✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आणीबाणीची चाहूल- भाग १२

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Mon, 06/21/2021 - 13:13  ·  लेख
लेख
यापूर्वीचे लेखन आणीबाणीची चाहूल- भाग १ आणीबाणीची चाहूल- भाग २ आणीबाणीची चाहूल- भाग ३ आणीबाणीची चाहूल- भाग ४ आणीबाणीची चाहूल- भाग ५ आणीबाणीची चाहूल- भाग ६ आणीबाणीची चाहूल- भाग ७ आणीबाणीची चाहूल- भाग ८ आणीबाणीची चाहूल- भाग ९ आणीबाणीची चाहूल- भाग १० आणीबाणीची चाहूल- भाग ११ मागच्या भागात आपण १२ जूनला अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर दिल्लीत झालेल्या घटनांचा परामर्श घेतला. १९७५ पूर्वीपासूनच इंदिरा गांधी त्यांचे कनिष्ठ पुत्र संजयवर अधिक प्रमाणावर अवलंबून राहायला लागल्या होत्या. असे म्हणतात की १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या 'इंदिरा हटाओ' ला प्रत्युत्तर म्हणून इंदिरांकडून 'गरीबी हटाओ' चा नारा दिला त्यामागे संजयचे डोके होते. आताही संजयच या अडचणीच्या वेळेस आपल्यामागे उभा राहिल आणि यातून मार्ग काढेल अशी इंदिरांना विश्वास होता. देहरादूनचे डून स्कूल आणि स्वित्झर्लंडमधील एक बोर्डिंग स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या संजयने इंग्लंडमध्ये रोल्स रॉईस या उंची गाड्यांची निर्मिती करणार्‍या कंपनीच्या कारखान्यात त्याने तीन वर्षे उमेदवारी केली होती. भारतात परतल्यावर सामान्य लोकांना गाडी परवडायला हवी या उद्देशाने मारूती मोटर्स लिमिटेड या कंपनीची स्थापना त्याने केली. sanjay संजय गांधी आपल्या आईबरोबर (संदर्भः https://www.sundayguardianlive.com/wp-content/uploads/2020/06/Untitled-design-4-2.png) संजयने आपल्याभोवती काही लोकांचा गोतावळा उभा केला होता. त्यात महत्वाचे होते यशपाल कपूरांचे भाचे राजिंदर कुमार धवन (आर.के.धवन). हे धवन इंदिरा गांधींच्या पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त खाजगी सचिव होते. एकेकाळी रेल्वेमध्ये कारकून म्हणून कामाला असलेले धवन थेट पंतप्रधान कार्यालयात पोहोचले ते आपले मामा यशपाल कपूर आणि संजय यांच्या आशीर्वादाने. संजय या धवनकरवी सरकारी कामात लुडबूड करायला लागला होता. धवन आता इतके ताकदवान झाले होते की ते पंतप्रधानांच्या नावाने कनिष्ठ मंत्र्यांना परस्पर खडसावू शकत. Dhawan आर.के.धवन इंदिरा गांधींबरोबर (संदर्भः https://gumlet.assettype.com/nationalherald/2018-08/70a378d3-ec85-4f87-997e-043d72fa9b36/congress_party_mourn_passing_of_veteran_leader_rk_dhawan_aged_81_former_prime_minister_indira_gandhi.jpg?w=1200&h=675) संजयच्या गोतावळ्यामध्ये आणखी एक नाव होते आणि ते म्हणजे हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल यांचे. याच बन्सीलालांनी संजयच्या मारूती कंपनीला गुरगावजवळ मानेसर येथे जवळपास ३०० एकर जमिन देऊ केली होती. संजय-धवन-बन्सीलाल या तिघांना इंदिरा गांधींभोवतीची त्रिमूर्ती असे म्हटले जायचे. कोणत्याही थराला जाऊन इंदिरांसाठी वाटेल ते करून देणे हा या तिघांचा हातखंडा होता. Bansilal बन्सीलाल (संदर्भः https://www.jagranimages.com/images/13_09_2019-bansilal_19573458.jpg) इंदिरांच्या गोतावळ्यामध्ये आणखी एक गृहस्थ होते. ते होते काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरूआ. इंदिरा गांधींचे दिवंगत पती फिरोज गांधींचे हे मित्र होते. फिरोज आणि इंदिरांमध्ये मतभेद होत असताना दोघांमध्ये मध्यस्थी करून समेट घडवून आणायचा प्रयत्न या बरूआंनी वेळोवेळी केला होता. काँग्रेसमध्ये असले तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी जवळीक असलेले काही नेते होते. त्यात चंद्रजीत यादवांबरोबर या बरूआंचाही समावेश होता. संजयला कम्युनिस्ट अजिबात आवडायचे नाहीत त्यामुळे या बरूआंविषयी त्याचे मत फारसे चांगले नव्हते. पण आताचा प्रसंगच असा होता की असल्या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेऊन सगळ्यांना एकत्र येणे भाग पडले. Barua देवकांत बरूआ (संदर्भः https://lh3.googleusercontent.com/proxy/34Ft6MbvMKg-GDPicDXBLloy_KvvhLvm0i-sEez_Ca19V0vPSzkUWLmIoE4ooMRjJM0ir_-Ht7Ke1YAwGJPw0dhbqPiXiIfzAJLAOJSYfAtq-YUR1jOvBu2hm6naIORfns72tSC25AGnuUTN17gqP03AfHosfynKb2J7U_Tfcd4_Cnk_X4Z1Rl5inn-eOfEl8RsPivCEvQO_jYHafr9Wto_pEwinWMW22C_5U7FUwkRMq-wVhWA) १९६९ मध्ये इंदिरांनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला होता तेव्हा त्या निर्णयाच्या समर्थनार्थ पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांची गर्दी जमली होती आणि त्या निर्णयाच्या बाजूने घोषणाबाजी त्यांच्याकडून होत होती. ही गर्दी जमा करण्यात त्यावेळी पंतप्रधान कार्यालयात विशेष अधिकारी असलेल्या यशपाल कपूर यांनी पुढाकार घेतला होता. त्याचीच पुनरावृत्ती करायचे ठरले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालात यशपाल कपूर यांच्या नावाचा थेट उल्लेख असल्याने ते यावेळी प्रत्यक्षपणे यात नव्हते तर त्यांचे भाचे आर.के.धवन यांनी उत्तर भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना (पंजाबचे मुख्यमंत्री ग्यानी झैलसिंग, हरियाणाचे मुख्यमंत्री बन्सीलाल, राजस्थानचे मुख्यमंत्री हरिदेव जोशी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हेमवतीनंदन बहुगुणा) पंतप्रधान कार्यालयातून फोन केले आणि इंदिरांच्या समर्थनासाठी लोक पाठवायचा आदेश दिला. या चारही मुख्यमंत्र्यांनी लगेच त्या आदेशाचे पालन केले. १३ आणि १४ तारखेला संध्याकाळी या गर्दीपुढे भाषण करायला बाहेर आल्या. या दोन्ही दिवशी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केले. इंदिरा नक्की काय म्हणाल्या याविषयी सोशालिस्ट इंडियाच्या १४ जून १९७५ च्या अंकात आलेली बातमीच इथे देतो. news सोशालिस्ट इंडियाच्या २१ जून १९७५ च्या अंकात इंदिरांच्या समर्थनार्थ दिल्लीत लावलेल्या पोस्टर्सचा पुढील फोटो होता. poster १८ जूनची काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक १८ जूनला दिल्लीत काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. तरूण तुर्क सोडून काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेतील सगळे खासदार या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी यशपाल कपूर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार असल्याने ते पण या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी 'देश की नेता इंदिरा गांधी' अशी घोषणा दिली. काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरूआंनी यावेळी बोलताना लाचारीची आणि लाळघोटेपणाची परमावधी गाठत Indira is India, India is Indira हे वक्तव्य केले. या घोषणेमुळे आपले नाव इतिहासात कायमच काँग्रेसचा एक दरबारी भाट म्हणून अनादरानेच घेतले जाईल अशी व्यवस्था देवकांत बरूआंनी करून ठेवली. संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांना आता आपल्याला पंतप्रधानपद मिळणे शक्य नाही हे लक्षात आले असावे. कारण त्यांनीही या बैठकीत 'What happens to her happens to India and what happens to India happens to her' असे काहीसे त्या प्रकारचेच वक्तव्य दिले. या बैठकीला स्वतः इंदिरा गांधी पण उपस्थित होत्या. त्या तिथून लवकर निघाल्या. त्या बैठकीतून गेल्यानंतर काँग्रेस संसदीय पक्षाने परत एकदा इंदिरा गांधींच्या समर्थनाचा ठराव पास केला. २० जूनची काँग्रेस पक्षाची बोट क्लबमधील सभा २० जूनला इंदिरांच्या समर्थनासाठी काँग्रेस पक्षाने एक मोठ्या सभेचे आयोजन केले. या सभेसाठी परत एकदा वर उल्लेख केलेल्या चार मुख्यमंत्र्यांना या सभेसाठी लोक पाठवायचा आदेश संजयच्या चौकडीतून दिला गेला. या सभेसाठी उत्तर प्रदेशातून अगदी वाराणसीपासून लोक आणले गेले. दिल्लीचे उपराज्यपाल आणि माजी आय.सी.एस अधिकारी किशन चंद यांनी तर 'इंदिरांच्या समर्थनासाठी लोकांचा महापूर आणायला हवा' असे म्हटले. या किशन चंद यांचे सचिव होते २००८-०९ या काळात मुख्य निवडणुक आयुक्त झालेले नवीन चावला. किशन चंद आणि नवीन चावला यांनी २० तारखेच्या सभेसाठी दिल्लीतील डी.टी.सीच्या बस सामान्य लोकांसाठी जवळपास शिल्लक ठेवल्याच नाहीत तर दिल्लीतील जवळपास सगळ्या बस या सभेसाठी लोकांची ने-आण करायला वापरल्या. २० तारखेची बोट क्लबवरील सभा प्रचंड मोठी होती. स्वतः इंदिरा गांधींनी या सभेला 'a sea of humanity' असे म्हटले. या सभेला काँग्रेसचे सगळे मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेत परत एकदा देवकांत बरूआंनी आपल्या लाचारीचे प्रदर्शन घडविले. 'इंदिरा तेरे सुबह की जय, तेरे शाम की जय, तेरे नाम की जय, तेरे काम की जय' अशी घोषणा आणखी एकदा दिली. या सभेत इंदिरा गांधींनी विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. आपण गरीबांसाठी लढत असल्यानेच त्यांच्या डोळ्यात खुपत होतो. या लोकांना आपल्याला निवडणुकीत हरवता येणे शक्य नाही म्हणून ते लोक ही लढाई न्यायालयाकरवी लढत आहेत अशा स्वरूपाचा आरोप त्यांनी परत एकदा केला. या सभेची २१ जून १९७५ च्या सोशालिस्ट इंडियाच्या अंकात आलेला फोटो इथे देत आहे. boat club या भागात आपण बघितले की राजीनामा द्यायचा नाही हे नक्की केल्यानंतर काँग्रेसच्या जी-हुजूर संस्कृतीचे आणि लाचारीचे ओंगळवाणे प्रदर्शन पुढील काही दिवस चालू होते. या कामासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून सरकारच्या बस इंदिरांच्या समर्थनासाठी लोकांची ने-आण करायला वापरल्या गेल्या. आणीबाणी आणायची तयारी तेव्हापासूनच चालू होती. मागच्या एका भागावरील एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे ८ जानेवारी १९७५ रोजी सिध्दार्थ शंकर रे यांनी इंदिरांना लिहिलेल्या एका पत्रात 'कडक भूमिका घ्या' अशा स्वरूपाची मागणी केली होती. अनेक पुस्तकांमध्ये असा उल्लेख असतो की २५ जूनच्या सभेत जयप्रकाश नारायणांनी लष्कर आणि पोलिस यांना इंदिरा सरकारचे आदेश मानू नका असे आवाहन केल्यामुळे इंदिरांनी आणीबाणीची घोषणा केली. आणखी एका पुस्तकात मी असेही वाचले आहे की आणीबाणी आणावी ही कल्पनाच सिध्दार्थ शंकर रेंनी इंदिरांच्या मनात २५ जूनच्या संध्याकाळी भरवली आणि मग आणीबाणी लादली गेली. पण तुरूंगात टाकायच्या नेत्यांची यादीचा पहिला आराखडा १५ जूनच्या सुमारासच पूर्ण झाला होता आणि त्यावर संजय लक्ष ठेऊन होता. त्यावरून आणीबाणी लादायचे अचानक ठरले असे वाटत नाही. याविषयी पुढच्या भागात लिहेन. अवांतरः २०१७ मध्ये आलेल्या इंदू सरकार चित्रपटात नवीन सरकार हा आणीबाणीकाळात उच्चपदस्थ सरकारी अधिकारी दाखवला आहे आणि त्याने शेवटी आत्महत्या केली असेही दाखवले आहे. मला वाटते की नवीन सरकार हे पात्र दिल्लीचे उपराज्यपाल किशन चंद आणि त्यांचा सचिव नवीन चावला या दोघांच्या मिश्रणातून या चित्रपटासाठी तयार केले गेले असावे. कारण १९७८ मध्ये किशन चंद यांनी आत्महत्या केली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21140 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

कायम आत्मविश्वासाने ठोकून

श्रीगुरुजी
Tue, 06/29/2021 - 00:07 नवीन
कायम आत्मविश्वासाने ठोकून देणाऱ्यांना, आपण आधीच्या प्रतिसादात काय ठोकलं होतं याचं सोयिस्कर विस्मरण होत असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

खरयं.

सुक्या
Tue, 06/29/2021 - 02:02 नवीन
खरयं. आतिशय चांगल्या मालिकेच्या या धाग्याचे काश्मिर होउ नये म्हंणुन इथेच थांबतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

राजेश188 प्रत्येक धाग्यावर

रावसाहेब चिंगभूतकर
Tue, 06/29/2021 - 10:56 नवीन
राजेश188 प्रत्येक धाग्यावर जाऊन घाण करून येतात.
  • Log in or register to post comments

:)

शा वि कु
Tue, 06/29/2021 - 11:34 नवीन
कोणाचा दुआयडी ? माझा तर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रावसाहेब चिंगभूतकर

हे नाव तुम्ही मिपा वर कसा

सुबोध खरे
Tue, 06/29/2021 - 19:57 नवीन
हे नाव तुम्ही मिपा वर कसा खोदलं?
  • Log in or register to post comments

पु भा प्र

आनन्दा
Wed, 06/30/2021 - 08:34 नवीन
पु भा प्र
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा