नास्तिक
नास्तिक म्हणजे काय ?
-नास्तिक म्हणजे देवावर विश्वास नसणारा माणूस.
विश्वास नसणे म्हणजे काय ?
- देव आहे असे मानण्यास कसलेही कारण नाही, त्यामुळे देव आहे असा विश्वास नाही.
देवावर विश्वास नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे सत्य मानणे आहे का ?
- नाही.
पण असे कसे ? देव अस्तित्वात आहे हे मान्य नसणे म्हणजे देव अस्तित्वात नाही हे मान्य झाले की !
- तीन वेगवेगळी वाक्य -
१. देव अस्तित्वात आहे.
२. देव अस्तित्वात नाही.
३. देव अस्तित्वात असल्याचा अथवा नसल्याचा कोणताही पुरावा नाही.
पहिली दोन वाक्ये सोपी आहेत. तिसऱ्या वाक्यासंबंधित-
-जोपर्यंत एखादी गोष्ट अस्तित्वात आहे ह्याचा पुरावा मिळत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट अस्तित्वात आहे ह्यावर विश्वास ठेवत नाही. तसेच, एखादी गोष्ट अस्तित्वात नाही ह्याचा पुरावा नाही म्हणून आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. युनिकॉर्न, दंतपरी, ब्रम्हराक्षस, रक्तपिपासू, ड्रॅगन ह्यांच्या अस्तित्वात असण्याचा व नसण्याचा कसलाही पुरावा नाही. आपण जनरली त्यांचे अस्तित्व मानत नाही. तिसरे वाक्य हे विश्वास नाकारणे आहे. अस्तित्वावर विश्वास नाकारणे म्हणजे अस्तित्व नाहीच ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (Rejection of a belief is not acceptance of the opposite.)
ह्याचे एक प्रात्यक्षिक उदाहरण -
राजू आणि संजू कॉलेजातले एकमेकांचे कट्टर शत्रू असतात. त्यांची दुष्मनी जगजाहीर आहे. एका दिवशी संजूच्या पालकांना सकाळी संजूच्या खोलीत त्याचा खून झालेला आढळतो. साहजिकच पोलीस राजुकडे संशयित म्हणून वळतात. पोलिसांना काय पुरावे सापडले ह्याच्या तीन केसेस पाहू.
१. राजुच्या हाताचे ठसे असणारा आणि संजुच्या रक्ताचे डाग असलेला चाकू सापडला. ह्यावरून पोलीस निष्कर्ष काढतात की राजूनेच संजूचा खून केला.
२.चाकू वैगरे काही सापडले नाही, उलट संजू ज्या रात्री मारला गेला त्या दिवशी राजू परगावी होता ह्याचा पुरावा सापडला. त्यामुळे, पोलीस निष्कर्ष काढतात की खून राजुने केले असणे अशक्य आहे, कारण तो तर ह्या गावातच नव्हता. त्यामुळे, पोलीस राजू निर्दोष आहे असा निर्वाळा देऊ शकतात.
३. पोलिसांना चाकू तर सापडत नाहीच, आणि राजूला तो कुठे होता विचारल्यावर तो सांगतो मी तर माझ्या घरीच होतो. म्हणजे पोलिसांना राजुच्या दोषी किंवा निर्दोष असण्याबद्दल कसलाही पुरावा सापडत नाही. पोलीस राजुबद्दल काहीही निष्कर्ष काढू शकत नाहीत. राजू दोषी असल्याबद्दल पुरावे नसल्याने अर्थातच त्याला काही शिक्षा झाली नाही. पण पोलिसांनी राजू निर्दोष असण्याचा निर्वाळा दिला असेही नाही.
पहिली केस म्हणजे देव अस्तित्वात असल्याचा पुरावा आहे त्यामुळे देव आहे हे मानणे.
दुसरी केस म्हणजे देव नसण्याचा पुरावा असल्याने देव अस्तित्वात नाही हे मानणे.
तिसरी
म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा पुरावा नसण्याने देव अस्तित्वात आहे हे मान्य न करणे. इथे हे महत्वाचे आहे - देवाच्या अस्तित्वावर विश्वासाचा अभाव म्हणजे देव नाही ह्यावर विश्वास ठेवणे नव्हे. दोन भिन्न गोष्टी आहेत. इथे राजू खुनी आहे ह्यावर विश्वास ठेवण्यास नकार देणे म्हणजे राजू निर्दोष आहे ह्यावर विश्वास ठेवणे नाही. (ह्याचे उलटे सुद्धा खरेच आहे. राजू निर्दोष आहे हे न स्वीकारणे म्हणजे राजू दोषी आहे हे स्वीकारणे होत नाही.) तसेच, देव अस्तित्वात आहे हा विश्वास नाकारणे म्हणजे देव अस्तित्वात नाही असा विश्वास ठेवणे नाही. तसेच, देव अस्तित्वात नाही ह्यावर विश्वास ठेवणे नाकारणे म्हणजे देव आहे ह्यावर विश्वास ठेवणे नाही.
तू देवाचे अस्तित्व अशक्य आहे असे मानतोस का ?
- नाही. कारण तसा पुरावा नाही.
म्हणजे तू देवाचे अस्तित्व शक्य आहे हे मान्य करतोस का ?
- नाही. देवाचे अस्तित्व अशक्य नाही ह्याचा पुरावा नाही, तसाच देवाचे अस्तित्व शक्य आहे ह्याचाही पुरावा नाही.
असे कसे ?
- देवाचे अस्तित्व शक्य आहे असे मानायला सुध्दा कसलाही पुरावा नाही. देवाच्या अस्तित्वाची शक्यता, अशक्यता ठामपणे सांगता येईल असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. पुराव्याच्या अभावे शक्य अशक्य बाबींवर कसलेही भाष्य करणे शक्य नसते. आपण एखादी बाब शक्य आहे असे तेव्हा म्हणतो (उदा.) जेव्हा आपण ती घटना प्रत्यक्ष तपासली आहे किंवा तपासू शकतो. उदा, बॅटने चेंडू सीमापार टोलवणे शक्य आहे कारण आपण तसे होताना खूपदा पाहिले आहे. पण, जर तुम्ही चेंडूचे वजन किंवा सीमेची त्रिज्या हळूहळू वाढवत गेला तर एक असा बिंदू येईल जिथे तुम्हाला म्हणावे लागेल की मला हे शक्य आहे की नाही हे माहिती नाही.
अज्ञेयवादी आणि नास्तिक ह्यामध्ये फरक काय ?
- "देवाच्या अस्तित्वाबद्दल ह्याबद्दल कोणतेही ठाम दावे करता येत नाहीत" हे वाक्य दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगितले की माणूस नास्तिक किंवा अज्ञेयवादी होतो -
देव आहे असे दाखवणारे पुरावे नसल्याने देव आहे ह्यावर मी विश्वास ठेवत नाही - नास्तिक.
देव आहे की नाही मला माहीत नाही - अज्ञेयवादी.
पण, अज्ञेयवाद असा पण आहे , की माणसाला देव असला काय आणि नसला काय, देवाच्या अस्तित्वाबद्दल खात्रीशीर माहिती मिळणे अशक्य आहे. त्या व्याख्येनुसार माणूस अज्ञेयवादी नास्तिक सुद्धा असू शकतो - असा माणूस ज्याच्या देवावर विश्वास नाही आणि ज्याला वाटते देवाच्या अस्तित्वाबद्दल काहीही माहिती मिळवणे अशक्य आहे.
थोड्या वेळ देव खरेच आहे की नाही बाजूला ठेव. पण देवावर विश्वास ठेवण्यात वाईट काय आहे ? लोकांना मानसिक शांती मिळत असेल तर देवावर विश्वास का ठेऊ नये ?
- स्वतःची फसवणूक करणे चांगले नाही. एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवल्याने मानसिक शांती मिळते, म्हणून तो विश्वास खरा होत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद.