा म्हणजे अस्मादिकांना उपस्थित राहता येईल कसे?
(सुचक)केशवसुमार
अन कायवं सरपंच ते मिपाच्या जोत्स्या कडून ते मव्हरत नवता का बघितला चावडिवर पाटि लावाच्या आदी
(शंकेखोर) केशवसुमार

सुनील's picture

24 Jan 2008 - 8:46 pm | सुनील

आता पुढे ढकलले आहेच तर मग २९ फे. ला ठेवा म्हणजे अस्मादिकांना उपस्थित राहता येईल कसे?

हेच म्हणतो.

पण जरा पंचांग वगैरे बघून ठेवा नाहीतर एखादी एकादशी किंवा अमावास्या निघायची!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अघळ पघळ's picture

28 Jan 2008 - 8:34 am | अघळ पघळ

अहो पण संमेलन स्पॉन्सर करणार्‍या भांडारकर दांपत्त्याचे काय? त्यांची सोय पण बघा की!!
आम्हला २९ फे पण चालेल.

धोंडोपंत's picture

28 Jan 2008 - 7:56 pm | धोंडोपंत

केशवा,
आता तुला मुहूर्ताचं महत्व पटलेले दिसते आहे.

तात्याला माहित आहे की ,आम्ही दिवसभर पंचांग घेऊन लोकांना मुहूर्त काढून देतो, पण त्यांनी एका शब्दानेही विचारले नाही.

आता पुढील तारखेचा नीट मुहूर्त काढून नंतर ठरवा. म्हणजे कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ असतील.

आपला,
(दशग्रंथी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मीनल गद्रे.'s picture

24 Jan 2008 - 8:16 am | मीनल गद्रे.

ह्या संमेलनात मिसळ पावावरच्या सर्व क विता वाचणे गरजेचे वाटते.
कार्यक्रमाचे शिर्षक गीत समजा हवं तर.
कसं काय?

मनीष पाठक's picture

24 Jan 2008 - 4:36 pm | मनीष पाठक

मी ही वाट पहातोय संमेलनाच्या नवीन तारखांची.

मनीष पाठक