एक छोटीशी भटकंती : चिरनेरचा महागणपती आणि हुतात्मा स्मारक

गोरगावलेकर's picture
गोरगावलेकर in भटकंती
20 May 2022 - 7:47 pm

आज रविवार. सावकाश कामे आटोपत व दुपारचा आराम करून जवळपास कुठेतरी बाहेर जायचा विचार करत होतो तेव्हड्यात दोघे मोठे दीर, जाऊ वगैरे भेटायला येत असल्याचा फोन आला. संध्याकाळचे पाच वाजले होते. त्यांना उलव्याच्या (बामन डोंगरी) स्टेशनला थांबायला सांगून बाहेर पडलो. आमची चार चाकी व अजून एका दुचाकीवर सगळे सोबत निघालो.

उलव्याला लागून उरणकडे जाणाऱ्या रस्त्याला गव्हाण फाट्याहून डावीकडे वळले की अगदी दहा-पंधरा मिनिटात आपण चिरनेरला पोहचतो. वाटेत दुतर्फा न्हावा शेवा बंदरावर जाणारे येणारे मालाचे कंटेनर थप्प्या मारून ठेवलेले मोठमोठे आवार दिसतात. चिरनेरला डाव्या बाजूस मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर कमान लागते. पण हा रस्ता गावातून जाणारा असून चिंचोळा आहे. थोडे पुढे जाऊन अजून एक डावीकडे जाणारी वाट आहे. गावाच्या अलीकडेच एका मोकळ्या मैदानात गाडी लावली व गावातल्या अगदी छोट्या रस्त्याने पायीच मंदिराकडे निघालो. जुन्या वळणाची लहान लहान कौलारू घरे छान वाटत होती. थोड्याच अंतरावर गाव संपते तेथे हे मंदिर आहे. पलीकडे दाट झाडी, डोंगरांचे नयनरम्य दर्शन होते.
चिरनेर मुख्यकरून दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला महागणपती व दुसरे म्हणजे १९३० साली झालेला जंगल सत्याग्रह.
१. महागणपती
मंदिर अतिशय प्राचीन असून याचा जीर्णोद्धार पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांनी केल्याचे समजते.

गणेशासमोरील मुषक

गणपतीची पाषाणातील भव्य मूर्ती .

मंदिराच्या खिडकीचा जतन केलेला गज (खाली रंग उडालेल्या ठिकाणी गोळी लागल्याची खूण दिसते)

मंदिराला लागूनच हनुमान मंदिर आहे.

२. हुतात्मा स्मारक
या भागात कोळी, आगरी, आदिवासी लोकांचे फार पूर्वीपासून वास्तव्य आहे. शेती व जंगलापासून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर यांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र इंग्रज सरकारने लाकूडतोड व जंगलापासून मिळणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यास गावकऱ्यांना बंदी घातली. याविरोधात स्थानिकांनी आंदोलन छेडले. २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या सत्याग्रहाच्या वेळी इंग्रजानी केलेल्या गोळीबारात काही सत्याग्रही मृत्युमुखी पडले तर अनेकांना अपंगत्व आले.

स्मारकाच भाग असलेल्या खोलीत सत्याग्रहाची चित्रे व माहिती दिलेली आहे. खोलीला कुलूप असले तरी बाजूच्या जाळीतून व्यवस्थित पाहता येईल अशी व्यवस्था आहे. पण दुर्दैवाने सध्या ही खोली अडगळीचे सामान ठेवण्यासाठी वापरत असावे असे वाटते. झाडू तर फक्त वर्षातून एकदाच म्हणजे २५ सप्टेंबरला काही कार्क्रम होत असेल तेव्हाच लागत असेल.

३. शिव मंदिर

हुतात्मा स्मारकालाच लागून हे मंदिर आहे. बांधकाम अलीकडचेच असले तरी मंदिर प्राचीन असावे.

सभागृहातील नंदी व समोरच्या भिंतीवरील गणेश व देवी

शिवलिंग.

मुख्य महागणपती मंदिर व या मंदिराचा कळसाचा आतील भाग यांची रचना सारखीच वाटते. त्यामुळे हि दोन्ही मंदिरे एकाच काळातील असावी.

४. देव तळे.
परकीय आक्रमणांपासून मूर्तीचे रक्षण व्हावे या उद्देशाने त्या वेळी मूर्ती लपवून ठेवीत असत. महागणपतीची मूर्तीही अशीच या तळ्यात लपवून ठेवलेली असावी व काही काळाने ती या तळ्यात सापडल्याने याला देव तळे असेही म्हणतात.

तळ्याच्या बाजूने दिसणारी जुनी कौलारू सुंदर घरे

५. गधेगळ
तळ्याच्या बाजूने शिवमंदिराच्या भिंतीलगत हे शिल्प ठेवलेले दिसते. वरच्या भागात चंद्र, सूर्य व मंगलकलश. मधल्या भागात शिलालेख व त्या खालच्या भागात गाढव व स्त्रीचे मैथुन शिल्प. मिसळपाववरच पूर्वी कुठल्याश्या लेखात/प्रतिक्रियेत (बहुतेक प्रचेतस यांच्या) असे शिल्प म्हणजे दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तीस आईवरून दिलेली शिवी आहे असे वाचल्याचे स्मरते.
निर्बंधांमुळे फोटो येथे देता येणार नाही असे वाटते.

६. दत्त मंदिर

चिरनेर हे अनेक छोट्या छोट्या पाड्यांचे मिळून बनलेले आहे. कातळपाडा येथील नवीनच दत्त मंदिर

७. बापूजी देव मंदिर /खंडोबा मंदिर.
परततांना उजवीकडे वळून थोडेसे पुढे गेल्यावर अगदी निर्जन स्थळी हे मंदिर आहे. डोंगराच्या पायथ्याशी थोड्याशा खोलगट भागात व गर्द झाडीने वेढलेले.

ही मूर्ती बापूजी देव असावी का? येथे आमच्याव्यतिरिक्त कोणीही नव्हते त्यामुळे विचारणा करता आली नाही.

खंडोबा

आजूबाजूला आगरी वस्ती असल्याने मंदिरातील घोषणा सुद्धा आगरीतच

आजचा दिवस (१५ मे) जागतिक कुटुंब दिवस, जो आम्ही कुटुंबासोबत अनपेक्षितपणे केलेल्या या छोट्याशा भटकंतीने साजरा केला.

परतीच्या वाटेवर कर्नाळा सुळक्याचे दर्शन

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

20 May 2022 - 7:49 pm | गोरगावलेकर

आपण चिरनेरला भेट दिली आहे का माहित नाही. गधेगळ चा फोटो व्यनीतून आपणास पाठवीत आहे. कदाचित मिपाकरांना या शिल्पाबाबत अधिक जाणून घ्यायला आवडेल व ती माहिती आपणच देऊ शकाल असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

20 May 2022 - 8:55 pm | कर्नलतपस्वी

भटकंती करणे आणी नंतर वर्णन करणे यातील दुसरी गोष्ट आवघड,पण ते काम तुम्ही छान करता. वर्णन वाचताना त्या जागेला प्रत्यक्ष भेट देतोय आसे वाटते.

गोरगावलेकर's picture

24 May 2022 - 10:38 pm | गोरगावलेकर

आपण व आपल्यासारखेच इतर मिपाकर सांभाळून घेतात म्हणून दोन शब्द लिहिण्याचे धाडस!

कर्नलतपस्वी's picture

20 May 2022 - 9:08 pm | कर्नलतपस्वी

एक नवीन माहीती मीळाली. प्रचेतस सर प्रकाश टाकतील पण उत्सुकते पोटी आंतरजालावर शोधत आसताना रोचक माहीती पुढे आली. वाचकांसाठी संदर्भ.
https://www.bbc.com/marathi/india-42719584.amp

काही वर्षांपूर्वी ओक्टोबर महिन्यात गेलो आहे पक्षी पाहायला. कुरुळ येथे उतरून पोलीस स्टेशनच्या आजुबाजूस पाणपक्षी असतात. मग जेएनपीटी गेटमधून कॉलनीच्या पलीकडे उरण रस्त्यावरून पुन्हा पक्षी पाहात उरण डेपोजवळचा द्रोणागिरी (फार उंच नाही.)वरून दिसणारे खांदेरी उंदेरी,समुद्र. वरचे जुने चर्च.

उरण फाटा ते उरण मार्गावर जासई आणि चिरनेर गावं लागतात बहुतेक. या भागास पूर्वी शेकापचा बालेकिल्ला म्हणत.

गधेगाळविषयी प्रचेतसनी दुसऱ्या एका लेखात लिहिलं आहे. तसा एक आमच्या घराजवळच आहे. पण फोटो काढता येत नाही/ फोटो निघत नाही इतके तेल ओतले गेले आहे. कारण पूर्वी हे एक पवित्र शिल्प मानले जायचे. गावदेवीचं देऊळ, तलाव आणि हे शिल्प असा रम्य परिसर होता. आता तलाव बुजवला आणि शिल्पाला कठडा घातलाय.

फोटोंसह लेख नेहमीप्रमाणेच झकास.

गोरगावलेकर's picture

24 May 2022 - 10:41 pm | गोरगावलेकर

पनवेल उरण मार्गावर जासई गाव लागते पण चिरनेरसाठी गव्हाण फाट्याहून डावीकडे वळून साधारण आठ किमी जावे लागते. याच मार्गावर ३-४ किमी अंतरावर वेश्वी या छोट्याशा गावाकडे जाण्यासाठी डाव्या बाजूस फाटा आहे. येथे डोंगरावर एकविरा आईचे मंदिर आहे. स्थानिक आगरी/कोळी लोकांसाठी याचे विशेष महत्व आहे.श्रद्धाळू नवस फेडण्यासाठी येथे येतात. चुलीवर स्वयंपाक करून देवीला नैवद्य दाखवला जातो.
डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या

एकविरा मंदिर

कंजूस's picture

25 May 2022 - 7:01 am | कंजूस

त्या पायऱ्या असलेलं एक केरळ छाप रम्य मंदिर टेकडीवर आहे कांजूरमार्गला. हुमा थिएटरसमोर नेव्ही कॉलनीत जायला फाटक आहे त्यातून आत गेल्यावर आहे. गेटवर अडवल्यास मंदिरात जायचे सांगा.

छोटेखानी भटकंती मस्तच. फोटो आणि वृत्तांत आवडले.

शिवमंदिराच्या आतील छताच्या रचनेवरुन मंदिर यादवकालीन असावे असे वाटते.
चिरनेरमधील मूर्ती, गधेगळ शेंदरामुळे भयानक विद्रूप आणि अवाचनीय झालेले आहेत. चिरनेरलाच अजून एक गधेगळ असल्याचे समजते. भैरव मंदिराच्याच आतील भागात तो आहे. जवळच्याच रानवड आणि चांजे गावात एकेक गधेगळ आहेत आणि त्यांचे वाचनही झालेले असून शिलाहार सोमेश्वरदेवाच्या कारकिर्दीतले ते आहेत. ह्यावरुन चिरनेरचे गधेगळ पण त्याच्याच किंवा उत्तरी कोकणच्या शिलाहारांचे असावेत हे अगदी निश्चित.

गोरगावलेकर's picture

3 Jun 2022 - 12:41 pm | गोरगावलेकर

नवीन माहिती मिळाली.

चौथा कोनाडा's picture

25 May 2022 - 6:02 pm | चौथा कोनाडा

सुंदर भटकंती वर्णन आणि साजेसे प्रचि.
+१

तुमच्या या धाग्यामुळे वेगळे ठिकाण कळले. इकडे आलो तर नक्की बघण्यासारखे आहे हे जाणवले !

गोरगावलेकर's picture

3 Jun 2022 - 12:42 pm | गोरगावलेकर

आवडले हे कळविल्याबद्दल मनापासून आभार

पद्मश्री चित्रे's picture

15 Jun 2022 - 8:40 am | पद्मश्री चित्रे

शाळेत असताना चिरनेरला गेली होती सहल. पण फार काही आठवत नव्हतं. छान लिहीलंय.