✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एसटीचा संप : विलीनीकरण एकच मार्ग ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Sun, 11/21/2021 - 10:19  ·  लेख
लेख

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात आपली सर्वांची लालपरी, एसटी याची सेवा देणा-या कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करावे या एकमेव मुद्द्यावर आंदोलन सुरू असून गेली काही दिवसांपासून ऐन दिवाळीत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरू झालेले काम बंद आंदोलन आजही सुरू आहे.

maha-st
बोधचिन्ह

आघाडी सरकार असो की मागील सरकार असो दोन्हीही सरकारांनी विलीनीकरण शक्य नाही अशा भूमिका घेतलेल्या होत्या. आणि मा.न्यायालयानेही याबाबतीत समिती नेमून निर्णय घ्यावा असे म्हटलेले आहे. एसटी तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित आहे, म्हणून एसटी सर्वांसाठीच वेगळा विषय आहे, म्हणून हा काथ्याकूट.

एक नजर टाकूया एसटीच्या इतिहास भूगोलोकडे- देशातील सर्वसामान्य जनतेला दळणवळणासाठी किफायतशीर दरात' ना नफा ना तोटा' या तत्त्वावर राष्ट्रीयकरणाच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्रसरकारने मार्ग परिवहन अधिनियम-१९५० तयार केला आणि त्या अन्वये राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्थापन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ही संस्था एष्टीचा कारभार चालवते. ही एक स्वतंत्र संस्था असून त्यास सरकार काही प्रमाणात अनुदान देतं आणि बाकी पैसा एसटी उभी करते. सरकारचे परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष असतात. एसटीची तिकिटं, गाड्या भाड्यावर देणे यातून एसटीला उत्पन्न मिळतं. एसटी कर्मचारी हा सरकारी कर्मचारी आहे, परंतु तो निमसरकारी आहे. एसटी कर्मचा-यांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे, नसता एकदा की तिची चाके रुतून बसली की पुन्हा मग त्यातून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटते. एसटीचा प्रवास आणि सुविधा आपल्या सर्वांचाच हळवा विषय आहे, आपण सर्वच एसटीने प्रवास करून मोठे झालेलो आहोत आणि काही तर, एसटीची वाट पाहणारे कायम प्रवासी आहेत. आपल्या सर्वांचाच तो जिव्हाळ्याचा विषय आहे.

ST-bus
आपली एसटी

एसटीचे शासनात विलीनीकरण झाले तर कर्मचा-यांचे प्रश्न सुटणार आहेत का ? वेतन वाढणार आहेत का ? सध्याचे त्या कर्मचा-यांचे वेतन फारच तुटपुंजे आहे असे व्यक्तीगत मत आहे. दहा वर्षाच्या सेवेनंतर चालक वाहक यांचे वेतन सतरा हजाराच्या जवळपास जाते. मला वाटते प्रदीर्घ सेवेनंतरही मिळणारे वेतन आजच्या काळात कमी आहे.

एसटी गेली अनेक वर्ष कायम तोट्यात असल्याच्या बातम्या वाचनात येत असतात. लॉकडाऊन काळात तर एसटी जवळजवळ बंद अवस्थेत होती त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीच्या नुकसानीत अजूनच भर पडली. एसटीचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावरही भर दिला पाहिजे असे वाटते, एसटीच्या खूप जागा आहेत त्यात गाळे काढून ते भाड्याने देणे, निगा राखणे, व्यवसायीकरण वगैरे करून त्यावर भर दिला तर एसटीचा आर्थिक स्त्रोत वाढेल असे वाटते. प्रवाशांना वेगवेगळ्या दिल्या जाणा-या सवलती कमी केल्या पाहिजेत. तरच एसटीची अवस्था सुधारेल असे वाटते. आर्थिक चणचणीवरचा उपाय म्हणून नुकतेच तिकीट दरामधेही सतरा टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. अपुरे आणि वेळेवर न होणारे पगार.आगारांमधील वाईट परिस्थिती, एसटीच्या अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचनात येतात.

ऑक्टोबर अखेरीस कर्मचा-यांनी राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे, राज्य सरकारने महागाई भत्ता बारा टक्क्यावरून अठ्ठावीस टक्के केला आहे, असे असले तरी एसटी कर्मचारी यावर नाखुष असून एसटी महामंडळाचं शासनात विलणीकरण करण्यात यावे हीच त्यांची मुख्य मागणी आहे. कोणत्याही संघटनेच्या नेतृत्वाशिवाय हे आंदोलन सुरू आहे.

एसटी शासनाच्या ताब्यात गेल्यावर सर्व प्रश्न सुटतील असे या एसटी कर्मचाऱ्यानं वाटते. एसटी विलीनीकरण कसे होऊ शकते ? एसटी महामंडळाची निर्मिती ही Road Transport corpaoration Act 1950 नुसार झालेली आहे. हा केंद्र सरकारचा कायदा आहे त्यामुळे या कायद्याखालचं महामंडळ बरखास्त करून ते राज्य शासनात विलीन करण्याची प्रक्रिया असेल. राज्य परिवहन महामंडळ कायदा १९५० अन्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अस्तित्वात आलेले आहे, त्यावेळी राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे भाग भांडवल यात गुंतविण्यात आलेले होते. कायद्यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ स्वायत्त राज्यसरकारची कंपनी किंवा राज्यसरकारचा विभाग म्हणून राहू शकतो. विलणीकरणासाठी केंद्रसरकारची परवानगी घेणे आणि त्यांचे भागभांडवल परत करणे आवश्यक असेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन आपला स्वायत्त दर्जा संपुष्टात आणून राज्याचा विभाग म्हणून राज्य सरकारने मान्यता द्यावी असा ठराव मंजूर करून राज्य सरकारला विनंती करणे गरजेचे आहे, अशावेळी महामंडळाची आताची रचना संपुष्टात येईल.

विलीनीकरणानंतर, एसटी कर्मचा-यांचे सर्व वेतन भत्ते सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे शासनावर आर्थिक भार पडेल. ( पडला तर पडू द्या) एसटीचे ९२ हजार कर्मचारी आहेत, त्यांची एकदा मागणी मंजूर झाली की इतर महामंडळाच्या कर्मचाऱ्याचीही मागणी पुढे येईल. देशात एकूण ५० पेक्षा अधिक परिवहन महामंडळे आहेत, केवळ आंध्रप्रदेश परिवहन महामंडळाचे राज्यशासनात विलणीकरण झालेले आहे, बाकी मंडळे अशी तशी आधारावर चालू आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे, एसटी कर्मचा-यांचे वेतन सुधारले पाहिजे. नव्या बसेस खरेदी केल्या पाहिजेत. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे. प्रवाशांच्या मार्गावर नियमित वेळेवर बसेस आल्या गेल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांची अरेरावी कमी होऊन नम्रपणा आला पाहिजे वगैरे मतं मांडण्यासाठी हा धागा.

काथ्याकूट विस्कळीत असला तरी, मुख्य विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या विचारांचे स्वागत आहे. वीस बावीस वर्ष नियमित एसटीने प्रवास करीत राहीलो आहे. प्रवाशी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आंदोलनात प्रवाशांच्या बाजूने उभा राहीलो आहे. बाकी, काथ्याकूट माहिती संदर्भ आणि छायाचित्रे जालावरील चालूघडामोडी इतर संकलन यातून केलेले आहे, ते बरोबरच असू शकते असा दावा नाही. (चुभूदेघे)

वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
71782 वाचन

💬 प्रतिसाद (253)

प्रतिक्रिया

आता पुढील निर्णयासाठी २२

चौथा कोनाडा
Sat, 03/12/2022 - 12:53 नवीन
आता पुढील निर्णयासाठी २२ मार्चपर्यंत वाट पाहणे आहे.
वेळ काढत समोरच्याला जेरीस आणायचे हाच डाव आहे शासनाचा ! ... आणि १० हजार कंत्राटी कामगारांची भरती करण्याची ही एसटी महामंडळाने घोषणा केली आहे
आधी कंत्राटीकरण आणि मग ( सर्व शोषण झाले की) खासगीकरण)
संबंधीत लुटारू याचीच वाट पहात होते. सगळी कंत्राटं आपल्या बगलबच्च्चांना द्यायची , कामगारांच्या तोंडचा घास पोटभरल्या कंत्राटदारांच्या घश्यात घालायचा हाच डाव असणार. सर्व शोषण झाले म्हंजे काहीच शोषण्यासारखे राहिले नाही स्वस्तात महामंडळ विकून टाकायचे (ते ही आपल्याच बगलबच्च्चांना ) अवघड आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जसे केंद्र

कपिलमुनी
Tue, 03/29/2022 - 15:05 नवीन
स्वस्तात महामंडळ विकून टाकायचे (ते ही आपल्याच बगलबच्च्चांना ) जसे केंद्र सरकार कंपन्या विकत आहे तसेच का हो ? की लगेच तिकडे भूमिका वेगळी असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

म्हणजे

प्रदीप
Sat, 04/09/2022 - 14:17 नवीन
केंद्र सरकार आपल्या बगलबच्च्यांनाच कंपन्या विकत आहे, असे आपले म्हणणे आहे काय? तसे केले असेल तर कंपन्या विकतांना जे काही प्रोसिजर असते, त्याला त्यांनी चाट मारली, व हेराफेरी केली असे झाले की. ह्याबद्दल काही ठोस माहिती तुमच्याकडून येथे मिळाली तर वाचावयास आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

डावाकडचे लोक शहराकडे धावतात.

कंजूस
Sat, 03/12/2022 - 10:43 नवीन
कारण सोयी शहरातच मिळतात. डोक्यावर ओवरब्रिजचे छप्परही मिळते. पाणी वीज मिळते. गावाची एसटी गेल्याने आणखी एक कारण वाढले गाव सोडण्याचे. आता सरकारी समिती मंडळ परदेश दौरा करणार का लंडनचा.?परिवहनाचा आढावा घेण्यासाठी? मग नवीन अहवाल सादर करणार? कोकणासाठी कटामरान सुरू? महाराष्ट्रात आतमध्ये हेलिकॉप्टर सेवा?
  • Log in or register to post comments

कदाचित

धर्मराजमुटके
Sat, 03/12/2022 - 18:06 नवीन
परप्रांतिय युपी बिहार मधे भाजपा ला मत देऊन रेल्वेमधून महाराष्ट्रात येतात. त्यांना महाराष्ट्राच्या मुख्य शहरातच रोखून धरायचे. गावागावात पसरून द्यायचे नाही म्हणून तर एस.टी. बंद केली नसेल ना ?
  • Log in or register to post comments

होय.

शानबा५१२
Sat, 03/12/2022 - 18:55 नवीन
होय.
  • Log in or register to post comments

कामगार नी किती तानावे

sunil kachure
Sat, 03/12/2022 - 20:20 नवीन
चार महिने संप चालू आहे.ह्यांची एकच मागणी एसटी महामंडळ चे सरकार मध्ये विलशिकरण करा. ही मागणी आघडी सरकार च काय कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार आता असते तरी मान्य कारणे शक्यच नाही. कामगार ना भडकावून चार महिने संप करण्यास भाग पाडण्यात bjp च मोठा हात आहे . नुकसान मात्र कामगार चे च होणार आहे पगार वाढ करा ,किंवा बाकी सुविधा ध्या ह्या मागण्या ठीक आहेत. पण महामंडळ नीट चालवा. प्रवासी लोकांस आस्था वाटेल अशी सेवा ध्या. खासगी गाडी चे प्रवासी एसटी कडे परत वळतील असे नियोजन करा. महामंडळ फायद्यात आले तर कोणतेही सरकार चांगला पगार देईल च आता तरी थोडे शहाणपण असेल तर नेत्यांना फाट्यावर मारून कामावर हजर व्हावे.
  • Log in or register to post comments

Bjp शासित

sunil kachure
Sat, 03/12/2022 - 20:30 नवीन
किती BJP शासित राज्यात एसटी महामंडळ अस्तित्त्वात आहेत आणि महाराष्ट्र पेक्षा चांगल्या स्थिती मध्ये आहेत,महाराष्ट्र पेक्षा जास्त पगार तेथील कामगार नी bjp शासित सरकार देत आहेत. कर्नाटक चे उदाहरण देवू नका ते राज्य पहिल्या पडूनच प्रगती करणारे आहे आताच्या तेथील bjp सरकार चा त्या प्रगती शी काही संबंध नाही. योगी महाराज चे गोडवे गात असता. यूपी मध्ये st महामंडळ आहे का? असेल तर काय स्थिती मध्ये आहे पगार तरी मिळतो का . थोडाफार तरी कामगार ना ते पण सांगत जा. बिहार,विषयी तर न बोलले बर.
  • Log in or register to post comments

तारीख पे तारीख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/24/2022 - 09:52 नवीन
काल म्हणजे २२ मार्चला मा.न्यायालयासमोर सुनावणी होती. काल मा. न्यायालय म्हणाले, विलीनीकरणाच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निर्णय नकारात्मक असल्यास तुम्हाला त्याविरोधात दाद मागण्याची मुभा आहे. हा विषय तसाही सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तुमची मागणी सरकारकडून मान्य झाली तर प्रश्नच मिटेल; परंतु सरकारचा याविषयी अंतिम निर्णय होईपर्यंत तुम्ही परिस्थिती आणखी गंभीर करण्याऐवजी कामावर रुजू का होत नाही ? आत्महत्या करुन प्रश्न सुटणार आहे का ? असा परखड सवाल मुंबई उच्चन्यायालयाने मंगळवारी संपकरी एसटी महामंडळ कर्मचा-यांना केला. राज्यसरकारकडून निर्णय घेण्यासाठी चालढकल केली जात आहे आजपर्यंत १०७ कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या आहे, निराशेपोटी कर्मचारी आत्महत्येसारखा टोकाचे पाउल उचलत आहेत असे संपकरी कर्मचा-यांच्या वतीने अ‍ॅड. गुरणरत्न सदावर्ते म्हणाले. आत्महत्त्या करुन प्रश्न सुटणार नाही. औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्थापन झालेल्या समितीचा अहवालही आलेला आहे. त्यामुळे कर्मचा-यांनी कामावर रुजू होणे आवश्यक आहे. बसेस उभ्या असल्याने महामंडळाचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान. दुसरीकडे प्रवाशी जनतेच हाल होत आहेत. असे एसटी महामंडळाचे वकिलांनी आपले म्हणने मांडले. हा प्रश्न न्यायालयासमोर आहे आणि आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. मग सरकारचा अंतिम निर्णय होईपर्यंत तुम्ही (कर्मचारी ) कामावर रुजू झालात तर आभाळ कोसळणार आहे का ? आत्महत्या सत्रसुरु ठेवून प्रश्न सुटणार आहे का असेही खंडपिठाने म्हटले आहे. बाकी, कर्मचा-यांच्या व्यथा समजून घेऊन एक समिती स्थापन करुन त्या समितीला निर्णय घेण्याचे सांगावे अशी आणखी एक मागणी एसटी कर्मचा-यांचे वकिल गुणरत्ने यांनी केली. काय समिती आहे, त्याची कागदपत्रे सादर करा, मग आम्ही ठरवू असेही मा.न्यायालयाने सांगितले. एसटीच्या विलीनीकरणाचा अहवाल स्वीकारला का नाही अजून त्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी सरकारी वकिलांनी मागितला होता पण खंडपिठाने एक एप्रीलपर्यंत माहिती देण्याचे सांगितले. बाकी, काल, एसटी महामंडळाचे राज्य सरकारमधे विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट करणारा मुख्य सचिवांच्या अध्यक्षेतेखाली त्रीसदस्यीय समितीचा अहवाल राज्य मंत्रीमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत स्वीकारण्यात आला त्यामुळे विलीनीकरणाची शक्यता संपुष्टात आली आहे. अगली तारीख ५ एप्रील. (माहिती संकलन : मटा, सकाळ, लोकमत. वृत्तचित्रवाहिन्या यावरुन साभार) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वकिलांना फी किती दिली?

कंजूस
गुरुवार, 03/24/2022 - 10:31 नवीन
आर्थिक दाव्यात वकील लोक टक्केवारीत पैसे आगाऊ घेतात असे ऐकून आहे. जाणकारांनी प्रकाश पाडावा. ((आमच्या ओफिसातल्या एकाने नोकरी सोडल्यावर मला पैसे कमी मिळाले तर तीन लाख रुपयांचा दावा लावण्यासाठी तीस हजार रु आगावू घेतले होते.))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐकीव माहिती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/24/2022 - 11:53 नवीन
सुरुवातीला एसटी कर्मचा-यांचे संघटनेचे वकील म्हणून संघटनेने त्यांना त्याचे पैसे दिले असतील. पण एसटी कर्मचा-यांनी ३०० आणि काहींनी पाचशे रुपये दिले होते, एका एसटी आगारात हे मी प्रत्यक्ष पाहिले होते. वकिलांना केसेस लढविण्यासाठी पैसे द्यावे लागतात. आणि आपली एसटी शासनात विलिनीकरण होईल या अपेक्षेने कर्मचा-यांनी 'अब नही तो फिर कभी नहीं' अशा अपेक्षेने हे पैसे दिले असावे आणि तशी अपेक्षा करणे चूक नाही. कर्मचा-यांचे वेतन कमी आहे, अपुरे आहे आणि त्यात अनियमितता आहे. त्याबद्दल मला सहानुभूती आहे, त्यासाठी हे सर्व केले गेले. पण सर्व पुरावे घटनाक्रम पाहता एका चुकीच्या मागण्यांसाठी हट्ट केला गेला असे वाटायला लागले आहे. कर्मचा-यांच्या दृष्टीने हे दुर्दैवी आहे. निकाल विरोधात गेला तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आपण हा लढा लढू असे जर कर्मचा-यांना कोणी पटवले आणि तसे झाले तर मग अवघड आहे सर्वच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी हेच.

कंजूस
गुरुवार, 03/24/2022 - 13:18 नवीन
निकाल विरोधात गेला तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आपण हा लढा लढू असे जर कर्मचा-यांना कोणी पटवले आणि तसे झाले तर मग अवघड आहे सर्वच.
पुन्हा न्यायालयीन प्रकरण म्हणजे कै बोलायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुळात एस टी महामंडळाचे

सुबोध खरे
गुरुवार, 03/24/2022 - 10:38 नवीन
मुळात एस टी महामंडळाचे कर्मचारी यांच्या सेवा अटी आणि शर्ती मध्ये "शासकीय नोकरी" हे नाहीच. कारण मग प्रत्येक महामंडळाला (आयुर्विमा कापूस वस्त्रोद्योग मत्स्य विभाग साखर इ इ ) येणाऱ्या वेतन आयोगाच्या अटी आणि शर्ती लागू कराव्या लागतील. आणि हा आर्थिक भर शासनाला पेलणे अशक्य आहे. तेंव्हा त्यांना शासकीय नोकरीत सामावून घ्या असे न्यायालय म्हणूच शकणार नाही. कारण हा प्रशासकीय निर्णय आहे. उद्या शासनाने न्यायालयाला सांगितले कि हा येणार आर्थिक भार न्यायालय उचलणार आहे का? तर ते न्यायालयाला झेपणार आहे का? न्यायालय हे प्रशासकीय निर्णय कायदेशीर आहे कि बेकायदेशीर आहे इतकेच सांगू शकते. तुम्ही असा निर्णय घेतलाच पाहिजे असा आदेश ( writ of mandamus) देऊ शकत नाही. त्याला न्यायालयीन अधिक्षेप (judicial overreach) म्हणतात. त्यातून उद्या उच्च न्यायालयाने जरी सांगितले कि याना शासकीय सेवेत सामील करून घ्या तर त्याविरुद्ध महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात नक्कीच जाईल आणि मग हे प्रकरण अजून काही वर्षे/ दशके लटकत राहील. एस टी च्या कर्मचाऱ्यांना फूस लावणारे लोक त्यांच्या पायावर धोंडा पाडत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

एस टी च्या कर्मचाऱ्यांना फूस

प्रसाद_१९८२
Mon, 03/28/2022 - 12:46 नवीन
एस टी च्या कर्मचाऱ्यांना फूस लावणारे लोक त्यांच्या पायावर धोंडा पाडत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
या फुस लावणार्‍यांत हा गुरणरत्न सदावर्ते सध्या आघाडीवर आहे असे दिसते. एसटी कर्मचार्‍यांच्या पगारवाढ, नियमित वेतनाची हमी, भत्ते व इतर मागण्या सरकारने मान्य केल्यावर भाजपाने या आंदोलनातून काढता पाय घेतला हे एक बरे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

त्यातून उद्या उच्च

चौथा कोनाडा
Mon, 03/28/2022 - 12:59 नवीन
त्यातून उद्या उच्च न्यायालयाने जरी सांगितले कि याना शासकीय सेवेत सामील करून घ्या तर त्याविरुद्ध महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयात नक्कीच जाईल आणि मग हे प्रकरण अजून काही वर्षे/ दशके लटकत राहील. एस टी च्या कर्मचाऱ्यांना फूस लावणारे लोक त्यांच्या पायावर धोंडा पाडत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
सहमत. जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या होत असल्याचा बातम्या येतच आहेत. सद्य परिस्थितीचे गांभिर्य ओळखून लवकर माघार घेऊन इतर मार्गाने पगारवाढ पदरात पाडुन घेणे इष्ट ! नाही तर नेहमीचे अनिष्ट अटळ आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दिवाळीत बसेस बंद केल्या तर

कंजूस
Mon, 03/28/2022 - 14:10 नवीन
संपाची झळ चांगलीच पोहोचेल या विचाराने सुरू केलेले आ्दोलन आता उन्हाळी सुटीत कसले मागे घेणार?
  • Log in or register to post comments

धडा

बाबुराव
Mon, 03/28/2022 - 15:00 नवीन
आता कोर्टाने धडा शिकवावा. जनतेचे हाल लय झाले आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आता कोर्टाने धडा शिकवावा.

चौथा कोनाडा
Mon, 03/28/2022 - 17:05 नवीन
आता कोर्टाने धडा शिकवावा.
कोर्ट कसला धडा शिकवणार ? उलट संबंधित लोक वेळ घालवण्यासाठी कोर्टाचा वापर करत आहेत, उध्वस्त एसटी कर्मचारी होणार आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबुराव

सुसाइड नोट लिहून एसटी

प्रसाद_१९८२
Mon, 03/28/2022 - 17:10 नवीन
सुसाइड नोट लिहून एसटी कर्मचार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या -- https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/st-bus-driver-commits-suicide-in-under-railway-in-jalgaon/articleshow/90495690.cms
  • Log in or register to post comments

दुर्दैवी.

चौथा कोनाडा
Tue, 03/29/2022 - 13:55 नवीन
दुर्दैवी. कर्मचाऱ्यांची बाजू ठोसपणे पुढे येत नाही असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

सुसाइड नोट लिहून एसटी

प्रसाद गोडबोले
Tue, 03/29/2022 - 14:45 नवीन
सुसाइड नोट लिहून एसटी कर्मचार्‍याची रेल्वेखाली आत्महत्या
जर रेल्वे कर्मचारी बंद पुकारुन घरी बसले असते तर रेल्वेच चालल्या नसत्या अन एसटी कर्मचार्‍याचा जीव वाचला असता ! सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन रेल्वे कर्मचार्‍यांनी बंद पुकारावा असे आवाहन मी ह्या निमित्ताने करत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
Tue, 03/29/2022 - 17:47 नवीन
सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन रेल्वे कर्मचार्‍यांनी बंद पुकारावा असे आवाहन मी ह्या निमित्ताने करत आहे !
हा .... हा .... हा .... !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आज कोर

कंजूस
गुरुवार, 04/07/2022 - 12:33 नवीन
कोर्टाचा आदेश आलाय आज. अगदी विलीनीकरण नाही पण कामगारांना पेन्शन मिळणार असेल तर खूप फायदा होईल. संपकरी कामावर येतील बहुतेक.
  • Log in or register to post comments

आता एसटी रस्त्यावर धावणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/07/2022 - 12:43 नवीन
विलीनीकरणाच्या प्रश्नावर चालु असलेल्या एसटी कर्मचा-यांचे आंदोलन आता निर्णायक वळणावर आलेले आहे, अर्थात विलीनीकरण मात्र होणार नाही हे नक्की झाले आहे. आंदोलन आता कधी संपते हाच मुख्य प्रश्न आहे. मा.न्यायालयात काल सुनावणी झाली त्यात एसटी महामंडळाचे कर्मचारी १५ एप्रीलपर्यंत कामावर रुजु होणार असतील तर त्यांच्यावरील बडतर्फी, निलंबन, अशी कारवाई मागे घेण्यास आम्ही महामंडळाला सांगू शकतो जे कर्मचारी १५ एप्रीलपर्यंत रुजू होणार नाहीत त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा मार्ग राज्यसरकार व महामंडळाला मोकळा असेल असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. आज गुरुवारी पुन्हा सुनावणी आहे. तसे आदेश होण्याची शक्यता आहे. विलीनीकरणाची मुख्य मागणी तीन सदस्यीय समितीने फेटाळली आहे. आणि तोच निर्णय राज्यसरकारनेही घेतला आहे. एसटी महामंडळाला आर्थिक सहाय्य करण्याची समितीने केलेली मागणी राज्यसरकारने स्वीकारली आहे. सरकारने विलीनीकरणाची मागणी फेटाळली आहे. त्याला आव्हान द्यायचे असल्यास तुम्हाला अन्य कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. १५ एप्रीलपर्यंत कर्मचा-यांवर रुजु होणा-या कर्मचा-यांवर कारवाई करु नये अशी विनंती आम्ही एसटी महामंडळाला करु शकतो, त्यानंतरही जर कर्मचारी रुजू झाले नाही तर कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही करण्यास एसटी महामंडळ आणि राज्यसरकार मोकळे असेल. कालच्या सुनावणीत दोन्ही बाजूने मत मांडून झाल्यानंतर मा.न्यायालयाने आपले मत मांडले. आता एसटी कर्मचा-यांनी कामावर रुजू व्हावे, वेतन वाढण्यावर लक्ष द्यावे-करार आणि इतर मागण्या कशा पूर्ण होतील त्यावर फोकस करावा. आता वकिलाच्या नादी लागण्यात अर्थ नाही असे वाटते.वेतन आणि अनुषांगिक मागण्या पुढे लावून धरता येतील. नकारात्मक वातावरणामुळे एसटी कर्मचारी निराश होत आहे तेव्हा सकारात्मक विचार करुन कर्मचा-यांनी आता कामावर रु़जू होऊन एसटी सुरु करावी असे वाटते. एसटीचा एक मोठा लढा कर्मचा-यांनी स्वतःच्या जीद्दीवर लढला, वेतन नसतांना अशा लढाया, संघर्ष सोपा नसतो. अशा लढाऊ कर्मचा-यांचे मनापासून अभिनंदनही करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

या संपादरम्यान, पेन्शन बद्दल

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/07/2022 - 12:51 नवीन
या संपादरम्यान, पेन्शन बद्दल काही वाचण्यात ऐकण्यात आलेले नाही. पेन्शनचा काही फायदा होणार असेल तर खरोखर उत्तम. बाकी, हायकोर्टाने निर्णय दिलाच आहे, पण बहुधा कामगार नेते सुप्रीम कोर्टात जाऊन संप लांबवू शकतात का ते पहायचे ! ___________________________________________________________________ विलीनीकरण थांबवू शकत नाही, कोणाचा बापही थांबवू शकत नाही ! "विलीनीकरण तुम्हाला मिळेलच; फक्त तुम्ही मला साथ द्या. त्यात एकच बाधा येऊ शकते. तुमच्यातील्न विश्वास कमी झाला तर तुमच्यात फूट पाडली जाण्याची शक्यता आहे. अन्यथा विलीनीकरण कोणाचा बापही थांबवू शकत नाही" असा दावा अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांनी काल बुधवारी रात्री आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या संपकरी कामगारांसमोर केला. " हा स्वाभिमानाचा लढा आहे, कष्टकर्‍यानो, तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की, आज सरकार न्यायालयासमोर आले आणि म्हणाले की, ९२ हजार कर्मचार्‍यांना सहा महिने तुरुंगात टाकण्याविषयीची आमची याचिका मागे घ्यायची आहे. न्यायालयाने एफ आय आर वै सुद्धा मागे घेण्याची सुचना सरकारला केली आहे" असे अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते म्हणाले. सरकारच्या अहवालाला आव्हान देण्यासही बहुतांश कामगारांनी पाठिंबा व्यक्त केला. _______________________________________________________________________________________ बघायचे आता काय होते.
  • Log in or register to post comments

मग मात्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/07/2022 - 13:11 नवीन
एसटी कर्मचा-यांना आता पुन्हा अशी कृती म्हणजे संपावर जाण्याची कृती करु नये असे मा. न्यायालयाने म्हटले आहे. पण कर्मचारी सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि कामावरही जाणार नाही असे ठरत असेल तर मग एसटीचं भवितव्य अंधारात जाईल असे म्हणावे लागेल. बघुया पुढे काय काय होते ते.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

सदावर्ते यांना कोर्टाने झापले . . .

कंजूस
गुरुवार, 04/07/2022 - 17:51 नवीन
असे चानेल बातम्यांतून ( एबिपीमाझा) कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

संप मिटला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/07/2022 - 13:08 नवीन
प्रतिसाद प्रकाशित करुन टीव्हीवर बातम्या बघू लागलोच की मा.न्यायालयात सुरु असलेल्या एसटीच्या सुनावणीची बातमी आली. संपकरी कर्मचा-यांनी २२ एप्रीलपर्यंत कामावर रुजू व्हावे, असे आदेश मा. न्यायालयाने दिला असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर, सर्व कर्मचा-यांना पुन्हा अशी कृती करणार नाही असा इशारा देऊन सर्वांना सेवेत ( बडतर्फ, निलंबीत कर्मचारी) सामावून घ्यावे असेही म्हटले आहे. सर्व कर्मचा-यांना निवृत्तीवेतन-ग्रॅच्युएटीचा लाभ देण्याचे आदेशही मा.न्यायालयाने दिले म्हटल्याच्या बातम्या येत आहेत. सिंह आणि कोकरुच्या वादात आम्हाला कोकरु वाचवावे लागेल असेही कोर्टाने म्हटले आहे. कोवीड काळातील कर्मचा-यांचा भत्ता प्रत्येकी ३०० प्रमाने तीस हजार रुपये देण्याचे आदेशही मा.न्यायालयाने दिले असे कर्मचा-यांचे वकील गुणरत्ने सदावर्ते हे सांगत होते. सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजिविकेचे साधन कर्मचा-यांनी गमावू नये असे आवाहनही मा.न्यायालयाने कर्मचा-यांना केले. संपकरी कर्मचारी सारासार विवेक बुद्धीला पटणार नाही असे वागले परंतु अशा सर्व कर्मचा-यांना एकदा संधी द्यायला हवी मा. न्यायालयाने म्हटले. बातम्यांच्या सर्वत्र धडाका आहे. संपकरी आंदोलन यशस्वी झाल्याचे म्हणत आहे. 'विलीनीकरणाचा' मुख्य लढा होता ते सोडून इतर मागण्या पूर्ण झाल्या म्हणून कर्मचारी खुश आहेत असे वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवरुन दिसत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दिलासा देणारी मोठी बातमी ... !

चौथा कोनाडा
Fri, 04/08/2022 - 17:03 नवीन
आणि २२ एप्रिलच्या आत कामावर हजर झाल्यास कारवाई नाही, ग्रॅज्युइटी आणि पेन्शनचे लाभ मिळणार त्यामुळे संपकरी कामगारांनी जल्लोष केला ही दिलासा देणारी मोठी बातमी ... ! पण संप मागे घेतल्याचे अजून जाहीर नाही, न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यावरच संपाबाबत निर्णय घेणार आहेत. ... काही तरी आशादायक सुरु झाले हे खुप छान झाले !
  • Log in or register to post comments

नाही. प्रकरण भडकले.

कंजूस
Fri, 04/08/2022 - 17:07 नवीन
आता काही एसटी सुरू होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल

सुरसंगम
Sat, 04/09/2022 - 08:31 नवीन
शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल.
  • Log in or register to post comments

अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत.

सुबोध खरे
Sat, 04/09/2022 - 10:12 नवीन
अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आता सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करायचं आहे म्हणून फिल्डिंग लावणं चालू आहे अशी आतली बातमी आहे. आंदोलनाचा आणि शरद पवार यांचा काय संबंध? गृह खाते राष्ट्रवादी कडेच आहे पण पोलिसांना आंदोलकांच्या हालचालींची माहितीच नव्हती हे कसं शक्य आहे? सुसू ताई बद्दल सहानुभूती निर्माण करायची आहे त्यामुळे केवढे फुटेज दिले जात आहे ते पाहून घ्या. सुप्रिया ताई सर्वाना हात जोडून विनंती करताना सगळ्या चॅनेल्स वर परत परत कशाला दाखवलं जातंय? पावसात भिजल्यानंतर आता आंदोलनाला शांतपणे सामोरे गेले याची सहानुभूती निर्माण करण्याचा डाव आहे हे कोणीही सहज सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरसंगम

चिघळत चालली परिस्थिती.

गवि
Sat, 04/09/2022 - 10:07 नवीन
चिघळत चालली परिस्थिती. काहीतरी तोडगा निघू दे आता तरी. कोणाचे संसार उध्वस्त नकोत.
  • Log in or register to post comments

आता विवेकाची गरज

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/09/2022 - 11:16 नवीन
काल मा.न्यायालयाचा निकाल आल्यानंतर कर्मचा-यांच्या जल्लोष आपण वृत्तवाहिन्यांवर पाहात होतो. कर्मचा-यांना नेमका काय निकाल आहे हे समजले नसावे असे मला वाटते. आता जेव्हा नेमका निकाल जो आहे तो समजू लागला आणि कर्मचा-यांचे वैफल्य काल समोर आले असे वाटते. कर्मचा-यांच्या पदरात संप आणि आंदोलनाने आणि न्यायालयाच्या आदेशामुळे फार काही पदरात पडले नाही, असे वाटते. वरील कर्मचा-यांना संपकाळातील वेतन मिळणार नाही. बडतर्फी निलंबन मागे घेतले तरी २२ एप्रील पर्यन्त कर्मचा-यांना रुजू होणे आवश्यक आहे. झाले नाही तर, त्यांना नौकरीची गरज नाही असे समजून कार्यवाहीचा इशारा आता निकालाच्या बळावर एसटी महामंडळाने दिला आहे. कर्मचा-यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे पण त्यांना कामावर रुजू होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर कर्मचारी स्वत:चे नुकसान करून घेत आहेत असे वाटते. आता मा.न्यायालयाच्या निकालानंतर एसटी सुरु झाली पाहिजे, असे जनतेला वाटत आहे. आणि आता ती सुरु झाली पाहिजे. हाही लेख वाचला पाहिजे. ता.क. कर्मचा-यांच्या संघटना या आंदोलनातून केव्हाच बाहेर पडल्या आहेत. आता वकिलाच्या भरवशावर जर संघर्ष वाढणार असेल तर मला वाटते कर्मचा-यांचे नुकसान होणार आहे. कर्मचा-यांना विवेकाने निर्णय घेण्याची गरज आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पुर्ण सहमत !

चौथा कोनाडा
Sun, 04/10/2022 - 17:05 नवीन
पुर्ण सहमत ! निर्णायक दिवस जवळ आलेत, एसटी कर्मचा-यांनी आता वकिलाच्या नादी लगणे म्हणजे पुर्णपणे आत्मघाताकडे वाटचाल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गिरणी कामगारांच्या

सर टोबी
Sat, 04/09/2022 - 14:26 नवीन
फसलेल्या संपासारखे या संपाचे होऊ नये अशी खूप इच्छा आहे. संप आता पूर्णतः राजकीय झाला असल्याची शंका येत आहे. खाजगी बस सेवा किती वाईट असू शकते याचा खरे तर सर्वांनाच अनुभव असेल. पुणे मुंबई प्रवासा दरम्यान लागणारा निम्मा वेळ तर शहरातल्या वेगवेगळ्या पिक अप पॉईंट्स वर प्रवासी घेण्यातच खर्च होतो. वातानुकूल पुरेसे नसणे, सिझनमध्ये तुफान भाववाढ करणे, उत्तरदायित्वाची पूर्ण अभाव, वाहन नादुरुस्त झाल्यास काहीही पर्यायी व्यवस्था नसणे हि खाजगी सेवेची वैशिष्ठ्य आहेत.
  • Log in or register to post comments

एस टी आंदोलकांची मुंबईत फरफट !

चौथा कोनाडा
Sun, 04/10/2022 - 17:12 नवीन
एस टी आंदोलकांची मुंबईत फरफट ! मुंबई पोलीसांनी शुक्रवारी मध्यरात्रीआणि शनिवारी पहाटे आजाद मैदानातून आंदोलकांना हुसकाऊन लावले. आंदोलकांनी छशिम टर्मिनसवर आश्रय घेतला पण रेल्वे पोलिसांनी तेथुनही हुसकाऊन लावले ! नंतर त्यांच्यावर बाहेरील फलाटावर बसण्याची वेळ आली ! ______________________________________________________________________________________________ एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून हाकलले; पवारांनी टेल्को संप पहाटे मोडल्याची आठवण!! 09 Apr 2022.11:20 AM संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराजवळ सिल्वर ओकपाशी दगड फेक आणि चप्पल फेक आंदोलन केले. संतप्त महिलांनी शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. इतकेच नाही, तर सुप्रिया सुळे या शाहरुख खानच्या मुलाचा आई बनल्या पण एसटी कर्मचाऱ्यांच्या आई आणि बहीण बनल्या नाहीत, असा आरोप महिलांनी केला. मात्र, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रचंड राजकारण झाले असून सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्याच वेळी संपकरी आणि आंदोलन कर्ते एसटी कर्मचारी यांच्यावर पोलिसी कायद्याचा बडगा चालवून मध्यरात्री त्यांना आझाद मैदानातून बाहेर काढले. पोलिसांनी सायंकाळी आझाद मैदानावर प्रचंड फौजफाटा जमवून संचालन केले. पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना आझाद मैदान सोडून जाण्यासाठी सांगितले. परंतु, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले तरच आम्ही आझाद मैदान सोडू अन्यथा इथेच थांबू, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. अखेरीस पोलिसांनी लाठीमार करून आणि पोलिसी बळ वापरून कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानाच्या बाहेर काढले. टेल्कोचा संप पोलिसी बळावर मोडला ! या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पोलिसी बळावर मोडून काढलेल्या एका आंदोलनाची आठवण झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची तुलना अनेकांनी मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संपाशी केली आहे. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी ताणून धरले म्हणून शेवटी गिरण्या बंद पडल्या आणि कामगार देशोधडीला लागला तसे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होऊ नये असे इशारे अनेकांनी दिले आहेत. परंतु त्यावेळी गिरणी कामगारांचा संप हा शरद पवारांनी ज्या पद्धतीने टेल्कोचा संप मोडला होता त्या पद्धतीने मोडून काढण्यात आला नव्हता. आज मात्र एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्या हालचाली पाहता 1990 च्या दशकात मुख्यमंत्री शरद पवारांनी पुण्यात शनिवारवाड्यासमोर जन्मलेल्या टेल्को (म्हणजे आजची टाटा मोटर्स) कामगारांचा संप मोडून काढला त्याची आठवण झाली. टेल्कोचे म्हणजे सध्याच्या टाटा मोटर्सचे हजारो कर्मचारी राजन नायर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारवाड्यासमोर आंदोलन करत होते. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. टीव्ही चॅनेल्स देखील फार नव्हते. होती ती फक्त वर्तमानपत्रे. वर्तमानपत्रांच्या डेडलाईन्स त्यावेळी रात्री 2.00 वाजता संपायच्या. म्हणजे रात्री 2.00 वाजल्यानंतरची बातमी वर्तमानपत्रात यायची नाही. हे लक्षात घेऊन पवारांनी "चोख बंदोबस्त" करून टेल्कोच्या कामगारांचा संप सकाळी पहाटे 4.00 ते 6.00 या दोन तासात मोडून काढला होता. पोलिसी बळावर हजारो टेल्को कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या बस मध्ये भरून महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या शहरांमध्ये उतरवून देण्यात आले होते. शनिवारवाड्याचे मैदान पूर्णपणे अवघ्या 2 तासात पोलिसांनी मोकळे केले होते. त्यावेळी हजारो पोलीस आणि एसआरपी हे अतिशय गुप्तपणे हालचाली करून शनिवारवाड्यावर पहाटेच्या सुमारास पोहोचले होते. टेल्को कामगारांना आपला संप अवघ्या तासाभरात मोडला जाईल याची कल्पनाही नव्हती. परंतु वर्तमानपत्रांच्या डेडलाईन संपल्यानंतर पहाटे 4.00 ते 6.00 या वेळेत पवारांच्या निर्देशानुसार पोलिसांनी टेल्कोचा संप मोडून काढला होता. पवार यांच्या घरावर दगडफेक आणि छप्पर फेक केल्यानंतर एसटी कामगारांच्या संपाची हालत याच पद्धतीने महाविकास आघाडी सरकारने केली. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील रत्न सदावर्ते यांना घरात घुसून ताब्यात घेतले रात्री उशिरा त्यांना अटक केली आणि नंतर मोठा फौजफाटा जमवून पोलिसी बळावर एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री आझाद मैदानातून हाकलले. हेच टेल्को कामगारांचा संप मोडण्यातले आणि आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यामधले साम्य आहे.!! ✍️ द फोकस इंडिया संदर्भ : कायप्पा ढकलपत्र
  • Log in or register to post comments

कोर्टाचे कामकाज, निर्णय,खटला, वकील,

कंजूस
Sun, 04/10/2022 - 18:32 नवीन
यासंबंधी संपकरी फारच अजाणता दाखवत आहेत. वकील म्हणजे युनिअन लीडर असा काही गैरसमज झाला आहे काय?
  • Log in or register to post comments

आधीच

इरसाल
Mon, 04/11/2022 - 13:59 नवीन
शेतीविषयक कायदे "झुंडशाहीने" मोडता येतात हे जर पुर्ण भारतभर केले. त्यात सध्याच्या राज्यकर्त्यंनी त्याला पाठिंबाच दर्शवला होता. तर हे संपकरी सुद्धा त्या मार्गावरुन चालले तर त्यांना दोष कसा देणार. फरक इतकाच आहे तिकडे एसी, बर्गर ,पिज्जा वगैरेची अखंड अप्लाय आणी परदेशातुन पैसा याची जोड आणी पाठबळ होते, इकडे ते नाही.
  • Log in or register to post comments

रहस्यकथाही पुचाट ठराव्यात . . .

कंजूस
Mon, 04/11/2022 - 16:49 नवीन
इतकी वळणं एसटी संपामध्ये येत आहेत.
  • Log in or register to post comments

विलीनीकरण आणि सरकारी नोकरी

स्वधर्म
Mon, 04/11/2022 - 18:23 नवीन
एसटी कर्मचारी विलीनीकरणाची मागणी का करत आहेत, ते पाहिले तर वाईट वाटते. राज्य सरकारच्या कर्मचार्यांना संस्था कितीही अडचणीत आली तरी पगार मिळेलच याची शाश्वती आहे. कामचुकारपणा केल्यास त्यांना कामावरून काढणे अतिशय अवघड आहे. दिलेले आऊटपुट आणि पगार यांचा काही म्हणजे काहीच संबंध नाही, अशी अवस्था आहे. त्याउलट एसटी कर्मचारी रोज जनतेला तोंड देतो, कामात चुकारपणा झाला तर लगेच आधिकार्यांकडून दंड व जनतेकडून वादविवाद ठरलेला. शिवाय सरकारच्या धोरणामूळेच एसटी अडचणीत. त्यामुळे एसटी कर्मचार्यांनी विलीनीकरणच हवे असा हट्ट धरणे सहाजिकच आहे. जर समजा सरकारने काही विशिष्ट विभागाचे अ-सरकारीकरण करून त्या राज्य सरकारी नोकरांना महामंडळात काम करायला लावले तर ते कर्मचारी नक्कीच संप करतील. सरकारी कर्मचार्यांच्या नोकरी व पगाराचे स्वरूप संपूर्ण बदलल्याशिवाय असे हट्ट कमी होणारच नाहीत. त्याचमुळे महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेला लाखो तरूण बसतात. जनतेची सेवा करायची आहे असे म्हणत असले तरी सत्य हेच की सरकारी नोकरीतली शाश्वती व इतर लाभ आणि जवळजवळ संपूर्ण सुरक्षितता, ही कोणाला नको आहे?
  • Log in or register to post comments

एसटी पूर्ववत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/21/2022 - 12:30 नवीन
Image removed. औरंगाबाद बस्थानक

एसटी आता बरीच पूर्ववत झाल्याचे दिसत आहे. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार आज सर्व कर्मचा-यांना रुजू करुन घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज जवळ जवळ ८२ हजार कर्मचारी रुजू झाल्याच्या बातम्या आहेत. अजूनही बरेच कर्मचारी रुजू होणे बाकी आहे. सर्व कर्मचा-यांनी रुजू झाले तरच त्यांचं भलं आहे, नसता कायदेशीर अडचणी वाढतील असे दिसते. मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने लढा पुन्हा उभा करता येईल. बाकी, ब-याच दिवसानंतर एसटीने प्रवास करतांना छान वाटलं. एसटी स्टँड वर प्रवाशांची गर्दी-लगबग. गाड्यांची अनाउन्समेंट, धावपळ, दिसली. आता एसटीनेही नव्या जगाबरोबर जुळवून नवे बदल केले पाहिजेत. आता काल प्रवास करतांना एसटी डेपोतच डिझेल भरुन यायची. आता रस्त्यावरील पंपावर डिझेल भरतांना दिसली. कारण विचारले तर एसटीडेपोतले डिझेल बावीस रुपयांनी महाग आहे, जे भरावे लागते. अशी जर अवस्था असेल तर त्यात बदल करावेच लागतील. एसटीच्या कर्मचा-यांच्या अपु-या वेतनाचा प्रश्न आहेच त्यात सुधारणाही महागाई पाहता त्यात बदल होतील अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद लक्षात घेऊन एसटीने आता इतर वाहतुकीच्या तुलनेत चांगली सेवा देणे गरजेचे आहे. आमच्याकडे कालीपीली (खासगी वाहतूक छोट्या गाड्या) एसटीच्या पुढे धावत असते. प्रवाशी एसटीत बसण्याऐवजी दोन-पाच रुपये कमी लागतात म्हणून खासगी वाहतुक गाड्यांनी प्रवास करतांना दिसतात. बसस्थानकात तर खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटचा सुळसुळाट दिसतो. पुना है क्या पुना. नासिक नासिक, करुन एसटीचे प्रवासी पळवत असतात. एसटीने अशा लोकांना अडविण्यासाठी खासगी लोकांना नेमले आहे, पण ते या लोकांना अडवत नाही. मिलिभगत असते त्यामुळे एसटीचे प्रवासी कमी होतात या आणि असंख्य गोष्टीबद्दल एसटीला विचार केला पाहिजे. एसटीच्या प्रवाशांना मन;पूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments

तुमचेही आभार

Trump
गुरुवार, 04/21/2022 - 14:40 नवीन
नमस्कार सर, ह्या विषयावर चर्चा घड्वुन आणल्याबद्दल तुमचेही आभार. आम्हाला त्यामुळे नवीन माहीती. --
आता काल प्रवास करतांना एसटी डेपोतच डिझेल भरुन यायची. आता रस्त्यावरील पंपावर डिझेल भरतांना दिसली.
माझ्या माहीतीने आगारात डिझेल भरण्यामागे आर्थिक कारण नसुन , हक्काचा आणि भरवश्याचा पुरवठा होता. एसटीच्या काही सेवा (उदा. गाड्या विकत घेण्याएवजी भाड्याने घेणे, काही मार्ग खाजगी करणे, प्रवासी सेवा इ.) खाजगी करुन स्पर्धेला वाव मिळायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संप मागे घेऊन एसटी सेवा आता

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/21/2022 - 17:49 नवीन
संप मागे घेऊन एसटी सेवा आता पूर्ववत होत आहे बघून चांगले वाटले, कर्मचार्‍यांच्या आयुष्याचा प्रश्न होता. एसटीला सुधारणा करायला प्रचंड वाव आहे. तुकाराम मुंढेंसारखा टास्क मास्टर अधिकारी मिळाला तर सर्वांचेच भले होईल . प्राडॉ सर आपण चर्चेचा धागा काढलात, जिव्हाळ्याच्या प्रश्न असल्याने मिपाकरांनी आपली मते हिरिरीने मांडली, चर्चा केली, वाद विवाद केले, आपले मन मोकळे केले, त्यासाठी आपले विशेष धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

कंजूस
गुरुवार, 04/21/2022 - 18:56 नवीन
कोकणात तर एसटीशिवाय कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अगदी.

चौथा कोनाडा
गुरुवार, 04/21/2022 - 21:15 नवीन
अगदी. नुसतं कोकणच नाही तर कित्येक अंतर्गत / दुर्गम / ग्रामीण भागात एसटी शिवाय कठीण आहे. एसटी विना तिथले हाल माध्यमांनी फारसे कव्हर केले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अभिनंदन

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/21/2022 - 14:27 नवीन
अनाकलनीय मागण्यांकरिता सुरु असलेला बेकायदेशीर संप "साम दाम दंड भेद" वापरुन निष्ठुरपणे व्यवस्थित मोडीत काढल्याबद्दल महाविकास आघाडीचे आणि विशेष करुन पवार साहेबांचे हार्दिक अभिनंदन ! सदावर्ते हाच खरा झारीतील शुक्राचार्य होता. आता त्याला काडीने टोचुन बाहेर काढलेला आहे. सातारा पुणे मुंबई कोल्हापुर वगैरे अनेक पोलीसठाण्यात अनेकानेक केसेस अन वॉरंट दाखवुन त्याला डांबुन ठेवा तुरुंगात अन दाखवुन द्या , सदा वर ते नसुन सदा वर आम्हीच आहोत ! ह्या सदावर्ते वर सदावर्त मागुन जण्याची वेळ आणणार पवारसाहेब ह्यात शंका नाही ! परत एकदा जोरदार अभिनंदन पवार साहेब आणि महाविकासाअघाडीसरकार चे !!
  • Log in or register to post comments

कपिल सिब्बल, मुकुल रोहटगी अशा

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/21/2022 - 14:39 नवीन
कपिल सिब्बल, मुकुल रोहटगी अशा नामवंत वकीलांना गुणरत्न सदावर्तेंनी सर्वोच्च न्यायालयात हरवून मराठ्यांना दिलेल्या राखीव जागा रद्द करायला लावल्या. तेव्हापासून महाभकास आघाडी सरकार त्यांच्यावर सूड उगविण्याची संधी शोधत होते. दुर्दैवाने या संपाच्या निमित्ताने त्यांना सूड उगविण्याची संधी मिळाली. परंतु या आरोपातून काही निष्पन्न होईल असे दिसत नाही. अजून काही दिवसांनी सदावर्ते जामिनावर बाहेर येतील. तोपर्यंत त्यांना जास्तीत जास्त त्रास दिला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+१

Trump
गुरुवार, 04/21/2022 - 14:43 नवीन
परंतु या आरोपातून काही निष्पन्न होईल असे दिसत नाही. अजून काही दिवसांनी सदावर्ते जामिनावर बाहेर येतील. तोपर्यंत त्यांना जास्तीत जास्त त्रास दिला जाईल.
+१ -- आरोपाची फायल दाबुन ठेवायची आणि विरोधात गेला की सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या असली प्रथा बंद व्ह्यायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सदावर्ते

sunil kachure
गुरुवार, 04/21/2022 - 16:00 नवीन
ज्या बिल्डिंग मध्ये राहतात त्या बिल्डिंग च maintance पण भरत नाहीत हा माणूस काही सत्यवादी नाही. उगाच त्याचे समर्थन राजकीय दृष्टी कोनातून करण्याची गरज नाही . जो माणूस maintance भरत नाही पण सर्व सुविधा वापरतो तो काय लायकीचा असेल. राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणालाच चांगले किंवा वाईट ठरवू नका. राजकीय पक्ष तुम्ही म्हणजे सामान्य नागरिक ह्यांना काडी ची किंमत देत नाहीत. सर्व सत्तेचा सारीपाट असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा