असं नको.. तसं लिही..

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
18 Jun 2021 - 10:34 pm

नाही.. नाही.. ही सगळी वाक्यं म्हणजे खाणीतनं आत्ताच फोडून काढलेल्या दगडांसारखी टोकदार आणि खुनशी झाली आहेत..
समजा ह्यातलं एकेक वाक्य हातात घेऊन भिरकावून दिलं तर उगाच डोकं-बिकं फुटायचं कुणाचंतरी..
आणि तुझ्या मागं लचांड लागायचं.. त्यातून तू एक नंबरचा पेद्रट मनुष्य असल्यामुळे तुला लचांड वगैरे नकोच असणार !
आणि 'मनुष्य' म्हटल्यावर इकडं तिकडं चमकून बघू नकोस.. 'मनुष्य' म्हणजे माणूस..! होमो सेपियन सेपियन..!

असो.. आता एक काम कर... ह्याची धार थोडी मऊ कर... एकेका वाक्यावर हात फिरवून बघ... भिऊ नकोस.. तूच लिहिलंयस ते..आपलाच हात आपल्याला लागत नाही...
एकेका शब्दाकडे नीट बघ... पॉलिश कर.. माणसाळव त्यांना.. सभ्य सुसंस्कृत कर ... !

आता उदाहरणार्थ 'मी त्यांना झ्याटावरनं कोलतो' हे वाक्य घे... ह्याच्यामध्ये जो विवक्षित शब्द आहे, त्याच्यामुळे अंगावर पाल पडल्यासारखं होतं.. थोडं सॉफ्ट कर.. लिही.. 'मी त्यांना जुमानत नाही'.. हे छान आहे, अर्थही बदलत नाही, आणि शिवाय भावनाही व्यवस्थित पोचतात..!

घंटा ss..! शब्दांतला सगळा जाळ निघून गेल्यावर काय झ्याट्याच्या भावना पोचणार..!

छि: छि: छि: फारच ग्राम्य आहेस बुवा तू... पुन्हा पुन्हा तोच विवक्षित शब्द वापरतोयस.. खाजगीत बोलताना कसंही बोललं तर चालतं, पण लिहिताना एकेक वाक्य सावडून घेतलेलं बरं असतं... असो.. थोडंसं संपादन केलं की होऊन जाईल.. !

अच्छा ..? पण काय होऊन जाईल? आणि काय व्हायला पाहिजे? किंवा काय होऊ? आणि असं होता येत असतं का?

हो..!
बरंच काही होता येतं..!
किंवा बराच काही हो..!

उदाहरणार्थ..

हा तुझ्या जातीचा उल्लेख काढून टाक.. आधुनिक हो..!
हा तुझ्या धर्माचा उल्लेख काढून टाक.. सेक्युलर हो..!
सुरे तलवारी घेऊन भोकसत फिर .. कट्टर हो.!
गांधींसारख्या गोड म्हाताऱ्याला गोळ्या घाल.. राष्ट्रभक्त हो..!

अग्रलेख लिही. रोज सगळ्या दुनियेला डोस पाज. सदैव नाक उंच ठेव... बुद्धिजीवी हो..!

सिग्नलवर (पोट जाळण्यासाठी) लिंबू-मिरच्या विकणाऱ्यांकडे बघून तेच नाक मुरड.. पुरोगामी हो..!

सवाई गंधर्वला जाऊन उगाचच मान डोलव.. सुसंस्कृत हो..!

मराठी बिराठी असलं काही नसतं, असं मान... ग्लोबल हो..!

अजून सांगायचं झालं तर..

बापाला येड्यात काढ, शेतीवाडी सगळी फुंकून टाक.. शहरी हो..!
पोरींना फक्त सुरुवातीलाच इंप्रेस कर.. लिबरल हो..!
आणि मग चान्स मिळेल तेव्हा मजा मार... पुरूष हो..!

ह्या सगळ्या भोगांचा कंटाळा आला की संन्यासी हो..
विपश्यनेसाठी वगैरे जा दहा दिवस...
कायमचा नकोस जाऊ.. दुनियेत अजून भरपूर मज्जा बाकी आहे.. परत ये..

मेडीटेशन वगैरे करतोस की नाही ?
मग मेडीटेशनमध्ये अडथळा आणणाऱ्या डासांना जोरजोरानं शिव्या दे..

शिवाय अधूनमधून चार पेग घेऊन, बधिर हो.. !
आणि लगेच मन:शांतीवर सभा हेपलायला सुरुवात कर...!
शरीर मन आत्मा कांदा बटाटा लसूण वगैरे..

तीन हातांची जेजुरी रे ss
त्यात आत्मा मल्हारी रे ss

जेजुरी? कुठली जेजुरी? अरुण कोलटकरांची?
की सासवडच्या पुढची?

नाय रे वेड्या ... ही वेगळी जेजुरी आहे..!
कवीनं इथं 'शरीराला' जेजुरीची आणि 'आत्म्याला' मल्हारीची उपमा दिलीय..!
आणि प्रत्येकाच्या आतला मल्हारी सेमच असला, तरी आपापली जेजुरी सांभाळण्याची भानगड ज्याच्या त्याच्यावरच टाकण्यात आलेली आहे..!

म्हणून आपण फक्त आपापली जेजुरी सांभाळत रहायचं..
दुनियेला आग लागली तरी फरक पडू द्यायचा नाही..
लक्षच द्यायचं नाही तिकडं...!
कान डोळे त्वचा घट्ट बंद करून घ्यायचं...!
आपलं आपलं सरळ नाकापुढं जगायचं..!
मग आपली जेजुरी सुरक्षित राहते..!
आत्मा वगैरे काय.. येत जात राहतो..!!

मुक्तकप्रकटनलेख

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

18 Jun 2021 - 10:58 pm | सौन्दर्य

मनातला क्षोभ, तळमळ, मळमळ प्रकट करायला नेहमीच शिव्यागाळ, अपशब्दांचा वापर करणे गरजेचे आहे का ? कबुल आहे की शिव्या, अर्वाच्य भाषा एक प्रकारचा सणसणीत पंच देतात पण तरीदेखील सुसंस्कृतपणा, सभ्यता, सामोपचार ह्यांपासून फारकत घ्यावीच असे नाही. कारण जर प्रत्येक जण अर्वाच्य भाषा वापरू लागला तर समाजमानस ढासळायला वेळ लागणार नाही व ते कोणत्याही संस्कृतीला परवडणारे नाही.

एक लहानपणीचा किस्सा सांगतो, वर्ष असेल १९६५. माझ्या एका मित्राच्या घरी त्याची बहीण बोलता बोलता "च्यायला" म्हणाली. त्या बरोबर तिची आई तापली व तिला जाब विचारू लागली, त्यावर त्या मुलीने मखलाशी केली की मी "हत्तीच्या आईला चार पाय म्हणत होती". त्या मुलीला पण माहीत होते की तिने त्या काळासाठी अपशब्द उच्चारलाय व त्यावर सारवासारव केली. आज काल मुलं किंवा पुरुषांचे जाऊच दे, मुली देखील बोलता बोलता "घंटा" किंवा "क्या उखाड लेगा ?" वगैरे शब्द उच्चारतात ते मलातरी बोचतात.

इतरांचे माहीत नाही.

पाटिल's picture

20 Jun 2021 - 7:44 am | पाटिल
पाटिल's picture

20 Jun 2021 - 7:44 am | पाटिल
पाटिल's picture

20 Jun 2021 - 7:47 am | पाटिल

सौंदर्य
तुम्ही ते सगळं वाचलंत आणि तुम्हाला जे जाणवलं ते तुम्ही प्रांजळपणे शेअर केलंत, ह्यासाठी आभार...!
त्यातले काही शब्द, काही मजकूर तुम्हाला थोडासा इरिटेटींग वाटलेला आहे, असं दिसतंय आणि त्याबद्दल तुम्ही मला माफ केलं पाहिजे, आणि हे मी अगदी मनापासून म्हणतोय..!
कारण तसं काही व्हावं असा उद्देश नव्हता त्यात..

पण
<< कारण जर प्रत्येक जण अर्वाच्य भाषा वापरू लागला तर समाजमानस ढासळायला वेळ लागणार नाही व ते कोणत्याही संस्कृतीला परवडणारे नाही.>>

ह्याबद्दल मी थोडा साशंक आहे..
ढासळणं किंवा समृद्ध होत जाणं हे सगळं रिलेटीव्ह असावं.. म्हणजे आपण कोणत्या बिंदू वरून त्याकडे बघतो, त्यावर ते ठरत असेल..
शिवाय भाषेचे एकमेकांत गुंफलेले असंख्य पदर असतात, हजारो वर्षांची जटील प्रक्रिया असते ती आणि ते सगळेच पदर कळत नकळत समाजमानस तोलून धरत असतात.. आणि
त्यामुळे 'प्रत्येक जण अर्वाच्य भाषा वापरू लागला तर समाजमानस ढासळायला वेळ लागणार नाही' हे जरी खरं असलं तरी...
प्रत्येकजण जर सर्ववेळ तुपाळ मधाळ मराठी बोलायला लागला तर त्या फोफशा समाजात रहायला मला तरी आवडणार नाही.. उगाच डायबेटीस वगैरे होऊन जायचा..! :-)

P S: वि का राजवाडे ह्यांचा 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' म्हणून एक संदर्भग्रंथ आहे... तर त्यात साधारण अडीच तीन हजार वर्षांपूर्वीच्या त्या समाजात स्त्री पुरुष ज्या जाहीर पद्धतीने आपापसातल्या लैंगिक संबंधांचा उल्लेख करत होते, ते वाचून मी स्वतःच बऱ्यापैकी उत्तेजित झालो होतो, हे एक आठवतंय..

सौन्दर्य's picture

20 Jun 2021 - 9:15 am | सौन्दर्य

माफी ? आणि ती हो कशासाठी ? तुम्ही तुमच्या मनातले विचार मांडलेत मी माझ्या. येथे विचारांची मुक्त देवाण-घेवाण अपेक्षित आहे. त्यामुळे माफिबिफिची काही गरजच नाही.

शिव्या किंवा अर्वाच्य भाषा ही कुकरच्या शिटीसारखी आहे कारण ज्यावेळी मनात अनावर राग साठला जातो पण आपण काहीही करण्यास हतबल असतो त्यावेळी त्या परिस्थितीला अथवा व्यक्तीला उघडपणे किंवा मनातल्या मनात शिव्या देण्याने रागाचा बऱ्यापैकी निचरा होतो व तुमच्या म्हणण्याप्रमाणे डोक्यात खोरी घालण्याची पाळी येत नाही हे ही तितकेच खरे आहे.

हे सर्व असले तरी काही शिष्टसंमत भाषा आहे जी वापरल्याने सुसंकृतपणा बर्यापैकी टिकून राहतो असं माझं प्रांजळ मत आहे.

गुल्लू दादा's picture

18 Jun 2021 - 11:58 pm | गुल्लू दादा

आवडलं..छान लिहिता. येऊ द्या अजून.धन्यवाद.

संजय पाटिल's picture

19 Jun 2021 - 8:40 am | संजय पाटिल

बरंच काही होता येतं..!
किंवा बराच काही हो..!

खरोखर कितीजण होतात आणि कितीजण होण्याचं सोंग घेतात?

प्रसाद गोडबोले's picture

19 Jun 2021 - 10:56 am | प्रसाद गोडबोले

उत्तम.

पण हे मराठी भाषेचे एक अप्रतिम वैशिष्ठ्य आहे !
मराठी मध्ये शब्दांच्या निवडीवरुन , वाक्यरचनेवरुन, आणि उच्चारांवरुन आपण एखाद्या व्यक्तीचा सामाजिक दर्जा ओळखु शकतो.
माझे सर्वजातीधर्मातील मित्र असल्याने माझ्या बोली भाषेत इतर शब्दांची सरमिसळ झालेली आहे , ती माझ्या लक्षात येत नाही पण घरच्यांच्या लक्षात येते .
मला आजही "लय" असे म्हणल्यावर घरातुन "खुप " " बख्खळ" "मुबलक" हे शब्द माहीत नाहीत का आपल्याला असा टोमणा ऐकायला मिळतो.
तरी नशीब की अजुनही माझ्या बोलण्यात आनी पानी लोनी असं येत नाही. न च्या जागी न , ण च्या जागी ण च येतो !

मी बोलता बोलता सहज चेष्टेत एकाला " माकडा" असे संबोधले , ते घरच्यांनी ऐकल्यावर " घरात शिव्या का देत आहेस" असा रागीट प्रश्न आला !! मी विचारलं की माकडा ही शिवी आहे का ? त्यावर आलेले उत्तर फार मौलिक होते - "वाचाशुध्दी फार महत्वाची आहे. आपल्याकडुन शाब्दिक हिंसा सुध्दा होता कामा नये. ही "आपली" भाषा आहे, तिचे विद्रुपीकरण होऊ न देणे आपल्याच हातात आहे ना ? काही लोकांना वाटतं की शिव्या हा भाषेचा अलंकार आहेत , वाटु दे बापडे ! आपली मराठी ही अमृतातेही पैजा जिंके अशीच असली पाहिजे , नाहीत तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक ? "

आम्हां घरी धन शब्दांचीच रत्नें | शब्दांचीच शस्त्रें यत्न करुं ||
शब्द चि आमुच्या जीवांचे जीवन | शब्दें वांटूं धन जनलोकां ||
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव | शब्द चि गौरव पूजा करुं ||

काही लोकांना वाटतं की शिव्या हा भाषेचा अलंकार आहेत , वाटु दे बापडे ! आपली मराठी ही अमृतातेही पैजा जिंके अशीच असली पाहिजे , नाहीत तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक ? "

अगदी तुमच्या(आणि फक्त तुमच्याच) शब्दात सांगायचे झाले तर...

एखाद्याला आपण अ‍ॅसहोल , गांडु , आणि अशा अनेक शरीर अवयवांवरुन शिव्या देतो , पण हेच आपल्या शरीराचे अवयव कसेही असले तरी आपण त्यांचा दुस्वास करतो का , नाही ना ! तसा विचारही आपल्या मनात येत नाही . तसेच समाजामध्ये हे असले अनेक भिन्न भिन्न प्रकारचे लोकं आहेत , त्यातील काही डाव्याहातासारखे अकार्यक्षम आहेत तर काही सरळ सरळ अ‍ॅसहोल सारखे आहेत, म्हणुन आपण त्यांचा मत्सर करणार का ?

आणि एका धाग्यावरील वरील प्रतिसादात आपणच मित्राचे नाव पुढे करून प्रतिसादात शिव्याचा वापर देखील केलात म्हणजेच तुम्ही शिवी देणारे मित्र राखता, त्याच्या शिव्यांचा स्वतःचा मुद्दा मांडायला वापरही करता आणि वरून काही लोकांना वाटतं की शिव्या हा भाषेचा अलंकार आहेत , वाटु दे बापडे ! आपली मराठी ही अमृतातेही पैजा जिंके अशीच असली पाहिजे , नाहीत तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक ? असेही सुनावता ना गडे...

@पाटील

माझ्या पुरते विचाराल तर प्रसंग पाहून भाषेची रचना असावी या मताचा मी आहे त्यामुळे मी अशुद्ध-प्रमाण अशा दोन्ही भाषेत व्यक्त होतो पण माझी कोणतीही प्रमाण भाषा नाही असं नाही... मी प्रमाण भाषेच्या जवळ जायचा शक्यतो प्रयत्न ठेवतो...

पाटिल's picture

20 Jun 2021 - 7:54 am | पाटिल

मार्कस,
प्रतिसादाबद्दल आभार.. _/\_

"वाचाशुध्दी फार महत्वाची आहे. आपल्याकडुन शाब्दिक हिंसा सुध्दा होता कामा नये. ही "आपली" भाषा आहे, तिचे विद्रुपीकरण होऊ न देणे आपल्याच हातात आहे ना ?"
हे सुंदर आहे..!!

पण शिव्यांनी नेहमी हिंसाच होते असं नाही.
उदाहरणार्थ कॉलेजवयीन मित्रांमध्ये साध्या संभाषणातही एकमेकांना सर्रास शिव्यांच्या स्वरूपातच प्रतिसाद दिला जातो... आणि ते एकमेकांशी असाधारण जवळीक असल्याचं, घट्ट बंध असल्याचंही लक्षण आहे, असं मला वाटतं..

शिवाय गावाकडं भावकीमध्ये बांधाच्या रेटारेटीवरून किंवा पाटाच्या (इरिगेशन कॅनल) पाण्यावरून जी बाचाबाची होते, त्यात सुरुवातीला मुख्यतः दोन्ही बाजूंनी शिव्यांचा पाऊस पडत असतो.. काय ती भाषेची रग असते..! म्हणजे भाषेचा जोम फेंसाडत, फुफाटत दोन्ही दिशांनी वाहत असतो अगदी..! आणि त्यातून एक मस्त ऊर्जामुक्तीचा अनुभव येतो, हलकं हलकं वाटतं, असा माझा तरी अनुभव आहे... त्यामुळे मग शेवटी एकमेकांच्या डोक्यात खोरं घालून शारीरिक हिंसेनं प्रश्न निकाली काढण्याची वेळ सहसा येत नाही, हे अजून एक बरं :-))

म्हणून आपण फक्त आपापली जेजुरी सांभाळत रहायचं..
दुनियेला आग लागली तरी फरक पडू द्यायचा नाही..
लक्षच द्यायचं नाही तिकडं...!
कान डोळे त्वचा घट्ट बंद करून घ्यायचं...!
आपलं आपलं सरळ नाकापुढं जगायचं..!
मग आपली जेजुरी सुरक्षित राहते..!
आत्मा वगैरे काय.. येत जात राहतो..!!

🙏 🙏 🙏

PS: पाटिल ह्या आयडीची नोंद घेण्यात आलीय!

- (आपली जेजुरी सांभाळण्याचा प्रयत्नात असलेला) सोकाजी

पाटिल's picture

20 Jun 2021 - 7:59 am | पाटिल

हा हा... धन्यवाद सोत्रि... _/\_

-(कुठेच ठसा उमटू नये, ह्याची काळजी घेणारा)
ओसाडगावचा पाटील