शापित यक्ष!--१

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
26 Jan 2023 - 7:14 pm

I am Ubik. Before the universe was I am. I made the suns. I made the worlds. I created the lives and the places they inhabit; I move them here, I put them there. They go as I say, they do as I tell them. I am the word and my name is never spoken, the name which no one knows. I am called Ubik but that is not my name. I am. I shall always be.

------------Ubik-Philip K Dick

त्याचे नाव? पहा मला पण नेमकं आठवत नाही. काही तरी “स” ने सुरुवात होणारे होते. समीर? सदानंद? सज्जन? सतीश? सत्येन? नाही. असं बंगाली वाटणारं निश्चित नव्हतं. नावात काय आहे? आपण त्याला एक्स म्हणूया.

हा माणूस –त्याला माणूस का म्हणायचे हा बाकी एक प्रश्नच होता- हा जन्मजात बावळट होता.

त्याच्या बावळटपणाची लक्षण अगदी लहानपणापासून दिसायला लागली होती. एक्स कधीही रडला नाही. अगदी जन्माला तेव्हा देखील. केव्हढा हा बावळटपणा! इतर मुलांचे आई बाप मुलांच्या रडण्याला कावतात. इथं हा रडत का नाही म्हणून एक्सची आई वैतागलेली. दुसऱ्या आया तिचा हेवा करत.

“खरच कित्ती कित्ती गुणाचं बाळ. एकदा मणजे एकदाही आवाज नाही हो.” एक्सच्या आईला भीती वाटायची. हा मुका तर नाहीना.

असा हा एक्स कसाबसा मोठा होत होता. वयाने मोठं होणे कुणाला थांबवता येतं का? काही काही गोष्टी असतात त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयही स्टे ऑर्डर देऊ शकत नाही.

तसच एक्सने कशासाठी कधी हट्ट केला नाही. त्याच्या आईला हेही काळजीचे कारण.

लहान मुलांनी हट्ट करावेत आणि आई बाबांनी ते खोटा खोटा राग करून ते पुरवावेत ही जनरीती.

एक्स तीन वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आईने ठरवले कि ह्याला आता नर्सरीत अडकवले पाहिजे. कदाचित त्यामुळे, इतर मुलांच्या सहवासाने ह्या खुळ्याला काही जाण येईल. मग काय आई बाबांनी त्याच्या साठी सहा पोशाख आणले. बूट आणले. पाण्याची वाटरबॉटल आणली. एक फॅन्सी टोपी आणली.

“एक्स, चल आवर बाळा, शाळेत जायची वेळ झाली.” आई म्हणाली. आज शाळेचा पहिला दिवस.

तो काय आवरणार? आईनेच त्याचे कपडे केले.

“हं आता बूट घाल. तवर मी पाणीबाटलीत पाणी भरून घेते.”

आई परत आली. एक्स बूट घालून तयार होता.

आईचे बोट धरून चालायला लागला. त्याची ती वेडीवाकडी चाल पाहून आईला संशय आला. बघते तर काय डावा बूट उजव्या पायात आणि उजवा बूट डाव्या पायात.

“असा कसा रे वेंधळा तू?” आईने बूट आदलाबदली केले.

आता आईला नवीन काळजी. तिनं काय करावं? तिनं डाव्या बुटावर हिरव्या स्केचपेनने हिरवा डॉट दिला आणि उजव्या बुटाला तसाच लाल डॉट दिला.

“हिरवा डॉटवाला बूट हिरव्या पायात घालायचा आणि...”

एक्स काय समजायचे ते समजला. त्याला एक समजलं नाही कि दोनी बुटावर खुणा करायची काय गरज? एका बुटावर खूण केली की बास. डावे उजवे बूट ही एंटॅंगल्ड जोडी होती ना? हे आईला समजावणे कठीण होते.

एनीवे दोन दिवसांनी पुन्हा प्रोब्लेम.

“आता काय झाले, येक्षु?”

“आईग, डावा पाय कुठला?” डावा बूट हातात घेऊन एक्सने आईला विचारलं.

आईने कपाळावर हात मारून घेतला. तिच्या डोळ्यात आसवें आली. एक्सला आईचे दुःख बघवेना.

तुम्ही विश्वास ठेवणार नाही हे मला चांगले माहित आहे तरीही सांगतो.

त्याने एक “डावा-उजवा” नावाचे अॅप बनवले आणि ते आपल्या पायांत टाकले. आता त्याचा गोंधळ होत नाही. आधी त्याला ते अॅप मेंदूत टाकायचे होते. पण त्याला लगेच आठवले. “डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टीम”चे तत्व ध्यानात आले. जिथलं काम तिथेच करायचे.

तो क्वचितच कुणाशी आपणहून बोलत असे. कुणी बोललाच तर जेव्हढ्यास तेव्हडे उत्तर जायचे. गणितासारखा विषय त्याला शिकवावा लागत नव्हता तर भाषा विषाय शिकवूनही समजण्यासारखा नव्हता. एक वाक्य बनवायचे तर एकेक शब्द शब्दकोशातून पकडून आणावे लागत होते. त्याचेही अॅप बनवले होते. पण ते सपशेल फेल गेले. त्याला एक समजलं की जी गोष्ट त्याला मनापासून करायची इच्छा नाही तिथे अॅप करून देखील काही फायदा नव्हता.

पण एक्स हा सर्वसाधारण मुलगा नव्हता. सर्वसाधारण म्हणजे ज्याला इंग्रजीत अवरेज म्हणतात तसा.

कस ते पहा.

एकदा त्याचे बाबा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची क्रिकेटची मॅच (tv वर) बघत बसले होते.

“हा, आता कसं. शेवटी लॉ ऑफ अवरेजेसच खरा. पाच वेळा टॉस सलग हरल्यावर आता ह्या वेळी धोणीने टॉस जिकला त्यात नवल ते काय!” बाबा बडबडत होते.

ह्याला खर म्हणजे “जुगाऱ्याचा तर्कदोष” अस म्हणतात. पण बाबा काय बघता बघता फेकत.

“लॉ ऑफ अवरेज?” मितभाषी एक्सने विचारले.

“म्हणजे शंभर वेळा टॉस केला तर पन्नास वेळा छाप आणि पन्नास वेळा काटा येणार. फिफ्टी फिफ्टी चान्स.”

ह्याला “लॉ ऑफ अवरेज” का प्रोबॅबिलीटी म्हणायचं ते तुम्हीच ठरवा.

“नाही.”

एक्सला म्हणायचे होते, “नाही. मी मानत नाही. मी तुम्हाला शंभर टॉस करून दाखवतो. पहा काय होते ते.”

एक्सच्या आई बाबांना तो जे अस अध्याहृत बोलतो ते सगळे बिनचूक समजते बरका मंडळी.

एक्सने घरात जाऊन दहा रुपयाचे नाणे आणले.

“पहा.”

एक्सने शंभर वेळा नाणेफेक केली. शंभरही वेळा छाप!

बाबा बघतच राहिले.

“एक्स, हा तुझा चावटपणा माझ्या समोर चालणार नाही. मला बघू देत ते दहा रुपये.”

बाबांनी दहा रुपये उलटून पालटून बघितले. दोनी बाजूला छाप तर नाही? नाणे अगदी सही होते. एका बाजूला तीन सिंह आणि दुसऱ्या बाजूला प्रातःस्मरणीय संताची प्रतिमा. सरते शेवटी भारत सरकारने जारी केलेले नाणे होते ते. त्याचा संशय कसा घेणार? त्याला खोटं कसं म्हणणार? पण काय असतं ना की कधी कधी एखादं नाणं “बायस्ड” असू शकतं.

त्यांनी आपल्या पाकिटातून दहा रुपयांचे नवीन नाणे काढले.

“बेटा, बघ आता गणिताची गंमत.”

त्यांनी शंभर वेळा नाणे उडवले. बरोबर अठ्ठे चाळीस वेळा छाप आणि बावन्न वेळा काटा. त्यांनी विजयी मुद्रेने एक्सकडे बघितले.

“हजार ट्रायल केल्या तर पाचशेएक वेळा छाप आणि चारशेनव्याणव वेळा काटा येणार. आता दाखव तुझी कारामत ह्या दहा रुपयावर.”

एक्सने आपली “करामत” दाखवली. शंभर वेळा छाप!

बाबांनी नाद सोडला.

बाबांना एक्सच्या असल्या करामतींची सवय झाली होती.

मागे एकदा बाबा त्याला चतुःशृंगीच्या जत्रेला घेऊन गेले होते. देवीचे दर्शन घेतल्यावर जत्रेत दोघं टाईमपास करत होते. पिघलनेवाली लडकी, मृत्युगोलातली फटफटी, दोन तोंडाचा कुत्रा इत्यादी बघितल्यावर ते आले ते रिंग फेकण्याच्या खेळाकडे.

चादरीवर तऱ्हे तऱ्हेच्या वस्तू मांडल्या होत्या. पार्लेजीचा बिस्कीटांचा मोठ्ठा पुडा, दोन सेलची विजेरी, पांढरी अंडी देणारा कोंबडा (कोंबडा नाही येक्षू. कोंबडी म्हण), लोकल रेडीओ, डोक्यावर चमचम लाईट असलेला रोबोट, बाकी इतर ठिकाणी सटर फटर गोळ्या.

“दहा रुपये द्या आणि तीन डाव रिंग फेकून बघा. रिंगमध्ये जे येईल ते घेऊन जा. मजा करा. जो जीतेगा वोही सिकंदर.”

एक्सने बाबांकडे बघितले.

“येक्षु, नो, नाही. नो जुव्वा.”

“जुव्वा? नो. स्किल, स्किल.”

“रावसाहेब बेटा ठीकही बोल रहा है. ये जुव्वा थोडेही है? ये ईसकीलका खेल है.”

पथारीवाला बाबांना भरीस पाडत होता. अखेरीस बाबांनी दिले बाबा दहा रुपये काढून. पथारीवाल्याने तीन रिंगा येक्षुच्या हातात दिल्या.

येक्षुने बाबांच्याकडे बघितले. तो नजरेनेच विचारात होता, “बोला बाबा काय पाहिजे तुम्हाला?”

Not failure, but low aim, is the crime
छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची.
बाबांनी विचार केला. एवीतेवी दहा रुपये गेले आहेतच. एफएम रेडीओ बरा दिसतो आहे. निदान शंभर रुपयांचा तरी असेलच.
“येक्षु, एफएम रेडीओ!”
येक्षुने रिंग फेकली आणि आला की रेडीओ रिंग मध्ये.
“आता?”
“आता? ती विजेरी. टॉर्च.”
येक्षुने दुसरा ट्राय घेतला आणि विजेरी हस्तगत केली.
बाबांच्या तल्लख डोक्यात प्रकाश पडला. येक्षुचा चावटपणा सुरु झाला होता.
पथारीवाला धावत आला.
“मायबाप, आवरा आपल्या छोकऱ्याला. पीठपर मारो, लेकीन पेटपर मत. तुम्ही मला असं धुतलं तर मी धंदा कसा करू?” गयावया करू लागला.
बाबांना ते पटलं.
“येक्षु बस झलं. त्याचं सामान त्याला परत कर.”
तर असा हा येक्षु आणि असे त्याचे बाबा.
येक्षुच्या घरात एक बोका होता. हल्लीचे बोके शाकाहारी झाले होते. उंदीर? छ्या. बिचाऱ्याला का आई नाही? त्याला पण भाऊ बहीण असतीलच की. बिळात ते त्याची वाट पहात असतील. हल्लीचे बोके बोकेसन्याशीपणा करत नाहीत तर उंदराची चव दुधावर भागवतात.
तर हा बोका रोज चोरून दुध प्यायला सोकावला होते. बोका दुध पिऊन गेला कि मग आईचा तोंडपट्टा सुरु व्हायचा.
“’येक्षु, तू स्वतःला मोठा हुशार समजतोस ना? मग ह्या बोक्याचा एकदाचा बंदोबस्त कर. मी गड्याला सांगितले तर त्याने ह्याला पोत्यात घालून शाळेच्या पटांगणात सोडले होते. स्वारी दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर. माझ्या राशीला लागला आहे जणू.”
मग येक्षुने काय करावे? त्याने बोक्याला दुसऱ्या मितीत पाठवून दिले. पण येक्षुच्या “मितीवहनात” थोडी त्रुटी राहून गेली. मांजर गेले पण त्याचे “म्याव” मात्र मागे रेंगाळले. ते “म्याव”, “म्याव” “म्याव” करत घर भर फिरत होते. चेशायर कॅटच्या स्मितहास्यासारखे.
सगळ्या आई बाबांप्रमाणे येक्षुच्या आई बाबांनाही वाटायचे येक्षुने लवकर मोठं होऊन आयआयटीची जेइइ उडत्या रंगाने पास करून आयआयटीत जावे, मग आयएम ला जाऊन एखाद्या बहुदेशीय कंपनीत कोटी रुपयांचे...
केव्हढी मोठी महात्वाकांक्षा! महात्वाकांक्षांचं असच असत. कधी संपतच नाही. ये दिल मांगे मोर!
दुसरी मुले उड्या मारत मारत देशपांडे स्कॉलर्स अकॅडमीतून कुलकर्णी विज्ञान, तिथून बावरा ऑनलाईन, बैबल्लू अशी जेइइची तयारी करतात तर येक्षु पाय π ची गणितं करत बसायचा.
ह्या π वरून बरी आठवण झाली. आजच मी वाचल की कुणा एका महाभागाने π ची किंमत ६४ त्रिलिअन डेसिमल पॉईंट पर्यंत काढली आहे. येक्षुला हे माहित आहे. त्याला एका गोष्टीचे नवल वाटते ते हे कि निसर्ग ठीकठिकाणी पाय वापरतो. मग तो एव्हढी मोठी संख्या कशी लक्षात ठेवत असेल. ते काही नाही आजपासून पायची किंमत ३.१४.
पण निसर्गात मात्र उलथापालथ सुरु झाली. विश्वाची वक्रता बदलली. सपाट विश्वाचे वक्र विश्व झाले. त्यामुळे जे काय होणार होते त्याला कित्येक कोटी वर्ष लागणार होती, त्याची काळजी आत्ता कशाला. सध्या आपण येक्षुची काळजी करू यात.
येक्षुला अजिबात घाई नव्हती. तो एक सेकड प्रति सेकंद ह्या वेगाने मोठा होत होता. येक्षुला खात्री होती कि तो दहावी बोर्डाची परीक्षा पास होऊ शकणार नाही. भाषेच्या अडथळ्यांची शर्यत कशी पार करणार? मराठीतून सुटलो तर इंग्रजी ईSSSS करून उभे. मग हिंदी हिSSSS करून आडवे येणार.
तर असा हा शापित यक्ष! कुठून आला? का आला?
(क्रमशः)

कथासाहित्यिक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

26 Jan 2023 - 8:00 pm | चांदणे संदीप

येक्षू ने तर डोस्क्याचा यक्स वाय झेड करून टाकला.
पुढल्या भागात तरी काही समजेल अशी आशा आहे. तस्मात्, पुभाप्र.

सं - दी - प

भागो's picture

27 Jan 2023 - 7:43 pm | भागो

काय आहे हे नक्की?
Flatland: A Romance of Many Dimensions by Edwin Abbott Abbott
१८८४ लिहिलेली ही कादंबरी जरूर वाचा.
https://www.gutenberg.org/ebooks/201 इथून बिनधास्त डाऊनलोड करा.
तसेच ही पण वाचा.
Sphereland : a fantasy about curved spaces and an expanding universe
ही अजून एक.
काय करायचं की आर्काइव्ह.org चे मेंबर व्हा आणि नंतर ही कादंबरी १४ दिवसांसाठी इश्यू करून घ्या.
नो चार्जेस!
https://archive.org/details/spherelandfantas00burg

चांदणे संदीप's picture

14 Feb 2023 - 5:30 pm | चांदणे संदीप

ओके, वाचतो. मी अधूनमधून जातच असतो आर्काईव्ह साईटवर.

सं - दी - प

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Feb 2023 - 7:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

काय तो व्यासंग!! एका पॅरा चा दुसर्‍याला संदर्भ लागेना. दंडवत घ्या!!

मला राहुन राहुन वाटतेय की ही आइन स्टाईन ची गोष्ट आहे की काय. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारी वस्तू असल्यास ती मागे मागे जात आहे असे वाटेल तसे काहीतरी या येक्षुचे लफडे असणार बहुतेक.

असो. कथा आवडली. पुभाप्र.