✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १५ (अंतिम): हिमालयातून परत...

म
मार्गी यांनी
Wed, 03/09/2022 - 16:22  ·  लेख
लेख
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने... हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी! हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर! हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १३: एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी) हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर ९ नोव्हेंबरला पाताल भुवनेश्वरचा नितांत रमणीय प्रवास झाला आणि आता हिमालयातला मुक्काम उठवण्याची वेळ आली आहे! पण १५ दिवस हिमालयात राहता आलं आणि हिमालयाचा सत्संग करता आला! सततचे घाटाचे रस्ते, सुंदर ट्रेक, रमणीय हिमशिखर, गूंजीचा थरारक प्रवास, नवीन ठिकाणची भ्रमंती, रात्रीच्या आकाशातले झमगते तारे! पण गंमत म्हणजे हिमालयातून निघताना पूर्वी होमसिक व्हायचं तसं आता होत नाही. स्पीति सायकलिंगच्या वेळेस हिमालयाचा निरोप घेतला तेव्हा निरोप घेतला असं वाटलंच नाही. हिमालय सोबतच राहिला तेव्हापासून. असो. १० नोव्हेंबरला बाकीच्यांना वाटेत एका ठिकाणी जायचं‌ होतं, म्हणून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. अदू तर आमच्यासोबत येणार नव्हती, त्यामुळे ती सत्गडलाच थांबली व मी तिच्यासोबत अजून एक दिवस सत्गडला थांबलो. दिवसभर अदू आसपासच्या मुला- मुलींसोबत मस्त खेळली. शेत, अंगणातला धबधबा, झाडं, गच्ची! त्यातच दिवसभर माकडांची टोळी आली होती! इथल्या अंगणातली झाडं, शेतावरची पिकं ह्यांचं खूप नुकसान करत होती. पण त्यामुळे अदूला माकडांची लॉटरी लागली! जिकडे बघू तिकडे तेच! तीही न घाबरता जवळ जात होती. खूप उपद्रव झाल्यावर काही जणांनी घरगुती एअरगनने त्यांना घाबरवलं. पण तरी ते संध्याकाळपर्यंत तिथेच होते. संध्याकाळी अदू व इतरांसोबत सत्गडमध्येच एक छोटा ट्रेक केला. संध्याकाळच्या प्रकाशात शिखर लाल दिसत होते. दूरवरूनच त्यांचा निरोप घेतला! अंधार पडता पडता तो ट्रेक करून घरी आलो आणि अदू एकदम रडायला लागली! दिवसभर खेळत होती. रात्री मात्र तिला एकदम आईची आठवण आली. तिची आई व नानी दुस-या गावाला गेल्या होत्या, मावशीही नव्हती. त्यामुळे एकदमच तिचा बांध फुटला. तिचं रडू बघताना वाटत होतं, ही आम्ही गेल्यानंतर राहू शकेल का! तिचं रडणं इतकं तीव्र आहे की, एक वेळ तर ठरवलं की, विमानाचं आमचं तिकीट रद्द करून तिच्यासाठी ट्रेनचं तिकीट काढू. रात्री तिचंही बरचसं सामान पॅक करून ठेवलं.    दुस-या दिवशी भल्या पहाटे सत्गडवरून गड उतार झालो. अगदी अंधारातच पायवाटेने उतरलो. साडे सहाची बस आहे. अदू शांत आहे आणि ती इकडेच थांबेल म्हणते आहे. सत्गडवरून पिथौरागढ़ला आलो आणि तिथे टनकपूरची बस मिळाली. बाकीचे जण टनकपूरच्या जवळ- हिमालयाच्या पायथ्याशी आहेत. मी, अदू व इतर काही जण बसने निघालो. सहा तासांचा बसचा प्रवास! हा प्रवास पूर्ण होईल तेव्हा हिमालयाच्या पायथ्याला आम्ही पोहचू आणि परत धरणीमाता भेटेल! पिथौरागढ़च्या बाहेर येता येता सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये रस्त्याला लागून असलेल्या दरीमध्ये धुक्याचा समुद्र दिसला! अक्षरश: समुद्रच तो! हा बसचा प्रवासही कमी थरारक नाहीय. किती तरी ठिकाणी रस्ता अजूनही दुरुस्त झालेला नाही आहे. अनेक ठिकाणी दगड कोसळत आहेत. आणि दूरवर बघताना तर लँड स्लाईडच्या खाणाखुणा सतत दिसत आहेत. हिमालय उतरतानाही सतत वळणारा व चढणारा- उतरणारा रस्ता. एका मागोमाग एक डोंगर उतरण्याचा अनुभव. लोहाघाट लागतं वाटेत. इथून जवळच विवेकानंदांचा मायावती आश्रम आहे. कधी योग नाही आला पण जाण्याचा. पुढे चंपावतला प्रसिद्ध बाल मिठाई घेतली. आता वेध लागले आहेत धरणीला भेटण्याचे! हिमालयातून परतताना सपाटीला येण्याचा अनुभवसुद्धा विशेष असतो. आधी सगळीकडे नुसते डोंगरच डोंगर असतात. जिकडे नजर जाईल तिकडे. पण हळु हळु तीन बाजूंना डोंगर राहतात आणि एका बाजूला खड्डा दिसतो. आणि व्हिजिबिलिटी चांगली असेल तर अगदी ४०- ५० किलोमीटर दूरवरूनही जमिनीवरचा धुक्याचा समुद्र दिसू शकतो! हिमालय उतरून परत जमिनीला टचडाउन होणं, हाही एक ध्यानाचा क्षण! एक प्रकारचा संधीकाल! टनकपूरला पोहचलो. टनकपूरच्या आधीही एका ठिकाणी नदीवरचा ब्रिज वाहून गेल्यामुळे रस्ता अगदी अस्थिर बनला आहे. पहाड़ी जीवनातल्या खडतर स्थितीचे हे रस्ते प्रतीक आहेत. असो.    दुपारी टनकपूरच्या जवळच असलेल्या बनबसा गावातल्या नातेवाईकांकडे आराम केला. हिमालयातून उतरून एकदम सपाट जमिनीवर आल्यामुळे काहीसं पोरकं वाटतंय. तिकडचे डोंगर, नितळ निळं आकाश इथे नाहीय. अदूची तिच्या आईसोबत आणि नानीसोबत भेट झाली. तिला सांगितलं की, ती थांबणार म्हणून तिचं विमानाचं तिकीट काढलेलं नाहीय, आत्ता एकदम काढलं किंवा कँसल केलं तर खूप महाग पडतं. शिवाय तिला हिमालय आणखी बघता येईल वगैरे. अखेर ती थांबायला तयार झाली. कारण तिलाही बाकी गोष्टी आवडत होत्याच. भावनेचा उद्रेक सोडला तर बाकी ती थांबण्याच्या तयारीनेच आली होती. संध्याकाळी तिथल्या नातेवाईकांसोबत बोलताना वेगळी माहिती कळाली. मी २६ किमीचा ट्रेक केला होता, तेव्हा ग्वेता नावाच्या गावावरून गेलो होतो. हे नातेवाईक त्या गावाजवळ डोंगरात वर पूर्वी राहायचे. त्यांनी सांगितलं की, आता इतक्या डोंगरात आणि जंगलामध्ये राहणा-या लोकांचं प्रमाण कमी झालंय. लोक आता गावं सोडून शहरांमध्ये येत आहेत. जमेल तसं दिल्ली, मुंबई असे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे मूळ गावी आणि आतल्या भागात आता तितकं मनुष्यबळच शिल्लक नाही. त्यांनी सांगितलं की, वाघाचा वावर वाढण्याचं हेही एक कारण आहे. पूर्वी तिथे एक प्रकारे मानवी उपस्थिती असायची. तिथे शेतीही‌ केली जायची. पण आता तिथे माणसं फार जात नाहीत. ह्या मंडळींची तिकडे जमीन आहे, तरीही त्यांचं तिकडे जाणं होत नाही. त्यामुळे वाघांना मोकळं रान मिळालं आहे. आणि जैव व्यवस्थेमध्ये एक बदल झाला तर अनेक बदल होतात. कदाचित आधी जे वृक्ष संवर्धन आपोआप (सामाजिक रिवाजांचा व लोकसंस्कृतीचा भाग म्हणून) होत असेल, ते आता होत नसेल. त्यामुळे तिथलं वन विरळ झालं असेल. आणि त्यामुळे मग वाघांना निवारा कमी मिळत असेल व म्हणून ते इतरत्र जात असतील. अशा खूप गोष्टी बदलल्या असतील. असो. रात्री आम्ही बनबसावरून बसने दिल्लीला निघालो. अदूला बाय बाय करणं कठीण गेलं. पण तिथे तिची मावशी, नानी व इतर नातेवाईक होते, त्यामुळे ती शांत झाली.    रात्रीचा बस प्रवास खूप थकवणारा ठरला. एक तर खूप गर्दी होती. आणि सिटिंग होतं. शिवाय समोरच ड्रायव्हरने रात्रभर मोठ्या आवाजात गाणी लावली होती! त्यामुळे झोप लागलीच नाही. हिमालयातल्या आठवणी मनातल्या मनात अनुभवत ती रात्र पार झाली. बनबसामध्ये काही तास थांबलो नसतो तर पिथौरागढ़ ते दिल्ली सलग प्रवासात खूप जास्त थकलो असतो. पहाटे दिल्लीत आनंद विहार टर्मिनसला उतरलो. मेट्रोने दुस-या एका ठिकाणी गेलो. मेट्रोचा अनुभव मात्र खूपच छान होता. इतका छान वाटला की, नंतरचा दिल्ली- पुणे प्रवास त्या तुलनेत कंटाळवाणा झाला! त्या विमान प्रवासापेक्षा वेळेमध्ये एअरपोर्टला पोहचण्याचा टॅक्सी प्रवास व टॅक्सीचा शोध जास्त थरारक होता! पुण्यामध्ये रात्री पोहचलो. आता इथे अक्लमटाईझ व्हायला दोन दिवस तरी लागतील! असा हिमालयातला प्रवास पूर्ण झाला. तिकडे अदू नंतर अजिबात रडली नाही. बनबसाच्या जवळ नानकमत्ता परिसरात मस्त फिरली. दोन- तीन दिवस ती बनबसाला राहिली आणि परत सत्गडला गेली. तिचा हिमालयात अजून राहण्याचा योग आहे! तिथली थंडी तिला त्रासदायक होती, पण ती आनंदात होती.    अजून एक ते दोन महिने अदू तिथे राहील असं वाटत असतानाच नोव्हेंबर संपता संपता ओमीक्रॉनचा उद्रेक झाला. त्या वेळेपर्यंत त्याच्याबद्दल ठाम असं काही माहिती नव्हतं. वातावरण असं होतं की, दुस-या लाटेसारखी स्थिती येऊ नये, म्हणून सरकार खूप लवकर सगळ्या गोष्टी परत बंद करेल असं वाटत होतं. आणि जर परत दुस-या लाटेसारखी स्थिती आली तर महिना- दोन महिने सगळा प्रवास वगैरे बंद असेल. त्यामुळे बराच विचार करून अदूला परत आणायचं ठरवलं. हळु हळु तिथे तीही कंटाळत होतीच. पण तरी ती आधी तर यायला तयारच झाली नाही. तिकीट काढल्यावरही कँसल कर म्हणून रडत होती. पण अखेर ओमीक्रॉनची तीव्रता आणि वाढण्याची शक्यता बघता ७ डिसेंबरचं आमचं ट्रेनचं दिल्ली- परभणी तिकिट काढलं (जसं मिळालं तसं). अदूची मावशी व तिचे मिस्टर तिला दिल्लीला सोडायला आले.   दिल्लीमध्ये त्यांचा निरोप घेतानाही तिला खूप रडू येत होतं! लहान मुलं कशी सहजपणे जीव लावतात! अदूला मी एकटाच ट्रेनने आणणार होतो. तिच्यासोबत एकट्याने केलेला प्रवास हासुद्धा एक वेगळा थरारक अनुभव! त्याबद्दल लिहीण्याची जागा अर्थातच तिचं पुढच्या वाढदिवसाचं पत्र! पण सगळं सामान आणि तिला घेऊन निजामुद्दीनला ट्रेन पकडणं हेही एक खडतर टास्क वाटलं. बायका लहान मुलांना घेऊन कशा फिरत असतील, ह्याची किंचितशी जाणीव झाली. अदू पिथौरागढ़वरून नॉनस्टॉप दिल्लीला आली होती. निजामुद्दीनजवळच्या एका लॉजमध्ये थोडा वेळ त्यांनी आराम केला आणि मी तिथेच तिला भेटलो. रात्री १० ची ट्रेन होती आणि अदू इतकी थकली की तिला ८ वाजताच झोप लागत होती. त्यातच तिचं सगळं घड्याळ सत्गडचं होतं, जिथे लोक ७ ला सगळं आवरतात आणि ८ ला झोपलेले असतात. कसबसं तिला जागं ठेवलं. अनेक सायकल मोहीमा व ट्रेकिंग वगैरे करूनही तिला घेऊन ती ट्रेन योग्य प्रकारे पकडण्याच्या गोष्टीचं जाम दडपण आलं होतं. पण अदू सोबतीला होती आणि गोष्टी होत गेल्या. छोटी बॅग पाठीवर आणि माझा हात धरून ती सोबत चालली. आणि योगायोग म्हणजे ट्रेन दीड तास आधीच लागलेली होती! ट्रेनमध्ये बसल्यावर व सेट झाल्यावर थोड्याच वेळात ती झोपूनही गेली! आणि मी रिलॅक्स झालो! चोवीस तासांचा हा प्रवास होता. सकाळी उठल्यावर तिचं मला निन्नू म्हणणं, सराईतपणे मराठीबरोबर हिंदी बोलणं, तिची ऊर्जा व मस्ती ह्यामुळे सोबतचे प्रवासी चकीत झाले! प्रवास मस्त झाला. विमानापेक्षा निश्चितच जास्त चांगला होता! वाटेतल्या गावांबद्दल- नद्यांबद्दल अदूला सांगता आलं. वाटेत तिच्यासोबत गप्पा झाल्या. तिचं खेळणं सुरू होतं. गोष्टी- गाणी सांगत होती, ऐकत होती. प्रवासानंतर रात्री उशीरा परभणीत पोहचलो. आणि ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली असतानाच अदूला उलटी झाली. पण तिची काहीच तक्रार नव्हती. असा हा प्रवास पूर्ण झाला! २४ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर असा उत्तराखंडचा प्रवास झाला आणि नंतर परत अदूला आणण्याचा तितकाच थरारक अनुभव! हिमालयाचा सत्संग, गूंजीचा रोमांच, अनेक रोमँटीक ट्रेक्स आणि साथ देणारे हिमशिखर! ह्या सगळ्या आठवणींना आता विराम देतो. हे सर्व वाचल्याबद्दल आणि ह्या प्रवासामध्ये साथ दिल्याबद्दल आपल्यालाही खूप खूप धन्यवाद!   (माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
5036 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

खुप छान होती हि लेखमाला!!

king_of_net
Wed, 03/09/2022 - 17:22 नवीन
खुप छान होती हि लेखमाला!!
  • Log in or register to post comments

आवडली

कर्नलतपस्वी
Wed, 03/09/2022 - 17:58 नवीन
सर्व लेख वाचले. फोटो छानच आहेत. हिमाचल, काश्मीर आणी उत्तरपुर्व राज्ये निसर्ग सौंदर्याने नटलेली आहेत कितीही वेळा जा पुन्हा पुन्हा जावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

सुंदर झाली मालिका

सौंदाळा
Wed, 03/09/2022 - 18:07 नवीन
सुंदर झाली मालिका सगळ्या भागांवर प्रतिसाद दिला नाही पण आवर्जून वाचत होतो. अजून भरपूर लिहा. पुलेशु
  • Log in or register to post comments

तुमची हिमालयातील लेखमाला

सुबोध खरे
Wed, 03/09/2022 - 19:11 नवीन
तुमची हिमालयातील लेखमाला संपली त्याने मलाच उदास झाले. हि लेखमाला इतकी लवकर संपेल असे वाटले नव्हते. सुंदर लेखन
  • Log in or register to post comments

छान झाली लेखमाला !

धर्मराजमुटके
Wed, 03/09/2022 - 19:19 नवीन
छान झाली लेखमाला ! तुमच्या लग्नाबद्दल देखील असाच एखादा सुंदर लेख येऊ द्या. बहुसंख्य आंतरराज्य विवाह उत्तर / दक्षिण भारतीयांशी होतात. मात्र पुर्वोत्तर भारताशी संबंध कसा काय जुळला ही उत्सुकता आहे. भोजनपद्धतीत खूप फरक आहे काय ? वगैरे ! मागणी अवास्तव / अस्थानी वाटली तर माफ करा.
  • Log in or register to post comments

आठवणीत राहील.

कंजूस
Wed, 03/09/2022 - 20:23 नवीन
आपण कुठे पर्यटनाला जातो तर हॉटेलात राहतो, 'करायच्या' गोष्टी करतो आणि परततो. पण जीव लावत नाही. म्हणजे लागत नाही. आपलं तिथं कुणी नसतं. ही कथा वेगळी आहे.
  • Log in or register to post comments

रमणीय लेखमाला!

नचिकेत जवखेडकर
गुरुवार, 03/10/2022 - 10:49 नवीन
रमणीय लेखमाला!
  • Log in or register to post comments

सुरेख झाली लेखमाला!

टर्मीनेटर
गुरुवार, 03/10/2022 - 11:28 नवीन
सुरेख झाली लेखमाला 👍 ट्रेकिंग आणि सायकलिंग ह्या प्रकारांत मला रस नाही पण नितांत सुंदर फोटोंसाठी ही मालिका आवर्जून फॉलो केली! सर्व फोटोज आवडले, अदूचेही छानच!
  • Log in or register to post comments

खूप सुंदर झाली लेखमाला

गोरगावलेकर
Sat, 03/12/2022 - 11:53 नवीन
वर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमाला आणि फोटो

रीडर
Sat, 03/12/2022 - 16:13 नवीन
सुंदर लेखमाला आणि फोटो
  • Log in or register to post comments

ओहह!!!

मार्गी
Mon, 03/14/2022 - 12:13 नवीन
ओहह! इतक्या जणांचे प्रतिसाद! सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद आणि नमस्कार! @ कंजूसजी, खरं आहे. @ सुबोध खरे सर, तीन महिने लागले लिहायला! तुम्हांला लवकर संपली असं वाटणं ही माझ्यासाठी शाबासकी आहे! :) @ धर्मराज मुटके जी! खूप खूप धन्यवाद! तसं उत्तराखंड उत्तरच आहे, पूर्वोत्तर नाही म्हणता येत. लग्नाबद्दल सांगण्यासारखं काही नाही. किंवा न सांगण्यासारखं बरंच काही आहे. इतकंच म्हणेन की, बाकी गोष्टी सामान्य नव्हे मिसमॅच आणि प्रतिकूल असूनही हिमालयानेच आम्हांला एकत्र आणलं. ती माझी लाईफ पार्टनर असं मला वाटलं, त्यामध्ये तिची हिमालयाची पार्श्वभूमीच होती. (ह्या जन्मात) तोपर्यंत हिमालय बघितलेला नसूनही तो तिच्यामध्ये दिसला आणि त्यामुळे बाकी गोष्टी मिसमॅच आणि प्रतिकूल असूनही लग्न ठरलं आणि पुढे संसार होत गेला. एक प्रकारे हिमालयानेच ते घडवून आणलं असं आज ध्यान करताना जाणवतं. असो. त्याबद्दल नंतर कधी बोलेन. भोजन पद्धतीबद्दल फारसं बोलू शकत नाही, कारण ती दृष्टी माझ्याकडे नाही. पण साधं उत्तर भारतीय जेवणच मुख्यत: असतं. आणि काही तिथल्या निसर्गात मिळणारे पदार्थ जसं भांगेची चटणी वगैरे! :)
  • Log in or register to post comments

मस्त झाली लेखमाला

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 03/19/2022 - 14:36 नवीन
प्रत्येक भागावर प्रतिसाद द्यायला नाही जमले पण सगळे भाग आवडीने वाचले आता पुढे काय? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख प्रवास वर्णन

कॅलक्यूलेटर
Sat, 03/19/2022 - 15:29 नवीन
अतिशय सुरेख प्रवास वर्णन आणि फोटोस. असेच प्रेरणादायी लिखाण करत राहा.तुमच्या सांगण्यानुसार पहिली गियर सायकल घेतली. आणि अजूनही ती ४-५ वर्ष नंतर पण चालवत आहे. आता रोज ऑफिस ला येण्या जाण्यासाठी वापरतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मार्गी
Tue, 03/22/2022 - 15:53 नवीन
धन्यवाद @ ज्ञानोबांचे पैंजार जी! पुढे लिहीत तर राहीनच आणि ट्रेकिंग- सायकलिंग वगैरे होत राहीलच. :) @ कॅल्क्युलेटर जी! धन्यवाद! :) ओहह! हे ऐकून छान वाटलं. आपल्या पुढच्या सायकलिंगला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

सुरेख लेखन .

सिरुसेरि
Sun, 03/27/2022 - 00:21 नवीन
सुरेख लेखन .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा