२ प्रेमी प्रेमाचे..!

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
6 Feb 2022 - 9:54 pm

२ प्रेमी प्रेमाचे
इसवी सन २०१५
यश = स्वप्नील जोशी
प्रिया = गिरीजा ओक
यशचा बाप =अरुण बक्षी

पहिल्या सीनमध्ये प्रिया तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला जाते, तेव्हा तो दुसऱ्याच एका मुलीशी प्रेमालाप करत असतो.
प्रिया हळवी आहे, मृदू आहे. हे दृश्य पाहून तिचा दिल दुखतो. ती तडकाफडकी बॅग भरून ते शहर सोडते आणि खुशी नावाच्या मैत्रीणीकडे रहायला जाते.
कारण शेवटी असं आहे की तुम्ही तुमच्या इंपल्सेसवर जगता ना! तुमच्या मनात आलं की बॅगा भरता आणि शहरं सोडता..! जॉबचा किंवा पोटापाण्याचा वगैरे प्रश्नच कुठे उपस्थित होतो ! आणि शिवाय सगळी दुनिया आपलीच असताना तुम्ही कशासाठी डरता ??

खुशी मैत्रीण तिचं सांत्वन करते की बरं झालं तुला
लवकर कळलं की तुझा बॉयफ्रेंड तुला फसवतोय
ते..! अन्यथा काही जणांच्या बाबतीत ते म्हातारपणापर्यंत कळत नाही. त्यामानाने हे बरंच झालं..!
प्रियाला हे पटतं. प्रिया तशी सूज्ञ आहे.
आपल्याच मस्तिष्कामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे..!

दुसऱ्या सीनमध्ये यश गाडीत बसून कुठेतरी निघालाय आणि त्याचं पाकीट रस्त्यावर पडताना प्रियाला दिसतं.
प्रिया यशचा पाठलाग करते.
आता यश एका अनाथाश्रमात पोचलाय.
कॅमेरा अनाथाश्रमाच्या संचालिकेच्या चेहऱ्यावर..!
संचालिका स्वगत म्हणतेय की, ''मुलं एवढा जल्लोष करतायत म्हणजे नक्कीच मिस्टर यश आले असणार.!''

संचालिका यशला कसलीतरी ब्लू प्रिंट दाखवण्याची तीव्र इच्छा व्यक्त करतेय.
पण यश म्हणतो की मी ते नंतर कधीतरी पाहतो. कारण मला आत्ता ह्या अनाथ मुलांवर खूप खूप प्रेम करायचं आहे..!

{{चेकॉव्ह म्हणतो की कथेत जर बंदूकीचा उल्लेख करणार असाल तर पुढे कधी ना कधी गोळी झाडली गेलीच पाहिजे.! अन्यथा उगाचच अनावश्यक गोष्टींचे उल्लेख करू नये..! आता ह्या स्क्रिप्ट रायटरला चेकॉव्ह वगैरे माहिती असणं म्हणजे फारच झालं, हे आपलं म्हणणं मी अगदी कबूल करतो..!
त्यामुळे त्या ब्ल्यू प्रिंटचं प्रयोजन तिथंच समाप्त होणार, हे स्पष्टच आहे. प्रयोजन हा मोठा शब्द झाला खरं तर..! ढेकळाचं प्रयोजन असंच म्हणायला हवं होतं. पण आता असो.
बाकी ब्ल्यू प्रिंट म्हटलं की मला थेट राजसायेब ठाकरेच आठवतात..! पण तो आणखी एक वेगळाच फाटा फुटेल.}}

मग लगेच यश तिथे एका रडणाऱ्या मुलीची समजूत
काढताना दिसतोय. तो तिला गोष्ट वगैरे सांगतोय.
गोष्टीतून तमाम मुलांना आपोआपच मूल्यशिक्षण
मिळतंय. किंवा संस्कारांचा धबधबा वगैरे.

बाकी ती गोष्ट एवढी फुसकी आहे की समजा माझ्या लहानपणी कुणी सांगितली असती, तर त्या काळातसुद्धा मी फिदीफिदी हसलो असतो..!
आजची पोरं जरा जास्तच हिंसक प्रतिक्रिया देतील. हाड हाड करून हाकलूनही देतील कदाचित..!

परंतु हा सिनेमा आहे.
आणि शिवाय हा यशदादा गोड गोज्जुला गोज्जुला
आहे. त्यामुळे सगळ्या मुलांना यशच्या गळ्यात
झेपावून पाप्या वगैरे द्याव्या लागतात.
बाकी ह्या यशचा चेहरा साखरेच्या पाकात घोळून काढल्यासारखा हरहमेश गोडच दिसतो.
त्याच्यावर माशा वगैरे कशा काय बसत नाहीत ?

प्रिया हे सगळं दुरून बघतेय. तर मग ओळख वगैरे.
शिवाय आता त्या मुलांवर खूप खूप प्रेम आणि माफक संस्कार वगैरे करून झालेलं आहे. आणि शेवटी अनाथाश्रमात किती काळ थांबणार ना माणूस..!

म्हणून मग यश प्रियाला अंधेरीला सोडायला निघतोय. यशने गाडीत 'नादान'जींची गझल लावलीये. योगायोगाने नादानजी हे प्रियाचे फारच आवडते शायर आहेत.
{ओह् कम्मॉन् ! असे दैवी योगायोग असतातच ना म्हणजे..!}
त्यामुळे प्रिया त्यांच्या एकूणच साहित्यकृतींचा आणि जीवनदृष्टीचा रसास्वाद दोनच वाक्यांमध्ये उकलून दाखवते.
आणि शेवटी व्याकुळपणे म्हणते की हे नादानजी गुप्त
का राहतात कळत नाही..! ते कधीच लोकांसमोर का बरं येत नाहीत..!
यावर यश लाजतोय..!
मग आता ह्याच्यामध्ये नादानजी कोण असावेत, ह्यात काय घंटा सिक्रेट राहिलं?

अचानक प्रिया एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जातेय. पण त्या जॉबसाठी पंचेचाळीसपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनाच बोलावलंय असं कळतं.
हा जॉब यश नावाच्या टोणग्याला सांभाळण्याचा
असतो..!
कारण लगेच तिथे यश डोकं धरून आचके देत कोसळताना दिसतो. ह्या सीनमध्ये आचके वगैरे देण्याच्या निमित्ताने यश मुद्दाम एक फ्लॉवरपॉट टेबलावरून खाली पाडतो.. हे एक करावं लागतं. पाडापाडी केल्याशिवाय प्रसंगात पुरेसं नाट्य येत नाही. प्रिया तिथेच दबा धरून उभी असते. ती भूमिकेत शिरून त्याला सावरते.

यशचा बाप कोट्याधीश बिझिनेसमन वगैरे असल्यामुळे सगळीकडे सूट बूट घालून फिरणं त्यास कंपल्सरी आहे.
पुढच्या सीनमध्ये हा बाप प्रियाच्या घरी येऊन तिला गळ घालतो की तुम्ही हवा तेवढा पगार, जगातील कोणतीही किंमत घ्या; पण यशला सांभाळण्याचा हा जॉब स्वीकारा.

कारण यशला ब्रेनट्युमरचा ॲटॅक येतो तेव्हा मोठ्यातला मोठा डॉक्टरही त्याला सांभाळू शकत नाही; पण तुम्ही मात्र काल त्याला अगदी सहजपणे शांत केलेत..! कमालच झाली अगदी..!

ह्या मूव्हीचे संवाद लिहिणारा बहुधा हिंदी भाषिक मनुष्य आहे. आणि मराठी अनुवाद करणाऱ्याने हमखास गुगल ट्रान्सलेटरचा शॉर्टकट स्वीकारलाय. त्यामुळे बऱ्यापैकी सुंदर घोटाळे झालेले आहेत.

उदाहरणार्थ एका सीनमध्ये यशचा बाप म्हणतो की, "डॉक्टरांनी उत्तर दिलंय."
हा मूळचा हिंदी वाक्प्रचार असणार की, "डॉक्टरोंने जवाब दे दिया है"
(जवाब दे देना= अब मरीज की हालत बहोत खराब होना)

किंवा एके ठिकाणी प्रिया म्हणते की,''या कामासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतले तर मी स्वतःच्याच नजरेत पडेन''
('मैं अपनेही नजर में गिर जाऊंगी' यावरून सरळसरळ उचललेलं असणार ते.!)
तर अनुवादाची अशी हमाली यामध्ये ठिकठिकाणी बिनधास्त पेरलेली आहे.

यश-प्रियाचे बॉन्डींग डेव्हलप होतेय हे दाखवण्यासाठी डायरेक्टरने त्यांना लालेलाल बर्फगोळे आणि पाणीपुरी खायला लावण्याचे, तसेच रेस्टॉरंटमधले काही बिनकामाचे सीन्स टाकले आहेत. जे दोघेही आपापल्या परीने जीवावर आल्यासारखे उरकतात.

यश मधूनच अत्यानंदाने किंचाळतो की पूर्वी मला थोड्याशा आवाजानेही ॲटॅक यायचा, पण आता मी एकदम मुक्त झालोय वगैरे.
पण त्याचा हा आव दोन मिनिटांच्या वर टिकत नाही.
पुढच्याच सीनमध्ये त्याच्या तोंडून मृत्यूच्या घनदाट छायेसंबंधी दर्दे शायऱ्या कम् अतिचिकट डायलॉग ओघळायला लागतात..! थांबतच नाहीत..!
म्हणजे समजा एकदा प्रिया म्हणाली की 'किती रम्य संध्याकाळ आहे ना !'
यावर यश लगेच म्हणतो की, ''होय, अगदी माझ्या आयुष्यासारखी! ज्याचा सूर्यास्त कधीही होऊ शकतो..!''

किंवा नंतर एके ठिकाणी तो चाहत्यांना म्हणतो की, "मित्रांनो, आपलं जीवन मोठं असो वा छोटं. एक ना एक दिवस त्याला मृत्यूसोबत जावंच लागतं..!"
तर यश ही असली उघड वैश्विक सत्यं पटाकदिशी आपल्या ओंजळीत टाकत राहतो. आपण फक्त तयार रहायचं. शिवाय असलं ज्ञान झेलायचं म्हणजे आपली झोळीही मजबूतच पाहिजे.

काही सीनमध्ये यश खोकताना दिसतो. काहींमध्ये ओकताना दिसतो. काहींमध्ये हॉस्पिटलमध्ये धापा टाकत लवंडलेला दिसतो. काहींमध्ये डोक्याला रंगीबेरंगी फडकी बांधून बिझनेस डील वगैरे करताना दिसतो. काहींमध्ये स्वतःच गुपचूप कसलेतरी इंजेक्शन टोचून घेताना दिसतो.
साला ह्या ब्रेन ट्युमरची नेमकी लक्षणं काय काय
आहेत, ते एकदा बघायला पाहिजे..!

बाकी त्याला सांभाळणे हा प्रियाचा जॉब प्रोफाइल..!
सांभाळणे म्हणजे पळत पळत जाऊन, ''काय झालं यश? काय होतंय तुला यश?'' असले उद्गार काढणे..!
आणि ताबडतोब पेशंटपेक्षा डबल आवाजात हुंदके देणे.

गाणी वगैरे आहेतच म्हणजे. एका सीनमध्ये डान्सच्या नावाखाली, प्रिया जिन्याच्या रेलिंगला टेकून चक्क पाठ खाजवून घेतानाही दिसते.

आणि एखाद्या कारचा भीषण ॲक्सिडेंट होत असतानासुद्धा त्या कारमध्ये बसून कुणी स्वतःचे केस सावरत असते का?
प्रिया सावरते..!
कारण कॅमेरा आपल्या चेहऱ्यावर आला की हलकंसं हसत जुल्फें कानांच्या मागे सरकवायची, असे तिला सांगितले गेले आहे..!

शेवटी शेवटी तर ह्यांचं बजेट पारच ढासळलंय बहुतेक. कारण यश फुल बाह्यांचा बनियन घालून
कु-हाड वगैरे घेऊन थेट लाकडंच फोडताना दिसायला लागतो..!
लाकडं फोडता फोडता आकाशाकडे बघून हंबरतो,
की मी प्रेमात पडायलाच नको होतं. मला तो अधिकारच नाही. कारण आता मी मरणाराय ओss

तर हे असं आहे सगळं..! किंवा हे असलंच आहे सगळं..!

बाकी ह्यात कथा स्क्रिप्ट वगैरे काही भानगडी नाहीयेत. त्याची काही गरजही नसते खरं तर..!
मनाला येईल तशी कथा स्वतःच आपली वाट
शोधत जाते..! प्रत्येक वळणावर बेगुमानपणे अंदाधुंद डायलॉग्जच्या लेंड्या टाकत सुटते..! भयाण टुकारपणाच्या सर्व सीमारेषा धडाधड ओलांडून जाते.! ते सगळं पेलणं आपल्या क्षमतेच्या पलीकडचं आहे..!

त्यामुळे शेवटही तसा ओपन एंडेड आणि मुक्तच ठेवला आहे. अमूर्त किंवा तत्सम कलात्मक टाईपचा.! तुम्हाला त्यातून जो अर्थ काढायचाय तो काढा..! किंवा समजा नसेल काढायचा तर मग मरा..! तुम्हाला कोण अडवणार..!

विडंबनचित्रपटआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

निनाद's picture

7 Feb 2022 - 6:15 am | निनाद

झकास आहे परिक्षण!

साला ह्या ब्रेन ट्युमरची नेमकी लक्षणं काय काय
आहेत, ते एकदा बघायला पाहिजे..!
जाम हसलो!

अभिप्रायाबद्दल धन्यवाद निनाद ! :-))

विजुभाऊ's picture

7 Feb 2022 - 11:43 am | विजुभाऊ

ब्रेन ट्यूमरचा अ‍ॅटॅक हा खोकल्याची उबळ येते तसा येतो का?

गामा पैलवान's picture

8 Feb 2022 - 2:16 am | गामा पैलवान

पाटीलबुवा,

सिनेमा हे मनोरंजनाचं साधन असेल वा नसेल, पण तुमची फटकेबाजी चांगलीच मनोरंजक आहे. :-)

तुम्ही म्हणालात की शेवटातून जो अर्थ काढायचाय तो काढा, तर प्रयत्न केला. तेव्हा जाणवलं की यश लाकूडतोड्या होतो ते सत्यवान-सावित्री च्या कथेवर बेतलेलं दिसतंय. बस्स, हेच बाकी राहिलं होतं.

🤦‍♂

आ.न.,
-गा.पै.

सुखी's picture

8 Feb 2022 - 11:21 pm | सुखी

भारी लिहिलंय :D

कॉमी's picture

9 Feb 2022 - 12:12 am | कॉमी

हीहीही
मस्त, खूप हसलो.
स्वप्नील जोशींची सिग्नेचर मूव्ह नाकातून रक्त येणे ही या सिनेमात नाही काय, ट्युमर अँड ऑल ?

नीलस्वप्निल's picture

9 Feb 2022 - 7:21 pm | नीलस्वप्निल

हा हा हा... मी पण स्वप्नील जोशी.... पण तो नाही.... हहापुवा

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Feb 2022 - 10:39 am | ज्ञानोबाचे पैजार

स्वप्नील जोशी अजून बाल श्रीकृष्णाच्या भुमिकेतून बाहेर पडलेला नाही
बाकीची चिरफाड अत्यंत उच्च दर्जाची झाली आहे.
जर चुकून माकून कोणत्या चॅनेल वर हा सिनेमा लागला तर लगेच चॅनेल बदलून टाकेन
पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

16 Feb 2022 - 9:52 am | धर्मराजमुटके

मस्त लिहिलय. लिहित रहा.

चौथा कोनाडा's picture

16 Feb 2022 - 5:19 pm | चौथा कोनाडा

हा .... हा .... हा .... !

एक नंबर चिरफाड !
मी स्वतःच्याच नजरेत पडेन' असलं गुगल ट्रान्सलेशन वाचताना हसावं की रडावं हेच समजत नाही !