✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चंद्रामागे जाणारा व परत येणारा शुक्र बघण्याचा थरारक अनुभव

म
मार्गी यांनी
Fri, 10/13/2023 - 14:20  ·  लेख
लेख
✪ दिवसा झालेले चंद्र- शुक्राचे पिधान ✪ क्षणार्धात अदृश्य व थोड्या वेळाने परत दृश्यमान होणारा शुक्र! ✪ ध्यानाचा अनुभव- जणू पूर्ण अंधार आणि क्षणार्धात आलेला प्रकाश ✪ दिवसा उजेडीसुद्धा शुक्र बघता येतो ✪ आकाशातील आश्चर्ये आपल्याला विनम्र करतात सर्वांना नमस्कार. आपल्याला दिसणारं आकाश एक जादूचा पेटारा आहे! अंधा-या रात्री दिसणारं आकाश बघताना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. अशाच एका अवाक् करणा-या अनुभवाबद्दल आपल्यासोबत शेअर करत आहे. हा अनुभव अगदी वेगळा होता कारण तो दिवसा आलेला होता! दिवसाच्या वेळी आपण चंद्र तर बघूच शकतो आणि सौर फिल्टर वापरून सौर डागसुद्धा बघू शकतो. पण आपण शुक्र व गुरू असे तेजस्वी ग्रहसुद्धा दिवसा बघू शकतो. हे चंद्र व शुक्राचं पिधान (म्हणजे चंद्रामुळे झाकला गेलेला व थोड्या वेळाने चंद्राच्या पलीकडून दिसायला लागलेला शुक्र) ह्या वर्षी २४ मार्चला झालं होतं. त्याबद्दल लिहायचं राहून गेलं होतं. ते आता लिहीत आहे. (इथे http://niranjan-vichar.blogspot.com/2023/10/thrilling-experience-of-watching-lunar.html आकाश दर्शनाशी संबंधित माझे इतर लेख वाचता येतील व टेलिस्कोपने घेतलेले फोटोजही बघता येतील.) हे पिधान २४ मार्चच्या संध्याकाळी झालं. आकाश स्वच्छ होतं. तृतीया असल्यामुळे चंद्राची बारीक कोर होती. हे बघण्यासाठी टेरेसवर गेलो तेव्हा चंद्र शोधावा लागला. भिंतीच्या सावलीचा उपयोग करून अपेक्षित जागी म्हणजे पश्चिमेच्या बाजूला चंद्राचा शोध घेतला. भर ऊन, गडद निळं आकाश आणि बारीकशी कोर असल्यामुळे लगेच सापडला नाही. बायनॅक्युलरचीही मदत घेतली आणि मग सापडला. आणि डोळ्यांनी तेजस्वी आकाशासोबत जुळवून घेतल्यावर डोळ्यांनीही दिसला. अगदी बारीक १३% प्रकाशित चंद्राची कोर. आणि विशेष म्हणजे बायनॅक्युलरमधून त्याच्या अप्रकाशित बाजूच्या अगदी जवळ शुक्रही दिसला! गंमत म्हणजे शुक्र चंद्रापेक्षा जास्त तेजस्वी दिसत होता. कदाचित त्याचा कोनीय आकार चंद्रापेक्षा खूपच कमी असल्यामुळे तसं दिसत असेल.  ठीक ४:०५ वाजता क्षणार्धात शुक्र चंद्राच्या अप्रकाशित भागामुळे झाकला गेला! दिसतोय दिसतोय आणि अचानक अदृश्य झाला. आकाश अतिशय तेजस्वी असल्यामुळे ह्यावेळी फोटो घेता आला नाही. आणि बायनॅक्युलरमधून बघताना डोळेही दुखत होते. शुक्र चंद्रापलीकडून परत बाहेर येण्याची वेळ ५:४५ ही होती. तोपर्यंत थोडा ब्रेक घेतला. अशाच चंद्र- मंगळ पिधानाचा मी घेतलेला व्हिडिओ. चंद्रावर "उगवणारा" मंगळ: http://niranjan-vichar.blogspot.com/2021/04/blog-post_18.html परत ठरलेल्या वेळेच्या थोडं आधी निरीक्षणाला सुरूवात केली. ह्यावेळीही सूर्यास्त जवळ आलेला असूनही आकाश तितकंच तेजस्वी आहे. दुसरी सावली वापरून चंद्र बघायला सुरूवात केली. बायनॅक्युलरने चंद्राचं निरीक्षण सुरू केलं. आणि ठरलेल्या क्षणी अगदी अचानक शुक्र प्रकट झाला! अगदी रोमांचक अनुभव. अनुपस्थिती किंवा अंधार किंवा शून्य आणि क्षणार्धात प्रकट झालेला तेजस्वी शुक्र! ह्यावेळीही शुक्र चंद्रापेक्षा तेजस्वी वाटला. काही मिनिटांनी शुक्र चंद्राला चिकटून नुसत्या डोळ्यांनीही बघता आला. तेजस्वी निळ्या आकाशामध्ये तो फिकट पिवळ्या बिंदुसारखा दिसतोय. मधून मधून हरवतोय, पण चंद्राच्या स्थितीच्या अंदाजाने परत बघता येतोय. शुक्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्याची बारीकशी कोर असते, तेव्हा तो दिवसाही सहजपणे दिसू शकतो. पण त्यासाठी सूर्यप्रकाश टाळण्याची काळजी घ्यावी लागते आणि त्याची आकाशातली स्थिती अचूक माहिती असावी लागते. ह्यावेळी चंद्रामुळे शुक्र शोधायला अगदी सोपा गेला. तेजस्वी ग्रह- शुक्र व गुरू हे दिवसाही बघता येऊ शकतात. आणि कदाचित विश्वास बसणार नाही, पण अंधा-या ठिकाणी आदर्श स्थितीत त्यांच्यामुळे सावल्याही पडतात! दुस-या महायुद्धामध्ये सैनिकांनी शत्रूने सोडलेली अज्ञात वस्तु समजून शुक्रावर फायरिंगसुद्धा केलं आहे! आकाशात अशी अनेक आश्चर्य आहेत व ते बघून आपण नम्र होतो. आपण किती छोटे आणि नगण्य आहोत, ही जाणीव आपल्याला होते. आता पावसाळ्यानंतर आकाश दर्शनाचे महिने सुरू होत आहेत. माझी आकाश दर्शनाची सत्रही सुरू होत आहेत. सर्वांना happy sky watching! आपले जवळचे लोक व ह्यात आवड असलेल्यांसोबत हा लेख शेअर करू शकता. धन्यवाद. (निरंजन वेलणकर 09422108376 वर दिलेल्या ब्लॉगवर माझे विविध लेख वाचता येतील व टेलिस्कोपिक फोटोजही बघता येतील. फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील व असं सेशन आपल्याकडे आयोजित करायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भूगोल
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
2150 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

लेख आवडला

मुक्त विहारि
Fri, 10/13/2023 - 14:37 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

सुंदर.

कंजूस
Fri, 10/13/2023 - 15:06 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments

माझ्या एका नातेवाईकाला हाच छंद आहे

मुक्त विहारि
Fri, 10/13/2023 - 19:14 नवीन
त्याला तुमचा नंबर देऊ का?
  • Log in or register to post comments

भारी!

Bhakti
Fri, 10/13/2023 - 19:47 नवीन
भारी!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Mon, 10/16/2023 - 15:37 नवीन
सर्वांना नमस्कार व मन:पूर्वक धन्यवाद! :) @ मुक्त विहारी जी, द्या की. आवडेल त्यांच्याशी बोलायला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा