युवर बाॅस इज नॉट ऑलवेज राईट..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
30 Nov 2021 - 2:15 pm

मी एका रेडिओ स्टेशन वर काम करत होते. तिथं माझे नियरेस्ट बाॅस-म्हणजे माझ्या पोस्टच्या फक्त एकच स्तर वरचा असलेले बाॅस होते. त्यांना आपण क्ष म्हणू. आमच्या दिल्ली ऑफिस मधून एकदा एक ७/८पानी बाड आलं. इंग्रजी भाषेत. त्यात भारताच्या प्रगतीचा आढावा घेणारा मजकूर होता. ते 'क्ष'नी मला दिलं. म्हणाले,"बाई याचं भाषांतर करा. अर्जंट आहे. एअरवर घालवायचंय."

माझं एक वैशिष्ट्य आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या नोकरीत ,अगदी मी तरुण आणि लहान वयाची असताना आणि अगदी रिटायर होईपर्यंत माझ्या ऑफिसातल्या एकाही पुरुष किंवा स्त्री कलीगने मला नावाने कधीही हाक मारली नाही. प्रत्येक जण "अहो बाई"च म्हणायचे. शेजारी पाजारी ही नावानं हाक न मारता (यात बायका , पुरुष दोघेही आले)"अहो वहिनी"म्हणायचे. माझी पर्सनाॅलिटी भारदस्त असावी असा मी निष्कर्ष काढला. असो.तर क्ष नी मला भाषांतर करायला ते कागद दिले. चांगले चार, पाच दिवस खर्च करून ,मान मोडून ते क्लिष्ट भाषांतर मी करून दिले. मूळ इंग्रजी मॅटरला ते मराठी भाषांतर पिन लावून जोडले. आणि त्यावर "सबमिटेड"असे लिहून सही केली आणि ते क्ष कडे सबमिट केले. मग मी तो विषय डोक्यातून काढून टाकला.

जवळपास महिन्याने स्टेशन डायरेक्टरांनी क्ष ना बोलावून विचारलं,"मी तुम्हांला दिल्ली ऑफिस मधून आलेलं एक इंग्रजी मॅटर भाषांतर करून घ्या असं सांगितलं होतं. ते एअरवर गेलं का? त्याचं स्टेटमेंट दिल्ली ऑफिस मध्ये मागवलंय." त्यावर क्ष कावरे बावरे झाले. त्यांनी माझे नाव सांगून सांगितले,"त्या बाईंनी ते अजूनही भाषांतरच केलेलं नाही." स्टेशन डायरेक्टरांनी मला केबीन मध्ये बोलावून घेतलं आणि विचारलं.मी म्हटलं,"मी ते भाषांतर महिन्यांपूर्वी च सबमिट केलंय." क्ष माझ्यावर मी खोटं बोलत असल्याचा आरोप करायला लागले.

मी स्टेशन डायरेक्टरांना म्हटलं,"मला प्लिज क्ष यांच्या रॅकला हात लावायची परवानगी देता का? मी ते भाषांतर शोधून काढते." विचित्र स्थिती झाली होती.

पण स्टेशन डायरेक्टरांनी परवानगी दिली. मी , साहेब आणि क्ष त्यांच्या केबिनमध्ये गेलो. मी त्यांच्या रॅकमधून ते भाषांतर आणि मूळ इंग्रजी मॅटर शोधून काढले. क्ष चा चेहरा पडला. ते म्हणाले ,"हे यांनी आत्ता इथे आणून ठेवलंय."
मी म्हटलं,"भाषांतर झालेलं असताना,काम पूर्ण झालेलं असताना मी ते माझ्याजवळ इतके दिवस कशासाठी ठेवू. मी त्यावर "सबमिटेड"असं लिहिलंय, सहीही केलीय. मग मी ते माझ्या खोलीत पाडून का ठेवेन?"
क्ष चाचरत म्हणाले,"मला काय माहीत?".
मी म्हटलं,"या फाईलवर धूळ बसलीय. याचा अर्थ असा की,ती इथं बरेच दिवस पडून आहे. दुसरा पुरावा म्हणजे ह्या कागदांना जी पिन लावलीय तिची बाहेर आलेली दोन्ही टोकं गंजलेली आहेत (यात तसा फारसा पुरावा नव्हता. तरी...) शिवाय तुमच्या दोघांच्या देखतच ही फाईल मी इथून शोधून काढलीय. याचाच अर्थ असा की ही फाईल इथं खूप दिवस पडून आहे."

सुदैवानं स्टेशन डायरेक्टरांना माझं म्हणणं पटलं. त्यांनी क्ष कडे एक "लुक" टाकला. आणि खांदे उडवले. मला केबिनमध्ये बोलावून साहेब म्हणाले,"यापुढं एक धडा घे."सबमिटेड"असं लिहून सही केलीस की सहीखाली तारीख टाकत जा. न विसरता. पूर्ण करियरभर माझा हा सल्ला लक्षात ठेव.!"

लहानशी गोष्ट. पण खूप मोलाची ठरते अनेकदा. तेव्हापासून मी तो दंडक पाळला. घरगुती बाबतीतही. पेपरचं बिल पे केलं. सही, तारीख. दुधाचं पेमेंट केलं, सही तारीख. आणखी एक नवीन शहाणपण. पलिकडच्याचीही "रिसीव्ह्ड"म्हणून सही घेणे, तारीख..

अनुभव हाच गुरू..

समाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

कोंबडी प्रेमी's picture

30 Nov 2021 - 5:38 pm | कोंबडी प्रेमी

प्रोफेसर हरी काळूस्कर आठवले !!

संदर्भ लागला नाही हा लेख वाचून. हरी काळुस्कर हे काय पात्र आहे?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

30 Nov 2021 - 5:59 pm | रावसाहेब चिंगभूतकर

फारच छान सल्ला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Nov 2021 - 6:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान आठवण आवडली.आम्हीही काहीही कागदपत्र देणे घेणे असले की तारीख टाकतोच टाकतो. स्वाक्षरी असेल तर त्या खाली तारीख हमखास असतेच असते.

-दिलीप बिरुटे

सौंदाळा's picture

30 Nov 2021 - 6:30 pm | सौंदाळा

+१
स्वाक्षरी नंतर सही करतोच.

सुरिया's picture

30 Nov 2021 - 7:19 pm | सुरिया

दोन्ही मराठी मध्येच का?
स्पेसिमन नुसार कोणती ग्राह्य धरतात?

मुक्त विहारि's picture

30 Nov 2021 - 7:06 pm | मुक्त विहारि

हम गलतियों से ही सिखते है... इति, M ने जेम्स बाॅन्डला
सांगीतले, संदर्भ, Quantum of Solace...

योगी९००'s picture

30 Nov 2021 - 7:28 pm | योगी९००

मस्त धागा व अनुभव...

(दुसर्‍या ठिकाणी लिहीलेले माझे काही या विषयांवरील अनुभव लिहीतोय.)

बॉसने सांगितलेले चुकीचे असले तरी मुकाट्याने करा याचा मी बळी पडलो होतो. (बॉसच पलटी मारू होता त्याला मी तरी काय करणार ?)
बर्‍याच आधीचा हा प्रसंग आहे (१९९८ साल). त्यावेळी मी एका मोठ्या प्रतिथयश कंपनीत होतो आणि नुकतीच माझी चेन्नाईहुन मुंबईला प्रॉडक्ट नॉलेज चांगले होते म्हणून सेल्स मध्ये बदली झाली होती. सेल्सचा प्रांत तसा नवीनच होता. त्यामुळे मुंबईच्या सेल्स मॅनेजरकडून धडे घेत होतो. ह्या सेल्स मॅनेजर विषयी आधी खूप ऐकले होते आणि फॅक्टरीवाले सर्व त्याला खुप मान देत होते. त्यामुळे चांगल्या माणसाबरोबर काम करतोय असे वाटत होते.
पण हळूहळू लक्षात यायला लागले की हा माणूस मला वापरून घेतोय. त्याकाळात कंप्यूटर तसा नवाच होता (म्हणजे या सेल्स मॅनेजरला नवा होता) त्यामुळे याला लागणारी प्रपोजल्स, प्रिंटस आणि सेल्स डेटा सगळा माझ्याकडून बनवून घ्यायचा. बर्‍याच वेळा फिल्डवर नको जाऊ, इथे बसूनच काम कर असे सांगायचा. त्यामुळे हा जरी अनुभव मिळत असला तरी माझी सेल्स टारगेट व्हायची नाहीत आणि वरून ओरडा बसायचा. अशा वेळी मात्र हा सेल्स मॅनेजर (डॅमेजर?) उलटा कांगावा करायचा की मी सांगतो याला की मार्केट मध्ये हिंड, लोकांना भेट पण यालाच (म्हणजे मला) ऑफिसमध्ये बसून काम आवडते. असे दोन-तीन वेळा झाल्यावर मी त्याचे न ऐकता फिल्डवर्क वाढवले आणि माझा परफॉर्मन्स सुधारला. याबाबतीत एका कलिगनेच मोलाचा सल्ला दिला की सकाळी तू घरून कधीच ऑफिसला येऊ नको. डायरेक्ट क्लायंट कडे जा. ऑफिसला आलास की हा तुला कामाला लावणार. आठवड्यातून १-२ दिवसच ऑफिसला जा. मग मी त्या प्रमाणे वागू लागलो पण कधी कधी हा डॅमेजर मला ऑफिसला बोलवून त्याची कामे करवून घ्यायचा.
एकदा मोठा झटका दिला ह्या माणसाने. आमचा जर्मन कोलॅबरेटरचा डायरेक्टर आला होता. त्याला घेऊन एका मोठ्या प्रॉस्पेट्सकडे गेलो होतो. बरोबर हा सेल्स मॅनेजर आणि आमचा व्हीपी (म्हणजे बॉसचा बॉस) पण होता. मिटींग छान झाली. क्लायंटने सांगितले की आम्ही तुमच्या कंपनीबरोबर काम करू इत्छित आहोत. तुमच्या टेक्निकल माणसाला (म्हणजे मला) आमच्या तारापोरच्या फॅक्टरीला जाऊन तिथल्या टेक्निकल लोकांना भेटायला सांगा आणि मग सगळा फॅक्टरीचा अभ्यास करून तुमचे प्रपोजल द्या. लगेचच आमच्यातर्फे सर्वांनी हे मान्य केले. नंतर दुसर्‍या दिवशी मी तारापोरला जायची तयारी करत असताना हा बॉस माझ्याकडे आला आणि मला त्याने तिकडे जाऊ नको, इकडूनच फोनवर त्यांच्याशी बोल आणि काय ती माहिती घे असे सांगितले. मी थोडाफार ह्या विषयावर वाद घातला पण त्याने मला जर मी तारापुरला त्याच्या परवानगी शिवाय गेलो तर माझा तो टुर रिपोर्ट (म्हणजे खर्च) मंजूर करणार नाही. तसेच चेन्नाईला परत पाठवीन अशी धमकी दिली. मी पण घाबरून क्लायंटला येत नाही असे कळवले आणि तारापुरला फोनवर बोलूनच काही माहिती घेतली आणि प्रपोजल बनवून त्यांच्या मुंबईच्या ऑफिसला पाठवले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी आमचे लटांबर (म्हणजे मी, आमचा जर्मन डायरेक्टर, बॉस आणि त्याचा बॉस (व्हीपी)) असे क्लायंटच्या ऑफिसमध्ये प्रपोजल डिस्कस करायला आणि डील फायनल करायला पोहोचलो. क्लायंटच्या लोकांनी आमची चांगलीच इज्जत काढली आणि म्हणाले की साधे तारापुरला जाऊन तुम्ही येऊ शकत नाही आणि फोन वर बोलून इतके करोडोचे प्रपोजल बनवता. त्यापेक्षा टेली मार्केटींगच करा म्हणून अक्षरशः हाकलवले. मी तारापुरला गेलो नाही म्हणून माझी चांगलीच धुलाई आणि कारण दिले तर बॉसने मी असे म्हणालोच नव्हतो. यालाच कुठे हिंडायला नको असा पवित्रा घेतला. त्यामुळे मला सर्वांची चांगलीच बोलणी खावी लागली. जर्मन कोलॅबरेटरने मी सेल्ससाठी फीट नाही असे सांगून मला नापासच केले. नोकरी जातेय की काय असे वाटायला लागले.
पण सुदैवाने माझ्या बॉसचा बॉस स्वभावाने चांगला होता. नंतर मला एकट्याला गाठून त्याने सगळी माहीती घेतली. तसे त्याला ह्या माणसाच्या पलटीमारू स्वभावाचा अंदाज होताच. त्याने नंतर मला फुल्ल गो अहेड दिले. तो म्हणाला तुला योग्य वाटेल ते कर. उगाचच याचे ऐकू नको. पण तूझ्या निर्णयाची तुलाच जबाबदारी घ्यावी लागेल. तुझा टुर रिपोर्ट याने नाही केला तर मी मंजूर करीन. मग काय मी मोकाटच सुटलो. दोन वर्षात स्वतःला छान पैकी सेट केले. सेल्समध्ये जो पर्यंत तुम्ही चांगला बिझनेस आणत आहात तो पर्यंत कोणीच तुमचे वाकडे करू शकत नाही. यामुळे माझा बॉस ही जरा माझ्याशी दबूनच वागायला लागला. तरी काही वेळा बॉसगिरी करायचा प्रयत्न करायचा पण अनुभवामुळे मी त्याला पुरून उरलो. असेच जवळजवळ दोन वर्षांनी आणखी एका मोठ्या प्रॉस्पेटकडे मी सुरतला जायला निघालो असताना मला अडवण्याचा प्रयत्न केला पण वरील अनुभवामुळे मी त्याचे न ऐकता गेलो आणि ती मोठ्ठी ऑर्डर मिळवली. माझ्या कौतूक समारंभात मात्र हा स्वतःला क्रेडीट घ्यायचा प्रयत्न करत होता. म्हणत होता की मीच याच्यामागे लागलो, त्याला पाठवले म्हणून ही ऑर्डर मिळाली. अर्थात त्यावेळी ह्याचा हा स्वभाव माहीत असलेले माझे कलिग आणि त्याचा बॉस माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते.
तो हे असे माझ्या इतर कलिगबरोबरपण वागायचा. चेन्नाईला बदली करीन अशी त्याची पेटंट धमकी होती. त्यामुळे आमच्या सगळ्यांचा शाप म्हणून की काय पण कंपनीने यालाच चेन्नाईला बदली दिली. ह्याला जाणे शक्य नव्हते (मराठी होता + पुण्यात त्याचे घर, आई, वडील होते). त्यामुळे ह्याने ही नोकरी सोडली आणि कुठल्यातरी साध्या कंपनीची काहीतरी डीलरशिप घेऊन पुण्यातच स्थायिक झाला. ह्याच्या सेंडॉफला मात्र मी आणि माझे कलिग डोळ्यातले पाणी (न आलेले) पुसत ह्यांना आम्ही खूप मिस करू, ह्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही छान काम करतोय असे काहीतरी बरळलो होतो. नंतर आम्हा सगळयांना फोन करायचा की ह्याच्याही प्रॉडक्टचे मार्केटिंग करा, कमिशन देतो वगैरे वगैरे पण ह्याच्या पलटीमारू स्वभावामुळे कोणीच ह्याला भाव दिला नाही. काही काळाने त्यालाही हे जाणवले असावे आणि त्याचे फोन बंद झाले.

असे नमुने सर्वत्र असतात. भारी प्रतिसाद.

सेंडॉफला मात्र मी आणि माझे कलिग डोळ्यातले पाणी (न आलेले) पुसत ह्यांना आम्ही खूप मिस करू, ह्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही छान काम करतोय असे काहीतरी बरळलो होतो.

खी खी खी..

Bhakti's picture

30 Nov 2021 - 7:47 pm | Bhakti

हा हा

छान अनुभव मांडला आजी!
सोप्या भाषेत महत्त्वाचे सांगितले.
माझे एक सोडता बाकी सगळे बाॅस अवघडच होते.एक तर महाकठीण एका ठिकाणी प्रेझेंटेशन होते,मला म्हणाला मी तयार करतो तुम्हाला पाठवतो.मला याचा स्वभाव माहीत होता मी माझं माझं प्रेझेंटेशन तयार ठेवलं.दुसर्या दिवशी ह्याच इतकं बोगस होत,मी माझं प्रेझेंटेशन दाखवलं ,तुमचंच करा म्हणाला . आणि ओफिसची बाहेर थोडी लाज राखली गेली.बाॅस खुर्चीवर बसताच एवढे इगोस्टिक कसे होतात काय जाणे?

केंद्र सरकारी पोलीस संघटना पक्षी सीबीआय, ईडी, इत्यादींशी जवळचा संबंध आला होता, त्यांचे काही अधिकारी कधीकधी भेटायला मीटिंग्जला येत असत, लाईक क्लायंट रिकवायरमेंट्स डिस्कस करायला किंवा अजून काहीतरी.

त्यावेळी डॉक्युमेंटेशन वर सह्या करताना ही माणसे हमखास सही खाली तारीख घालत, ती पण व्यवस्थित डेट/मंथ/ईयर पॅटर्न मध्ये. त्यावेळी त्याचा कार्यकारणभाव समजला नव्हता, समजून घेण्याचा प्रयत्न नव्हता केला आज तुमच्या पोस्टच्या निमित्ताने तो पुन्हा आठवला अन लॉजिकल एन्डला गेला बघा

गवि's picture

30 Nov 2021 - 8:27 pm | गवि

लेखातील आणि काही प्रतिसादांतील सहीखाली तारीख हा मुद्दा महत्वाचा वाटल्याने एक तत्सम गोष्ट आठवली. कुठेही आपले आयडी डोक्युमेंटची कॉपी (झेरॉक्स) देताना त्यावर सही, तारीख तर असावीच पण कोणाला आणि कशासाठी देतोय तेही एका ओळीत लिहावे. (उदा. गिव्हन टू अमुक बँक फॉर अकाउंट ओपनिंग kyc पर्पज, किंवा फॉर होटेल चेक इन, किंवा सबमिट करण्याचे जे कारण असेल ते). म्हणजे कोणाला गैरवापर करणे कठीण होते.

हा पण मुद्दा योग्य वाटत आहे ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2021 - 8:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी आपला स्वभाव कसा का असेना. (ह.घ्या) आपले लेखन, प्रतिसाद काही विषय अतिशय महत्वाचे असतात. यापुढे तसा प्रयत्न करून पाहतो.

-दिलीप बिरुटे

आता धन्यवाद म्हणणे आले.. पण आमची शंभर टक्के निखळ प्रशंसा केली तर काही शुल्क भरावे लागते का तुम्हाला डीबीसर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2021 - 9:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक मिपाकर म्हणून जी वैशिष्ट्ये असावी लागतात त्याची उतराई होण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न असतो. कोणाची मुक्त कंठाने प्रशंसा करायची नाही, आणि कोणाच्या प्रशंसेने वाहवून जायचं नाही. विषय संपला.

आपली 'भावना' नाराज झाली असल्यास त्यांची दिलगीरी व्यक्त करतो. (पळा आता)

-दिलीप बिरुटे

आदरणीय गविशेठ यांचा स्वभाव कसाही का असेना म्हणजे नेमका कसाय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Dec 2021 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचु डार्लिंग, मला त्यांच्याबद्दल वाईट लिहिता येत नाही. देव माणूस आहे. कानाला खड़े लावतो सॉरी, कानाला हात लावून आदर व्यक्त करतो.

''उतना बुरा भी नहीं हूं मैं
बस कुछ देर के लिए उलझा हुआ हूं अपनी जिंदगी में
पर इतना बुरा भी नहीं हूं मैं''

असं...! ( ह. घ्या गविसर, हा प्रचु मला उचकावत आहे)

-दिलीप बिरुटे
(गविसर शिष्य)

ज्याला आयडीप्रुफचा गैरवापर करायचाच आहे तो अशा ओळीवरती / लिखाणावरती व्हाईटनर / पांढरा कागद लावून आणखी एक झेरॉक्स काढणार.

ते तर आहेच. मूळ फोटोकॉपीच्या मुख्य छापलेल्या भागावरही सही आणि वाक्याचा काही भाग ठेवून त्यातल्या त्यात अधिक अडचण करता येते. किमान उद्या मोठा झोल झाल्यास हे आपण या कामासाठी दिले नव्हते हे फोरेंसीकली सिद्ध करण्याची वेळ आल्यास त्यात सहजता राहते.

चौकस२१२'s picture

1 Dec 2021 - 7:47 am | चौकस२१२

साहेबाची नको तिथे कंजुषी
- प्रसंग असा होता कि कंपनी खाजगी मालकीची आणि मालक तसा उदार पण त्याचं पुतण्या जरा खडूस किंवा चिंधीचोर असावा ,, हा पुतण्या वेगळे काम बघायचा त्यामुळे त्याचा माझा काय किंवा माजया बोस चा फार संबंध यायचा नाही ..
कंपनीचाच मुख्यालय आणि मालकी सिंगापोर पण माझी नोकरी ऑस्ट्रेलयातील मध्ये , कामासाठी सिंगापुर ला होतो काही कामा मुले अचानक जर्मनी ला जायचे होते , पाहील प्रश्न आला कि इथे सिंगापुर मध्ये जर्मनीच्या थंडीला पुरतील असे कपडे कुठून मिळणार...३००-५०० $ ... मालक म्हणला काळजी नको करू कंपनी या साठी चांगले कपडे घेऊन देईल .. आम्ही असा कद्रू पण करीत नाही .... चला अनुभव तर चांगला आला .. सगळे बुकिंग झाले , चक्क सिंगापोरर सारख्या विषुवृत्ताचं ठिकाणी चांगले रेटेड थंडीचे कपडे मिळले
सलग १३ तासाची फ्लाइट होती म्हणून मी शनिवारी निघायचे जायचे ठरवले ... एकतर फ्रॅंकफुर्ट पासून कामाचे ठिकाण अजून पुढे होते आणि दुसरे म्हणजे सोमवारी सकाळी वेळेवर कामाचं ठिकाणी ताजे तवाने असावे आणि शनिवारी सकाळी बॅग वैगरे घेऊन काहीतरी राहिलेले घेण्यासाठी कारखान्यात गेलो ... माझा प्रवासी कपडे तयारी बघून हा पुतण्या मला म्हणाला काय रे आजच चालल्यास .. मी म्हणले हो ( मनात होते कि लेका एवढी चिंगू गिरी करतोय? पण हे दिसत नाही कि मी माझा विकांत कंपणी ला देतोय )
१ दिवसाचे हॉटेल आणि खाणे कंपनी ला जास्त दयावे लागले ... त्यासाठी ह्या वडिलांचं पैशावर श्रीमंत झालेलया पुतण्याची हि चिंधीचोर गिरी ...

तो बॉस राहात नाही.

प्रचेतस's picture

1 Dec 2021 - 9:45 am | प्रचेतस

आपले लेखन नेहमीच आवडते.

तुषार काळभोर's picture

1 Dec 2021 - 2:01 pm | तुषार काळभोर

असे "ऑलवेज राईट" नसलेले बॉस सगळ्यांच्या करियरमध्ये कधी ना कधी येतातच.

आजी's picture

6 Dec 2021 - 12:49 pm | आजी

माझ्या या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या.वाचकसंख्याही भरपूर आहे. हे पाहून आनंद झाला. बहुतेक जणांनी विस्तृत अभिप्राय दिलेत. आणि स्वतःच्या बाॅसचे अनुभव सांगितले आहेत. माझ्या अनुभवाशी प्रत्येकानं स्वतःला रिलेट केलं. ही समाधानाची बाब. सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

कर्नलतपस्वी's picture

7 Dec 2021 - 10:32 am | कर्नलतपस्वी

Soldiers do or die they don't ask why.

जेवढे मिळाले तेवढे friend philosopher and guide म्हणून काहीच त्रास नव्हता. दिवसा बाँस आमची शाळा करायचे आम्ही संध्याकाळी मधूशाळेत त्यांची शाळा घ्यायचो.

कर्नलतपस्वी's picture

7 Dec 2021 - 10:36 am | कर्नलतपस्वी

अशुद्ध चे शुद्ध केले.