अभियांत्रिकीचे दिवस-३.. सबमिशन्स
पहिल्या वर्षाच्या शेवटच्या परीक्षेच्या तडाख्यात, निम्मी-अर्धी जनता जबर जखमी व्हायची. पण कसेतरी बॅकलॉग घेऊन, रडत खडत दुसऱ्या वर्षाचा जुगाड लागायचा. उरलेली जी जनता गचका खायची त्यांची व्हॅकन्सी डिप्लोमाच्या पोरांनी भरून काढली जायची.
ज्याप्रमाणे घरात नवीन आलेल्या सुनेला तिची सासू वेगवेगळ्या आयडिया काढून, घरात मिसळून घ्यायची टाळाटाळ करते, त्याच प्रकाराची एक आवृत्ती रेग्युलरची पोरं ह्या डिप्लोमाच्या पोरांच्या बाबतीत सादर करायची.
"आम्ही तुमच्या आधीपासून इथं आहोत. त्यामुळं इथल्या सगळ्या रिसोर्सेसचा लाभ घेताना आधी आम्हाला विचारलं गेलं पाहिजे", असा ह्या रेग्युलर पोरांचा दावा असायचा.
पण डिप्लोमाची पोरं बारा गावचं पाणी पिऊन आलेली असल्यामुळं ह्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करून, सबमिशनच्या वेळी कळेल कोण सासू आणि कोण सून ते, म्हणून त्यांचं त्यांचं चालू ठेवायची.
अर्थात हे फ्रिक्शन जास्त वेळ टिकायचं नाही.
दिवस निवांत, आपोआप जात राहायचे.
हा आळसावलेल्या गोगलगायीसारखा निवांतपणा सदैवच असायचा असं नाही.
मढ्यासारखं सुस्त पडलेल्या हॉस्टेलला सेमिस्टरच्या शेवटी हळू हळू जाग यायला लागायची.
अंगाला लागलेली वाळवी खरवडायला आणखी थोडा वेळ जायचा.
तोपर्यंत सबमिशन्सच्या महापूराचे पाणी गळ्याशी आलेलं असायचं. मग सगळ्यांची जीवाच्या आकांतानं हातपाय मारायला सुरुवात व्हायची.
भांडवल-कॉपी शोधणं, ही पहिली आणि तातडीची टास्क..!
गर्ल्स होस्टेलवर सगळ्याच विषयांच्या भांडवल कॉप्या नेहमीच तयार असायच्या. मग त्यांच्याशी सलोख्याचे संबंध असलेल्या एका मध्यस्थाला त्या मोहिमेवर पाठवलं जायचं किंवा हौसेखातर तो स्वतःच जायचा.
तिथं जाऊन तो,
'' वाढा वो sss माय '' '' काय शिळं- पाकं सबमिशन आसलं तर द्या वो माय sss ''
अशा पद्धतीनं मन लावून भीका मागायचा.
आणि ते रेडीमेड फायलींचं बोचकं पाठीवर बांधून होस्टेलवर आणायचा.
तोपर्यंत होस्टेलवर सगळीकडे बुभूक्षित आदिमानव त्याची वाटच बघत बसलेले असायचे.
मग जे काही आपल्याला सुरुवातीला झेपेल, ते उष्टं खरकटं सबमिशन हातात घेऊन सगळे जीव तोडून लिहित सुटायचे. कारण टर्म एन्ड आठवड्यावर आलेली असायची.
अशाच काळात लोकल पोरांचा होस्टेलवर बाजार उठायला सुरुवात व्हायची.
'' भावाsss तूच आहेस!! ''
असे आणि वेगवेगळ्या बाइक्सचे आवाज अहोरात्र, होस्टेलच्या कॉरिडॉरमधून घुमायला लागायचे आणि मागची सगळी खुन्नस विसरून तात्पुरते गळ्यात गळे घातले जायचे.
गर्ल्स होस्टेलवरून सबमिशन आणायला गेलेल्या मध्यस्ताबरोबर खंडीभर गाईडलाईन्सही आलेल्या असायच्या.
या गाईडलाईन्स मुख्यतः काळजीयुक्त आणि किनऱ्या आवाजातल्या असायच्या.
उदारणार्थ..
"असाइन्मेंट्स चुरगाळू नकोस हं "
"फाईलवर डाग पडू नकोस हं"
"फाईल कुणाला देऊ नकोस हं"
अर्थात सूचनांकडे ताबडतोब दुर्लक्ष व्हायचं. कारण त्या फाईलीतली पानं नंतर सतरा ठिकाणी फिरत राहायची.
कोण कंट्रोल ठेवणार ? आणि एवढा वेळ कुणाकडे असणार होता..!
कुणालातरी लिहिता लिहिता त्यावर डुलकी लागू शकते, त्यांच्यावर कुणाच्या वडापावचा डाग पडू शकतो..
कुणी लिहिता लिहिता बसल्या जागेवरून खिडकीच्या दिशेनं तोंड करून मारलेली पिचकारी त्या पानांवर रिटर्न उडू शकते..
कधी कधी त्यातली गहाळ झालेले ग्राफ्स सहा- सात महिन्यांनी कुणाच्यातरी गादीच्या किंवा कपाटाच्या कोपच्यात सापडलेले आढळू शकतात..
अशा हजारो शक्यता..!
आपण काय काय बघणार ? आपलं आपलं सबमिशन झाल्याशी मतलब.
अशी जबाबदारी झटकण्याची ट्रेनिंग तिथं सगळ्यांनाच आपोआप मिळालेली असायची.
"कंझ्युमर्स स्टोअर उघडलंय काय बे ?" असा एक लाखमोलाचा रोकडा सवाल याच काळात उपस्थित व्हायचा.
मग एकजण एका खटारा स्कूटीवरून कोऱ्या फायली, इंडेक्स, पेजेस, ग्राफ्स, शीट्स सगळ्यांसाठी आणायचा.
सबमिशन लिहिताना " काय लिहितोय " कशासाठी लिहितोय" "कुठल्या प्रॅक्टिकलचे रीडींग्ज लिहितोय" असले फालतू प्रश्न कुणालाच पडायचे नाहीत.
कारण ते कागद ऑल-रेडी सतरा ठिकाणांवरून झिरपत झिरपत त्यांच्यापर्यंत आलेले असायचे.
आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्यातला मजकूर गाळून गाळून आणि हक्कानं १५-२० चुका करूनच पुढच्यांपर्यंत पोचवलेला असायचा.
आणि चुकून एखाद्याला लिहिताना समजा काही डाउट आलाच तर "मरू दे च्यायला !! चेकिंगच्या टायमाला मास्तरनं पकडलंच तर बघू पुढच्या पुढं!! " असं म्हणायची पद्धत होती.
स्वतः उठून रेफरन्स बुक्स शोधून करेक्शन करायचा दम कुणातच नसायचा...!
कारण उघड आहे !! त्यावेळेपर्यंत त्या सेमिस्टरला "नेमके विषय कुठले कुठले आहेत" ह्याचाच पत्ता नसायचा.
याच काळात काही मोक्याच्या ठिकाणी GT चा (ग्लास ट्रेसिंगचा) सेट लावून ठेवलेला असायचा.
ते लोक जाडजूड रेफरन्स बुक्सचा उपयोग फक्त GT च्या ग्लासला दोन्ही बाजूला सपोर्ट लावायला करायचे..
शेकडो जणांच्या शीट्सची भेंडोळी जोपर्यंत ट्रेस होऊन बाहेर पडत नाहीत तोपर्यंत ही GT ची भट्टी दिवसरात्र सेवा देत राहायची.
शेवटी शेवटी दिवसरात्र GT मारून मारून झिंगलेले डोळे, आंघोळीला आठवडेच्या आठवडे वेळ न मिळाल्यामुळे सगळ्यांनाच येणारा सूक्ष्म वास, त्यात सिगरेटींचा वास मिक्स झाल्यामुळं तयार होणारं एक "डेडली कॉम्बिनेशन"... असा सगळा वैताग माहौल सबमिशन्सच्या काळात सगळ्या होस्टेलभर पसरलेला असायचा..!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तिथं जाऊन तो,
=))
जबराट
आम्ही डिप्लोमा वाले ....
भारी... तुच रे भावा
खासंच
GT ला काय बोलायची नाय हा
चांगलच आहे
सबमिशन बनवण्याची ची रात्र
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
GT फार महत्वाचे साधन
हे सगळं ठीक आहे, पण असं करून
अभियांत्रिकी महाविद्यालयात
मजेशीर अनुभव . मिशन
छान!
जी टी वर अभ्यास करून अभियंता
त्यांच्या गर्ल फ्रेंड्स
तिसरा भाग चांगलाच रंगलाय....