बहारो फूल बरसाओ....

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Jun 2022 - 11:42 pm

बहारो फूल बरसाओ मेरा महेबूब आया है......
हिंदी सिनेमातलं हे गाणे जणू खास बँडवाल्यांसाठे मुद्दाम होउन लिहीले असावे असेच वाटते. मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे.
लहानपणे म्हणे टीव्हीवर एकदा हे गाणे लागले होते तेंव्हा मी आईला विचारले होते की "आई या गाण्यात बँडवाले कुठे आहेत? वरात कुठे आहे. काहीतरी चुकतय." माझा प्रश्न ऐकून घरातले सगळे खो खो हसत सुटले होते. तो एक किस्साच होऊन बसला होता. कोणतेही लग्न असले आणि त्यात हे गाणे वाजू लागले की सगळे इतर कुठे पहायच्या ऐवजी माझ्याकडेच पहायला लागतात. इतक्या वर्षांनंतरही. दाद्याने तर या गाण्याचे नामकरण मोहंमद रफीचे गाणे असे न करता मिराचे गाणे असेच केले. कधीही रेडीओवर ते गाणे लागले की तो अजूनही मिराचे गाणे लागले असेच म्हणतो.
खास सजवलेल्या घोड्यावरून नवरदेव त्याच्या त्याचे नाचणारे मित्र आणि त्यापुढे पुढे बँडवाले. खरेतर हे गाणे नाचण्यासाठीचे नाहिय्ये पण तरीही ते नाचताहेत. लग्नाच्या वरातीत नाचण्यासाठी पण खास गाणी आहेत. आज मेरे यार की शादी है... किंवा मग अगदी हमखास नाचायचे गाणे म्हणजे मुंगळा मुंगळा...... किंवा भोली सूरत दिलके खोटे .... बँडमधल्या त्या भल्या थोरल्या तोंडाचा पितळी ट्रंपेट , क्लॅरेनॉट , कॅसिओ चे सम्मिश्र स्वर आणि त्या सोबत ते ढोल आणि ड्रम वर ढांगु टुकू टप्पा टप्पा चा ताल. हा त्या नाचणाराना काय मोहीत करतो कोण जाणे. ताल समजत असो नसो इतरांना कसे दिसो याचा विचार न करता सगळे नाचायला लागतात.
गाणे संपायच्या वेळेस गाण्याचा वेग वाढतो. सहाजिकच नाचण्याचा वेग वाढतो. गाणे संपते. ढोल , ड्रम वरची थाप थांबते.पण नाचणे असे अचानक थांबवता येत नाही. दोन एक क्षण काहीच वाजत नसते पण नाचणारांचे नाचणे थांबलेले नसते. त्यांच्या अंगात ताल भिनलेला असतो. मग वरातीत मिरवणारे सोबतचे एखादे काका खिशातुन दहा रुपयाची नोट काढून नाचणारावरुन ओवाळतात आणि बँडवाल्यापैकी कोणाकडे देतात. देताना एक फर्माईश सांगतात. आणि नागीन सिनेमातले "कौन बजाये बासुरिया" सुरू होते. गाण्याचे स्वर ऐकताच नाचणार्यांच्या अंगात येते. ते अधीक उत्साहाने नाचायला लागतात. कोणीतरी दोन्ही हातांची उलटी ओंजळ करून कपाळावर धरतो स्वतःला नागीन समजत अंगाला आळोखे पिळोखे देत नाचू लागतो. ते पाहून त्याच्या मित्राला काहितरी आठवते. खिशातून रुमाल काढत तो हातरुमालाचे एक टोक तोंडात धरतो. दुसरे टोक हातात. भातुकलीच्या खेळात खोटा खोटा स्वयंपाक असतो तशी त्या रुमालाची खोटी खोटी बीन बनते. आणि तो मित्र सपेरा बनून नाचायला लागतो. नागन आणि सपेरा डान्स रंगात येतो. अंगावरल्या नव्या शर्टाची पर्वा न करता नागीन झालेला रस्त्यावर अक्षरशः लोळायला लागतो. लोक मजा घेत असतात. वरात ही अशी नाचण्यात रंगली तर लग्नाचा मुहूर्त चुकेल अशी शंकाही कोणाच्या डोक्यात नसते. वरामाई नेसत्या शालूनिशी वरातीत वावरत असते. वरपित्यालाही ही गम्मत बघून नाचायची हुक्की येते. सोबत नाचणारे समवयस्क कोणीच नसतात. तरीही हे पुढे होतात. वरमाईचा हात हातात धरतात. कोळी नाच आणि फुगडी यांचे कॉकटेल केले तर जे काही होईल तसा नाच करतात. ते नाचताहेत हे पाहून बँडवाल्यानाही हुरूप येतो. ते "ओ मेरी जोहराजबी "गाणे वाजवायला सुरवात करतात.
हे सगळे पहाणारे एक पांढरा झब्बा वाले काका पुढे होतात. हे बहुतेक मुलाच्या मावशीचे किंवा आत्याचे यजमान असतात. ते बँडवाल्याना पुढे चला पुढे चला खुणावतात. बँडवाले थोडे पुढे होतात. घोडा पुढे होतो. वरात थोडी हलते.
या बँडवाल्याची एक गम्मत असते. त्यांचे पोशाख एकदम मस्त असतात . लालजर्द कोट त्यावर सोनेरी दोरीची नक्षी. सोनेरी बटणे. डोक्यावर पी कॅप. ती फरची असती ना उंच तर एकदम कोणीतरी बकिंगहॅम पॅलेसचे गार्डच शोभले असते. पण जरा नजर खाली करा. इतक्या सुंदर कोटच्या खाली पायजमा आणि पायात स्लीपर असतात. कुठल्याही लग्नात वाजणार्‍या बँडवाल्याना पहा थोड्या फारफरकाने हेच दिसते.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद's picture

16 Jun 2022 - 5:15 am | निनाद

मला तर लहानपणी हे गाणे सिनेमातले नसून लग्नातले आहे असेच वाटायचे. अगदी अगदी! लेख भारी लिहिला आहे. आवडला.

जबरी!!
हेच ते वास्तव.
कमाल निरीक्षण!!

कंजूस's picture

16 Jun 2022 - 8:44 am | कंजूस

वास्तव.

कर्नलतपस्वी's picture

16 Jun 2022 - 9:22 am | कर्नलतपस्वी

उत्तर भारतात "नागीण डान्स " वर जिजा (बहन का हैस्बॅन्ड) चा जन्म सिद्ध अधिकार मानला जातो.
&#128578

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Jun 2022 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी नवरा नवरीला घरी घेउन जाताना पण वरात निघायची. साधारण रात्री उशीरा ही वरात निघत असे, लायटिंगच्या रथात नवरा नवरी आणि त्यांच्या पुढे बँडचा ताफा आणि नाचणारी मंडळी. या सगळ्यांना उजेड देण्यासाठी डोक्यावर पेट्रोमॅक्सच्या बत्त्या घेतलेले लोक त्यांच्या आजूबाजुला चालायचे. या मिरवणूकीला मुहुर्त गाठायचा नसल्याने किंवा त्याकाळी रात्री १० चे सरकारी बंधन नसल्याने मनसोक्त रमतगमत ही मिरवणूक चालायची. मधेच कोणीतरी मिरवणूकीत पैसे उधळायचे, फटाके लावायचे आणि जर फार जास्त बजेट असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात मिरवणुकीत कोल्ड्रिंक वाटणारीही एक गाडी असायची. अशी मिरवणूक बघायला लोकही रस्त्यावर गर्दी करायची आणि मिरवणूक पुढे निघुन जाईपर्यंत बघत बसायची. काही हौशी लोक तर मिरवणूक बघायला उभे असणार्‍या लोकांनाही लाडू वाटायचे. पण असे लाडू बघ्यांना क्वचितच मिळायचे.

हे लिहित असताना पुणे नगर रस्त्यावरील वाघोली जवळ आठ दहा वर्षांपूर्वी पाहिलेली एक शाही मिरवणुक आठवली. साधारण सगळ्या शाही मिरवणूकांमधे हत्ती घोडे उंटांचा ताफा, मिरवणूकीपुढे दोन तीन लेझिम पथके, झांज पथके, साहसी खेळ दाखवणारे पथक, त्यांच्या मागे बँड वाले आणि नाचणारे लोक असा अर्धा पाउण किलोमिटरचा पसारा असायचा. त्या भागात हायवे बंद करणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जायचे. जितक्या मोठ्या माणसाचे लग्न तेवढा जास्त वेळ हायवे बंद.

पण मी सांगतो आहे त्या इसमाने या सर्वांवर कडी केली होती. या बहाद्दराने एका मोठ्या ट्रेलरचे चालते फिरते स्टेज बनवले होते आणि त्यावर काही व्यवसायिक नृत्य करणार्‍या मुली नाचत होत्या. त्यांना पहायला इतकी गर्दी जमली होती की नगर रोड दोन्ही बाजूंनी चार चार किलोमिटर जाम झाला होता. साधारण दोनतीन तास अडकल्यावर आमची बस एकदाची त्या गर्दीतून पुढे निघाली होती.

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

16 Jun 2022 - 9:50 am | तुषार काळभोर

कावेरी हॉटेलच्या मालकाच्या मुलीचं लग्न होतं. आमची बस त्यादिवशी साडेनऊला हडपसरला पोहचली. रोज सातला पोहचते!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Jun 2022 - 8:15 am | ज्ञानोबाचे पैजार

पुढच्या वेळी नगर रोडवर असा अडकलो की तुम्हीपण आहात का ते नक्की चेक करेन.

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

17 Jun 2022 - 8:17 am | तुषार काळभोर

:/

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

16 Jun 2022 - 9:46 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लिहीलय.

नचिकेत जवखेडकर's picture

16 Jun 2022 - 10:04 am | नचिकेत जवखेडकर

जबरी निरीक्षण. मजा आली वाचताना.

राजेंद्र मेहेंदळे's picture

16 Jun 2022 - 12:23 pm | राजेंद्र मेहेंदळे

एकदम मस्त निरीक्षण आहे विजुभाउ!!
पुर्वी बँड पथकात एखादे वाद्य वाजवायची सुरुवात करुन स्वरांवर हुकुमत आल्यावर पुढे फिल्म लाईन मध्ये नशीब आजमावणारे किवा नावारुपाला आलेले अनेक कलाकार असत. एक उदाहरण म्हणजे लावणी सम्राट स्व.राम कदम.

टि.व्ही. मोबाईल वगैरे नसताना आणि साधारण ८-९ नंतर सामसुम व्हायच्या काळात दारावरुन एखादी वरात वाजतगाजत जायची तेव्हा सगळे घरदार आणि गल्लीबोळातले लोक रस्त्यावर येउन बघायला गर्दी करायचे. जितका श्रीमंत माणुस तितकी मोठी वरात, त्यात पेट्रोमॅक्स घेउन चालणारे लोक, नाचणारे हौशी कलाकार वगैरे सर्व मस्त टिपले आहे.पण लेख जरा छोटा वाटला.

बाकी बँड हे प्रकरण गेल्या २०-२५ वर्षात कमी कमी होत अगदीच बंद झाले आहे. क्वचित एखाद्या सार्वजनिक गणपतीच्या मिरवणुकीला दिसतो.
"ढांगु टुकू टप्पा टप्पा चा ताल" ह्याला विशेष दाद देतो. :)

कर्नलतपस्वी's picture

16 Jun 2022 - 7:36 pm | कर्नलतपस्वी

सुट्टीवर आलो होतो.बायकोने समुद्र पाहिला नव्हता.हरिहरेश्वर, श्रीवर्धन ट्रिप काढली. अर्थात सगळेच बहिण भाऊ सुद्धा बरोबर होते. श्रीवर्धन उशीरा पोहोचलो.ओळखीचेच होते. दमल्या मुळे लगेच झोप लागली. रात्री तीन एक वाजता अचानक झोप उघडली.

बेंजो,जुना गोल बटणावाला आणी ब्लेडचा तुकडा घेऊन "कारल्याचा वेल लाव ग सुने मग जा आपुल्या माहेरा" हे गाणे वाजवत होते. एवढ्यात रात्री कोण वाजवतयं म्हणून बाहेर आलो.
पुढे वाजवणारा ,काही नाचणारे झीलगे ,नवरा नवरी आणी वराती. सर्व मस्त आणी पायी ना घोडा ना गाडी. पण काय समा बांधला होता बेंजो वाल्याने. ऐकण्यासाठी बिन बुलाया मेहमान म्हणून सामील झालो व शेवटपर्यंत बेंजो ऐकला.

गोष्ट ऐंशीच्या दशकातली. सुर आजुन कानात आहेत.

विजुभाऊ's picture

17 Jun 2022 - 7:54 am | विजुभाऊ

क्रमशः लिहायला विसरलोय.
पुढचा भाग लवकरच टाकेन

विजुभाऊ's picture

18 Jun 2022 - 8:54 am | विजुभाऊ

कथेचा या पुढील भाग http://misalpav.com/node/50355