✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नराधम

स
सुबोध खरे यांनी
Sat, 07/01/2023 - 20:50  ·  लेख
लेख
नराधम आज माझ्याकडे सोनोग्राफी साठी एक रुग्ण बाई आल्या होत्या. वय वर्षे ४२. त्यांची फाईल पहिली तर त्यात बऱ्याच गोष्टी तर्कास न पटणाऱ्या होत्या. त्यांना एक वर्षांपूर्वी गर्भाशयाच्या कर्करोगाची सुरुवात झालेली होती. पण आजतागायत गर्भाशय काढून टाकलेला नव्हता. प्रथितयश अशा स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक आहे असे एक वर्षांपूर्वी स्पष्ट लिहून दिलेले होते. अगोदर झालेल्या सोनोग्राफी प्रमाणे या बाईंच्या गर्भाशयात निदान सात आठ तरी फायब्रॉइड्स होते आणि गर्भाशयाच्या मधल्या भागास अडेनोमायोसिस म्हणूनआजार झालेला होता. तीन महिन्यापूर्वी पेट सिटी (PET CT) झालेला होता. त्यावेळेस हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पडलेला नव्हता. या महाशयांनी कोणी एक डॉक्टर गाठला होता ज्याने हॉर्मोन थेरपी चालू केली होती ज्यामुळे त्या बाईंना गेले सहा महिने पाळी आली नव्हती. मी त्यांची सोनोग्राफी करताना मी त्यांच्या यजमानांना विचारले अजून तुम्ही शल्यक्रिया का केलेली नाही? त्यावर त्यांनी मला सांगितले कि आम्ही तीन चार वेळेस वंध्यत्वासाठी आय व्ही एफ चे उपचार केले परंतु त्यात यश आले नाही म्हणून आम्ही या डॉक्टरांकडे जाऊन शल्यक्रियेच्या ऐवजी हॉर्मोन थेरपी चालू केली. सोनोग्राफीमध्ये गर्भाशयाचे आतील आवरण बरेच वाढलेले दिसत होते याचा सरळ अर्थ असा होता कि हा कर्करोग त्या हॉर्मोन थेरपीला जुमानत नव्हता मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले कि या हॉर्मोन थेरपीला कोणताही शास्त्राधार नाही. याने केवळ पाळी येणे बंद होईल गर्भाशयाचे आतले आवरण वाढणार नाही म्हणून कर्करोग थांबेल असा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. मुळात आपल्या पत्नीच्या गर्भाशयात असलेल्या फायब्रॉइड्स आणि ऍडेनोमायोसीसमुळे त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता फारच कमी ( फारतर ५%) आहे. त्यातून तुम्ही हॉर्मोन थेरपी घेत आहेत त्याने स्त्रीबीज निर्मिती होत नाही मग गर्भधारणा कशी होणार? त्यातून अगदी गर्भधारणा झालीच तरी गर्भाशयाचा कर्करोग गरोदरपणाच्या हॉर्मोन्स मुळे वेगाने वाढून गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि या काळात हा कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पाडण्याचीशक्यत कितीतरी जास्त आहे. असे असताना तुम्ही तुम्ही केवळ आपल्याला मूल हवे त्यांच्या जीवाशी खेळता आहात. "शल्यक्रिया करू नका" असे सांगणारा डॉक्टर शोधणे बंद करा आणि कोणत्याही अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या किंवा टाटा रुग्णालयात जाऊन दाखवा. नऊ वर्षे कर्करोग केंद्रात काम केल्याने मला थोडाफार अनुभव आहे यामुळेच मी तुम्हाला हा सल्ला देतो आहे. तुमच्या दृष्टीने सर्वात चांगला मार्ग म्हणजे अनुभवी स्त्रीरोगतज्ञाचा ताबडतोब सल्ला घ्या आणि ताबडतोब शल्यक्रिया करून घ्या आणि नंतर सरोगसी मार्गाने (तुमचा गर्भ दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात वाढवायचा उपाय) वंध्यत्वावर उपचार करा. मी त्यांना स्वच्छ शब्दात सांगितले कि आपल्या पत्नीला गर्भधारणा होण्याची शक्यता फारशी नाही हे सांगताना मला अजिबात आनंद होत नाहीये. परंतु कुणी तरी हे वाईट काम करणे आवश्यक आहे आणि लष्करात गोल गोल बोलण्याचे आम्हाला शिकवलेले नाही. यामुळे जे आहे ते तोंडावर स्पष्ट सांगणे आवश्यक आहे. अशा बोलण्याने दोन चार रुग्ण गेले तरी मला फरक पडत नाही. एवढ्यात या महाशयांना एक फोन आला म्हणून ते बाहेर गेले त्या वेळेत त्या बाईंनी सांगितले कि हा माणूस माझा शत्रू आहे. मला शल्यक्रिया करू देत नाहीये. जितक्या डॉक्टरांकडे गेलो तितक्यांनी मला ताबडतोब शल्यक्रिया करा असा सल्ला दिला आहे. एवढ्यात ते यजमान परत आले. त्यावर त्या बाई गप्प झाल्या. मी त्यांना हाच सल्ला परत एकदा कळकळीने दिला. त्यांना तो फारसा पटलेला दिसला नाही. पुढे काय होईल माहिती नाही. अर्थात मी याच्यापेक्षा अधिक काहीही करू शकत नव्हतो. डॉक्टर्स डे च्या दिवशी माझी अगतिकता मला प्रकर्षाने जाणवत होती. या बाई कोणत्या कारणाने या माणसाचे ऐकत होत्या आणि आपला जीव धोक्यात टाकत होत्या हे समजत नव्हते. त्यांची काहीतरी अगतिकता असावी असेच मला वाटते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
28437 वाचन

💬 प्रतिसाद (101)

प्रतिक्रिया

फार वाईट वाटले. जिवाला धोका

गवि
Sat, 07/01/2023 - 20:56 नवीन
फार वाईट वाटले. जिवाला धोका आहे हे कळत असून ही भलतीच बळजबरी...
  • Log in or register to post comments

काय बोलावे.

कॉमी
Sat, 07/01/2023 - 21:06 नवीन
काय बोलावे.
  • Log in or register to post comments

पत्नीला जबरदस्तीने उपचार न

कॉमी
Sat, 07/01/2023 - 21:13 नवीन
पत्नीला जबरदस्तीने उपचार न घेउ देणे हा गुन्हा असावा... हार्मोन थेरपी इत्यादी काम न करणारे उपाय जाणून बुजून पैश्यासाठी देत राहणारा डॉक्टर सुद्धा किती कोत्या मनाचा म्हणावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

कटू आहे .. पण माझ्याही

आंद्रे वडापाव
Sun, 07/02/2023 - 10:24 नवीन
कटू आहे .. पण माझ्याही पाहण्यात अश्या सडलेल्या मानसिकतेचे पुरुष (पेशंट बरोबरील) पाहिलेत ... हार्मोन थेरेपी देणारा डॉ हा खरंच आधुनिक वैद्यकीय शास्त्राचा पदवीधर असण्याची शक्यता कमी माझ्यामते ... भारतात नावापुढे डॉ लावणारा हा फक्त एम बी बी एस / बिडीएस या एमसीए च्या मान्यताप्राप्त आधुनिक शास्त्रातील पदवीधर च लावू शकतो ... बाकीच्यांना टाचणी सुद्धा टोचायला मनाई आहे ... इंजेक्शन तर लांब राहीले ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

स्त्रियांना

धर्मराजमुटके
Sat, 07/01/2023 - 21:15 नवीन
आपल्या समाजात स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्णय घेण्यास अडचणी येतात कारण बालपणापासून झालेली जडणघडण. शिवाय जास्त स्वतंत्र विचारांच्या स्त्रीला अतिशहाणी हे बिरुद मिरवावे लागते. मी देखील जुन्याच जडणघडणीत वाढून घरातील स्त्रियांवर कळत नकळत अत्याचार केले असतील (मत स्वातंत्र्याच्या बाबतीत) पण आज स्वतःच्या चुका सुधारताना स्त्रियांची निर्णय प्रक्रियेतील जडणघडण सुधारणे खुप अवघड आहे असे जाणवते. त्यासाठी सतत प्रयत्न करतो आहे. तुम्हाला अशा प्रवृत्तींना भेटण्याची / त्यांना उपदेश करण्याची संधी मिळते म्हणून आदर आणि कौतुक आहे पण त्याचवेळी तुम्हाला होणार्‍या मानसिक त्रासासाठी वाईट देखील वाटते पण एक वाचक म्हणून हळहळ व्यक्त करणे आणि आपल्या व्यक्तीगत विचारात सुधारणा करणे एवढे माझ्या हातात नक्की आहे. (स्पष्टवक्तेपणा प्रथम दर्शनी वाईट वाटला तरी तो हितकर आहे याची जाणिव असणारा एक वाचक)
  • Log in or register to post comments

डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट

प्रसाद गोडबोले
Sat, 07/01/2023 - 22:42 नवीन
हिंदु विवाह कायद्याने पुरुषांचे मानसिक खच्चिकरण केले नसते अन बहुपत्नीत्व बेकायदेशीर नसते तर सदरहु व्यक्तीने आधीच दुसरे लग्न करुन स्वतःची अपत्यप्राप्तीची इच्छा पुर्ण केली असती. प्रत्येक गोष्ट काळी पांढरी अशी विभागता कशी येईल , प्रत्येकाला ग्रे शेड आहे, सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत . किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते. शिवाय दुसर्‍या पत्नीकडुन झालेल्या स्त्रीचे अपत्यही प्रेमाणे , आईचा लळा लाऊन वाढवता आले असते.
  • Log in or register to post comments

काहीही बकवास.

कॉमी
Sat, 07/01/2023 - 23:11 नवीन
काहीही बकवास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+०१०७२०२३

रंगीला रतन
Sat, 07/01/2023 - 23:41 नवीन
+०१०७२०२३ अशे बिनडोक प्रतिसाद देण्यासाठी कुठ्ला क्रॅशकोर्स आहे का? किंवा कुठ्ला कडक माल मारायचा याची काही आयडीया :=)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी

मी काय म्हणतो... हिंदुं

आंद्रे वडापाव
Sun, 07/02/2023 - 22:18 नवीन
मी काय म्हणतो... हिंदुं पुरुषांना परवानगी घेवून दुसरे लग्न करण्याची मुभा मिळाल्याने, काहींच्या मते न्याय होणार असेल. तर तशीच सुधारणा स्त्रियांच्या बाबतीत व्हावी.. म्हणजे हिंदू स्त्रीला सुद्धा दुसरा, तिसरा.. नवरा करण्याची मुभा मिळावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

आंद्रे वडापाव,

प्रसाद गोडबोले
Mon, 07/03/2023 - 23:29 नवीन
आंद्रे वडापाव, एका वडापाव सोबत एक्स्ट्रापाव घेऊन , दोन पाव आरामात खाता येतात , पण एका पावात दोन वडे कोंबुन खायला गेले तर , नीट पकडताही येत नाही अन , तोंड डबल भाजते . तस्मात ते प्रॅक्टीकल नाही. अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

शक्य आहे..

आंद्रे वडापाव
Tue, 07/04/2023 - 07:27 नवीन
शक्य आहे.. पण ते वाड्याच्या आणि पावाच्या साईझ वर पण अवलंबून असेल... कोणी एकच वडा २-४ पावाबरोबर पुरवून पुरवून खाईल... कोणी एकाच पावत दोन वडे घुसडून डबल डेकर खाईल.. कोणी नुसते वडे वडे च खाईल.. कोणी नुसते पाव पाव चघळेल... “एकांचं वड्यां सोंबत दोनं तिनं पावं चांलतील... परंतु एकांचं पावां सोंबत दोनं तिनं वडे न्नाहिं चांलतील...” हे फुकटचे सल्ले कोणी देवू नये... कारण को तो आपल्या पैश्याने वडापाव खाऊ शकतो. कोणाच्या परवानगीची किंवा शिकवणुकी ची गरज लोकांना नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पण, समाजामध्ये पावांची मालकी

कॉमी
Tue, 07/04/2023 - 07:40 नवीन
पण, समाजामध्ये पावांची मालकी वड्यांकडे आहे हा मुद्दा तुम्ही विसरलात... त्यामुळे एका वड्याला आणखी पाव घ्यायचे असतील तर पावाची परमिशन लागेल. पण पावाला आणखी वडे हवे असतील तर वड्याने गप बसायचे... समाज पावसत्ताक आहे भाऊ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

तुम्हाला वाचता येत नाही का ?

प्रसाद गोडबोले
Tue, 07/04/2023 - 21:35 नवीन
तुम्हाला वाचता येत नाही का ?
हे फुकटचे सल्ले कोणी देवू नये
परत एकदा टाईपकरतो , मोठ्ठ्या फॉन्ट मध्ये , सविस्तर वेळ देऊन एकेक अक्षर , एकेक शब्द नीट वाचा , घाई गडबड करु नका , कोणीही पळुन चाललेलं नाहीये की धागा संपादित किंव्वा वाचनमात्र होण्याची चिन्हे नाहीयेत. शांतपणे समजाला लागेल तेवढा वेळ घ्या निवांत.

अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.

आणि हो, पुढच्या वेळेस एका पावात २-४ वडे कोंबुन खाताना फोटो काढा आणि नक्की टाकात इथे प्रतिसादात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

हेडिंग १ फॉर्मॅटिंग चालात नाहीये बोल्ड करुन लिहितो

प्रसाद गोडबोले
Tue, 07/04/2023 - 21:36 नवीन
अर्थात ज्यांना खायचे ते खाऊ शकतातच , आमची हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बहुतांशी सहमत

Trump
Sun, 07/02/2023 - 13:45 नवीन
हिंदु विवाह कायद्याने पुरुषांचे मानसिक खच्चिकरण केले नसते अन बहुपत्नीत्व बेकायदेशीर नसते तर सदरहु व्यक्तीने आधीच दुसरे लग्न करुन स्वतःची अपत्यप्राप्तीची इच्छा पुर्ण केली असती. प्रत्येक गोष्ट काळी पांढरी अशी विभागता कशी येईल , प्रत्येकाला ग्रे शेड आहे, सगळ्यांचे पाय मातीचेच आहेत . किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते. शिवाय दुसर्‍या पत्नीकडुन झालेल्या स्त्रीचे अपत्यही प्रेमाणे , आईचा लळा लाऊन वाढवता आले असते.
श्री मार्कस ऑरेलियस यांच्या भावनांबरोबर सहमत आहे, हिंदुना राजरोसपणे, जर आधीची बायको सहमत नसेल तर दुसरे लग्न खुपच मुश्कील आहे. श्री सुबोध खरे यांचे विचार वैद्यकीय दृष्टीकोनातुन आले आहेत आणि मुळ विषय समजुन न घेता लक्षणावर उपाय करण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाला नुसतेच शरीर नसते त्याला मनही असते ह्याचा विचार केला नाही. त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा. ती परवानगी न दिल्याने, जर अपत्य नसल्यामुळे त्या मनुष्याला होणार्‍या मानसिक त्रासांना/व्याधींना कोण जबाबदार ह्यावर विचार व्ह्यायला हवा. परगर्भधारण (surrogacy) कायद्याची सरकारने चांगलीच वाट लावुन ठेवली आहे, सरकारी मुर्खपणा काय असतो त्याचे एक ढळढळीत उदाहरण आहे. परगर्भधारणा कायद्याच्या अटीत सर्वसामान्य माणसे बसणे आणि परवडणे अशक्य होऊन गेले आहे. त्या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात खटले चालु आहेत. काही संबधित बातम्या:
  • https://www.deccanherald.com/metrolife/metrolife-your-bond-with-bengaluru/new-laws-have-killed-surrogacysay-bengaluru-fertility-clinics-1153387.html
  • https://bwlegalworld.businessworld.in/article/Surrogacy-Regulation-Act-2021-A-Case-Of-Good-Intentions-Leading-To-Bad-Outcomes/06-03-2023-467930/
  • https://www.einnews.com/pr_news/640525172/navigating-the-changing-laws-of-surrogacy-in-india-brutal-2023-laws-forcing-singles-to-go-overseas-to-have-a-child
  • https://journalsofindia.com/triple-tests-for-altruistic-surrogacy/
  • https://timesofindia.indiatimes.com/blogs/voices/commercialization-of-surrogacy-in-india-the-effects-of-globalisation/
---- सदर मनुष्याने मुस्लीम होऊन दुसरे लग्न करणे भारतीय घटनेने दिलेला मार्ग अनुसरणे योग्य राहील. ते अयोग्य वाटत असल्यास निर्भिडपणे बाहेर प्रेमपप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

@TRUMP

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 09:54 नवीन
@TRUMP सदर मनुष्याने मुस्लीम होऊन दुसरे लग्न करणे भारतीय घटनेने दिलेला मार्ग अनुसरणे योग्य राहील. ते अयोग्य वाटत असल्यास निर्भिडपणे बाहेर प्रेमपप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत. अशीच परिस्थिती एखाद्या स्त्रीची असल्यास( किंवा नसली तरी) तिने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत काय? म्हणजे मुलाला एक सोडून अनेक बाप मिळतील आणि मुलं श्रीमंत होऊन समाजाचे कोटकल्याण होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही.

Trump
Mon, 07/03/2023 - 10:51 नवीन
अशीच परिस्थिती एखाद्या स्त्रीची असल्यास( किंवा नसली तरी) तिने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करुन अपत्ये जन्मास घालावीत काय? म्हणजे मुलाला एक सोडून अनेक बाप मिळतील आणि मुलं श्रीमंत होऊन समाजाचे कोटकल्याण होईल
वीर्यपेढी / नियोग कशासाठी असतो!!! स्त्रीला कमीत कमी ते पर्याय असतात. तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही. तुम्ही अजुन मुळ प्रश्नाला उत्तर दिले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वीर्यपेढी / नियोग कशासाठी

गवि
Mon, 07/03/2023 - 11:15 नवीन
वीर्यपेढी / नियोग कशासाठी असतो!!! स्त्रीला कमीत कमी ते पर्याय असतात.
पर्याय खूप असतात हो. पेढीपर्यंत जायचीही गरज नाही. डॉ खरे बहुधा असा प्रश्न विचारत आहेत की हे समाजमान्य ठरेल का? पुरुषांना चालेल का? (ज्या सहजतेने बहुपत्निक समाजमान्य असण्याची मागणी होते त्या मानाने)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

माझ्या माहितीने हा वीर्यपेढीचा पर्याय गोपनीय असतो

Trump
Mon, 07/03/2023 - 11:51 नवीन
पर्याय खूप असतात हो. पेढीपर्यंत जायचीही गरज नाही. डॉ खरे बहुधा असा प्रश्न विचारत आहेत की हे समाजमान्य ठरेल का? पुरुषांना चालेल का? (ज्या सहजतेने बहुपत्निक समाजमान्य असण्याची मागणी होते त्या मानाने)
माझ्या माहितीने हा वीर्यपेढीचा पर्याय गोपनीय असतो. जोपर्यंत स्वतःहुन माहिती देत नाही, तोपर्यंत समाजात माहिती होत नाही. त्यामुळे समाजमान्यतेचा प्रश्न नाही. जर पुरुषाला अपत्य पाहिजे असेल आणि त्याला शारिरीकदृष्ट्या शक्य नसेल तर हेच सोयिस्कर पर्याय आहेत. माझ्या माहितीत काही पुरुषांनी आधीच (बहुदा आधीच्या लग्नापासुन) मुल असलेल्या स्त्रीबरोबर लग्न केले आहे. तेवढा समजुतदारपणा काही पुरुषांनमध्ये नक्कीच असेल. - दुसरी बाजु. अपत्यप्राप्तीसाठी बहुपत्निकपणा खरे तर प्रतिगामी पर्याय आहे. पण सरकारने इतर सगळ्या पर्यायांची वाट लावुन (त्रासदायक, न परवडणारे, जवळपास अशक्य, वेळखाऊ) टाकली आहे. बहुपत्नि / प्रेयसीशिवाय कोणता पर्याय शिल्लक आहे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

वीर्यपेढी / नियोग कशासाठी

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 12:10 नवीन
वीर्यपेढी / नियोग कशासाठी असतो!!! स्त्रीला कमीत कमी ते पर्याय असतात. "सरोगसी" हा पुरुषाला उपलब्ध असणारा पर्याय आहे हा मी त्या महाशयांना सुचवलेला आहेच. तुमच्यासारख्या डॉक्टरकडुन असल्या बालिश प्रतिसादाची अपेक्षा नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने पुरुषाने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करणे आणि मुलांना जन्माला घालणे हा परिपक्वपणा (mature) आहे आणि तसे स्त्रीने करणे हा बालिश पर्याय आहे? कि मुसल्मान होणे हा परीपक्व पणा आहे? बाकी वीर्यपेढी/ नियोग मध्ये मी स्वतः सात वर्षे काम केलेले आहे. त्यातील अनेक अनुभव मी मिपा वर लिहिलेले आहेतच. येथे आपली जाहिरात करण्यात मला रस नाही. तुमचा मूळ प्रश्न नक्की काय आहे? त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा हा जर असेल तर एक वर्ष पूर्वी पर्यंत त्यांचे मूल होण्यासाठी सर्व प्रयत्न चालू होतेच. पण बायकोने स्वतः ला कर्करोग झाल्यावर तिने नवऱ्याला दुसरे लग्न करावे म्हणून परवानगी द्यायला हवी होती? तिची शुश्रूषा नवऱ्याने करायची कि आणखी कुणी? आणि दुसऱ्या बायकोने आपले नवे नवतीचे दिवस सोडून काय म्हणून कर्करोग झालेल्या सवतीची शुश्रूषा करायची? नवऱ्याला मन असतं मग बायकोला नसतं का? तिला कर्करोग झाला हा तिचाच दोष? हे काही दारू पिऊन लिव्हर खराब झालं किंवा सिग्रेटी पिऊन फुप्फुसाचा कर्कर्ग झाला असा नसतं. कर्करोग झाला हे एक दुर्दैव, त्यातून असा नवरा मिळाला हे दुहेरी दुर्दैव यावर तुम्ही असे पर्याय सुचवता आहात? धन्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

म्हणजे तुमच्या दृष्टीने

Trump
Mon, 07/03/2023 - 12:26 नवीन
म्हणजे तुमच्या दृष्टीने पुरुषाने निर्भिडपणे बाहेर प्रेमप्रकरणे करणे आणि मुलांना जन्माला घालणे हा परिपक्वपणा (mature) आहे आणि तसे स्त्रीने करणे हा बालिश पर्याय आहे? कि मुसल्मान होणे हा परीपक्व पणा आहे?
मग कोणते पर्याय पुरुषाला शिल्लक आहेत ?? परगर्भधारणा कायद्याची सरकारने वाट लावली आहे. दत्तक प्रकार मुश्कील आहे. हे दोन्ही मी वरती लिहीले आहे.
त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा हा जर असेल तर एक वर्ष पूर्वी पर्यंत त्यांचे मूल होण्यासाठी सर्व प्रयत्न चालू होतेच. पण बायकोने स्वतः ला कर्करोग झाल्यावर तिने नवऱ्याला दुसरे लग्न करावे म्हणून परवानगी द्यायला हवी होती? तिची शुश्रूषा नवऱ्याने करायची कि आणखी कुणी? आणि दुसऱ्या बायकोने आपले नवे नवतीचे दिवस सोडून काय म्हणून कर्करोग झालेल्या सवतीची शुश्रूषा करायची? नवऱ्याला मन असतं मग बायकोला नसतं का? तिला कर्करोग झाला हा तिचाच दोष? हे काही दारू पिऊन लिव्हर खराब झालं किंवा सिग्रेटी पिऊन फुप्फुसाचा कर्कर्ग झाला असा नसतं. कर्करोग झाला हे एक दुर्दैव, त्यातून असा नवरा मिळाला हे दुहेरी दुर्दैव यावर तुम्ही असे पर्याय सुचवता आहात? धन्य आहे
तुम्ही खुपच एकांगी चित्र रेखाटता आहात. मी विचारलेल्या मुळ प्रश्नाला उत्तर न देता, तुम्हीच स्वतः प्रश्न विचारत आहात. जर तुम्हाला मुळ समस्येला हात न घालता लक्षणावरुन त्या पुरुषाला झोडण्यात रस असेल तर पुढे लिहीण्यात काहीच अर्थ नाही. आयुष्यात चांगले आणि वाईट पर्याय यातुन एक पर्याय निवडायची वेळ खुप कमी वेळा येते. बहुदा सगळ्या पर्यांयामधुन कमीत कमी वाईट पर्याय निवडावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आपला मूळ प्रश्न काय आहे ?

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 13:00 नवीन
आपला मूळ प्रश्न काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला

Trump
Mon, 07/03/2023 - 13:18 नवीन
त्यांनी सदर स्त्रीने नवर्‍याला दुसरे लग्न करायला किंवा इतर पध्दतीने अपत्य जन्मास घालायला परवानगी दिली आहे का ह्यावर प्रकाश टाकावा. https://www.misalpav.com/comment/1166280#comment-1166280
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तिला कर्करोग निदान होऊन एक

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 18:26 नवीन
तिला कर्करोग निदान होऊन एक वर्ष झालेले आहे. अशा काळात ती आपल्या नवऱ्याला दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी देईल अशी शक्यताही माझ्या मनाला शिवलीं नाही. तेंव्हा तिने अशी परवानगी दिली नसावी असेच माझे गृहीतक आहे. अर्थात कोणती स्त्री अशी परवानगी देईल. महान संत प्रवृत्ती असेल किंवा सर्व उपचार करूनही उपयोग न झाल्याने आता आपला शेवट जवळ आला आहे म्हणून निरुपायाने एखाद्या स्त्रीने अशी परवानगी कदाचित दिली असती. दुसरया तर्हेने अपत्य जन्मासाठी मीच त्यांना गर्भाशय काढून टाका आणि नंतर सरोगसीच्या उपायाने मूल होण्यासाठी उपचार करा हे सुचवले आहे. अर्थात आपल्याला मूल हवे म्हणून आपल्या धर्मपत्नीला उपलब्ध असणाऱ्या उपचारांपासून वंचित ठेऊन मृत्यूच्या दाढेत लोटणारा हा माणूस नराधमच आहे असे मात्र माझे स्पष्ट मत झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

माझ्या मते त्या जोडप्याला संपुर्ण समोपदेशानाची गरज आहे.

Trump
Mon, 07/03/2023 - 18:41 नवीन
माझा संशय खरा ठरला. - तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त रुग्णमाहिती माहिती असेलच. जी माहिती तुम्ही दिली आहे, ती जर वेगळ्या पध्द्तीने मांडली तर अजुन वेगळा निष्कर्ष निघु शकतो. तुम्ही ज्या पध्दतीने माहिती मांडली आहे, ती खुपच एकांगी आणि केवळ लक्षणावर आधारीत आहे. माझ्या मते त्या जोडप्याला संपुर्ण समोपदेशानाची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही ज्या पध्दतीने माहिती

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 19:01 नवीन
तुम्ही ज्या पध्दतीने माहिती मांडली आहे, ती खुपच एकांगी आणि केवळ लक्षणावर आधारीत आहे हो ना त्या पत्नीला समुपदेशन करायला हवं होतं कि ते "सात जन्म" वगैरे काही नसतं तू खरं तर एक वर्षांपूर्वीच नवऱ्याला सोडून द्यायला हवं होतं. म्हणजे त्याला मूल होण्यासाठी दुसरी बायको करता आली असती आणि अपत्य नसल्यामुळे त्या मनुष्याला होणार्‍या मानसिक त्रासांना/व्याधींच्या जबाबदारीतुन तू मुक्त झाली असतीस. गांधीजींनी बलात्कार टाळण्यासाठी बायकांनी आपला श्वास अवरोधून आत्महत्या करायला हवी होतीस असे एका बलात्कार झालेल्या स्त्रीला सुचवले होते त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

मला त्यांची संपूर्ण फाईल

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 19:03 नवीन
मला त्यांची संपूर्ण फाईल वाचून आणि ते माझ्याबरोबर जेवढा वेळ होते त्यावरूनच मी हा लेख लिहिलेला आहे. त्यामुळे अर्थातच माझी संपूर्ण माहिती एकांगी आणि पूर्वग्रहदूषितच आहे हे मी मान्यच करून टाकतो. म्हणजे पुढचे गैरसमज टळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

डॉक्टर साहेब थोडे अवांतर करतो

कानडाऊ योगेशु
Tue, 07/04/2023 - 09:26 नवीन
डॉक्टर साहेब थोडे अवांतर करतो.
गांधीजींनी बलात्कार टाळण्यासाठी बायकांनी आपला श्वास अवरोधून आत्महत्या करायला हवी होतीस असे एका बलात्कार झालेल्या स्त्रीला सुचवले होते त्याची आठवण झाली.
ह्यात काहीही तथ्य नाही. असा प्रसंग घडलेला नाही. कोण्या एका गांधीविरोधकाने एका मुलाखतीत जर कुणी शांतिदूत हिंदू स्त्रीवर अत्याचार करत असेल तर तिने काय करावे असा प्रश्न गांधींजीना विचारला तर ते असे अमुक अमुक उत्तर देतील असे सांगताना वरील विधान केले होते. हा प्रकार "पानी मे से बिजली निकालोगे तो किसानोके लिये बचेगा का?" अशोक गेहलोत ह्यांची जी एडिटेड क्लिप फिरत होती त्यासारखाच प्रकार आहे. बाकी मी गांधीवादी ही नाही व गांधी विरोधक ही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पण हे संवाद एका चित्रपटात आले

खटपट्या
Wed, 10/22/2025 - 01:05 नवीन
पण हे संवाद एका चित्रपटात आले आहेत. आणि हा चित्रपट प्रसारीत झाल्यावर त्यावर कोणी गान्धीवाद्याने किंवा त्यांच्या नातेवाइकाने आक्षेपही घेतला नाही. त्यामुळे गांधी असे काही म्हणालेच नव्हते याची काही ठोस पुरावे असतील तर ते पहायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

गांधीजींच्या अहिंसेचे भयानक

सुबोध खरे
Wed, 11/05/2025 - 10:03 नवीन
गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान ! 'पूर्व बंगालच्या स्त्रियांनी गांधीजींना विचारले, "गुंडांनी आमच्यावर हात टाकला, तर आम्ही काय करायचे ?' गांधीजी म्हणाले, "श्वास रोखून धरा, म्हणजे तुमचा प्राण जाईल आणि अब्रू वाचेल." डॉक्टरांनी सांगितले, "श्वास रोखून प्राण जाणार नाही. स्त्री बेशुद्ध होईल आणि गुंडांचे दुष्ट कार्य झाल्यावर ती शुद्धीवर येईल." तेव्हा गांधीजी म्हणाले, "विषाची कुपी स्त्रियांनी जवळ बाळगावी." अहिंसेच्या अतिरेकाची ही तिरस्करणीय पराकाष्ठा आहे. 'स्त्रियांनी विष खाऊन मरावे आणि गुंडांवर मात्र सूड घेण्यात येऊ नये', हे जर गांधीजींच्या अहिंसेचे भयानक तत्त्वज्ञान असेल, तर आग लागो रे, त्या अहिंसेला ! अहिंसेमधून निर्माण झालेल्या भ्याडपणामुळे आणि भेकडपणामुळे या महान देशाचे तुकडे तुकडे झाले.' (साभार : आचार्य अत्रे लिखित 'क-हेचे पाणी' - खंड ४, पान नं. ९०)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

कुजबूज

अभ्या..
Wed, 11/05/2025 - 22:37 नवीन
मूळ मुद्दा नाही.. हे सत्य नाही. आचार्य अत्रे यांनी त्यांच्या पुस्तकात हे लिहिले आहे. 'कर्हेचे पाणी' या पुस्तकात त्यांनी या आवृत्तीसाठी एकमेव परिच्छेद काढला आहे, गांधींचे संपूर्ण विधान नाही. १९४६ च्या कलकत्ता हत्याकांडात बी.सी. रॉय यांनी गांधींना ही शोकांतिका सांगितली तेव्हा गांधींनी उत्तर दिले की, "जर भारतातील अर्धी मानवता लकवाग्रस्त झाली तर भारत कधीही मुक्त होऊ शकणार नाही. भारतातील महिलांना असहाय्य वाटण्यापेक्षा शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिलेले पाहणे मला अधिक आवडेल." आत्मसन्मानासाठी पृथ्वीवरील कोणत्याही शक्तीसमोर शरण जाणे माहित नव्हते, असे त्यांनी सुचवले. "विष पिऊन आत्मदहन" हा अपमानाला शरण जाण्यापेक्षा चांगला मार्ग होता. असे त्यांचे म्हणणे होते. आचार्य अत्रे यांनी गांधींवरील टीकाकारांना फक्त दुसरा परिच्छेद दिला आहे. Image removed. आचार्य अ त्रे अतिशयोक्त लिहिण्यात पहिल्यापासून निष्णात होते. गेल्या दहा हजार वर्षात असा लेख होणार नाही असली त्यांची भाषा असायचीच. स्वातंत्र्यवीर की स्वातंत्र्याचे शत्रू असा लेख सावरकरावर लिहिलेल्या प्र के अ त्रे यांनी सावरकरांची जितकी प्रचंड खिल्ली उडवली आहे तितकेच भक्तीभावाने त्यांच्यावर पुस्तकही लिहिले आहे. पण अत्रे यांच्या लेखनातील ठराविक भाग घेऊन त्याचा प्रचार करायचा आणि गांधीजींना झोडायचे असे प्रकार पाहता अत्रे यांच्या जीवनातील आणखी एक प्रसंग पहावा. स्व. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रापदी विराजमान झाल्यानंतर आचार्य अत्रेंनी ‘निपुत्रिक यशवंतरावांच्या हातात महाराष्ट्राची धुरा’ या मथळ्याखाली मोठा अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात यशवंतराव चव्हाण यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली होती. कुणालाही राग यावा, अशी ही टीका होती. या अग्रलेखाने सर्वत्र खळबळ माजली. जेव्हा यशवंतरावांनी हा अग्रलेख वाचला तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं. पण यशवंतरावांनी अत्रेंना थेट उत्तर देणं टाळलं. दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांनी अत्रेंना फोन केला. यशवंतराव म्हणाले, “अत्रे साहेब तुम्ही म्हणता मी निपुत्रिक… पण अहो मी निपुत्रिक नाही… चले जाव चळवळीवेळी मला पकडण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही. त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं. या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला. तसंच गर्भशयाला देखील दुखापत झाली आणि त्याचमुळे पुन्हा मला मुल होण्यात अडचण आली. यशवंतराव चव्हाण यांचं फोनवरील बोलणं ऐकून आचार्य अत्रेंचं मन हेलावून गेलं. त्यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली. आणि यशवंतरावांच्या घरी जाऊन वेणूताईसमोर अत्रेंनी पश्चातापही व्यक्त केला. पुढे जाहीरसभेतही त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली. . हे खरे आचार्य अत्रे होते, गांधीजीवर परत इकडचे तिकडचे काही बोलून मुदा भरकटवण्यापेक्षा आचार्य अत्रे यांची उध्दरणे खंड आणि पान नंबरासहीत देण्यापेक्षा, बघा मिळते का थोडे तरी घेता येण्यासारखे काही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गांधीजींनी सुद्धा भरपूर लटपट

सुबोध खरे
गुरुवार, 11/06/2025 - 20:47 नवीन
गांधीजींनी सुद्धा भरपूर लटपट पंची ही केलेली होती त्यामुळे केवळ या लेखावर विश्वास ठेवून ते असे म्हणाले असतील हे म्हणणे पण मानभावीपणाचे ठरेल. श्री भगत सिंह यांच्या साठी वकील देण्यास किंवा त्यांची फाशी रद्द करण्यास त्यांनी दिलेला नकार सुद्धा लोकांना माहिती आहे. गांधीजी खोटे बोलतात हे ना भा खरे हया मध्य प्रांताच्या प्रधानमंत्री यांनी न्यायालयात सिद्ध केलेले होते. गांधीजींच्या एकंदर वर्तनाबद्दल रंग सफेती करण्याचा काँग्रेसच्या सरकारांनी बराच प्रयत्न केला. नथुराम गोडसे यांचे न्यायालयातील भाषण प्रसिद्ध करण्यास आणलेली बंदी हा त्याचाच एक भाग आहे. असो वरच्या प्रश्नात सुद्धा त्या माणसाला सज्जन ठरवण्यासाठी अशीच बरीचशी लटपट पंची केलेली दिसून येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वाहवा

अभ्या..
गुरुवार, 11/06/2025 - 21:58 नवीन
गांधीजींनी सुद्धा भरपूर लटपट पंची ही केलेली होती
हेच नारायण भास्कर खरे सी पी अँड बेरारचे प्रधानमंत्रीपदी असताना पदाचा कॉग्रेसने म्हणजेच अध्यक्ष सुभाषचंद्र बोसांनी राजिनामा द्यायला सांगितल्यावर त्याचे खापर गांधीजी आणि सरदार पटेलांवर फोडून हिंदू महासभेत गेलेले, अल्वार संस्थानचे दिवाण आणि मुस्लीम लीगशी समझोता करायला आतुर झालेले आणि जिन्ना पेपर्स मध्येही ज्यांचा उल्लेख आहे तेच खरे ना? गांधीच्या हत्येपूर्वी ब्राह्मणाचा शाप म्हणणारे हेच खरे ना? लटपटपंची हा शब्द ह्या खर्‍यांना आणि त्यांच्या वर्तनाला चांगला शोभून दिसतो. कुठल्या खटल्यात ना भा खरे ह्यांनी गांधीजी काय खोटे बोलतात हे सिध्द केलेले तेही सांगाल तर बरे. . भगतसिंहाची फाशी आणि ती रद्द करण्यासाठी गांधीनी नकार दिला ह्या कुजबूजीचेही व्यवस्थित खंडन आहे. गांधींनी व्हाईसरॉय इर्विन यांना अनेक वेळा भेटले आणि मृत्युदंडाची शिक्षा कमी करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले, ज्यात जनमत, अंतर्गत शांतता आणि इर्विनच्या "ख्रिश्चन भावना" यांना आवाहन केले गेले. गांधी-इर्विन करार: कैद्यांची सुटका हा गांधी-इर्विन कराराचा एक महत्त्वाचा भाग होता (५ मार्च १९३१), परंतु ब्रिटिश सरकारने केवळ हिंसाचारात दोषी नसलेल्या राजकीय कैद्यांना सोडण्यास सहमती दर्शविली. या चर्चेदरम्यान गांधींनी भगतसिंगांचा मुद्दा उपस्थित केला, परंतु व्हाईसरॉयने ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याच्या (जॉन पी. सॉन्डर्स) हत्येप्रकरणी दोषी असलेल्यांना अपवाद करण्यास नकार दिला. भगतसिंगांची भूमिका: भगतसिंग आणि त्यांचे सहकारी क्रांतिकारक होते जे ब्रिटिश राजवट उलथवून टाकण्यासाठी हिंसाचाराच्या वापरावर विश्वास ठेवत होते आणि दया मागत नव्हते. ते स्वतःला "युद्धकैदी" मानत होते आणि पंजाबच्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी फाशी देण्याऐवजी गोळ्या घालण्याची विनंती केली होती, ज्यामुळे दया याचिकांद्वारे त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नांचा मार्ग प्रभावीपणे बंद झाला. व्हाइसरॉयचा निर्णय: शिक्षा कमी करण्याचा अंतिम अधिकार लॉर्ड इर्विनकडे होता, ज्यांच्यावर पंजाबमधील ब्रिटीश अधिकाऱ्यांकडून फाशीची शिक्षा पुढे नेण्यासाठी प्रचंड दबाव होता. इर्विनचा असा विश्वास होता की ज्यांनी ब्रिटीश पोलिसांना मारले ते त्यांच्या नशिबाला पात्र होते आणि ते कमकुवत दिसू इच्छित नव्हते. तात्विक फरक: गांधीजींनी मृत्युदंडाच्या शिक्षेला विरोध केला आणि भगतसिंगांना "शूर माणूस" मानले, तरी भगतसिंगांच्या अहिंसेच्या कट्टर तत्त्वामुळे त्यांनी त्यांच्या हिंसाचाराच्या मार्गाशी सार्वजनिकपणे असहमती दर्शविली. शेवटी, गांधींनी भगतसिंगांना फाशी देण्याच्या निर्णयात काहीच प्रयत्न केला नाही असे म्हणता येणार नाही, उलट, त्यांनी अधिकृत मार्गांनी आणि वैयक्तिक आवाहनांद्वारे त्यांचे प्राण वाचवण्याचा सक्रियपणे प्रयत्न केला, परंतु ब्रिटिश सरकारच्या ठाम भूमिकेमुळे, गांधी-इर्विन कराराच्या कायदेशीर निकषांमुळे आणि भगतसिंगांनी स्वतः दयेची मागणी करण्यास नकार दिल्यामुळे त्यांचे प्रयत्न अखेर अयशस्वी झाले. . नथुराम गोडसे चे भाषण हेच ज्यांना जणूकाही संविधानाप्रत वाटते अशांकडून बाकी काहीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. . नमस्कार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भगत सिंह यांनी दया याचिका

सुबोध खरे
Fri, 11/07/2025 - 11:25 नवीन
भगत सिंह यांनी दया याचिका केली असती तर पप्पू आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारखे माफीवीर म्हणून त्यांची हेटाळणी आणि चिखलफेक केली असती. म्हणजे दयायाचिका केली नाही म्हणून फाशी झाली असे म्हणायला पप्पू समर्थक आता मोकळे आहेत ते उलटया बोंबा मारायला मोकळे झाले असते, चालू द्या गुलामगिरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मुद्दलांत चूक ?

प्रदीप
Sun, 07/02/2023 - 14:23 नवीन
किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते.
त्या दाम्पत्यास एखादे मूल दत्तक घेता येते. स्वतःचे मूल असण्यासाठी, पुरुषाने अथवा स्त्रीने, दुसरे लग्न करण्याची आवश्यकता काय आहे? मी रहतो तेथे अनेक भारतीय, व विशेष्तः मराठी कुटुंबे आहेत, ज्यांनी मूल दत्तक घेतले आहे. (ह्याची वैयक्तिक कारणे वेगवेगळी असू शकतील). आणी ही मुले ह्या सार्‍यांनी, भारताबाहेर राहून, भारतांतील- विशेषतः महाराष्ट्रांतील अनाथालयांतून दत्तक घेतलेली आहेत. हा तपशील नमूद करण्याचे कारण इतकेच की, असे दुरून करतांना त्यांना काही कष्ट घ्यावे लागले. तरीही त्यांनी ते केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अजुन एक भारतीय कायद्यातील रत्न सापडले.

Trump
Sun, 07/02/2023 - 14:48 नवीन
त्या दाम्पत्यास एखादे मूल दत्तक घेता येते. स्वतःचे मूल असण्यासाठी, पुरुषाने अथवा स्त्रीने, दुसरे लग्न करण्याची आवश्यकता काय आहे?
दत्तक घेणे हे तितके सोपे नाही. वेळा भरपुर लागतो आणि पैसेही खर्च होतात. दत्तक मुलाला अनुवांशिक आजार असु शकतात. काही लोकांना स्वत:च्या रक्ताचे मुल हवे असते. अजुन एक भारतीय कायद्यातील रत्न सापडले.
4. Can I Adopt a Child If I Already have a Child? Yes, you can. However, under the Hindu Adoption and Maintenance Act, you can only adopt a child of the opposite gender your child. The Guardians and Wards Act and the Juvenile Justice Act, do not have any such diktats. If the child you will be adopting is old enough to express his views on the matter, his opinion will be taken in writing. https://parenting.firstcry.com/articles/a-complete-guide-to-child-adoption-in-india/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

@Trump

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 09:59 नवीन
@Trump दत्तक घेणे हे तितके सोपे नाही. वेळा भरपुर लागतो आणि पैसेही खर्च होतात. काही लोकांना स्वत:च्या रक्ताचे मुल हवे असते. हि गोष्ट मान्य आहे. दत्तक घेण्याची प्रक्रिया इतकी किचकट आणि कटकटीची केलेली आहे कि सामान्य माणसाला नको वाटावे. माझ्याकडे अशी दोन जोडपी आली होती कि दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत इतका विलंब झाला कि तोवर त्यांना वंध्यत्वावर उपचार (आय व्ही एफ) करून स्वतःचे मूल झाले. आणि दत्तक मूल आणि रक्ताचे मूल यात जमीन अस्मानाचा फरक आहे एवढेच मी म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

@मा. ऑ.

मुक्त विहारि
Sun, 07/02/2023 - 16:28 नवीन
अशा परिस्थित, दुसरे लग्न करणे, हा पण एक पर्याय होऊ शकतो... आणि असे लग्न झाले पण आहे ... https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/two-twin-sisters-married-with-one-boy-in-solapur-akluj-ask97 ------- कुणाला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही? हे ठरवण्याचा माझा हक्क आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इथे पती आपल्या हुशारीने

साहना
Mon, 07/03/2023 - 01:59 नवीन
इथे पती आपल्या हुशारीने पत्नीवर बळजबरी करत आहे. एकपत्नी असो वा बहुपत्नी हि गोष्ट चुकीची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

माझ्या दूरच्या ओळखीच्या एका

साहना
Mon, 07/03/2023 - 02:11 नवीन
माझ्या दूरच्या ओळखीच्या एका जैन परिवारांत अशीच गोष्ट घडली. पत्नीला सरळ ३ मुली झाल्या. पतीला पुत्र पाहिजे होता पण पत्नीच्या गर्भाशयांत शक्ती नव्हती. शेवटी पत्नीने पतीला पाहिजेच तर दुसऱ्या स्त्री कडून अपत्य प्राप्त करून घ्या असा सल्ला दिला. नक्की करार काय होता ठाऊक नाही पण सरोगसी नव्हते. शेवटी एक तरुण मुलगी पैश्यांच्या आशेने आली, गरोदर सुद्धा राहिली. पण मूल जन्माला आले ते अत्यंत रिटार्डेड. पहिली पत्नी मुलाचा सांभाळ करण्यास तयार नाही. दुसरीला पैसे पाहिजेत पण आपले मूळ असे तिच्या हातांत पूर्णतः सुपूर्द करण्यास पतीला वाईट वाटते अशी बरीच क्लिष्टता निर्माण झाली आहे. अपत्य प्राप्ती आणि त्यातल्या त्यांत पुत्र रत्न प्राप्ती हा भारतीय लग्नव्यवस्थेचा महत्वाचा घटक आहे असे किमान बाहेरून तरी दिसते पण एकूणच कायदे व्यवस्था विनाकारण क्लिष्ट करून ठेवली आहे. कोणाला किती पत्नी आणि किती पती असावेत ह्यावर कायदे असावेत असे मला वाटत नाही. पण समाज असल्या गोष्टी साठी अजून तयार नाही. त्यामुळे किमान अपत्य प्राप्ती दृष्टिकोनातून इतर पुरुष किंवा स्त्री कडून अपत्य प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ असली पाहिजे. अपत्य दत्तक व्यवस्था किती क्लिष्ट आहे ह्यावर आधीच एका मिपाकरांनी तळपायाची आग मस्तकाला जावी अश्या प्रकारचा लेख लिहिला होता. लेखकाचे नाव आठवत नाही पण लेखक टाटा मोटर्स मध्ये कामाला होते असे आठवणीत आहे. मोदी सरकारने एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे राष्ट्रीय स्तरावरची दत्तक CARA संस्था आणि २०२२ मधील नवीन नियम. ह्या मुले प्रक्रिया बरीच सुकर झाली असे असे दत्तक मार्गावर चालणाऱ्या एका मैत्रिणीने सांगितले. पण अजून तिला मूल काही मिळाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

@ मार्कस ऑरेलियस

सुबोध खरे
Mon, 07/03/2023 - 09:51 नवीन
@ मार्कस ऑरेलियस सदरहु व्यक्तीने आधीच दुसरे लग्न करुन स्वतःची अपत्यप्राप्तीची इच्छा पुर्ण केली असती. पुरुष जर नपुंसक असेल किंवा वीर्यात शुक्राणू कमी असतील/ अशक्त असतील ( ज्यामुळे त्या पुरुषाला मूल होणे शक्य नाही) तर त्या स्त्रीने त्या नवऱ्यासह राहून दुसरे लग्न करावे का? हे समाजाला कितपत मान्य होईल? किमान त्या स्त्रीने , आपल्याला शक्य नाही म्हणल्यावर पतीला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली असती आणि सुखनैव स्वतःचे ऑपरेशन करुन घेतले असते. शिवाय दुसर्‍या पत्नीकडुन झालेल्या स्त्रीचे अपत्यही प्रेमाणे , आईचा लळा लाऊन वाढवता आले असते. अशीच परवानगी एखादा पुरुष आपल्या बायकोला देईल का? आणि असे दोन बाप असलेले मूल दुहेरी उत्पन्न मिळाल्यामुळे श्रीमंत होईल आणि समाजाची भरभराट होईल असे आपल्याला वाटते का? जोवर समाजाची मनोवृत्ती इतकी प्रगल्भ होत नाही तोवर सद्यस्थिती वाईट नाही असेच म्हणावे लागेल. अर्थात याला स्वातंत्र्य म्हणावे कि स्वैराचार हा एक वादग्रस्त मुद्दा राहतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हिंदू धर्मात,

मुक्त विहारि
Mon, 07/03/2023 - 10:40 नवीन
बहु पतीत्व आणि बहु पत्नीत्व, ही गोष्ट होतीच आज देखील, काही जमातीत, बहू पतीत्वाची चाल आहेच https://hpgeneralstudies.com/what-is-polyandry-himachal-pradesh-general-studies/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पुरुष जर नपुंसक असेल किंवा

प्रसाद गोडबोले
Mon, 07/03/2023 - 23:21 नवीन
पुरुष जर नपुंसक असेल किंवा वीर्यात शुक्राणू कमी असतील/ अशक्त असतील ( ज्यामुळे त्या पुरुषाला मूल होणे शक्य नाही) तर त्या स्त्रीने त्या नवऱ्यासह राहून दुसरे लग्न करावे का? हे समाजाला कितपत मान्य होईल?
>>> स्त्री आणि पुरुष मुळातच समान नसतात. ते समान असतात असे विनाकारण आपल्या पिढीवर ठसवल्याने आपण गोंधळ करुन घेतला आहे . आपण वर लिहिलेल्या परिस्थिती मध्ये मी त्या स्त्रीला ४ ऑप्शन्स देईन > १. पतीच्या परवानगनीने , स्पर्मबँकेतुन स्पर्म वापरुन अपत्य जन्माला घालावे २. पतीच्या परवानगीने , पतीला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीचे स्पर्म वापरुन अपत्याला जन्म देणे. ( ह्याला पुर्वी नियोग असे म्हणत, आजच्या काळात अ‍ॅक्चुअल सेक्स करायची गरज नाही, नुसते स्पर्म वापरुन कार्यभाग साधता येईल.) ३. पती वरील पैकी कोणतीच परवानगी देत नसल्यास, पती नपुंसक आहे ह्या कारणाने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करुन अपत्य जन्माला घालावे. (नपुंसकता आणि अपत्य जन्माला घालण्यातील असमर्थता हे मानसिक क्रौर्य च असल्याने न्यायालय अगदी सहज घटस्फोट मान्य करेल. अर्थात त्या घटस्फोटात पतीला लुबाळुन देशोधडीला लाऊ नये इतकी माफक अपेक्षा आहे.) ४. पतीची परवानगी असेल तर दुसरे लग्न करायलाही हरकत नाही . पण हा डेंजरस ऑप्शन आहे कारण पती शारिरिक दृष्ट्या जरी नपुंसक असला तरी मानसिक दृष्ट्या नक्कीच नसतो, त्यामुळे बायकोवरील अन विशेष्तः पोरावरील हक्काच्या नादात एकामेकाचे मुडदे पाडण्याचा संभव जास्त आहे , तस्मात सख्खे भाऊ वगैरे असतील तरच हा पर्याय वापरावा.
अशीच परवानगी एखादा पुरुष आपल्या बायकोला देईल का? आणि असे दोन बाप असलेले मूल दुहेरी उत्पन्न मिळाल्यामुळे श्रीमंत होईल आणि समाजाची भरभराट होईल असे आपल्याला वाटते का?
लग्न ही अतिषय किचकट व्यवस्था आहे. पण जशी आहे त्या व्यवस्थेत पुरुष हा मालक आणि स्त्री ही सह्हाय्यक ह्या भुमीकेत आहे. शेतकरी आणि शेतजमीन असे नाते असते तसे काहीसे. एका जमीनीत पिक येत नाही म्हणुन एखाद्या शेतकर्‍याने दुसरी जमीन विकत घेऊन त्यात पिक घेता येईल , पण हेच एखाद्या शेतकर्‍याला शेती नीट करता येत नसल्याने दुसर्‍या कोणीतरी त्याच्या शेतात येऊन पिक घेऊन दाखवावे म्हणले तर त्यात मालकी हक्काचा वाद निर्माण होणारच ! आणि वादावादीने कोणत्याही समजाची भरभराट होत नाही. समाजाची भरभराट हाच उद्देश असल्यास कमाल शेतजमीन धारणा कायदा रद्द करावा , ज्याला उत्तम शेती करता येते , सांभाळता येते , उत्तम पिक घेतायेते , वाढवता येते त्यांन्ना वाट्टेल तितकी शेतजमीन घेण्याची परवानगी द्यावी. आजच्या स्त्रीमुक्तीच्या जमान्यात बायकांना वरील शब्दरचना आक्षेपार्ह वाटेल पण कायदा आणि समाजव्यवस्था तशीच आहे. आहे हे असं आहे . अजुन पुढे जाऊन म्हणतो कि आज काल तर जमाना इतका बदलला आहे की २५ लाखाची नोकरी असलेल्या एकपत्नीव्रती नवर्‍यापेक्षा , एक करोड उत्पन्न असलेला पण " बायको व्यतिरिक्त अजुन ३ बायका ठेवणार" असे म्हणणार्‍या पोराला पोरी जास्त पसंती देतील. ! ही वस्तुस्थीती आहे .
अर्थात याला स्वातंत्र्य म्हणावे कि स्वैराचार हा एक वादग्रस्त मुद्दा राहतोच.
कोण काय म्हणतो ह्याने आपल्याला का फरक पडावा ? मला जे माझ्या लॉजिकने योग्य वाटले ते मी लिहिले. तुम्हाला जे योग्य वाटले त्या नुसार तुम्ही सल्ला दिलात. आणि त्या कपल ला शेवटी जे वाटेल ते त्यांच्या विचाराने करतील. पण कॅन्सर होऊन हाल हाल होऊन निपुत्रिक मरण्यापेक्षा , पतीला दुसर्‍या लग्नाची किंव्वा अन्य स्त्रीकडुन अपत्य जन्माला घालायची परवानगी देणे , अन स्वतःचे ऑपरेशन करुन उर्वरीत आयुष्य निरागस गोड बाळाला खेळवत घालवणे हा माझ्यालेखी खुप लॉजिकल आणि सुखाचा पर्याय आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

१. पतीच्या परवानगनीने ,

सुबोध खरे
Tue, 07/04/2023 - 09:51 नवीन
१. पतीच्या परवानगनीने , स्पर्मबँकेतुन स्पर्म वापरुन अपत्य जन्माला घालावे २. पतीच्या परवानगीने , पतीला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीचे स्पर्म वापरुन अपत्याला जन्म देणे. ( ह्याला पुर्वी नियोग असे म्हणत, आजच्या काळात अ‍ॅक्चुअल सेक्स करायची गरज नाही, नुसते स्पर्म वापरुन कार्यभाग साधता येईल.) या दोन्ही बाबतीत मी स्वतः काम केलेले आहे आणि ते किती कठीण आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. शुक्राणू रहित वीर्य असणे( azoospermia) आणि नपुंसक( impotency) या दोन गोष्टी मुळात वेगळ्या आहेत. वीर्यामध्ये शुक्राणू नसले तरी माणूस समाधानकारक संभोग करू शकतो परंतु त्याला उपचारांशिवाय स्वतःचे मूल होणे अशक्य मुळात आपण नपुंसक आहोत हेच कितीतरी पुरुष मान्य करत नाहीत त्यामुळे त्यावर उपाय करणे कठीण जाते. नपुंसकतेच्या अनेक प्रकार आहेत ज्यात शुक्राणू सहित वीर्य असूनही संभोग न करू शकणे पासून मुळात पुरुषी संप्रेरकाचा अभाव असणे सारखे असंख्य प्रकार असतात ( टेस्टोस्टिरॉन नसणे, टेस्टोस्टिरॉनला शरीर प्रतिसाद न देणे सारखे) या खोलात मी जात नाही. परंतु आपण बायकोला मूल देऊ शकत नाही हे समाजाला समजूच नये याचा अनेक जण आटोकाट प्रयत्न करतात त्यात बायकोला बाहेरख्याली ठरवून मारहाण करणे आणि हाकलून देणे सारखे प्रकार होतात. (मूठ झाकलेलीच राहावी म्हणून) जे सम्भोग करू शकतात पण शुक्राणूरहित वीर्य असते त्यांना दुसऱ्या पुरुषाचे वीर्य आपल्या बायकोच्या शरीरात सोडणे हा प्रकार व्यभिचार वाटत राहतो. अशांचे समुपदेशन करावे लागते. लष्करात माणसे आपल्या गावापासून वेगळी राहत असल्याने त्यांना समजावणे सोपे असते. त्यांना सांगता येते कि तुम्हाला मूळ झाले नाही तर गावचे लोकांना सत्य समजून येईन यापेक्षा वीर्यदान करून घेऊन तुमची बायको गरोदर झाली तर हे मूल तुमचे नाही हे कोणालाहि समजणार नाही. मग तुम्ही नपुंसक असा किंवा शुक्राणूंचा अभाव. हा उपाय बहुतेक लोक निरुपायाने स्वीकारत असत. बायकांना तर स्वच्छ माहिती असे कि नवरा तर आपल्याला मूल देऊ शकत नाही. मग विर्यदात्याच्या वीर्याने झाले तरी मूल आपलेच असणार आहे. शिवाय आपण वांझ नाही हे सिद्ध करणे सहज सोपे असते. याशिवाय लग्नाचा नवरा सोडून जायची गरज नाही. सर्व काही झाकलेलेच राहते. ३. पती वरील पैकी कोणतीच परवानगी देत नसल्यास, पती नपुंसक आहे ह्या कारणाने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करुन अपत्य जन्माला घालावे. (नपुंसकता आणि अपत्य जन्माला घालण्यातील असमर्थता हे मानसिक क्रौर्य च असल्याने न्यायालय अगदी सहज घटस्फोट मान्य करेल. अर्थात त्या घटस्फोटात पतीला लुबाळुन देशोधडीला लाऊ नये इतकी माफक अपेक्षा आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

३. पती वरील पैकी कोणतीच

सुबोध खरे
Tue, 07/04/2023 - 10:00 नवीन
३. पती वरील पैकी कोणतीच परवानगी देत नसल्यास, पती नपुंसक आहे ह्या कारणाने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करुन अपत्य जन्माला घालावे. हे जितके सहज आपण टंकले आहे तितकेच ते अवघड आहे. नवरा नपुंसक आहे हे सिद्ध करणे जवळ जवळ अशक्य असते. त्यातून कोणताही माणूस असे सहजासहजी मान्य करणार नाही. आणि एकदा न्यायालयात खटला गेला कि आपण नपुंसक नसून बायकोच व्यभिचारी आहे आणि तिचे बाहेर संबंध आहेत म्हणून तिला घटस्फोट हवा आहे असे अत्यंत लांच्छनास्पद आरोप तिच्यावर भर न्यायालयात होतात. त्यातून शुक्राणूरहित वीर्य असले तर घटस्फोट मिळत नाही कारण न्यायालय साधारणपणे वीर्यदान हा पर्याय वापरायला सांगते. खटला हरण्याची स्थिती येते तेंव्हा नवरे ते मान्य करतात परंतु प्रत्यक्ष वीर्य दान करण्याच्या वेळेस बायकोला साफ विरोध करतात. यानंतर बायकोला परत न्यायालयाचा दरवाजा ठोठवायला लागतो. त्यात नवरा मला क्रूरपणे वागवतो म्हणून आरोप प्रत्यारोप होतात यावर परत केवळ मला मूल होत नाही म्हणून ती माझ्यावर क्रूरपणाचा आरोप करते आहे असा बचाव केला जातो. यात इतकी वर्षे आणि अमाप पैसे वाया जातो एवढा पैसे ती स्त्री स्वतः मिळवत असेल तर ठीक आहे परंतु किती बाप/ भाऊ आपल्या मुलीला/ बहिणीला असा आधार देतात हे आपण कधी पहिले आहे का? नसती ब्याद गळ्यात कशाला म्हणून ते आपल्या मुलीला "जमवून घे" असाच सल्ला देताना दिसतात. कागदोपत्री आपले उपाय अत्यन्त साधे सोपे वाटतात. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती पासून फार दूर आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

. पतीची परवानगी असेल तर दुसरे

सुबोध खरे
Tue, 07/04/2023 - 10:06 नवीन
. पतीची परवानगी असेल तर दुसरे लग्न करायलाही हरकत नाही याला कोणता कायदा परवानगी देतो? उगाच काहींच्या काही पण कॅन्सर होऊन हाल हाल होऊन निपुत्रिक मरण्यापेक्षा , पतीला दुसर्‍या लग्नाची किंव्वा अन्य स्त्रीकडुन अपत्य जन्माला घालायची परवानगी देणे , अन स्वतःचे ऑपरेशन करुन उर्वरीत आयुष्य निरागस गोड बाळाला खेळवत घालवणे हा माझ्यालेखी खुप लॉजिकल आणि सुखाचा पर्याय आहे ! मुळात तुम्हाला या विषयाची सखोल माहितीच नाही. मी लिहिलेल्या स्त्रीचा कर्करोग एक वर्षांपूर्वी निदान झालेलें असताना केवळ गर्भाशय काढून टाकून संपूर्ण बरा होण्यातला होता. यानंतर सरोगसी उपायाने तिला (आणि त्या नवऱ्याला) स्वतःच्या रक्तामासांचे मूल होणे शक्य होते. एक वर्षानंतर आता तो रोग किती पसरला आहे हे आता मला सांगता येणार नाही. पण जर पसरला नसेल तर अजूनही हाच उपाय वापरता येईल यासाठीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या मी त्यांना सांगितले. ते सोडून हे महाशय भलताच उपाय करत आहेत ज्यामुळे या स्त्रीला संपूर्ण रोगमुक्त होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे हे आपल्याला लक्षात येत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

याला कोणता कायदा परवानगी देतो

प्रसाद गोडबोले
Tue, 07/04/2023 - 21:49 नवीन
याला कोणता कायदा परवानगी देतो? उगाच काहींच्या काही
हेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात म्हणालो होतो, की कायद्याने गोची करुन ठेवली आहे. तुम्हाला नराधम म्हणायचे असेल तर ज्यांन्नी कायदा केला अन लोकांवर ही आणली त्यांना म्हणा . पतीला अपत्य हवेच असेल तर पत्नीने घटस्फोट देऊन पतीला दुसर्‍या लग्नाची अनुमती देणे अन स्वतःवर योग्य ते उपचार करुन जीव वाचवुन घेणे हाच एकमेव प्रॅक्टिकल उपाय आहे. बाकी इतके पुरे. आपल्या वैद्यकीय ज्ञानावद्दल आदर आहे पण त्या पुरुषाला "नराधम " म्हणणे हे काही पटले नाही. अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ इच्छा आहे, आणि कायदा दुसर्‍या लग्नाची परवानगी देत नाही म्हणुन तो माणुस आगतिक आहे बस्स इतकेच मला जाणवले ! कॉलिंग नराधम .... धिज इज जस्ट टू मच प्रीजुडाईस! यु मस्ट बी अ व्हेरी गूड डॉक्टर बट यु आर सर्टनली नॉट अ गूड जज ! इत्यलम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ह्यात मुल हवे म्हणुन घटस्फोट मिळत नाही.

Trump
Tue, 07/04/2023 - 22:23 नवीन
पतीला अपत्य हवेच असेल तर पत्नीने घटस्फोट देऊन पतीला दुसर्‍या लग्नाची अनुमती देणे अन स्वतःवर योग्य ते उपचार करुन जीव वाचवुन घेणे हाच एकमेव प्रॅक्टिकल उपाय आहे.
हाही उपाय चुकीचा आहे. हिंदु विवाह कायद्यानुसार पुढील प्रकारे घटस्फोट मिळवु शकतो.
1.Grounds for Divorce under the Hindu Marriage Act, 1955 The following are the grounds for divorce in India mentioned under the Hindu Marriage Act, 1955. Adultery – The act of indulging in any kind of sexual relationship including intercourse outside marriage is termed adultery. Adultery is counted as a criminal offense and substantial proof are required to establish it. An amendment to the law in 1976 states that one single act of adultery is enough for the petitioner to get a divorce. Cruelty – A spouse can file a divorce case when he/she is subjected to any kind of mental and physical injury that causes danger to life, limb and health. The intangible acts of cruelty through mental torture are not judged upon one single act but series of incidents. Certain instances like the food being denied, continuous ill-treatment and abuses to acquire dowry, perverse sexual act etc are included under cruelty. Desertion – If one of the spouses voluntarily abandons his/her partner for at least a period of two years, the abandoned spouse can file a divorce case on the ground of desertion. Conversion – In case either of the two converts himself/herself into another religion, the other spouse may file a divorce case based on this ground. Mental Disorder – Mental disorder can become a ground for filing a divorce if the spouse of the petitioner suffers from incurable mental disorder and insanity and therefore cannot be expected from the couple to stay together. Leprosy – In case of a ‘virulent and incurable’ form of leprosy, a petition can be filed by the other spouse based on this ground. Venereal Disease – If one of the spouses is suffering from a serious disease that is easily communicable, a divorce can be filed by the other spouse. Sexually transmitted diseases like AIDS are accounted to be venereal diseases. Renunciation – A spouse is entitled to file for a divorce if the other renounces all worldly affairs by embracing a religious order. Not Heard Alive – If a person is not seen or heard alive by those who are expected to be ‘naturally heard’ of the person for a continuous period of seven years, the person is presumed to be dead. The other spouse should need to file a divorce if he/she is interested in remarriage. No Resumption of Co-habitation – It becomes a ground for divorce if the couple fails to resume their co-habitation after the court has passed a decree of separation. https://timesofindia.indiatimes.com/readersblog/lawpedia/grounds-for-divorce-in-india-35652/
ह्यात मुल हवे म्हणुन घटस्फोट मिळत नाही. जरी परस्पर संमतीने घटस्फोट हवा असेल तरी त्याला एक ते तीन वर्षे लागु शकतात. त्या बायकोने नडण्याचे ठरवले तर त्या पुरुषाचे बारा वाजतील आणि किती वेळ लागेल, खर्च किती होईल ते सांगता येत नाही. येथे तीला कर्करोग झाला आहे म्हणजे पुर्ण सहानुभुती तिला जाणार. आई/बाप होण्यासाठी एक ठराविक वय असते, ते उलटुन गेले की कितीही उपाय केली तरी उपयोगी पडत नाहीत. स्त्रीहट्ट आणि बालहट्ट यापुढे कोणाचे काय चालते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ

सुबोध खरे
Wed, 07/05/2023 - 11:47 नवीन
अपत्यप्राप्ती ही निसर्गसुलभ इच्छा आहे, आणि कायदा दुसर्‍या लग्नाची परवानगी देत नाही म्हणुन तो माणुस आगतिक आहे बस्स इतकेच मला जाणवले ! हे दोन मुद्दे वेग वेगळे आहेत. किती तरी बायकांना मूल होत नाही म्हणून नवऱ्याने त्यांना सोडूनच द्यायला पाहिजे का? किंवा एखादा पुरुष नपुसंक असेल तर बायकोने बाहेरख्यालीपणा करून गर्भधारणा करून घ्यायला हवी का? अगदी इथपर्यंतहि मान्य केले तरी काहीही करून नवऱ्याला मूल हवेच ही त्याची इच्छा मान्य आहे परंतु त्यासाठी बायकोचा जीव धोक्यात घालणे हे काही पटले नाही. याचे कारण हा कर्करोग आहे हे चाचण्यातून स्पष्टपणे सिद्ध झालेले आहे या शिवाय अनेक डॉक्टरांनी त्याला लवकरात लवकर गर्भाशय काढून टाका अन्यथा तिच्या जीवाला धोका आहे असाच सल्ला दिलेला आहे असे असताना हा मनुष्य ते उपचार करायला तयार नाही. सद्य स्थितीत आपल्या पत्नीला गर्भधारणा होणे माझ्या ज्ञानाप्रमाणे जवळ जवळ अशक्य आहे हे मी त्याला स्पष्टपणे सांगितले आणि उपचार न केल्यास तिच्या जीवाला धोका आहे हे हि स्पष्टपणे सांगितले तरीही त्याची बायकोवर उपचार करुन घेण्याची तयारी दिसली नाही. कदाचित त्याची विचारसरणी अशीही असेल कि आपण केलेल्या अक्षम्य दिरंगाई मुले बायको मरेल. त्यानंतर आपण दुसरे लग्न करायला मोकळे होऊ. (हा केवळ एक तर्क आहे. असा कोणताही संवाद किंवा तसा संदेश नवऱ्याकडून मला दिसला नाही). परंतु ज्या बायकोला जन्मभर सुखात आणि दुःखात साथ देऊ हि वचने देऊन लग्न केल्यावर दुर्धर रोग झाल्यावर बायकोच्या उपचारात अक्षम्य दिरंगाई करणे हे केवळ अत्यंत नीच वृत्तीचे लक्षण आहे त्यामुळे मला तो माणूस नराधमच वाटतो. मग इतर कुणाला काहीही वाटो आपल्याला मी पूर्वग्रहदूषित वाटलो तर तसे समजण्याचा आपला अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काहीही करून नवऱ्याला मूल हवेच

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/06/2023 - 00:53 नवीन
काहीही करून नवऱ्याला मूल हवेच ही त्याची इच्छा मान्य आहे परंतु त्यासाठी बायकोचा जीव धोक्यात घालणे हे काही पटले नाही.
करेक्ट ! मी फक्त इतकेच म्हणत आहे की त्या बिचार्‍या बायकोचा जीव धोक्यात घालणारा तिचा नवरा नसुन कायदा आहे ! तुमच्या लेखी व्यक्ती नराधम आहे आणि माझ्या लेखी त्या व्यक्तीला त्या परिस्थितित पाडणारा कायदा नीच नराधम आहे ! बस्स इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा